भाषेचे भले होते ते तिचे जतन करतानाच नव्या संकल्पना कवेत घेण्याने, नवे शब्द रचण्याने आणि आपलेसे करण्याने. इंग्रजीने जाईल तेथून नवनवे शब्द वेचले. आज महाराष्ट्रातील नव्या पिढीची अवस्था मात्र धड ना उत्तम मराठी येते, धड ना चांगले इंग्रजी येते, अशी झाली, ती भाषेबद्दलच्या भोंगळ धोरणांमुळेच..
ज्या अर्थी आपण तंत्रज्ञानात एवढी प्रगती केली आहे, त्या अर्थी माणूस हा मुळातच कंटाळखोर, कष्टचोर प्राणी असणार, यात अणुमात्र शंका नाही! अनेकांस हे पटणार नाही, रुचणार नाही. ते म्हणतील, तो उत्साही, कष्टाळू वगरे सद्गुणपुतळा नसता, तर समाजात यंत्रे निर्माण झालीच नसती. बरोबर आहे. माणसाने खूप डोकेबिके चालवून यंत्रांची निर्मिती केली. पण ती कशासाठी? मानवी कष्ट कमी करण्यासाठी! म्हणजे यंत्रनिर्मितीची प्रेरणा काय? तर कष्टांचा कंटाळा, सुखाची लालसा! भाषेचा शोधसुद्धा बहुधा याच कंटाळ्यातून लागला असावा. शब्देविणु संवादु वगरे म्हणायला ठीक असते. दोन जवळच्या माणसांत तो विनासायास करताही येईल. पण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर शब्देविणु चर्चा कशी करणार? त्यासाठी किती कुटाणे करीत बसावे लागले असते. हातवारे करा, देहबोली वापरा, चित्रे काढा. यापेक्षा आवाज दिलेला बरा. माणसा-माणसातील संवाद सोपा व्हावा यासाठी त्याने स्वरांना अर्थ दिला. त्यातून शब्द आले. शब्दांची वाक्ये बनली. भाषेचा जन्म झाला. संवाद सोपा झाला. पुढे कधी तरी त्याच्या लक्षात आले, की शब्द म्हणजे अखेर पोकळ वारा. तो धरून ठेवायचा, तर शब्द बद्ध केले पाहिजेत. तेव्हा त्याने लिपी शोधली. तो लिहू लागला. मग त्या लिहिण्याचे व्याकरण आले, वेलांटी-उकार-मात्र्यांचे वळसे आले. छापण्याची कला आली अन् प्रमाणत्वाचा सोस आला. शुद्धत्वाचे सोवळे आले. पण आता त्याला याचाही कंटाळा आला. आणि त्या कंटाळ्यातून त्याने एक वेगळीच भाषा निर्माण केली. लघुरूप भाषा. लघुसंदेशाची भाषा. आता तो भावना पोहोचल्या हे सांगण्यासाठी ‘भापो’ म्हणू लागला. धन्यवाद हा एवढा मोठा शब्द टंकित करण्याऐवजी तो ‘धन्स’ असे लिहू लागला आणि आपण खळखळून हसतो आहोत हे तिकडे कुठे तरी बसलेल्या सुहृदास सांगण्यासाठी केवळ ‘एलओएल’ म्हणजे ‘लािफग आऊट लाऊड’ असे म्हणू लागला. हे काही आजच घडले असे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते सुरू आहे. एलओएल या शब्दाचाच सरत्या महिन्यात पंचविसावा वाढदिवस होऊन गेला, म्हणजे बघा!
भाषेचे जन्मसाल नेमके सांगणे कठीणच. ‘सलिलयपदसंचारा, पयडिय मयणा, सुवण्ण रयणेल्ला’ म्हणजे सललितपदसंचारा, प्रकटितमदना, सुवर्णरचनावती अशी कामिनी असणारी ‘मरहठ्ठ भासा’ तशी अगदी अलीकडची. पण तिचे जन्मवर्ष सांगतानाही अधिकउणे शतक करून इसवी सन ६०० ते ७०० असे अनमानधपक्याने सांगावे लागते. या भाषेतील पहिले ज्ञात लिखित वाक्य ‘श्रीचावुंडराजें करविलें’ हे येते सन ९८३ मध्ये. पुन्हा याबाबतही वाद आहेत. डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या मते हा शिलालेख सन १११७ चा असण्याची शक्यता आहे. तेव्हा पहिल्या वाक्याचा मान जातो अलिबागमधील अक्षीच्या शिलालेखातील ‘पसींमसमुद्राधिपती स्रीकोंकणाचक्रीवर्ती’ या वाक्याला. काही संशोधकांच्या मते मराठीतील पहिले ज्ञात लिखित वाक्य ‘वाछितो विजयी होईबा’ हे सोलापूरच्या शिलालेखातले. एकूण हे सर्व मराठीच्या वादपरंपरेस साजेसेच. पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशी संशोधनेही सोपी झाली. गुगलादी शोधइंजिनांमुळे माहितीच्या महाजालातील एखादा शब्द पहिल्यांदा कधी वापरण्यात आला हे शोधणे एका कळदाबणीचा खेळ झाला. त्यामुळेच एलओएलची नेमकी जन्मतारीख समजू शकली. हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला तो ८ मे १९८९ रोजी. बेन झिमर या भाषातज्ज्ञाच्या मते हा शब्द पहिल्यांदा फिडोनेट नामक वृत्तपत्रकात वापरण्यात आला होता. त्यात अशा शब्दांची एक यादीच देण्यात आली होती. ओह आय सी साठी ओआयसी, बाय द वे साठी बीटीडब्लू वगरे. त्यातील बरीच लघुरूपे कालौघात विरून गेली. टिकले ते एलओएल. अनेकांना वाटते लॉट्स ऑफ लव्ह हे त्याचे गुरुरूप. