काही प्रसंग असे असतात की, त्याच्या अनुभवानेच नव्हे, तर केवळ कल्पनेनेदेखील ‘जनताजनार्दना’स पावन झाल्यासारखे वाटू लागते. ज्याच्या मुखीचे जेमतेम दोन शब्द ऐकण्यासाठी आतुरलेल्या कर्णसंपुटांचा सांभार सांभाळत तासन्तास ताटकळण्याची जनताजनार्दनाची तयारी असते, त्याने स्वत:च समोर येऊन दर्शन द्यावे आणि प्रसन्न होऊन आपल्या कृपेचा वर्षांव करावा असे क्षण मुळातच दुर्मीळ असतात. अशा वातावरणात, एखाद्या सरकारी ‘बाबू’ने स्वत:हून पुढे यावे आणि जनताजनार्दनाच्या उंबरठय़ास त्याच्या पदकमलांचा स्पर्श व्हावा हा तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. या योगाचे महत्त्व सरसकटपणे सर्वाना समजणार नाही, पण लालफितीच्या कारभारात अडकलेले एखादे काम ‘सोडविण्या’साठी सरकारदरबारी संबंधित बाबूच्या दरवाजाशी केविलवाण्या चेहऱ्याने ताटकळण्याचा दीर्घ अनुभव ज्याच्या गाठीशी असतो, त्याला मात्र या मणिकांचन योगाचे महत्त्व पटकन् पटेल. आपल्याकडे जसा पालकमंत्री असतो, तशीच, पालक सचिव नावाची एक व्यवस्थाही सरकारने तयार केली आहे. हे जनतेस ऐकून तरी माहीत असावयास हवे. या पालक सचिवांनी ठरावीक कालावधीत आपापल्या पालकत्वाखालील जिल्ह्य़ास भेट द्यावी, तेथील जनताजनार्दनाशी संवाद साधावा, त्यांची सुखदु:खे जाणून घ्यावीत आणि प्रशासकीय पातळीवर त्यांचे निराकरण करून सामान्यांच्या समस्यांवर तोडगा काढावा अशी या व्यवस्थेमागील अपेक्षा असते, हेही लोकांना ऐकून माहीतच असेल. मुळात, ही व्यवस्था प्रत्यक्षात अनुभवास येणे यापरता आनंद नाही. त्या आनंदाचा अनुभव क्वचित कधी कोणास आला असेल, तोच त्याचे योग्य वर्णन करू शकेल. पण इथे मुद्दा तो नाही.. असा अनुभव, जम्मूमधील जेमतेम सातआठ हजार वस्तीच्या गावांना नुकताच आला, ही आपल्यासारख्या मराठी मुलखातील जनताजनार्दनास हेवा वाटण्यासारखी बाब म्हणावी लागेल. काश्मीरच्या चाका कुंडी नावाच्या परिसरातील दुर्गम ठिकाणी असलेल्या आपल्या गावास भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात अशी विनंती तेथील जनताजनार्दनाने प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्यास केली आणि हे महाशय तातडीने त्या गावाच्या भेटीस निघाले. मात्र जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्य असले तरी वय झाले असल्याने व प्रकृती साथ देत नसल्याने या दुर्गम भागास भेट देण्यासाठी पायपीट करणे शक्य नसल्याची प्रामाणिक कबुली या अधिकाऱ्याने दिली. असे काही कारण दिले, की कर्तव्य टाळण्याचा उद्देश असावा असा अनुभवी जनताजनार्दनाचा समज होण्याचीच शक्यता अधिक असते. पण तेथील जनतेचा त्या अधिकाऱ्याच्या प्रामाणिक कबुलीवर प्रगाढ विश्वास असल्याने त्यांनी त्या अधिकाऱ्यास पालखीत बसविले, त्याच्या शिरावर छत्र धरले आणि जणू एखाद्या महाराजाच्या थाटास शोभेल अशा रीतीने त्याला आपल्या गावात आणले.

या अद्वितीय प्रसंगाच्या वर्णनासाठी ही जागा खरे तर पुरेशी नाही. पण खुद्द सरकारी बाबू आपल्या दाराशी येणे हा केवढा आनंदाचा सण असू शकतो, याची प्रचीती यानिमित्ताने त्या गावास निश्चितच आली असेल. मराठमोळ्या माणसांना अशा प्रसंगी ‘दिवाळी-दसरा’ साजरा केल्याचा आनंद होत असतो. तोच आनंद जम्मूच्या त्या दुर्गम भागातील सातआठ हजारांच्या त्या वस्तीला झाला असेल, यात शंकाच नाही.. समाजमाध्यमांवर अशा पालखीबहाद्दर बाबूला ‘आधुनिक महाराजा’ वगैरे विशेषणे लावून त्याची संभावना केली गेली असली, तरी तो क्षण त्या गावाच्या दृष्टीने सोहळ्याहून कमी नसणार हे नक्कीच!..

कर्तव्यपालनाची तयारी असेल, तर जनताजनार्दन पालखी घेऊन बाबूच्या दारी हजर राहतो, हा या घटनेने बाबूशाहीला दिलेला धडाही अनुकरणीय असाच म्हणावा लागेल..