scorecardresearch

दिपले ऐकुनिया, देवहि हर्षभरें…

‘मत्स्यगंधा’ हे संगीत नाटक १९६४ मधील. त्याने ‘आंधळ्यांची शाळा’ आणि ‘कुलवधू’च्या पुढचे पाऊल टाकले.

मास्टर कृष्णराव , मेहदी हसन

|| मुकुंद संगोराम
प्रेक्षकांना ‘देवा…’ म्हणणाऱ्या बालगंधर्वांचा काळ सरला तरीही नाट्यसंगीताची खुमारी कमी झाली नाही… ‘कुलवधू’ सारख्या नाटकांतून ती वाढली आणि तिने श्रोत्यांचे कान पुढल्या अनेक प्रकारच्या अमृतबोलांसाठी तयार केले. भारतात, महाराष्ट्रात याच कानांनी पुढे गज़लच्या अनेक अवतारांचेही स्वागतच केले…

आयुष्यभर संगीतच करायचे, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कितीतरी कलावंतांच्या वाट्याला प्रसिद्धी, पैसा, मानमरातब यापैकी काहीच आले नाही. तरीही संगीत हेच आपले जगणे आणि तोच आपला श्वास, असे मानणाऱ्या सगळ्यांना संगीतानेच जगण्याचे त्राण दिले आणि त्यासाठी अव्याहत कष्ट उपसण्याची शक्तीही दिली. त्यामुळेच संगीत ऐकण्याची समाजातील इच्छा टिकून राहिली आणि तिने कलाकारांनाही जगण्याचे बळ दिले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात संगीतसाधना करणाऱ्या बहुतेकांच्या आयुष्यात हे असे घडत होते; तरीही गाणे हेच सुखनिधान मानणाऱ्यांची संख्या वाढतच होती. सत्तरचे दशक यासाठी महत्त्वाचे की, तेव्हा पुन्हा एकदा संगीतविश्वात नवोन्मेषाचे कारंजे फुलू लागले होते. तेव्हा संगीत ही विक्रीयोग्य ‘वस्तू’ झालेली नव्हती. त्यामुळे त्यातील कलात्मकतेचे आव्हान तेवढेच तगडे राहिलेले होते. अभिजात संगीतात जसे नवनवे प्रयोग होत होते तसेच, तोपर्यंत लयाला जाण्याच्या छायेत असलेल्या संगीत नाटकाच्या क्षेत्रातही होत होते. विद्याधर गोखले, वसंत कानेटकर यांच्यासारख्या नाटककारांनी आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या सर्जनशील संगीतकाराने नाट्यसंगीतात घडवलेले बदल त्या वेळच्या अभिरुचीसंपन्नतेत भर घालत होते. कितीतरी आधी म्हणजे १९३३ मध्ये संगीतकार केशवराव भोळे यांनी ‘नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. ‘आंधळ्यांची शाळा’ हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. हे वर्ष लक्षात अशासाठी घ्यायचे की, त्यापूर्वी एकच वर्ष ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने संगीत नाटकांची पीछेहाट होईल, असे तेव्हा कुणाच्या स्वप्नातही नसेल; परंतु चित्रपट संगीताने संगीत नाटकातील नाट्यसंगीताचा बाज बदलण्याची गरज आहे, याचे पहिले भान येणारे केशवराव भोळे होते. ते उत्तम लेखक, संगीताचे मर्मग्राही समीक्षकही. नंतरच्या काळात ‘प्रभात’ या चित्रसंस्थेत संगीतकार म्हणूनही ते काम करीत राहिले. प्रभातच्या ‘संत तुकाराम’ या चित्रपटातील शांताराम आठवले यांनी लिहिलेल्या ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले’ या गीताने भोळे यांची संगीतकार म्हणून असलेली ओळख अधिक गडद झाली. नाट्यसंगीतातील रागदारीचा पसारा आवरता घेत, अभिजाततेच्या नव्या खुणा निर्माण करणारे ‘आंधळ्यांची शाळा’ हे पहिले नाटक. वयाच्या अठराव्या वर्षी ज्योत्स्ना भोळे यांनी भूमिका केलेले ते पहिले नाटक. त्याने त्यांची गायक-अभिनेत्री अशी ओळख निर्माण झाली. त्या काळात मुंबई-पुण्यात या नाटकाचे शंभरावर प्रयोग झाले.

