आशुतोष

‘आम आदमी पार्टी’ ऊर्फ ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याकडे धक्कातंत्राचा वापर करण्याची प्रतिभा आहे, हे त्यांच्या समर्थकांप्रमाणेच विरोधकांनाही मान्य करावे लागेल. ‘हनुमान चालीसा’ असो की आणखी काही, केजरीवाल यांच्या धक्क्यामागे काहीएक राजकीय हेतू असतो. नरेंद्र मोदींना ‘अल्पशिक्षित’ म्हणणे, हा त्यांचा सर्वांत ताजा धक्का. सन २०१७ मधल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव झाला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी मोदींवर वैयक्तिक हल्ले करणे टाळले होते. केजरीवाल, त्यांचा पक्ष आणि त्यांच्या सरकारवर भाजप आणि दिल्लीच्या उपराज्यपालांकडून सातत्याने हल्ले होत असतानाही केजरीवालांनी धोरणात्मक मुद्द्यांपुरतीच मोदींवर टीका केली. त्यामुळे दिल्ली विधानसभेत ‘अदानी’ मुद्दा उपस्थित करताना अचानक झालेल्या गदारोळामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेषत: त्यांनी मोदींना भारतातील सर्व पंतप्रधानांपैकी सर्वात अल्पशिक्षित आणि सर्वात भ्रष्टदेखील म्हटले आहे. अशी टीका करणे ही केजरीवाल यांची नित्याची शैली नाही.

bihar man weds with mother in law
Video: जावयाचा सासूवर जडला जीव; सासऱ्याला कळताच लावले दोघांचे लग्न
Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा

केजरीवालांच्या या बदलामागचे कारण काय असावे, हे ओळखणे कठीण नाही. मे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीशी ते संबंधित असल्याचा तर्क करू शकतो. केजरीवाल राहुल गांधींसारखे नाहीत – राहुल गांधींकडे राजकीय विचार आणि दृष्टिकोन आहे. पण केजरीवालांच्या राजकीय विचारात व्यूहरचनेचे भान असते. मोदींप्रमाणेच, केजरीवाल त्यांच्या विरोधकांना बेसावध पकडणारे कथानक रचण्याची रणनीती तयार करण्यात वाकबगार आहेत. त्यांच्या भाषणांत ते कधीही मोठे शब्द किंवा लांब आणि गुंतागुंतीची वाक्ये वापरत नाही. मोदींप्रमाणेच सोपे बोलतात. शिवाय केजरीवाल यांच्याकडे वैचारिक दुराग्रह नाही, तो ज्यातून येतो असे नैतिक काचदेखील केजरीवाल घेत नाहीत, त्यामुळे राजकीय कोलांडउड्या मारणे त्यांना सहज जमून जाते.

हेही वाचा – साहित्याच्या क्षेत्रातील आगळावेगळा चौकीदार

केजरीवाल काही राजकीय विचारवंत नाहीत. राममनोहर लोहिया किंवा जयप्रकाश नारायण यांच्याइतके सखोल राजकीय चिंतन तर त्यांच्याकडे नाहीच. पण राजकीय वातावरणाचे आकलन आणि मूल्यमापन करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यांचे घनिष्ट मित्र आणि निकटचे सहकारी मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे त्यांना एवढे नक्की समजले आहे की, हल्ला हा बचावाचा सर्वोत्तम प्रकार आहे. मोदी हे भक्कम सामाजिक आधार असलेले लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांना पक्षाची प्रचंड यंत्रणा आणि संसाधने यांचा पाठिंबा आहे, हे केजरीवालांनाही माहीत आहे. मोदींच्या विरोधात व्यवहार्य कथन तयार करूनच त्याचा प्रतिकार केला जाऊ शकतो. केजरीवाल यांचा ठाम विश्वास आहे की, ‘लोकशाही वाचवा’ आणि ‘संविधान वाचवा’ मोहिमा खूप सैद्धांतिक आहेत आणि एखाद्या प्रेरणादायी नेत्याच्या नेतृत्वाशिवाय ‘संविधान बचाओ’च्या नाऱ्याला जनसामान्यांचा प्रतिसाद काही लाभणार नाही. म्हणजे लढाईचा अन्य मार्गच पाहावा लागेल.

बरे, मोदींना काही ‘हिंदुविरोधी’, ‘देशविरोधी’ वगैरे म्हणता येणार नाही, हेही केजरीवालांना माहीत आहे. गुजरातच्या २००२ दंगलीपासून मोदी हे हिंदुहृदयसम्राट ठरले आणि पंतप्रधान म्हणून मोदी यांचे हिंदुत्व चित्रवाणी वाहिन्यांवरून नेहमीच दिसत असते. रा. स्व. संघाच्या विचारसरणीमुळे तर मोदी यांना हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा वारसाच मिळालेला आहे. भाजपने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांबद्दल यशस्वीरित्या एक कथन तयार केले आहे की ते मुस्लिमांना संतुष्ट करतात आणि त्या तर्काने ते हिंदूविरोधी आहेत. तमाम विरोधी पक्ष हे चीन आणि पाकिस्तानबाबत मवाळ असल्याचाही आरोप भाजपने पूर्वापार केलेला असल्यामुळे, या विरोधी पक्षांना राष्ट्रविरोधी म्हणणेसुद्धा भाजपनेत्यांना सोपे जाते.