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी न्यूज ऑफ द वर्ल्डच्या संपादक रिबेका ब्रुक्स यांना पाठविलेल्या लघुसंदेशांतही याच अर्थाने हा शब्द वापरला होता. पण एलओएलचा खरा अर्थ खळखळून हसणे हाच. तो वापरल्याने कॅमेरॉन यांचे हसे झाले हा भाग वेगळा! ही अशी लघुरूपे, असे शब्द का वापरले जातात? ज्याने पहिल्यांदा फिडोनेटवर ती शब्दयादी टाकली, त्याचा हेतू एकच होता. संवादाला रंगत आणणे. आजही आपण समाजमाध्यमांत लेखन करताना, एकमेकांस संदेश पाठविताना अशा शब्दांचा वापर करतो तो बव्हंशी याच हेतूने. त्यातून कमी वेळात आणि कष्टात भावना पोहोचविता येतात हाही एक उद्देश असतोच. तो काहीही असला, तरी अशा शब्दांमुळे भाषेचा डौल बिघडतो, ती बिघडते, विकृत होते, तिची वाट लागते, असे एक मत आहे. मुले उत्तरपत्रिकेतही एसएमएसची लघुरूपी भाषा वापरू लागली आहेत. तेही खुद्द ब्रिटनमध्ये. मराठीत शुद्धलेखनाच्या असंख्य चुका असल्या तरी चालेल, परंतु इंग्रजीतील एक स्पेिलग चुकले तर जगबुडी येते, ही मानसिकता आज आपल्याकडे वाढते आहेच. परंतु तिकडे ब्रिटनमध्ये मात्र या भाषेचे स्वागतच करण्यात आले. ‘बीबीसी’च्या संस्थळावर त्या वृत्ताची मोठी चर्चा झाली. तेथेही इंग्रजी भाषा मुमुर्षू झाली आहे काय, असे प्रश्न आलेच. भाषिक रुदाली सर्वच समाजांत असतात. पण एकंदर सूर सनईचाच होता. याचे कारण भाषा ही नेहमीच प्रवाही असते याची उत्तम जाणीव इंग्रजीला आहे.
भाषेच्या इतिहासाचा, अभिजाततेचा अभिमान बाळगताना हे लक्षात ठेवावे लागते, की इतिहास आणि वर्तमान यांतील पुलाखालून बरेच पाणी गेलेले असते. मराठीला चौदाशे वर्षांचा इतिहास आहे. पण त्याचा अर्थ असा नसतो, की आज आपण तेराशे वर्षांपूर्वीचीच मराठी बोलत आहोत. आपण आज बोलतो ती मराठी चक्रधर-ज्ञानोबा-तुकाराम बोलत नव्हते किंवा ती सातवाहनांची मराठीही नाही. भाषा बदलत असते. तिच्यावर बाजूच्या पर्यावरणाचाही परिणाम होत असतो. त्यातूनच ती समृद्ध होत असते. मराठीसाठी गळे काढणारांनी, आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी अस्मितेचे तवे भाजणारांनी तसे खुशाल करावे. त्यांनी राष्ट्रभाषेचा वाद घालावा. ज्ञानभाषेचा दुस्वास करावा. पण हे करताना एक लक्षात घ्यावे की यातून ते भाषेचे काहीही भले करीत नसतात. भाषेचे भले होते ते तिचे जतन करतानाच नव्या संकल्पना कवेत घेण्याने, नवे शब्द रचण्याने आणि आपलेसे करण्याने. इंग्रजीने ते केले. राणीचे इंग्रजी, शेक्सपियरचे इंग्रजी यांची वाट की हो लागली, अशी टिपे गाळण्याऐवजी इंग्रजीने जाईल तेथून नवनवे शब्द वेचले. शब्दांना अर्थ असतात. त्यांमागे संकल्पना असतात. परभाषेतून एखादा शब्द आपण उचलतो, तेव्हा त्यामागची अख्खी संस्कृती त्याबरोबर येत असते. भाषा आणि ती बोलणारा समाज समृद्ध होतो, तो त्यामुळे.
आपण मात्र हे लक्षात न घेता, भारतीय भाषेतील एखादा शब्द ऑक्सफर्ड शब्दकोशात आला की त्याच्या बातम्या करून स्वत:चे नगारे पिटत राहिलो आणि आपल्या भाषेची गौरवगीते गात तिला सोवळ्यात ठेवत बसलो. आज महाराष्ट्रातील नव्या पिढीची अवस्था धड ना उत्तम मराठी येते, धड ना चांगले इंग्रजी येते, अशी झाली, ती भाषेबद्दलच्या भोंगळ धोरणांमुळेच. अशाने मराठीत नवे शब्द, नव्या संकल्पना कशा येणार? तिचे आभाळ कसे विस्तारणार? यावरला एक जालीम उपाय म्हणजे मराठीने तिच्याच अस्मितावादाला काही वेळा हसण्यावारी नेणे.. तेही ‘एलओएल’!