देवर्षी नारद यांच्या मुखातून जे ज्ञान प्रल्हादानं जन्मत:च ग्रहण केलं होतं त्यामुळे त्याचं अंत:करण अत्यंत उदार आणि विशाल झालं होतं. ते उदार अंत:करणच त्याचा गुरू होतं! सर्वाशी आपलेपणानं व्यवहार करणं, गरिबांशी सहवेदनेनं वागणं, दु:खितांना मायेनं समजावणं यातं प्रल्हादाला संतोष वाटे. प्रल्हादाच्या अनंत गुणांचं वर्णन नारदांनी युधिष्ठिरासमोर केलं आणि शेवटी म्हणाले, ‘‘गुणरलमसंख्येयैर्माहात्म्यं तस्य सूच्यते। वासुदेवे भगवति यस्य नैसर्गिकी रति:।।’’ (श्रीमद्भागवत, सप्तम स्कंध, अध्याय ४, श्लोक ३६). म्हणजे प्रल्हादाचा महिमा कळावा यासाठी त्याचे असंख्य गुण सांगण्याची वा ऐकण्याची गरज नाही. केवळ एकच गुण त्याचं माहात्म्य दाखविण्यास पुरेसा आहे. तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या चरणी जन्मजात आणि स्वाभाविक प्रेम! या विशुद्ध प्रेमाच्या लहानशा ठिणगीनं समस्त दैत्यभावाचे संस्कार भस्मसात झाले होते. नारद सांगतात, बालपणीच्या खेळांत प्रल्हादाचं मन कधीच इतर मुलांप्रमाणे रमलं नाही. उलट भगवंताच्या ध्यानात तो तन्मय होत असे. (न्यस्तक्रीडनको बालो जडवत्तन्मनस्तया।). भगवान श्रीकृष्णाच्या अनुग्रहरूप ग्रहानं त्याला इतकं ग्रासलं होतं की त्याचं जगाचं भानच लोपलं होतं. (कृष्णग्रहगृहीतात्मा न वेद जगदीदृशम्।।) या ‘कृष्णग्रहगृहीतात्मा’ स्थितीचं म्हणजेच श्रीकृष्णाच्या अनुग्रहरूप ग्रहानं ग्रासलेल्या स्थितीचं समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी सुडौल मराठीत चपखल भाषांतर केलंय ते म्हणजे, त्याला कृष्णरूपी महाभूतानं पछाडलं होतं! या विराट भगवद्जाणिवेत अहोरात्र जागृत असलेल्या प्रल्हादालाअशाश्वताच्या प्राप्तीसाठी आणि अशाश्वत टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शाश्वत  खटपटीच्या कलांचं ज्ञान कुठून व्हावं? प्रल्हादाची ही भावतन्मयता ‘श्रीमद्भागवत महापुराणा’त फार सुंदर चितारली गेली आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘‘आसीन: पर्यटन् अश्नन् शयान: प्रपिबन् ब्रुवन्। नानुसन्धत्त एतानि गोविन्दपरिरम्भित:।।’’ हा प्रल्हाद ‘गोविन्दपरिरम्भित’ होता म्हणजे गोविंदानं आलिंगन दिलेला, गोविंदभावानं पूर्ण वेढलेला होता. त्यामुळे त्याला बसताना (आसीन:), फिरताना (पर्यटन्), खाताना (अश्नन्), निजताना (शयान:), पिताना (प्रपिबन्), बोलताना (ब्रुवन्) आपण काय करतो आहोत, याचंच भान नसे! बाह्य़कृतीचं अनुसंधानच नसे, पण गोविंदाचं नामानुसंधान क्षणभरही सुटत नसे!  काय स्थिती आहे पाहा.. समर्थानीही एके ठिकाणी म्हटलं आहे ना? की, खाता-पिता, उठता-बसता, कोणताही व्यवहार करताना नाम सोडू नये! अनुसंधान प्रत्येक क्षणी टिकावं, हे साधकाचं ध्येयच असतं. समर्थ प्रल्हादाच्या याच आंतरिक भावस्थितीचं वर्णन करताना ‘मनोबोधा’च्या ९६व्या श्लोकात म्हणतात की, ‘‘महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं। जपे रामनामावळी नित्यकाळीं।।’’ मग पित्याची म्हणजे हिरण्यकशिपुची स्थिती सांगतात.. ‘‘पिता पापरूपी तया देखवेना। जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना ।।’’ पण तुकाराममहाराज म्हणतात ना? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी.. जशी ज्याची आंतरिक स्थिती असते ती कधी ना कधी प्रकट झाल्याशिवाय राहात नाही.. गुलाबाला आपला सुवास लपविता येत नाही.. अत्तराची कुपी उघडताच गंध दरवळल्याशिवाय राहात नाही.. तसं प्रल्हादाच्या अंत:करणातील भगवद्भक्ती प्रकट होऊन दरवळल्याशिवाय राहिली नाही.. आणि हिरण्यकशिपुच्याही अंत:करणातील भगवद्द्वेष आणि भक्तद्वेष उघड झाल्यावाचून राहिला नाही! आपला हा लाडका पुत्र आपली दैत्यपरंपरा अधिक सामर्थ्यांनं पुढे चालवेल, असं हिरण्यकशिपुला वाटलं होतं. त्या स्वप्नाला एके दिवशी तडा गेला.

 

Shekhar Suman Emotional Post
“रात्रभर मी त्याच्या मृतदेहाजवळ…”, ११ वर्षांच्या मुलाच्या निधनाचा तो प्रसंग सांगताना शेखर सुमन भावूक
jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..