.. तरीही संगीत ‘हिंदूुस्तानी’!

‘मुसलमान और भारतीय संगीत’ या कैलाशचंद्र देव बृहस्पती यांनी लिहिलेल्या ग्रंथात या काळातील उलघालीचा सविस्तर आढावा घेतला आहे.

अकबर, तानसेन आणि गुरू हरिदास यांचे लघुचित्र (मुघल शैली)

 

मुकुंद संगोराम

तानसेनाला अकबराचा जसा राजाश्रय मिळाला, तसा पुढल्या संगीतकारांना मिळण्याची ददात होती हे खरे. पण हा काळ धृपद गायकीकडून ख्यालगायकीकडे जात होता आणि पुढे तर, उस्तादांकडे शिकलेले पंडितही गाऊ लागले होते..

कलानिर्मितीसाठी मन:स्वास्थ्य असावे लागते असे म्हणतात, परंतु कलांच्या क्षेत्रात अस्वस्थता हाच निर्माणाचा प्रारंभ बिंदू ठरतो, असे अनेकदा लक्षात आले आहे. प्रसिद्ध समीक्षक रा. ग.जाधव यांच्याशी गप्पा मारताना, भारतीय किंवा मराठी भाषेतील साहित्य जागतिक पातळीवरील उच्च साहित्याची पातळी का गाठू शकत नाही याबद्दल विवेचन करताना, ‘आपण प्रचंड असे दु:ख अनुभवले नाही, महाकाय संहारालाही आपण सामोरे गेलो नाही. एवढेच काय, जे क्लेश आपल्या वाटय़ाला आले, त्याचेही साहित्यिक रूपांतर करण्यात आपले लेखक कमी पडले,’ असे ते म्हणाले होते. म्हणजे देश स्वतंत्र होताना, येथील समाजमनाची जी काही घालमेल होत होती, ती एक-दोन अपवाद वगळता, फार मोठय़ा प्रमाणात अभिव्यक्त होऊ शकली नाही. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ ही कादंबरी कदाचित त्यामुळेच वेगळी आणि महत्त्वाची ठरली. ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गप्पांच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खाँ यांनीही नेमक्या याच मुद्दय़ावर बोट ठेवले होते. संगीतात ‘दर्द’ हवा, त्यासाठी तो अनुभवायलाही हवा, असे त्यांचे म्हणणे. दर्द म्हणजे कारुण्य. मनात निर्माण होणारी ही एकप्रकारची भावना. कलांमध्ये या भावनांचं प्रकटीकरण जितक्या तीव्रतेने, तेवढा त्याचा कलात्मक आनंदही उंचीवरचा आणि वेगळा. केवळ दर्द नव्हे, तर भावनांचा कल्लोळ व्यक्त करण्याची क्षमता कलावंताच्या ठायी असणे आणि त्यासाठी प्रज्ञेचीही जोड मिळणे, या गोष्टी कलांच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाच्या ठरत असाव्यात. त्यामुळे अस्वस्थता हा जर संगीतनिर्मितीसाठीचा अवकाश असेल, तर हजार वर्षांपूर्वी भारतीय समाजजीवनावर झालेल्या परकीय आक्रमणाच्या वेळीही तसेच घडले असणार.

