‘शोकनाटय़ तेच, अंक पुढचा’ हे संपादकीय (१८ मे) वाचले. त्यात एक वाक्य आहे : स्वत:स माणूस म्हणवून घेण्याची पात्रता कायम राहावी याकरिता का होईना परंतु ते (म्हणजे मानवाधिकार) समजून घेणे आवश्यक ठरते. त्याला अर्थातच पॅलेस्टाइनचा -आणि विशेषत: अलीकडच्या गाझा पट्टीतल्या निदर्शनांचा – संदर्भ आहे.

गाझाच्या लोकसंख्येपैकी सत्तर टक्के लोक इस्रायलने हाकलून दिलेले निर्वासित किंवा त्यांचे वंशज आहेत. गाझाचे जगण्याचे प्रश्न भीषण आहेत. तिथे बेरोजगारीचे प्रमाण ६४ टक्के आहे. मिळणारे पाणी पिण्यायोग्य नाही. गाझाला जमीन, पाणी, आकाश सगळीकडून अनेक वर्षे इस्रायलच्या सुरक्षा दलाने वेढा घातलेला आहे. इस्रायली पहाऱ्यातून गाझामध्ये येणारे अन्नधान्य मुक्तपणे येऊ शकत नाही. माणशी किती कॅलरीज लागतात याचा हिशेब करून ते आत सोडले जाते. तिथल्या भयंकर उन्हाळ्यातसुद्धा विजेचा पुरवठा दिवसातून जेमतेम चार तास होतो. तरुण-तरुणींना शिक्षण घेतल्यानंतर करिअर करायला तिथे वाव नाही; त्यामुळे तिथल्या काही मुलग्यांनी इस्लामी जिहाद किंवा हमासमध्ये सामील होऊन इस्रायलबरोबर सशस्त्र संघर्ष करणे हा जगण्याचा एक पर्याय म्हणून निवडला आहे. तुम्ही गाझाच्या सीमेवर का जाता, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका पत्रकाराने जेव्हा गाझामधल्या तरुणाला विचारले तेव्हा त्याचे उत्तर होते- असेही आम्ही मरतच आहोत; तसेही मरायचे आहे. त्यामुळे इस्रायली सैनिकांनी मला गोळ्या घातल्या तरी मला काही फरक पडत नाही.

तिथल्या एकूण जीवनावर केलेले हे हृदयद्रावक भाष्य आहे. ‘हारेत्झ’ या इस्रायली दैनिकाचे प्रतिनिधी गिडीअन लेवी यांनी गाझाचे वर्णन ‘छळछावणी’ या शब्दात केले आहे; तर जगात सर्वत्र गाझाचा उल्लेख ‘जगातला सर्वात मोठा खुला तुरुंग’ या शब्दांत केला जातो. वर्षांनुवर्षांची अशांतता आणि भांडणे यातून त्या ठिकाणी हमास किंवा इस्लामिक जिहादसारख्या संघटना प्रभावी आहेत यात आश्चर्य नाही. गाझाच्या जनतेने भडकू नये अशी अपेक्षा ठेवणे हे भरल्या पोटी ढेकर देऊन उपाशी माणसाला शांत राहण्याचा हितोपदेश करण्यासारखे आहे. ट्रम्प आणि नेतान्याहूसारख्या नेत्यांनी घडवलेल्या हिंसाचाराला आणि दादागिरीला आपण ‘स्वसंरक्षण’ म्हणतो; त्यांच्या सशस्त्र सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला आपण नेहमीच वैध मानतो; पण संकटांनी पोळून गेलेल्या सशस्त्र संघर्ष करणाऱ्या विस्कळीत माणसांना तशी सवलत देत नाही. त्यामागची गंभीर परिस्थिती नजरेआड करतो. धार्मिक दुजाभाव हा जसा इस्रायलमध्ये आहे तसाच भारतात वर्धिष्णू व्हावा; इस्रायलप्रमाणे इथे परमोच्चपदाला पोचावा असे इथे धर्माचे टिळे लावून फिरणाऱ्या काही मंडळींचे स्वप्न आहे आणि इस्रायली झायनवाद्यांचा कित्ता आपण इथे गिरवावा असे त्यांना मनोमन वाटतेय.

