‘पिणे’ ही एक आल्हाददायक कृती असते. जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत ती एक गरजदेखील असते. म्हणूनच, ‘पिण्याचा’ मुद्दा निघाला, की मने मोहरू लागतात. नजरेसमोर वेगळेच विश्व तरळू लागते, आणि केवळ कल्पनेनेदेखील हवेत तरंगल्यासारखे वाटू लागते. पिणे ही बालपणापासूनची सवय असते. खाण्याची सवय नंतर लागते. पुढे वयोमानाबरोबर पिण्याच्या सवयी बदलू लागतात, आणि लहानपणी दुधावर पोसलेल्या शरीराला मोठेपणी पिण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हांची चटक लागते. वय वाढले की काहींना दारू पिण्याचा मोह होतो. अगोदरच पिण्याचा अनुभव, आणि त्यात दारूच्या आनंदाची भर, असा योग जुळून आला की काहींना या पिण्याचा आनंद द्विगुणित झाल्यासारखा वाटू लागतो, आणि बघता बघता, दुधाची जागा दारू घेते. पिण्याच्या या नव्या सवयीच्या दुष्परिणामांची जाणीव होते, तेव्हा ही सवय शिगेला पोहोचलेली असते. मग त्यातून बाहेर पडण्याच्या वाटांचा शोध सुरू होतो. दारूची नशा संसाराची दुर्दशा करते, त्यातून  सामाजिक समस्याही वाढतात, तरीही त्यातून राज्याला मिळणाऱ्या महसुलाचा विकासात मोठा वाटा असतो. दारूच्या सेवनाने माणसाचा तोल जात असला, तरी महसुलातून राज्ये भक्कम उभी राहात असतात. मग दारूबंदी हा केवळ सुविचार उरतो. बिहारने मात्र हिंमत दाखवून राज्यात दारूबंदी लागू केली. सालिना दहा हजार कोटींच्या महसुलाचा हा भक्कम स्रोत केवळ आदेशाच्या एका फटकाऱ्यात बंद करण्याचे धाडस सरकारने दाखविले. पण दारू पिणाऱ्यांची मानसिकता बदलणे सोपे नव्हते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा बहुधा या मानसिकतेचा सखोल अभ्यास असावा. दारूबंदी लागू करताच दारूडय़ांच्या मानसिकतेची समस्या सुरू होईल, हे त्यांनी ओळखले, आणि दारूला दुधाचाच पर्याय देऊन परिवर्तनही घडविले. लहानपणीच्या दूध सेवनाच्या आनंदी आठवणी जागविण्याचा अनोखा प्रयोग आता बिहारमध्ये आकाराला येतोय. दारूबंदी लागू झाल्यापासून या राज्यात दुधाची विक्री झपाटय़ाने वाढू लागली आहे. सूर्यास्तानंतर जेव्हा दारूच्या आठवणीने मने व्याकूळ होतात, तेव्हा दुधाचा एक प्याला समोर घ्या, मंद संगीताच्या साथीने त्याचे घुटक्याघुटक्याने सेवन करा असा एक कानमंत्र नितीश कुमारांनी जनतेला दिला होता. त्याचा परिणामही दिसू  लागला आहे. दारूबंदी यशस्वी होते, आणि दूध पिण्याची सवय वाढते, हे नितीश कुमारांच्या बिहारने सिद्ध केले आहे. पिण्याच्या सवयीचा हा उलटा प्रवास आनंददायी करण्यासाठी पिण्याचे मानसशास्त्र जाणावे लागते. संध्याकाळच्या संधिप्रकाशात मध, बर्फी आणि मिठायांचा मधुर ‘चखणा’ समोर घेऊन, दारू पिण्याची कल्पना करत गरम दुधाच्या घुटक्यांची मजा लुटलीत, तर कालांतराने दारूचा विसर पडेल आणि दुधाचीच चटक लागेल, या नितीश कुमार यांनी दिलेल्या कानमंत्राची केवळ कल्पना करणे पुरेसे नाही. तो आनंद प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. त्यासाठी लहानपण आठवायला हवे..

How long do birds live
पक्षी किती काळ जगतात? म्हातारपणी पक्ष्यांची पिसे पांढरी पडतात का? जाणून घ्या रंजक तथ्य
Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
Trimbakeshwar taluka, nashik district, water scarcity
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणी टंचाईमुळे स्थिती बिकट
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?