दिलीपकुमार यांनी आत्मप्रौढी टाळून शक्य तितक्या तटस्थतेने आपला प्रवास मांडला आहे. सिने कारकिर्द आणि खासगी जीवन यातील संदिग्ध व नाजूक घटनांविषयी मोकळेपणाने लिहिले आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. ते आपला खानदानी आब आणि अभिजातता अंगभर मिरवणारे राहिले. त्यांच्याबद्दल केवळ चित्रपटशौकिनांनाच नाही, तर इतरांनाही औत्सुक असते. ते शमवण्याचे काम या त्यांच्या आत्मचरित्रातून होऊ शकेल. या आत्मचरित्राचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात पेशावरमधील बालपणापासून हिंदी चित्रपटसृष्टीत बस्तान बसेपर्यंतचा प्रवास आला आहे. दुसऱ्या भागात ‘विधाता’ (१९८२) पासून सुरू झालेल्या चरित्र अभिनेत्याची कारकीर्द, मुंबईचे नगरपालपद, राज्यसभा सदस्यत्व या राजकीय प्रवासाचा; तसेच नॅब, नेहरू सेंटरसारख्या संस्थांच्या जडणघडणीत सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिलेले योगदान, तर तिसऱ्या भागात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांनी दिलीपकुमार यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात अमिताभ बच्चन, धर्मेद्र, मनोज कुमार, शबाना आझमी, अनिल कपूर, सुभाष घई, फरिदा जलाल, सलीम, हेमा मालिनी आदींचा समावेश आहे.
पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खानने कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे (आई) कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी (अघाजी) उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले.
नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्यालीखुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणीसमोर उभे राहिले. देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली. युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते. देविकाराणींच्या सूचनेवरूनच दिलीपकुमार या टोपण नावाने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. त्यानंतर १९९२ च्या ‘सौदागर’पर्यंतच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा तसेच कौटुंबिक घडामोडींचा सचित्र आढावा हिंदी सिनेमासृष्टीच्या सुवर्णकाळाची सैर घडवून आणतो.
दिलीपकुमार यांनी आत्मप्रौढी टाळून शक्य तितक्या तटस्थतेने आपला प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांच्या बहुपरिचित देदीप्यमान सिने कारकिर्दीबरोबरच खासगी जीवनातील काही संदिग्ध आणि नाजूक घटनांविषयीसुद्धा त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहे.
आई-वडिलांच्या पश्चात सहा बहिणी आणि पाच भावंडांची जबाबदारी असलेल्या दिलीपकुमार यांनी घर आणि व्यावसायिक कारकिर्दीतील चढउतारांबद्दल मोकळेपणाने लिहिले आहे. घोडय़ावरून पडून मणक्याला दुखापत होऊन कायमचा अधू झालेल्या आयूबसाहेब या भावाविषयी त्यांना विशेष स्नेह होता. त्याला आराम वाटावा म्हणून वडिलांनी त्यांचे बिऱ्हाड मुंबईतून नाशिकजवळील देवळाली येथे हलवले. अविवाहित थोरली बहीण सकिना आपा आणि मोठा भाऊ नूरसाहेब त्यांच्या मर्जीनुसार वागले. मात्र आई-वडिलांच्या पश्चात इतर भावंडांच्या संगोपनात त्यांनी काही कमी पडू दिले नाही. मात्र आपल्या मर्जीविरुद्ध दिग्दर्शक के. आसिफबरोबर लग्न केलेल्या अख्तर या उच्चशिक्षित बहिणीशी बरेच वर्षे त्यांनी संपर्क ठेवला नव्हता. कारण के. आसिफ तिच्यापेक्षा बरेच मोठे आणि दोनदा विवाहबद्ध झालेले होते. त्यांच्याशी विवाहबद्ध होऊन अख्तरने स्वत:च्या उज्ज्वल भवितव्याचे मार्ग स्वत:हूनच बंद केले, असे त्यांचे मत होते. त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असणारा नासीरही हिंदी चित्रपटसृष्टीत नायक म्हणून आपली ओळख निर्माण करीत होता. आपल्या या धाकटय़ा भावाचे नीट बस्तान बसावे म्हणून त्यांनी ‘गंगा-जमना’ चित्रपटात त्याला महत्त्वाची भूमिका करण्याची संधी दिली. मोठय़ा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना अधिकाधिक पैशांची गरज होती. तरीही त्यांनी लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होत भाराभर चित्रपट साइन करणे कटाक्षाने टाळले. एका वेळी एक अथवा दोनच चित्रपट हे तत्त्व कसोशीने पाळले, हे त्यांनी अभिमानाने नमूद केले आहे.
‘मुघल-ए-आझम’चे चित्रीकरण चालू असताना दिलीपकुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, या वदंतेला त्यांनी त्यांच्या या आत्मकथनात दुजोरा दिला आहे. सायरा बानूशी झालेला विवाह हे विधिलिखित होते. हे वैवाहिक जीवन प्रदीर्घ काळ टिकले, असा दिलीपकुमार यांचा विश्वास आहे. ‘मध्यंतरीच्या काळात १९८२ मध्ये अस्मा रहेमान या महिलेसोबत केलेला दुसरा विवाह ही आपल्या आयुष्यातील घोडचूक होती. माझ्यावरील विश्वास आणि प्रेमामुळेच सायराने मला माफ केले आणि त्यातून सावरायला मदत केली,’ असा कबुलीजबाबही दिलीपकुमार यांनी दिला आहे.
१९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या ‘क्रांति’ (१९८१)पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या सेकंड इनिंगमध्येही ‘शक्ति’, ‘विधाता’, ‘मजदूर’, ‘दुनिया’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. मिळालेल्या मानसन्मानांबरोबरच पाकिस्तान सरकारने १९९८ मध्ये दिलेला ‘निशान ए इम्तियाज’ हा पुरस्कार स्वीकारल्यावरून उठलेल्या वादाचा परामर्शही या पुस्तकात त्यांनी घेतला आहे. अनेक दुर्मीळ छायाचित्रे तसेच दिलीपकुमार यांच्या चित्रपटांच्या सविस्तर सूचीमुळे आत्मकथन संग्रहणीय ठरते.
द सबस्टन्स अ‍ॅण्ड शॅडो : दिलीपकुमार,
हाय हाऊस इंडिया, नवी दिल्ली,
पाने : ४५६, किंमत : ६९९ रुपये.