तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखिल भारतीय काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वारे सळसळू लागले, आणि लोकसभा निवडणुकीनंतरच्या गेल्या चार वर्षांपासून पसरलेली मरगळ पुसली गेली. चार महिन्यांपूर्वी, १८ मार्च रोजी राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवी कार्यकारिणी स्थापन होणे अपेक्षित होतेच, त्यामुळे तेव्हापासूनच काँग्रेसच्या बुजुर्गापैकी अनेकांनी आपापल्या राजकीय कुंडल्या पुन्हा एकदा, नव्याने तपासून घेण्यास सुरुवात केली होती. मोहन प्रकाश यांना महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून हटविल्यानंतर काही बुजुर्गाच्या मनात शंकेची  पाल चुकचुकू  लागली होती. पण सगळेच नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नसतात. इकडे अस्थिरतेचे एवढे सावट दाटलेले असताना, शिंदे मात्र निर्धास्त होते. कारण, जे काही घडणार ते आपल्या इच्छेनुसारच असणार हे त्यांना पक्के ठाऊक होते. कधीपासूनच त्यांना निवृत्तीचे वेध लागले होते. आता निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडायचे, सोलापुरात शेतावरच्या घरात साहित्यिकांसमवेत गप्पांचा फड रंगवायचा, संगीताच्या मैफिली सजवायच्या, अशी अनेक स्वप्ने त्यांनी बोलूनच दाखविली होती. काँग्रेसमध्ये ज्येष्ठांच्या इच्छेची कदर केली जाते, ती अशी! आता सोलापुरातील शिंदेंच्या शेतघरात साहित्यिक आणि सांगीतिक मैफिली रंगतील. आपल्यासोबतच्या अन्य काही सहकाऱ्यांनाही राहुलजींनी निवृत्तीची संधी देऊन त्यांच्याही उत्तरायुष्याचे सोने केले याचा आनंद त्यांना लपविता येत नसेल. एरवीही, भारत हा नवयुवकांचा देश असल्याने, राजकारणातही नवयुवकांना संधी मिळणे हाच नैसर्गिक न्याय. सत्तेवर असलेल्या भाजपने तर याच न्यायाची सुरुवात कधीपासूनच केली होती. ज्यांनी पक्ष उभा केला, पक्षाला सत्तेच्या पहिल्या पायरीपर्यंत आणून ठेवले, त्या अडवाणी-जोशींसारख्या नेत्यांनाही या न्यायाच्या तत्त्वापुढे झुकावे लागले. तेव्हा ज्या काँग्रेसजनांनी अडवाणी यांना सहानुभूती दाखवत भाजपवर टीकेची झोड उठविली होती, त्यांपैकी दिग्विजय सिंहासारख्या काँग्रेसी चाणक्यासही आता निवृत्तीचा मार्ग दाखवून राहुलजींनी पक्षाला नव्या वळणावर आणून ठेवले आहे. भाजपप्रमाणेच आता काँग्रेसमध्येही, हाताची बोटे एकमेकांत गुंफून पक्षाच्या नव्या वाटचालीकडे त्रयस्थपणे पाहणाऱ्या जाणत्या नेत्यांची एक फळी तयार झाली, हे नव्या राजकारणाचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. दोनतीन वर्षांपूर्वी, महिला सबलीकरणाचे एक सुंदर स्वप्न राहुलजींनी सातत्याने पाहिले होते.  त्यामुळे, राहुलजींच्या नव्या कार्यकारिणीत महिलांचे प्रतिनिधित्व असेल, असा साहजिक समज असलेल्यांना धक्का देऊन राहुलजींनी एक वेगळेच धक्कातंत्र अवलंबिले. इंदिराजी आणि अलीकडे सोनियाजी यांची परंपरा हा पक्ष सांगतो. तरीही नव्या कार्यकारिणीत महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही, म्हणून पक्षात काहींच्या भुवया उंचावल्या असतील. पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या महिला खंतावल्यादेखील असतील. पण, ‘राजकारण हे विषासमान असते’, हा सोनियाजींनी दिलेला संजीवनी मंत्र पचविला, तर आपल्याला स्थान मिळाले नाही याचे त्यांना दुख वाटणार नाही. मरगळलेल्या काँग्रेस पक्षाला तरुण चेहरा लाभला आहे, हेच खरे!