शिवाय मोदी कसे धडाडीचे, मोदींची निर्णयक्षमता किती मोठी, असा मोदी-प्रभाव लोकांवर आहेच. फक्त एवढेच की, मोदी यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. केजरीवाल यांनी पहिल्यांदा मे २०१६ मध्ये मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा काढला होता. तेव्हा केजरीवाल पहिल्यांदाच दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकले होते. दिल्ली विद्यापीठाकडून मोदींना पदवी देण्यात आली, हे खरे की कसे, याची चौकशी करण्यासाठी ‘आप’ची माणसे दिल्ली विद्यापीठापर्यंत पोहोचली होती, अगदी कुलगुरूंची भेटही ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी त्या वेळी घेतली होती.

त्या वेळी भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शाह आणि तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद बोलावून दोन पदवी-प्रमाणपत्रे सादर केली होती. (मोदींचे नाव लिहिलेल्या ज्या प्रमाणपत्रांच्या प्रतिमा आजही समाजमाध्यमांवरून फिरताहेत, त्या प्रतिमा या पत्रकार परिषदेत पहिल्यांदा सादर करण्यात आल्या होत्या). तेव्हा ‘आप’ने म्हटले होते की, मोदींची शैक्षणिक पात्रता किती हा मुद्दाच नसून, पात्रता असल्यास त्याविषयीची प्रमाणपत्रे दडवली का जात आहेत, हा वादाचा मुद्दा आहे. त्या वेळी हा वाद एवढ्याने संपला. मात्र ‘ती’ पदवी प्रमाणपत्रे खरी आहेत किंवा कसे, अशा सुरातील चर्चा समाजमाध्यमांवरून अधूनमधून होत राहिली. मोदींच्या शिक्षणाबद्दलचे गूढ मात्र तेव्हापासून आजतागायत कायम आहे. आता सात वर्षांनंतर केजरीवाल यांनीच हा मुद्दा पुन्हा उकरला आहे. पण आता त्यामागचा राजकीय रंग मात्र नवा आहे.

केजरीवालच अधिक योग्य?

आता दिल्लीचे मुख्यमंत्री मोदींच्या कथित अल्पशिक्षिततेचा संबंध त्यांच्या फसलेल्या धोरणात्मक निर्णयांशी जोडत आहेत. केजरीवाल म्हणताहेत की, केंद्रीय नेत्यांमधील शिक्षणाच्या अभावाची किंमत देश चुकवत आहे. उदाहरणार्थ, केजरीवाल म्हणाले की, जर पंतप्रधान पुरेसे शिक्षित असते, तर त्यांनी नोटाबंदीची घोषणा केली नसती – पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळे ‘दहशतवाद, काळा पैसा, अंमली पदार्थ आणि बनावट चलन संपुष्टात येऊ शकते’ असा दावा तरी केला नसता. त्याचप्रमाणे, मोदीप्रणित जीएसटीची गोंधळलेली अंमलबजावणी, कोविडला सामोरे जाण्यासाठी अचानक टाळेबंदीची घोषणा आणि ‘सदोष शेती कायदे’ मंजूर करणे हे निर्णयही फसले होते. केजरीवाल यांच्या मते, शिक्षणाच्या कमतरतेमुळे मोदींना किचकट विषयांची समज नाही आणि अशा अल्पशिक्षित नेतृत्वाला सल्लागारांवरच विश्वास ठेवणे भाग पडत असते.

हेही वाचा – तरुणांच्या सामाजिक चळवळी उर्जादायी, त्या  कमकुवत होऊन चालणार नाही..

केजरीवाल आणि ‘आप’ यांचे म्हणणे असे आहे की, भारतासारख्या विशाल आणि वैविध्यमय देशाला विविध विषयांची जाण असलेला पंतप्रधान हवा आहे. यातून एकप्रकारे, केजरीवालच देशाचे नेते होण्यासाठी अधिक योग्य असल्याचे संकेतही दिले जात आहेत. केजरीवाल यांनी आयआयटीमधून पदवी घेतली आहे. भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी मानली जाणारी ‘संघ लोकसेवा आयोगा’ची (यूपीएससी) परीक्षाही त्यांनी पार केली आहे.

केजरीवाल आणि त्यांचा पक्ष हे मध्यमवर्गाचे लाडके आहेत. पण दिल्लीसारख्या महानगरातील शहरी, साक्षर आणि संपन्न मतदार आप आणि भाजप दोघांनाही पसंती देतात, हे आजवर दिसले आहे. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली, तर संसदेच्या निवडणुकीत भाजपबाबतही तेच घडते, हा योगायोग नाही. मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करून केजरीवाल या शहरी मध्यमवर्गाच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अदानी मुद्द्यावरून विरोधक पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतानाही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा डाव लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे यापुढे पाहायचे!

(आशुतोष हे ‘आप’च्या स्थापनेपासूनचा काही काळ त्या पक्षात होते, नंतर त्यांनी ‘सत्य हिंदी’ हे वृत्त-संकेतस्थळ सुरू केले. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र’ हे पुस्तकही लिहिले आहे.)