विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. वेताळास पुन्हा खांद्यावर घेऊन तलवार सावरत तो चालू लागला. त्याचा हा हट्ट पाहून वेताळ खदाखदा हसू लागला. विक्रमादित्य मात्र अजिबात विचलित झाला नाही. तो चालतच होता. आपले काम पूर्ण करायचेच असा निर्धारही त्याने केला होता. तब्बल ३६ वर्षे तो एकाच ध्यासाने पछाडला होता. कसेही करून राजभाषेचा संपूर्ण वापर सरकारी कामकाजात झालाच पाहिजे, असे सर्व अधिकाऱ्यांना वारंवार बजावूनही एवढी साधी गोष्टदेखील ३६ वर्षांत साध्य होत नाही या विचाराने तो अस्वस्थ होता. खांद्यावरच्या वेताळाला त्याची ही अवस्था माहीत होती. काही क्षण तोही कळवळला. त्याने आपला विचार बदलला, आणि विक्रमादित्याशी तो कनवाळूपणाने बोलू लागला. ‘विक्रमादित्या, आज मी तुला गोष्ट सांगणार नाही. त्याचे उत्तरही मी विचारणार नाही. त्यामुळे उत्तर माहीत असूनही तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील वगैरे भीतीही तुला दाखविणार नाही. पण मला जर तू आज तुला हवे त्या ठिकाणी नेऊन सोडले नाहीस तर मात्र, तुझी इच्छा पूर्ण होणार नाही, आणि मीदेखील खांद्यावरून पुन्हा झाडावर जाऊन बसेन हे लक्षात ठेव!’ वेताळाची ही नवीच धमकी ऐकून विक्रमादित्य मनाशीच हसला. गेली ३६ वर्षे आपण प्रयत्न करत आहोत, याही वेळी यश आले नाही, तर पुन्हा नव्याने प्रयत्न करू, पण धीर सोडायचा नाही, असे त्याने स्वत:स बजाविले, आणि वेताळाच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो चालतच राहिला. काल आपण गेल्या ३६ वर्षांतील २७ वा शासन निर्णय जारी केला, हे त्याला आठवले, आणि त्याचे मन भूतकाळात गेले. पहिल्या शासन निर्णयाची तारीखही त्याला लख्ख आठवली होती. १८ मे १९८२! ३६ वर्षांपूर्वी त्या परिपत्रकाचा मथळादेखील ‘शासन व्यवहारात मराठीचा वापर’ हाच होता, आणि त्याचे काटेकोर पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही आपण दिला होता, हेही त्याला आठवले. पुढे वारंवार तेच परिपत्रक आणि कारवाईचे इशारे आपण देत राहिलो तरीही गेल्या ३६ वर्षांत एवढे काम आपण करू शकलो नाही, याची त्याला अजिबात खंत वाटत नव्हती. उलट, या कामासाठी सतत ३६ वर्षे ध्यासाने आपण पछाडलेलो आहोत, याचा त्याला अभिमानच वाटू लागला होता. कसेही करून राजभाषा मराठीला पुन्हा भरजरी वस्त्रे नेसवून दिमाखात शासन व्यवहारात उभी करायचीच, असा विचार त्याच्या मनात घोळत असतानाच वेताळ पुन्हा खदाखदा हसला. पण विक्रमादित्याचा निर्धार कायम होता. आपल्या नव्या निर्णयामुळे आता तो दिवस दूर नाही, याचा त्याला कमालीचा विश्वास वाटत होता. ३६ वर्षांत सत्तावीस परिपत्रके काढून जे काम झाले नाही, ते कालच्या परिपत्रकातून नक्कीच होणार.. विक्रमादित्य स्वत:शीच म्हणाला, आणि वेताळाने  विक्रमादित्याच्या डोक्यावर हात ठेवला. आता एका प्रश्नाचे उत्तर तुला द्यावेच लागेल. अन्यथा, पुन्हा मी झाडावर लटकेन.. वेताळ म्हणाला, ‘विक्रमादित्या, विधिमंडळाच्या अधिवेशनातील राज्यपालांचे संपूर्ण अभिभाषणही मराठीतच असेल याची तू हमी देतोस काय?’ खदाखदा हसत वेताळाने विचारले आणि विक्रमादित्य चक्रावला. त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला, आणि वेताळाने पुन्हा झाडाकडे झेप घेतली..