‘मुसलमान और भारतीय संगीत’ या कैलाशचंद्र देव बृहस्पती यांनी लिहिलेल्या ग्रंथात या काळातील उलघालीचा सविस्तर आढावा घेतला आहे. मुसलमानी आक्रमणापूर्वी या भरतखंडात प्रचलित असलेल्या संगीताला जे नवे परिमाण मिळाले, ते येथे पूर्वापार चालत आलेल्या संगीत परंपरेने अतिशय कुशलतेने स्थापित केले. इस्लामी संगीत अरबस्तानात जन्म पावले, परंतु इराणी सीरियन तसेच ग्रीक संगीताच्या प्रभावाने ते व्यापक झाले (या ग्रंथाचा मा. कृ. पारधी यांनी केलेला मराठी अनुवाद पुस्तकरूपात उपलब्ध आहे.). मुद्दा हा की, मुसलमानी आक्रमणानंतरच्या काळातही भारतीय संगीताला अतिशय अस्वस्थ अवस्थेत सर्जनाची मशागत करावी लागली. ती महत्त्वाची अशासाठी की, सत्ता आणि संस्कृती यांच्यात परस्परसंबंध असतो, याचा तो तीव्र वाटावा असा अनुभव होता. त्यामुळे या भूमीत अनेक शतके परंपरेने विकसित होत आलेल्या संगीताच्या शास्त्रावरही परदेशी मुस्लीम संगीताचा अतिशय प्रभाव पडला. तरीही त्या संगीताचे नामकरण मात्र ‘हिंदुस्तानी’ असेच झाले. कलांचा भवतालाशी, त्यातील घडामोडींशी, त्यातील अंतर्गत ताणतणावाशी संबंध असतो, हे पुन:पुन्हा सिद्ध होत राहिलेले आहे. हे ताणतणाव कलांच्या निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कलावंताला स्वास्थ्य हवे असतेच; परंतु ते अन्य सगळ्या सामान्यांना जसे हवे असते, तितपत. प्रत्यक्ष कला सादर करताना मात्र, कलावंत सामान्य माणूस राहात नाही. तो एका अद्भुताच्या प्रदेशातील सफरीवर निघतो, तिथे आधी किती तरी वेळा जाऊन आलेले असतानाही त्याला अनेकदा आधी अनुभवलेलेच पुन्हा नव्याने, नव्या रूपात गवसते. त्यामुळे व्यक्त होणाऱ्या कलेला अनेक पदर सुटतात. ज्याला जो भावेल, तो त्याचा पदर. सर्जनाच्या या प्रक्रियेची तपशीलवार नोंद कोणी करू शकेल, तर तो क्रियावंतच. प्रत्यक्षात अशा नोंदी फारच थोडय़ा दिसून येतात. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया त्यात प्रत्यक्ष न गुंतलेल्यांकडून समजून घेण्याचा भाग म्हणून घडते. तरीही संगीत समजून घेण्यासाठी तीही तेवढीच महत्त्वाची.

मुसलमानी आमदनीतच धृपदाकडून ख्याल संगीताकडे वाटचाल सुरू झाली. धृपदाची परंपरा प्रदीर्घ आणि तासून घासून उभी राहिलेली. त्या परंपरेतील भव्यता आणि अभिजातता हा त्या काळातील समाजजीवनातील अभिरुची संपन्न करणारा प्रकार होता. धृपदातून नव्या संगीतशैलीचा उगम होण्याच्या काळात जगण्यात जे बदल होत होते, त्याने रुचीतही बदल होत होते. या बदलांना ख्याल संगीताने समजून घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी ही नवी शैली अधिक आवडू लागली. ज्यांनी धृपद-धमार शैलीत स्वत:चे स्थान मिळवले होते, त्यांनी या शैलीतील कमी आवडणारा भाग कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्या सदारंग आणि अदारंग यांच्या बंदिशी आजही लोकप्रिय आहेत, ते दोघे धृपदियेच होते. अकबराच्या दरबारातील तानसेन हा श्रेष्ठ कलावंत हिंदू होता, म्हणून त्याला राजाश्रय मिळण्यात कधीच अडचण आली नाही. तानसेनाने त्या काळातील सम्राटांना आपल्या कलेने आपलेसे केले आणि त्याच्या या कलागुणांचा त्यांनीही आदरच केला. ही गोष्ट सत्ता आणि संस्कृती या संदर्भात नोंदवणे आवश्यक ठरायला हवी. राज्यशकट चालवताना जगण्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज सम्राटांना वाटतही नसेल, मात्र कलांच्या विकासाकडे त्यांनी दिलेले लक्ष नंतरच्या काळातील कलाविकासासाठी मूलभूत बदल घडण्यास कारणीभूत ठरले, असे म्हणता येईल.