संगीत नाटकाने कात टाकण्याचा हा पहिला यशस्वी प्रयत्न. त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचायला नंतरची काही दशके जावी लागली. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याची तालीम मिळालेल्या भास्करबुवा बखले यांचे शिष्य, ज्येष्ठ  कलावंत, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले आणि मो. ग. रांगणेकर यांनी लिहिलेले ‘कुलवधू’ हे नाटक १९४२ मध्ये रंगभूमीवर आले आणि त्याने लोकप्रियता मिळवली. पारंपरिक किर्लोस्करी संगीत नाटकांपेक्षा वेगळ्या धाटणीची ही नाटके म्हणजे संगीतातील आधुनिकतेच्या खाणाखुणा होत्या. विशेष म्हणजे अभिजात संगीतात अतिशय आदरणीय असलेल्या कलावंतांनी काळाची बदलती पावले ओळखून या सांगीतिक बदलांची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याला नंतरच्या काळात अतिशय गोमटी फळेही मिळाली. कृष्णराव मास्तरांनी अभिजात संगीतात जेवढी मोठी मजल मारली, तेवढीच ललित संगीतातही आपली नाममुद्रा उमटवली. मैफली गवई म्हणून भारतभर ‘मास्तर’ रसिकांना जेवढे माहीत होते, तेवढेच अतिशय सहजसोप्या, कुणालाही गुणगुणता येतील अशा स्वररचना निर्माण करणारे ‘प्रभात फिल्म कंपनी’चे संगीतकार म्हणूनही परिचित होते. ‘लखलख चंदेरी तेजाची दुनिया’ या गीताने त्यांची ओळख अधिक दृढ झाली. ‘वंदे मातरम’ या राष्ट्रपर गीताच्या रचनेमुळे ते समूह संगीतातही लोकप्रिय ठरले (स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान नेहरू यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आपली चाल त्यांना ऐकवली होती.).

‘मत्स्यगंधा’ हे संगीत नाटक १९६४ मधील. त्याने ‘आंधळ्यांची शाळा’ आणि ‘कुलवधू’च्या पुढचे पाऊल टाकले. अतिशय अभिजात संगीताने नटलेल्या या नाटकाला जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या आग्रा घराण्याच्या पंडिती कलावंताने जे ललितसुंदर रूप दिले, त्याने त्या वेळचे रसिक हरखून गेले. पूर्वसुरींनी निर्माण केलेल्या नाट्यसंगीताच्या प्रतिमेला मुळातून धक्का न लावता आधुनिक काळाला अनुकूल असे नाट्यसंगीत अभिषेकीबुवांनी निर्माण केले. ‘लेकुरे उदंड जाली’ ते ‘हे बंध रेशमांचे’ हा त्यांचा सांगीतिक प्रवास नाट्यसंगीताला नवसंजीवनी देणारा ठरला, यात शंकाच नाही. ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’, ‘प्रेम वरदान’ यासारखी नाट्यगीते आठवली तरी बुवांचे लालित्य सहज लक्षात येते. हे संगीत जसे रसिकांना आवडत होते, तसेच अभिजात संगीतात होत असलेले कलात्मक बदलही त्यांना मानवणारे होते. मैफली गवयांसाठी तो काळ सर्जनशीलतेचा होता. मैफल जिंकण्याची ईर्षा आणि कलात्मकतेची नवी आव्हाने स्वीकारत त्यामध्ये बदल करण्याची ‘धमक’ असणाऱ्या कलावंतांसाठी तर हा काळ अधिकच आव्हानात्मक होता. कंठसंगीताबरोबरच वाद्यसंगीताचे क्षेत्र भारतभर फुलत चालले होते आणि संगीताला चहूबाजूंनी धुमारे फुटत होते. तरीही कलावंत म्हणून उभे राहण्याची धडपड मात्र सुरूच होती. सार्वजनिक मैफिली आणि आकाशवाणी यांच्या जोडीला चित्रपटासारखे माध्यम लोकप्रिय होऊ  लागल्याने अभिजात संगीताविषयीची चिंता वाढण्याची भीती दूर करण्यासाठी सगळ्यांनीच आपापल्या परीने हातभार लावला. चित्रपटातील संगीत कमअस्सल आणि अभिजात संगीत तेवढेच फक्त अस्सल, असे म्हणणाऱ्यांना आपल्या संगीतात कालानुरूप बदल घडवणे क्रमप्राप्त होते. मनोरंजनाची नवनवी साधने निर्माण होत असताना, फक्त एकच एक कलाप्रकार विकास पावू शकत नाही, हे जाणत्या कलावंतांनी उमजून घेतले होते.