– अशोक राजवाडे, मालाड (मुंबई)

 

उशिरा सुचलेले शहाणपण

‘सरकारी सेवेतील ३६ हजार रिक्त पदे भरण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी’ ही बातमी (१७ मे) वाचली. याला म्हणतात, उशिरा आलेली जाग आणि उशिरा सुचलेले शहाणपण. सरकारच्या भौतिक विकासाच्या योजना कार्यान्वित करायच्या असतील, सार्वजनिक उपक्रम अमलात आणायचे असतील, पायाभूत सुविधा व कल्याणकारी योजनांचे लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर राज्यव्यापी शासन यंत्रणा पुरेशा मनुष्यबळानिशी समृद्ध आणि सज्ज असायला हवी; खासगीकरणाने सर्वच गोष्टी साध्य होत नाहीत याचे भान साडेतीन वर्षे राज्य केल्यानंतर सरकारला आले, असे वाटते. भाजप-शिवसेना युती सरकारची आरंभीची साडेतीन वर्षे सरकारी यंत्रणा आणि प्रशासन समजण्यात आणि शिकण्यात वाया गेली (शिवाय एकमेकांशी भांडण्यातही). त्यामुळे सरकारला आतापर्यंत राज्याच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या फक्त पोकळ गप्पा मारूनच वेळ मारून न्यावी लागत होती, हे अधोरेखित झाले. संतुष्ट कर्मचारीवर्ग व पुरेसे मनुष्यबळ, त्यायोगे सक्षम प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असेल तर, भौतिक आणि आर्थिक अशा दोन्ही आघाडय़ांवर राज्याला प्रगती साधता येईल.

– उल्हास गुहागरकर, गिरगाव (मुंबई)

 

 नॉट आऊट महाराज!

देशात सध्या सुरू असलेल्या कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पाश्र्वभूमीवर मला लहानपणी एका मासिकात वाचलेली विनोदी कथा आठवली.

आज अत्यंत लोकप्रिय असलेला क्रिकेटचा खेळ त्यावेळेच्या राजेमहाराजांची मिरासदारी होता व बहुतेक छोटय़ामोठय़ा संस्थानिकांचा स्वत:चा खासगी चमू असे. त्या गोष्टीतील राजांच्या संघाच्या प्रतिस्पर्धी संघाचा डाव संपून प्रस्तुत राजेसाहेबांच्या संघाचा डाव सुरू असताना फलंदाजीला एका टोकाला स्वत: राजेसाहेब होते. एका चेंडूवर ते त्रिफळाचित झाले असताना पंचाने तो चेंडू ‘नो बॉल’ जाहीर केला. थोडय़ा वेळाने राजांच्या पायावर गोलंदाजाचा चेंडू सरळ यष्टींच्या रेषेत आदळतो तरी पंच तत्परतेने त्यांना ‘नॉट आऊट’ देतो. महाराजांची फलंदाजी सुरूच राहते. थोडय़ा वेळाने महाराज धाव काढताना क्रिझच्या बाहेर असतानाच चेंडू यष्टय़ांवर आदळतो व महाराज धावचीत होतात. जोराने अपील होते. भांबावलेला पंच लगेच सावरतो व मोठय़ाने ओरडतो ‘डेड बॉल.. आपण खेळावं महाराज!’ अशा पद्धतीने राजेसाहेबांची टीम प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या ओलांडते व त्यांची जंगी विजयी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात येते.

– शरद फडणवीस, पुणे

 

‘त्या’ मुद्दय़ांचे आता काय काम?

कर्नाटकमधील निवडणूक झाली. आता भारतात अलिगढ विद्यापीठातील जिनांच्या चित्राबद्दल किंवा हरयाणामध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्याबद्दल कुठल्याही पक्षाला अडचण नाही.  त्या मुद्दय़ांचे आता काय काम? आता जेव्हा मध्य प्रदेश, राजस्थानच्या निवडणुका येतील तेव्हा परत हा वा असे मुद्दे आणले जातील. इतकाच उपयोग आहे धार्मिक मुद्दय़ांचा आपल्या राजकारणात.

– मोईन शेख, पालघर