महाराष्ट्राचे ‘राजकीय शल्यविशारद’ देवेंद्र फडणवीस यांनी सध्या शस्त्रक्रियांचा सपाटा सुरू केलाय. पावणे दोन वर्षे औषधपाण्याचे जुजबी उपचार करूनही सरकारच्या कारभारात सुरू झालेला आजार बरा होत नाही असे दिसताच त्यांनी नुकतीच एक अवघड शस्त्रक्रिया पार पाडली आणि कारभारातला आजार एका झटक्यात ‘खड-खडीत’ बरा करून टाकला. उठताबसता फडणवीसांच्या कारभारावर ‘शेतकऱ्यांचे आसूड’ ओढणारी शिवसेनाही या शस्त्रक्रियेचे कौतुक करते, म्हणून विरोधी पक्षांची बोटे आश्चर्याने तोंडात गेली आणि अशा बेसावध क्षणाचा नेमका फायदा घेत त्याच टेबलावर डॉक्टर फडणवीसांनी लगेचच दुसरी शस्त्रक्रियाही करून टाकली. सर्वसामान्यांच्या आजाराची मात्रा असलेल्या योजनेचे तापदायक वाटणारे नाव काढून टाकून तेथे दुसरे नाव चिकटविण्याची ही शस्त्रक्रिया अवयव-प्रत्यारोपणाइतकीच अवघड होती; पण हातात हत्यारे घेतलीच आहेत, तर त्याच उत्साहात आणखीही एक शस्त्रक्रिया करून फडणवीस डॉक्टरांनी शल्यविशारदाची किमया करून दाखविली. सत्तेवर आल्यापासून सुरू झालेल्या डोकेदुखीचे कारण शोधण्यात दोन वर्षे गेली होती. परवा ऋषी कपूरच्या एका ट्वीटमधून डोकेदुखीचे कारणही सापडले आणि उपायही मिळाला. राजीव गांधी यांच्या नावाने काँग्रेस सरकारने सुरू केलेली योजना जनतेचे आजार संपविणारी असली, तरी या नावामुळेच डोकेदुखीचा विकार वाढल्याचे निदान झाले आणि फडणवीसांना थेट शस्त्रक्रियेचाच सल्ला मिळाला. नामांतर प्रत्यारोपणाची ही वरवर सोपी वाटणारी अवघड शस्त्रक्रिया आटोपल्यावरच शल्यविशारद फडणवीस ऑपरेशन थिएटरातून बाहेर आले. एखादा निकामी अवयव काढून टाकून त्याच्या जागी त्याहूनही चांगले काम करणारा अवयव बसविताना नव्या अवयवाची निवड करणे सोपे नसते. समोर एकाच अवयवाचे अनेक नमुने असले, तरी त्यातून नेमका अवयव निवडण्याचे फडणवीसांचे कौशल्य एवढे कौतुकास्पद ठरले, की राजीव गांधींचे नाव काढून त्या जागी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरणाऱ्यांनाही वाहवा करण्यावाचून इलाज उरला नसेल. राजीव गांधींचे नाव काढून तेथे महात्मा फुले यांचे नाव बसविण्याची ‘नामप्रत्यारोपणा’ची शस्त्रक्रिया करून सरकारचा आजार तर बरा केला, पण त्यामुळे काही जणांचा राजकीय ताप वाढला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील या नामप्रत्यारोपणाच्या राजकीय शस्त्रक्रियेमुळे झालेली पंचाईत कशी पचवावी, असा प्रश्न काहींना पडला. शरद पवारांनी मुंबईच्या सागरी सेतूसाठी राजीव गांधींचे नाव सुचविले, तेव्हा गांधी-नेहरूनामाचा जप करणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्काही बसला होता, पण तो त्यांच्या तेव्हाच्या डोकेदुखीवरचा जुजबी स्वयंउपचार होता. आता शस्त्रक्रियांचा हंगाम सुरू होतोय. पुढच्या शस्त्रक्रियेसाठी फडणवीस डॉक्टर कोणाला टेबलावर घेणार, या चिंतेची नवी साथ आता सुरू झाली असेल..