हे पुस्तक वाचताना महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकी नोकरशहांचा आडमुठेपणा, झारीतले शुक्राचार्य किंवा लाल फितीचा कारभार यांचे दर्शन झाल्याने वाटते की जगातली महासत्ता असो वा इतर कुठला सामान्य देश असो, राजकारणाची वैशिष्टय़े सर्वत्र समानच आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, परिपूर्ण योजना आणि विलक्षण गुप्तता व चिकाटी यांच्या बळावर अमेरिकेने एक अकल्पनीय गोष्ट वास्तवात आणली आणि सारे जग तोंडात बोटे घालून बघतच राहिले. पाकिस्तानच्या राजधानीपासून- इस्लामाबादपासून १०० कि.मी.वर घडलेले हे नाटय़. त्यासाठी पाकिस्तानची अंतरिक्ष-कक्षा आणि स्वामित्व यावर बिनधास्तपणे आक्रमण करणाऱ्या अमेरिकेची ही घुसखोरी पाहून अमेरिकेचा निषेध करावा की लादेनसारख्या दहशतवाद्याचा अंत करण्याचे धाडस अमेरिकेने दाखवले याबद्दल अभिनंदन करावे याचाच संभ्रम अनेक राष्ट्रप्रमुखांना पडला.
मार्क बोडेन यांनी ‘द फिनिश- द किलिंग ऑफ ओसामा बिन लादेन’ या पुस्तकात अमेरिकेच्या या यशस्वी धाडसामागचे अथक परिश्रम, चिकाटी, अचूक निर्णयक्षमता या वैशिष्टय़ांनी युक्त असा त्या शेवटच्या क्षणापर्यंतचा थरार वाचकांपुढे ठेवला आहे. या लेखनाला पुराव्यांचा बळकट आधार आहे. अमेरिकन सरकारातील उच्चपदस्थांशी असलेल्या संबंधांमुळे विविध प्रकारच्या कागदपत्रांपर्यंत पोचण्याची मुभा मिळालेल्या लेखकाने तो सारा ऐवज आपल्यापर्यंत पोचवला आहे.
लेखक मार्क रॉबर्ट बोडेन सध्या ‘व्हॅनिटी फेअर’ या मासिकासाठी पत्रकारिता करतात. पूर्वी ‘न्यूयॉर्कर’, ‘अटलांटिक’, ‘रोलिंग स्टोन’ इ. नियतकालिकांसाठी लेखन करणारे हे पत्रकार. १९९३ मध्ये झालेल्या सोमालियातील युद्धाची कहाणी सांगणाऱ्या ‘ब्लॅक हॉक डाऊन-अ स्टोरी ऑफ मॉडर्न वॉर’ या पुस्तकामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. पडद्याआडची युद्धविषयक तथ्ये मांडत लेखन करणारे उत्कृष्ट लेखक म्हणजे मार्क बोडेन असे मानले जाते. बराक ओबामांनी खास त्यांना दिलेल्या मुलाखतीवर आधारित अशा अनेक गोष्टी त्यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. एखाद्या दीर्घकालीन मोहिमेचे सर्व टप्पे आणि अशा मोहिमांच्या यशापयशावर अवलंबून असणारे इतर संभाव्य राजकीय परिणाम यांचे वर्णनही त्यांनी उत्कृष्ट केले आहे.
या पुस्तकात घटनांचा क्रम सांभाळत व त्या घटनांची जलदगती कायम ठेवीत हे पुस्तक एखाद्या थरारक कादंबरीसारखे वाचनीय केले आहे. या धाडसासाठी प्रचंड प्रमाणावर माहिती गोळा करणे, ती साठवणे, त्यातली वेचक माहिती घेऊन विश्लेषण करणे आणि त्यातून हाती लागलेल्या निष्कर्षांच्या आधारे दहशतवादी कारवायांना लगाम घालणे, दहशतवाद्यांची धरपकड, इ. अनेक कामांच्या मागे किती मोठी यंत्रणा उभी असते याचे मनोवेधक आणि तथ्यपूर्ण चित्रण केले आहे. याबरोबर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा, त्यांची कठोर कार्यपद्धती यांची माहितीही होते. जगातील महाशक्तीचा सर्वेसर्वा असणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर कशी व कोणती दडपणे असतात, आपल्या कोणत्याही निर्णयामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांची चाहूल तो कशी घेत असतो याचेही रोचक वर्णन आपणास वाचता येते. तिथल्याही नोकरशहांचा आडमुठेपणा, झारीतले शुक्राचार्य किंवा लाल फितीचा कारभार यांचे दर्शन झाल्याने वाटते की जगातली महासत्ता असो वा इतर कुठला सामान्य देश असो, राजकारणाची वैशिष्टय़े सर्वत्र समानच आहेत.