त्यामुळे संगीतातील सर्वच कलाप्रकारांमध्ये नवे काही घडत होते. मग ते अभिजात संगीत असो की नाट्यसंगीत, भावगीत असो की गज़ल आणि ठुमरी. हे सगळेच कलाप्रकार काळाच्या या एकाच परिघात एकमेकांना समजून घेत विकास पावत होते.

मेहदी हसन हे नाव या संदर्भात अतिशय महत्त्वाचे. अशासाठी की, भारतीय उपखंडात मराठी भावगीताची मोठी बहीण म्हणता येईल, अशी गज़ल त्यांनी घरोघरी नेली. तिला आपल्या मधुर शैलीने मढवले आणि भरजरी स्वरात चिंब भिजलेल्या तरल भावनांचे उदात्तीकरण केले. ‘रंजिश ही सही’, ‘अब के हम बिछडे’ यांसारख्या त्यांच्या कितीतरी गज़लला भारतीय रसिकांच्या कानामनात गुंजू लागल्या, त्या सत्तरच्या दशकांत. भावनांचा हा उदात्त कल्लोळ या रसिकांसाठी अतिशय मोलाचा ठरला. त्यातून संगीताचे नवे वारेही वाहू लागले (मेहदी हसन यांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी ते पाकिस्तानात जिथे राहात होते, त्या घराच्या परिसरातील घरांच्या व फ्लॅट्सच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या, अशी दंतकथा सांगितली जाते.). ते गज़ल गायन अभिजात होतेच, त्यात शब्दांच्या बरोबरीने… काकणभर जास्तच त्यांच्या जादुई स्वरांची खुमारी होती. ठुमरी गायक म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या मेहदी हसन यांना उर्दू काव्याची गोडी होती. त्यामुळे ठुमरीच्या बरोबरीने त्यांनी गज़ल गायनालाही सुरुवात केली. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिखर’ या चित्रपटातील ‘नजर मिलतेही दिल की बात का चर्चा ना हो जाय’ त्यांचे पहिले गीत, त्यांच्या भविष्यातील शब्दसंगीताची चुणूक दाखवणारे ठरले. मेहदी साहेबांच्या सौंदर्यपूर्ण गायनाने त्या दशकातील सगळे जण इतके भारावून गेले होते की, त्यानंतरच्या काळात भारतीय संगीतात ‘गज़ल’चा एक नवा लोकप्रिय अध्यायच सुरू झाला. सुरेश भट यांच्या ‘मालवून टाक दीप’ या गज़लच्या आकृतिबंधात लिहिलेल्या गीतासाठी प्रतिभावान संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनाही मेहदी साहेबांच्या स्वररचनेचा उपयोग करण्याचा मोह आवरता आला नाही. मंगेशकरांच्या अभिजात कलात्मकतेने त्या रचनेचे अप्रतीम गीत सगळ्यांच्या मनात गुंजत राहिले आहे. पाकिस्तानातीलच गुलाम अली हे मेहंदी हसन यांचे वारसदार तर जगजित सिंग हे त्या अध्यायाचे लोकप्रिय भारतीय कलावंत. पंकज उधास, अनुप जलोटा, हरिहरन यांच्यासारख्या लोकप्रिय ठरलेल्या गायक कलावंतांनीही गज़ल या संगीत प्रकाराला भारतीय संगीतात मानाचे स्थान मिळवून दिले.

mukund.sangoram@expressindia.com

मराठीतील सर्व स्वरावकाश ( Swaravkash ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lifelong music artists make money musical instrument akp

ताज्या बातम्या