scorecardresearch

साम्ययोग : बापूंची संगत हीच माझी गीता

गीता प्रवचनांमध्ये आणि विनोबांच्या एकंदर साहित्यात देह आणि आत्मा यांच्यातील भिन्नत्व वारंवार सांगितले आहे.

samyayoga darshan vinoba bhave
(प्रातिनिधीक छायाचित्र)

अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com

सर्व धर्मग्रंथांमध्ये विनोबांवर सर्वाधिक प्रभाव पडला तो गीतेचा. ज्ञानेश्वरीच्या गद्य रूपांतरणातून त्यांच्यापर्यंत गीतार्थ पोचला. म्हणजे पहिला संस्कार मातृभाषेतील गीतेचा झाला. तोच आदर्श त्यांनी गीताईच्या लेखनात ठेवला. पुढे आचार्य शंकरांच्या गीता भाष्यानेही ते प्रभावित झाले. शंकराचार्य आणि ज्ञानदेव हे गीतेचे श्रेष्ठ भाष्यकार आणि प्रसारक होऊन गेले ही त्यांची भूमिका होती.

तथापि हे महापुरुष विनोबांना सगुण रूपात दिसणे अशक्य होते. याशिवाय गीताच काय पण कोणत्याही धर्मग्रंथाची शिकवण आचरणात आणणाऱ्या माणसाचा सहवास लाभला तर तो ग्रंथ अधिक नेमकेपणाने समजतो किंवा त्यामुळेच तो समजतो. विनोबांच्या दृष्टीने गांधीजींचा सहवास ही अशी गोष्ट होती.

गीता प्रवचनांमध्ये आणि विनोबांच्या एकंदर साहित्यात देह आणि आत्मा यांच्यातील भिन्नत्व वारंवार सांगितले आहे. ही शिकवण कोणत्याही ग्रंथापेक्षा विनोबांना एका प्रसंगातून मिळाली. विनोबा आश्रमात दाखल झाले त्या वर्षी त्यांच्या डोक्यात बापूंचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना आली. आश्रमवासीयांच्या मदतीने त्यांनी सजावट केली. बापूंनी हा देखावा पाहिला आणि ते संतापले. विनोबांची कानउघाडणी करताना ते म्हणाले, ‘‘तू गीता वाचतोस ना? तरीही असे वागणे!’’

एकदा आश्रमात विनोबांचे गीतेवर व्याख्यान झाले. त्या व्याख्यानाचे प्रास्ताविक बाळूभाई मेहता यांनी केले. आध्यात्मिक बाबतीत गांधीजी, विनोबांशी चर्चा करतात इतकेच नव्हे तर ते विनोबांना गुरूप्रमाणे मानतात, असे बाळूभाई म्हणाले. प्रत्यक्ष व्याख्यानात विनोबांनी हा समज किती चुकीचा आहे हे सांगितले आणि गांधीजी, गीता आणि विनोबा हे नाते तपशीलवार मांडले. विनोबा म्हणाले,

‘‘म. गांधींच्या संगतीचा लाभ मला मिळाला नसता तर गीता मी आज जी समजूं शकलों आहे तशी समजूं शकलों नसतों. बापूंच्या संगतींत जें कांहीं मला मिळालें तीच माझी गीता’’

‘बाळूभाईंनीं माझें वर्णन केलेलें जें मीं आतांच सांगितलें ती म्हणजे खरोखर कविकल्पना. बापूंच्या समोर मी हिमालयापुढें रजकणासारखा आहे! बापूंच्या पायाशीं बसण्याचें भाग्य मला लाभलें, त्या भाग्याला पात्र होण्याएवढी योग्यता दहा जन्मांत जरी मला मिळाली तरी पुष्कळ असें मी समजतों! आज बापूंच्या संबंधीं मी जें बोललों तशासारखें बहुधा मी बोलत नाहीं. परंतु गीतेसंबंधीचा अनुभव नि:संकोचपणें मांडण्यासाठीं मीं हें सांगितले.’

‘हें सांगण्याचा हेतू हाच कीं गीतेचा अर्थ समजून घेण्याची चावी आपल्याला मिळावी. प्रत्यक्ष जीवनाशिवाय गीता कळावयाची नाहीं. कोष व्याकरणाच्या जोरावर गीता समजून घेऊं असें कोणी म्हणेल तर तो त्याचा प्रयत्न मिथ्या आहे. संतांशिवाय गीता समजावयाची नाहीं.’

विनोबांच्या या प्रतिपादनावर कोणत्याही टिप्पणीची गरज नाही. तसेच विनोबा गीतेचे अधिकारी भाष्यकार बनण्यामध्ये गांधीजींची भूमिकाही समजते. सत्संग ही सर्वोच्च शिकवण असते. म्हणून संतमंडळी सत्संग मिळावा अशी प्रार्थना करतात. विनोबाही सत्संगाचा महिमा सतत सांगायचे.

मराठीतील सर्व संपादकीय ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog bhagavad gita impact on acharya vinoba bhave zws

ताज्या बातम्या