अध्यक्ष महाराज, हा सरासर अन्याय आहे. प्रत्येक यंत्रणेची कामाची एक चौकट असते. त्या चौकटीत राहूनच यंत्रणेतील सर्वाना काम करावयाचे असते. यालाच प्रशासकीय शिस्त असे म्हणतात. ही चौकट तोडणे हा शिस्तभंग असतो आणि शिस्तभंग करणाऱ्यास क्षमा नाही, असे प्रशासकीय शिष्टाचार सांगतो. तरीही, एखादी व्यक्ती यंत्रणेचा आणि शिस्तीचा शिरस्ता तोडून टाकत मनमानीपणा करते, हे खेदजनक आहे. असे करणाऱ्या व्यक्तीचे समाजाकडून कौतुक केले जाते, हा तर त्याहूनही विचित्र आणि चिंताजनक असाच प्रकार आहे. याला वेळीच पायबंद घातला नाही, तर प्रशासकीय कामकाजाच्या प्रथांना केव्हा मूठमाती मिळेल ते कळणारदेखील नाही. असा शिरस्ताभंग करून यंत्रणेस वेठीस धरणारी माणसे समाजाच्या कौतुकाचे धनी झाली तर क्रांतीची बीजे रुजतील. ही स्थिती ओळखून, चौकटीबाहेर जाऊ  पाहणाऱ्यांना वेळीच आवर घातला पाहिजे. अध्यक्ष महाराज, या देशात कामकाजाच्या शिस्तीला ‘वेळ’ नावाची एक वेसण बांधलेली असते. त्यानुसार काम करणे सर्वावर बंधनकारक असते. कुणाकडे कोणत्या कामासाठी किती वेळ असला पाहिजे, याचे कठोर निकषही प्रशासकीय शिस्तीचा भाग म्हणून आखून ठेवण्यात आले आहेत. त्याचे पालन करणे हीच शिस्त असताना, भरपूर वेळ काम करीत सुटणे हा शिस्तभंगाचाच प्रकार नव्हे काय? अध्यक्ष महाराज, या देशात राष्ट्रपतींनादेखील पुरस्कार देताना वेळेचाच विचार करावा लागतो. सामान्य जनतेला भेट देण्याआधी मंत्री, मुख्यमंत्री किंवा कुणीही सरकारी अधिकारी वेळ ठरवून देतात. तसे नसेल, तर कितीही वेळ ताटकळत बसणाऱ्या जनतेला भेट मिळतच नाही. तीच पद्धत न्यायव्यवस्थेतही असायलाच हवी. उन्हाळी सुट्टी हा नियमच आहे. त्या काळात, ‘सुट्टी म्हणजे सुट्टी’ हा नियम पाळणे सर्वावर बंधनकारकही असते. असे असताना, एखादीच व्यक्ती रात्रंदिवस न्यायदानाचे काम करत बसली, तर तो शिरस्ताभंग मानून त्यास पायबंद घातला गेला पाहिजे, असे, अध्यक्ष महाराज, या ठिकाणी आम्ही नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ  इच्छितो. मुंबईच्या उच्च न्यायालयास ६ मेपासून ३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असते. या काळात सुट्टीवर जाणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. शिवाय, सकाळी ११ वाजता सुरू होणारे दैनंदिन काम सायंकाळी ५ वाजता आटोपणे ही दैनंदिन कार्यपद्धतीदेखील सर्वत्र पाळली जाते. असे असताना, काही जण त्याचे राजरोस उल्लंघन करीत असतील, तर शिस्तीचे महत्त्व सांगण्याचा अधिकार या व्यवस्थेस राहील तरी काय? अध्यक्ष महाराज, आमचा रोख न्यायमूर्ती शारूख काथावाला यांच्याकडे आहे, हे आता स्पष्टच सांगून टाकतो. सुट्टी सुरू होण्याच्या एक दिवस आधी ते कामकाजाच्या वेळेचे सारे नियम बाजूला सारून चक्क पहाटे साडेतीन वाजेपर्यंत कामकाज करीत होते. हा शिरस्ता मोडण्याचा प्रकार तर आहेच, पण त्यांच्या या कामाचे माध्यमांनी कौतुक केले, ही त्याहूनही चिंतेची बाब आहे. देशात आज दहा लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत, कारण इथे वेळेचे आणि शिरस्त्याचे पालन केले जाते. अध्यक्ष महाराज, पहाटेपर्यंत काम करून शिरस्ता मोडू पाहणाऱ्यांना वेळीच आवर घातला नाही, तर देश सुधारेल ही भीती आहेच याची नोंद घ्यावी!