९ सप्टेंबर २००१ला दहशतवाद्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड सेंटर आणि पेंटॉगॉन यावर हल्ले करून साऱ्या जगालाच हादरा दिला. अमेरिकेसारख्या स्वयंपूर्ण, स्वसामर्थ्यांवर रास्त विश्वास-  कधी कधी जादा विश्वास असणाऱ्या आणि म्हणून उद्धटपणे वागणाऱ्या महासत्तेला अनपेक्षित धक्का बसला. त्यामुळे साऱ्या मध्यपूर्वेत युद्धे सुरू झाली आणि अरबी जगत ढवळून निघाले. त्या दिवसापासून अल-कायदा संघटना आणि तिचा प्रमुख ओसामा याला नष्ट करणे हे एकच लक्ष्य अमेरिकेन सरकारने आपल्यासमोर ठेवले. लादेनला शोधून काढण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले, पण त्या हल्ल्यानंतर जवळपास ११ वर्षे तो अमेरिकेला हुलकावण्या देत राहिला. खरे म्हणजे डिसेंबर २०११मध्ये अफगाणिस्तानातील तोराबोरा पर्वतराजींमध्ये ओसामा बिन लादेन जवळजवळ हाती लागला होता, पण तेव्हा अमेरिकेची यंत्रणा अपुरी पडली. शिवाय इराक प्रकरणाला अमेरिकन धोरणाने अग्रक्रम दिला व ओसामाला निसटायला संधी मिळाली. अमेरिकन सरकार आणि गुप्तहेर खाते निराश झाले, पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. या कामातील प्रगती, वेगवेगळ्या टप्प्यांवर घेतले जाणारे निर्णय या सर्वामागचे ताणतणाव यांचा सुंदर गोफ लेखक गुंफतात.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ओसामाचा शोध घेण्याच्या मिशनला दिलेले प्राधान्य, त्याच वेळी उद्भवलेले आर्थिक मंदीचे संकट, त्यातून अमेरिकेची जगातील प्रतिमा सुधारण्याची त्यांची धडपड, यांचे चित्रण करता-करता लेखक पूर्वाध्यक्ष बुश आणि ओबामा यांच्या विचारपद्धतीतील व धोरणातील फरक स्पष्ट होतो. कमीत कमी जीवित/ वित्तहानी व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारे ओबामा आणि त्यापेक्षा दहशतवाद मोडताना आपलीच दहशत बसावी अशा कृतींना पाठिंबा देणारे बुश यांच्यातील फरक चांगला रंगवला आहे. त्याचबरोबर एका श्रीमंत कुटुंबातील मुलाचे खतरनाक दहशतवाद्यात रूपांतर होईपर्यंतचा लादेनचा प्रवासही कुशलतेने रेखाटला आहे.
लादेनच्या एखाद्या हालचालीची किंचितशी माहिती मिळवण्यासाठी रात्रंदिवस केलेली धडपड, अनेकदा त्यातून काहीच हाती न लागल्याने अधिकाऱ्यांना आलेले नैराश्य आणि सरतेशवटी अबोताबादमध्ये लागलेला लादेनचा शोध आपल्याला थरारून सोडतो. तिथे लादेन असण्याची शक्यता ५० टक्के आहे अशी बातमी मिळाल्यावर ओबामा आणि त्यांचे सहकारी यांनी गुप्तहेर यंत्रणेने दिलेल्या अहवालाची कसून छाननी केली. अनेक शंका उपस्थित करून चर्चा केली. यापूर्वी गुप्तहेर यंत्रणेच्या माहितीवरून केलेले हल्ले महागात पडले होते. त्यामुळे ओबामा अति सावध होते आणि त्यांच्यावरचे दडपणही प्रचंड होते.
