|| पी. चिदम्बरम

करोना विषाणूमुळे उत्पादन व उत्पादन साखळ्या उद्ध्वस्त झाल्याने जागतिक आर्थिक विकास दर कमीच होणार; परंतु आपले प्रश्न सामाजिकदेखील आहेत.. जर अल्पसंख्याकांशी आपण फटकून राहणार असू तर आरोग्य कर्मचारी तरी त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार? 

 

२६ फेब्रुवारी २०२० रोजी अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेच्या संचालक डॉ. नॅन्सी मेसोनियर यांनी करोना विषाणूच्या प्रसाराबाबत धोक्याचा इशारा दिला होता. यात ही आपत्ती येणार का, यापेक्षा ती केव्हा येणार, या देशातील किती लोकांना गंभीर आजार होणार, एवढाच प्रश्न आहे असे त्यांनी या वेळी म्हटले होते.

चीनमध्ये विषाणू पसरल्याच्या घटनेला आता १० आठवडे उलटून गेले आहेत. पण तेथील राज्यव्यवस्था फार नियंत्रित आहे. तेथील लोकांवर कडक देखरेख आहे. तेथील राज्यकर्त्यांनी ठरवले तर ते तेथील रहिवाशांची वाट्टेल तशी मुस्कटदाबी करू शकतात. करोना विषाणूनंतर चीनचा प्रतिसाद हा फार चांगला नव्हता, त्यात दिरंगाई होती. पण जेव्हा त्यांना परिस्थितीचे गांभीर्य उमगले तेव्हा त्यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी हुबेई प्रांतातील शहरे तातडीने बंद केली, अंतर्गत हालचालींवर नियंत्रणे आणली, करोना रुग्णांसाठी खाटा सज्ज केल्या. दोन नवीन रुग्णालये उभारली, डॉक्टर्स, परिचारिका, निम्नवैद्यक कर्मचारी व साधनसामग्री तैनात करण्यात आली. शिस्तबद्ध नागरी जीवन असलेल्या रशिया व जपानसारख्या काही देशांनी इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने करोनाचा सामना केला, पण इटली व इराण यांनी करोनाच्या आपत्तीबाबत गाफील असल्याचेच दाखवून देत अत्यंत खराब कामगिरीचे दर्शन घडवले.

पूर्वतयारीची अवस्था

भारतातील परिस्थिती काळजी करावी अशीच आहे. पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वीच घाबरण्याचे कारण नाही, पण आपण तयारीत असले पाहिजे, असे म्हटले होते, पण आपला देश खरोखर करोना विषाणूचा सामना करण्यास सुसज्ज आहे का, जास्त स्पष्टपणे बोलायचे तर आपल्या देशातील प्रत्येक राज्य या धोक्याचा सामना करण्यास सज्ज आहे का? आपल्याकडे काही अपवाद वगळता प्रत्येक राज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तेथे रोज परदेशातून विमाने येत असतात. देशातील प्रवासीही विमानाने येत-जात असतात. देशांतर्गत प्रवासातील लोकांची संख्या शेकडो ते हजारो असेल. यातील अनेक लोक जास्त लोकसंख्या-घनता असलेल्या ठिकाणचे असतात. आपल्याकडे घरे दाटीवाटीने बांधलेली असतात. सगळीकडे कचरा तर आहेच. शहरे, गावे सगळीकडे अनारोग्याचा कळस आहे. ही वस्तुस्थिती पाहता आपल्या देशाची करोनाचा सामना करण्याची कितपत तयारी आहे हा प्रश्नच आहे.

पंतप्रधानांनी ३ मार्चला याबाबत आढावा बैठक घेतली. आरोग्यमंत्र्यांनी ५ मार्चला निवेदन करोनाबाबत उपाययोजनांची माहिती दिली, पण अद्याप राज्यांचे मुख्यमंत्री किंवा आरोग्यमंत्री यांची बैठक घेण्यात आलेली नाही. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था व इतर १५ प्रयोगशाळा वैद्यकीय नमुन्यांच्या चाचणीसाठी सुसज्ज असल्याचे सांगण्यात आले, पण अशा आणखी अनेक प्रयोगशाळांची गरज आहे, तीही तातडीने. इतर देशांकडून आपण काय शिकलो तर एकदा विषाणूचा प्रसार सुरू झाला की, विषाणूग्रस्तांची संख्या दिवसागणिक वेगाने वाढत जाते. भारतात सुरुवातीला एक ते दोन रुग्ण होते त्यांची संख्या अलीकडे तीन दिवसांत ६ वरून ३० झाली. आता ती ४१ च्या आसपास आहे.

सध्याची अवस्था पाहता घाबरण्याचे कारण नाही हे खरे असले तरी काळजी व निराशेची काही कारणे आहेत. एकतर या करोना विषाणूच्या प्रसाराबाबत जनजागृती वाढवायला हवी होती, दूरसंपर्क वाढवायला हवा होता हे सगळे काही आठवडय़ांपूर्वीच होणे अपेक्षित होते, पण सरकार नागरिकत्व कायदा, लोकसंख्या नोंदणी, ट्रम्प यांचे स्वागत यात मश्गूल असल्याने कदाचित त्यासाठी कुणाला वेळ मिळाला नसेल. अजूनही सरकारचे अग्रक्रम वेगळेच दिसत आहेत.

वास्तवाची तपासणी

जातीयवादाच्या विषाणूने सध्या तरी करोना विषाणूविरोधातील लढाईवर मात केली आहे. आपण कदाचित हे मान्य करणार नाही, पण अल्पसंख्याक लोक हे बंदिस्ततेत राहात आहेत. जर अल्पसंख्याकांशी आपण फटकून राहणार असू तर आरोग्य कर्मचारी तरी त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार, विषाणूग्रस्तांना वेगळे करून रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस दले कशी तैनात करणार. यात करोनाविरोधी लढाई सुरू करण्यापूर्वी देशात सामाजिक सलोखा व शांतता निर्माण करण्याचे काम आधी करावे लागणार आहे.  गेल्या काही दिवसांतील कटुता मागे सारण्यासाठी व सर्व समुदायांना करोनाविरोधात एकत्र करण्यासाठी सरकार काय उपाय करणार आहे, या प्रश्नांची उत्तरे अवघड आहेत. जे लोक भीतीच्या छायेत आहेत, घरे सोडून पळून जात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे कुठलेही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. या परिस्थितीत जर काही लोक किंवा संस्था (विशेष करून परदेशातील) आपल्या वैगुण्यांवर बोट ठेवणार असतील तर मग आपण बोटे मोडण्यात अर्थ नाही. आफ्रिकी देशांतील वंशहत्या, म्यानमारमधील रोहिंग्यांच्या स्थलांतराने झालेले मानवी हक्क उल्लंघन, इतर काही ठिकाणचा वसाहतवाद, वांशिक भेद यावर भारताने अनेकदा टिप्पण्या केल्या होत्या. त्यामुळे आता आपल्यावर टीका झाली तर तोंड फिरवून चालता येणार नाही. आपण या टीकेचा सकारात्मक फायदा करून घेतला पाहिजे. आपल्याला पूर्वी कधी नव्हे इतक्या तीव्रतेने मित्र व व्यापारी भागीदारांची गरज आहे. आपली अर्थव्यवस्था ही ८ टक्क्यांवरून ४.७ टक्क्यांवर आली ती केवळ २१ महिन्यांत. जागतिक आर्थिक विकास दराचा विचार केला तर २०२० मध्ये त्याचा सुधारित अंदाज हा २.९ टक्क्यांवरून २.४ टक्के देण्यात आला आहे. करोना विषाणूमुळे उत्पादन व उत्पादन साखळ्या उद्ध्वस्त झाल्याने आता हा जागतिक आर्थिक विकास दर कमीच होणार आहे.

काही सूचना

भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कदाचित रुचणार नाहीत, पण सरकार करू शकेल अशा काही उपाययोजना येथे सुचवीत आहे.

१. पंतप्रधानांनी देशाला उद्देशून तातडीने भाषण करावे. नंतर प्रत्येक आठवडय़ाला लोकांना मतभेद विसरून राष्ट्रीय आपत्तीत केंद्र व राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी करावे.

२. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजे एनपीआरचा सोपस्कार बेमुदत लांबणीवर टाकण्याची घोषणा करावी.

३. नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलबजावणी स्थगित करावी व सर्वोच्च न्यायालयाला या कायद्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यास सांगावे.

४. दिल्ली दंगलीचा उलगडा करण्यासाठी निष्पक्ष व स्वतंत्र आयोग नेमावा.

५. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली राष्ट्रीय आपत्कालीन समिती स्थापन करावी.

६. वायफळ प्रकल्पांवरचा खर्च कमी करून तोच निधी तपासणी प्रयोगशाळा व उपचार सुविधा स्थापन करण्यासाठी देण्यात यावा. खासगी रुग्णालयांचे सहकार्य घेऊन त्यांनाही अनुदाने द्यावीत.

७. वृद्ध माणसांना जोखीम जास्त असल्याने सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना त्यांच्यासाठी खास कक्ष सुरू करण्यासाठी मदत द्यावी.

८. औषध उद्योगाला मास्क, ग्लोव्ह्ज, संरक्षक कपडे, सॅनिटायझर्स (जंतुनाशके), औषधे तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ते फायद्याचे आहे.

९. भारतातून इतर करोनाग्रस्त देशांत होणारे अनावश्यक प्रवास टाळावेत, त्या देशातील लोकांना व्हिसा देऊ नये. आंतरराष्ट्रीय परिषदांतून माघार घ्यावी.

१०. करोनाग्रस्त देशांत जाण्यासाठी विमान प्रवास टाळल्याने पर्यटन, हवाई वाहतूक कंपन्या, हॉटेल्स, आयात, निर्यात उद्योगांचे नुकसान होणार आहे. त्यांना करदिलासा देण्यात यावा.

तुमच्याकडून तुम्ही फक्त जंतुनाशकाने हात धुऊन करोनापासून बचाव करा, काय होते ते हातावर हात धरून शांतपणे बघत राहा. कारण सार्वजनिक ठिकाणे टाळणे, परदेश प्रवासाची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना देणे, हस्तांदोलन टाळणे, शिंकताना- खोकताना रुमालाचा वापर करणे हे आरोग्याबाबतचे काही नियम पाळण्यावाचून आपल्या हातात फार काही नाही.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in 

ट्विटर : @Pchidambaram_IN