कलांच्या क्षेत्रातील बदल प्रज्ञा आणि सर्जनाने घडतात. ते समाजात रुजण्यासाठी काही काळ जावा लागतो. मात्र अन्य सामाजिक बदलांपेक्षा कलांमध्ये घडून येणारे बदल सामावून घेण्यासाठी समाज अधिक उत्सुक असतो, असे दिसून येते. समाजातील प्रत्येकाला असलेली कलांबद्दलची गाढ उत्सुकता आणि त्याबद्दलची प्रीती याला कारणीभूत असू शकेल. कलेचे रसग्रहण करणाऱ्या समूहाच्या आवडीनिवडी कलेतील बदलास कारणीभूत ठरतात. धृपदाकडून ख्यालाकडे जाताना हे बदल अधिक प्रभावी ठरले असावेत, असे म्हणण्यास वाव आहे. कोणत्याही मानवी समूहास कलेपासून मिळणारा आनंद घेण्याची क्षमता साध्य करावी लागते. ती परिसरातील अनेक पातळ्यांवरील घटनांच्या प्रभावातूनच साध्य होऊ शकते. हे प्रभाव अदृश्य असतात, त्यांचा परिणाम मात्र काही काळानंतर स्पष्टपणे प्रतीत होऊ लागतो. सुमारे हजार वर्षांच्या परकीयांच्या सत्तेत संगीतावरही अनेकदा गंडांतरे आली. ती परतवून लावण्यासाठी ज्यांनी जिवाची बाजी लावली, ते कलावंत नामानिराळेच राहिले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना नंतरच्या काळात यश आले आणि संगीत कलेत मन्वंतर घडून येण्याच्या प्रक्रियेत खंड पडला नाही. सत्तेच्या वळचणीला राहून कलासाधना करण्याशिवाय पर्याय नाही, अशा परिस्थितीत संगीत करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या मनात दरबारापर्यंत पोहोचण्याची आस लागून राहिली. जगण्यासाठी ते आवश्यक होते खरे, परंतु सत्ताधीशाच्या आवडीनिवडीचा प्रभावही संगीतावर होण्याची स्थिती निर्माण झाली. ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतच्या काळात केवळ संगीतच करण्याची ऊर्मी असणाऱ्या कलावंतांचे जगणे हे ना घर का ना घाट का असेच होते. सत्ताधीशास शरण जावे, तर कलेवर बंधने येण्याची शक्यता आणि ते टाळावे, तर समाजाकडून पुरेसा आधार नाही, अशी ही अवस्था. ही अस्वस्थता संगीत कला जिवंत ठेवत होती, हे मात्र खरे.

अशा काळात त्या काळातील भारतीय भूप्रदेशात मुळातच अस्तित्वात असलेल्या पंडिती परंपरेला आव्हान देणारी उस्तादी परंपरा निर्माण झाली. मात्र उस्तादांच्या गायनाबद्दल अपार प्रेम वाटणाऱ्या अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. उस्तादांनीही त्यांना शिकवण्यास नकार दिला नाही. संगीतातील घराणी उस्तादांनी आपल्या खासगी जीवनातही टिकून राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आपल्या घरात संगीतविद्या राहावी, असा त्यांचा कटाक्ष असे. अगदी लहानपणापासूनच मुलाला (मुलीला नव्हे!) ‘तालीम’ द्यायला सुरुवात होत असे. मग इतर शिष्यांना शिकवताना हातचे राखून शिकवण्याचा प्रयत्न होई. तरीही त्या काळातील अनेक शिष्यांनी पडेल ते पदरात पाडून घेतले, त्यावर स्वत:चा विचार केला. घराण्याच्या घरंदाजपणाचा अंदाज तसाच ठेवून काही नवे करण्याचा प्रयत्न केला. त्यातून संगीत वेगवेगळ्या अंगाने फुलत गेले. ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत खाँसाहेबांकडून संगीत शिकून पंडित झालेल्यांची एक नवी प्रभावळही तयार होत गेली. नंतरच्या काळात संगीताला असलेला राजाश्रय क्षीण होत गेला आणि संगीताबद्दल प्रीती निर्माण झालेला नवा वर्गही तयार होऊ लागला. पण या काळातही कलावंतांना आस होती, ती उच्च प्रतीच्या संगीत कलेचीच.

mukund.sangoram@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व स्वरावकाश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on still music hindustani abn

ताज्या बातम्या