अतुल सुलाखे

विनोबांनी ‘भाकरीची समस्या’ कधीही नाकारली नाही तथापि ते केवळ तिथेच थांबले नाहीत. भूक भागली म्हणून ते समाधान मानणारे नव्हते. त्यापलीकडे असणारी परमोच्च जीवनावस्था सर्वाना लाभावी ही त्यांची तळमळ होती.

माणसाच्या आर्थिक समस्यांवर मार्ग शोधणारी आणि त्यापलीकडे विचार करणारी परंपरा जुनीच आहे. गौतम बुद्ध उपाशी माणसाला उपदेश म्हणून भोजन देतात ही चटकन स्मरणारी गोष्ट.

गीता प्रवचनांमध्ये विनोबांनी ही भूमिका आणखी स्पष्ट केली आहे. गीतेच्या दहाव्या अध्यायात विभूतियोग सांगितला आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला परमेश्वराची रूपे दिसतात. त्यांना शरण जावे, असा तो उपदेश आहे. तथापि आपण परमेश्वर आहे कुठे? आणि आहे का? असाच पवित्रा घेतला आहे. विनोबांच्या मते याच्या मुळाशी जडवाद आहे आणि परिणामी आपण श्रद्धाहीन झालो आहोत.

या अश्रद्धेतून संघर्ष, परस्परांविषयीची टोकाची द्वेषभावना, हिंसा यांचा उगम होतो. समाजाचे असे भयकारी चित्र का दिसते, या प्रश्नाची विनोबांनी केलेली समीक्षा त्यांची आर्थिक आणि तदनुषंगिक प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी स्पष्ट करणारी आहे. ते म्हणतात,

‘हल्ली उंचातील उंच विचार करणारे जे तत्त्वज्ञानी आहेत त्यांचेसुद्धा विचार सर्वाना पोटभर भाकर कशी मिळेल यापलीकडे जाऊ शकत नाहीत. यात त्यांचा दोष नाही. कारण आज अनेकांना अन्न मिळत नाही अशी स्थिती आहे. आजची मोठी समस्या म्हणजे भाकरी. ही समस्या सोडविण्यात सारी बुद्धी आज गढून गेली आहे.’ आपल्या मताच्या पुष्टीसाठी ते सायणाचार्याचा दाखला देतात. सायणाचार्यानी ‘बुभुक्षुमाण: रुद्ररूपेण अवतिष्ठते’ अशी रुद्राची व्याख्या केली आहे. भुकेले लोक म्हणजे रुद्राचा अवतार. त्यांच्या क्षुधाशांतीसाठी नाना तत्त्वज्ञाने, नाना वाद, नाना राजकारणे उभी राहिली आहेत. या प्रश्नातून बाहेर पडण्यास अवसरच नाही.

एकमेकांशी न भांडता लोक मोकळय़ा मनाने दोन घास कसे खातील, याचा विचार करण्यात आज प्रयत्नांची शिकस्त होत आहे. अशी चमत्कारिक समाजरचना ज्या काळात आहे तेथे ईश्वरार्पणतेची साधी सोपी गोष्टच कठीण होऊन बसली यात आश्चर्य नाही.

जडवाद नाकारणारी, अर्थ व नीतीचा मेळ घालणारी विनोबांची ही भूमिका साम्ययोगाच्या तत्त्वज्ञानात स्पष्ट दिसते. श्रद्धा, धर्म, नीती, अर्थ, सामाजिक असे कप्पे न पाडता मानवी जीवनाचा सलग विचार करत ते आयुष्यभर झटले.

आधुनिक काळात न्यायमूर्ती रानडे यांनी अशा प्रकारच्या विचारमंथनाला आरंभ केला. राजकीय हक्क, समाजरचना, यांचे परस्परावलंबन न्यायमूर्तीनी, निक्षून सांगितले. बुद्धी, न्याय व नीती, यांना आपण पारखे असू तर कुणी कितीही हक्क दिले तरी त्यांचा आपल्याला उपभोग घेता येणार नाही हेही त्यांनी बजावले. हा योगायोग नसून प्रकृतीचा कायदा आहे, हे सांगताना त्यांनी समाजाच्या भावनेची पर्वा केली नाही.

रानडे ते विनोबा अशा किमान दीड शतकातील धुरीण मंडळींच्या चिंतनाची दिशा कधी ढळली नाही. सुज्ञ समाज ती दिशा सोडतही नाही कारण परम साम्याच्या प्रवासाचा तो आरंभ आहे.

jayjagat24 @gmail.com