ओबामांनी हे ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. नेव्ही सीलला पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याचा आदेश दिला गेला. त्यांच्यापुढे आणखी दोन पर्याय होते. एक म्हणजे मिसाइल्सच्या मदतीने थेट हल्ला किंवा दुसरा त्या आवारावर ड्रोनने हल्ला करणे. पण यामुळे होणारी निरपराध स्त्रिया व मुलांची जीवितहानी आणि इतर गोष्टींचा विध्वंस या बाबींचा विचार करून त्यांनी हे दोन्ही पर्याय फेटाळले.
नेव्ही सीलच्या पथकातील अत्युत्कृष्ट लोक निवडणे, या मोहिमेच्या प्रत्येक क्षणाची तयारी करणे, त्यातील वेगवेगळ्या शक्यतांचा अंदाज घेण्यासाठी अमेरिकन स्पेशल फोर्सने अबोताबादच्या आवाराची हुबेहूब प्रतिकृती सूक्ष्म तपशिलासह दोन ठिकाणी तयार केली होती. एक अमेरिकेत आणि दुसरी अफगाणिस्तानातील बग्राम येथे! अत्यंत कमी आवाज करणाऱ्या स्टील्थ हेलिकॉप्टरची यासाठी योजना तयार होती, त्यामुळे पाकिस्तानी रडारकक्षेत ते आले नसते. याशिवाय नेव्ही सीलचे पथक पाकिस्तानी फौजेकडून पकडले गेले आणि आणीबाणीची वेळ आली तर काय करायचे याचीही योजना तयार होती.
 शेवटी २९ एप्रिलला अमेरिकन वेळेनुसार सकाळी ओबामांनी ऑपरेशनला हिरवा कंदील दाखवला. इतर कोणत्याही देशाच्या सरकारला, अगदी जवळच्या मित्रराष्ट्राला- इंग्लंडलादेखील या योजनेची माहिती द्यायची नाही असाही निर्णय त्यांनी घेतला. बोडेन यांनी त्या तणावपूर्ण क्षणांचे वर्णन केले आहे. ज्या दिवशी (३० एप्रिलच्या रात्री) हे नाटय़ घडणार होते, त्या दिवशी खराब हवामान होते. त्यामुळे प्रत्यक्षात एक दिवस उशिरा (१ मेच्या मध्यरात्रीनंतर) हे सारे घडले. ओबामांनी त्याआधीच ठरल्याप्रमाणे पत्रकारांबरोबर व्हाइट हाऊसमध्ये मेजवानी घेण्याचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे ते मेजवानीस बाह्य़ात्कारी शांत आणि हसतमुख चेहऱ्याने उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहून कुणाला कसलीच कल्पना येत नव्हती. मेजवानीतून ते जरासे घाईने बाहेर पडले आणि तडक कंट्रोलरूमकडे गेले. ते आणि त्यांचे निकटचे सहकारी यांनी ती घटना घडताना जवळजवळ प्रत्यक्ष पाहिली.  नेव्ही सील कमांडरच्या हेल्मेटला बसवलेल्या कॅमेऱ्यातून ते दृश्य राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोचत होते.
काही मिनिटांतच सील कमांडरने सांगितले, ‘जिरोनिमो, जिरोनिमो.’ (हा मिशनचा सांकेतिक शब्द होता.) तरीही त्यांनी खात्री करून घेण्यासाठी विचारले Geronimo EKIA? (Enemy killed in action?)उत्तर आले, होय. मग व्हाइट हाऊसमधून ओबामा धीरगंभीर आवाजात बोलू लागले, ‘‘मी अमेरिकन नागरिकांना आणि साऱ्या जगाला सांगू इच्छितो की, युनायटेड स्टेट्सने हाती घेतलेले ऑपरेशन आज यशस्वी झाले आहे. अल्-कायदाचा म्होरक्या, हजारो व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणारा दहशतवादी ओसामा बिन लादेन हा या ऑपरेशनमध्ये मारला गेला आहे.’’
द फिनिश- द किलिंग ऑफ ओसामा बिन लादेन : मार्क बोडेन,
 प्रकाशक : अ‍ॅटलांटिक मंथली प्रेस,  पाने : ७९८, किंमत : १२८७ रुपये.

Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
ग्रामविकासाची कहाणी
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद