अमृतांशु नेरुरकर

गोपनीयतेचा विचार करताना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तात्कालिक संदर्भ तपासणे आवश्यक ठरते..

special provisions in constitution of india for sc st and obc
संविधानभान : सामाजिक न्यायाची गुंतागुंत
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

‘हार्वर्ड लॉ रिव्ह्य़ू’मध्ये प्रकाशित झालेला वॉरन आणि ब्रॅण्डाईसचा लेख व्यक्तीच्या गोपनीयतेच्या (प्रायव्हसी) अधिकाराचा हिरिरीने पुरस्कार करणारा होता यात काही वादच नाही. गोपनीयतेची संकल्पना, सद्य:परिस्थितीतील तिची निकड आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तिच्या होणाऱ्या उल्लंघनाची प्रथमच इतक्या सुसूत्रपणे मांडणी केल्यामुळे अमेरिकेत त्या लेखाच्या अनुषंगाने या विषयावर चर्चा व्हायला लागली. लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच्या केवळ दोन दशकांत अमेरिकेतील गोपनीयतेसंदर्भातल्या किमान डझनभर खटल्यांच्या निवाडय़ात न्यायाधीशांनी या लेखाचा संदर्भ दिला.

योगायोगाची गोष्ट म्हणजे जे (कथित) कारण या लेखाचं प्रेरणास्थान होतं त्या संदर्भातल्या खटल्यावर निकाल देताना अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने याच लेखाचा आणि त्यात ऊहापोह केलेल्या तत्त्वांचा संदर्भ दिला. आपल्या लहान भावाचं समलिंगी वर्तन गोपनीय ठेवण्याचा अधिकार त्याला मिळावा, ज्यामुळे त्याला सामाजिक जाचाला सामोरं जावं लागणार नाही, या प्रेरणेतून १८९० साली लिहिलेल्या या लेखाचा आधार अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने २०१५ साली समलिंगी विवाहाला घटनादत्त हक्क म्हणून कायदेशीर मान्यता देताना केला. १२५ वर्षांनी का होईना पण एक वर्तुळ पूर्ण झाले.

गेल्या शतकभरात वॉरन आणि ब्रॅण्डाईसने गोपनीयतेसंदर्भात विशद केलेल्या ‘एकांत जतन करण्याचा अधिकार’ (राइट टू बी लेट अलोन) या संकल्पनेचा बऱ्याच विद्वानांनी विविध प्रकारे विस्तार केलाय. सुप्रसिद्ध अमेरिकी लेखक हेन्री जेम्सने वृत्तपत्रांमुळे होणाऱ्या खासगीपणाच्या उल्लंघनासंदर्भात पुष्कळ लिखाण केलंय. वॉरन आणि ब्रॅण्डाईसला समकालीन या लेखकाने त्यांचेच लिखाण आधारभूत ठेवून माध्यमांच्या सनसनाटीकरणाच्या (सेन्सेशनलायजेशन) हव्यासामुळे माणसांच्या व्यक्तित्वावर पडणारा घाला आणि गोपनीयतेच्या होणाऱ्या तडजोडीविरोधात चांगलाच आवाज उठवला.

अमेरिकेतील ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ तसंच तत्त्वज्ञानाचा अभ्यासक, विल्यम्स जेम्सने, १९वं शतक संपतासंपता मानसशास्त्रावर ‘द प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी’ नावाचं नितांतसुंदर पुस्तक लिहिलं. त्यात मानवाच्या मनोव्यवहारांबद्दलचं विवेचन करताना त्याने गोपनीयतेच्या मुद्दय़ावर महत्त्वाचे भाष्य केलं. विल्यम्स जेम्सच्या म्हणण्यानुसार कोणतीही व्यक्ती त्या त्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या लोकांपुढे भिन्न स्वरूपात व्यक्त होत असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं असं प्रकटीकरण करण्यासाठी स्वत:बद्दलच्या खासगी माहितीला काही प्रमाणात गुप्त ठेवण्याचं धोरण ती व्यक्ती स्वीकारते. म्हणूनच स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी खासगी माहितीच्या वहनावर त्या व्यक्तीचं संपूर्ण नियंत्रण असणं गरजेचे आहे हा महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडला. विल्यम्स जेम्स हा वर उल्लेखलेल्या हेन्री जेम्सचा सख्खा भाऊ होता हा अजून एक गमतीशीर योगायोग!

प्रख्यात अमेरिकी समाजशास्त्रज्ञ एरविंग गॉफमननं विल्यम्स जेम्सच्या वरील मुद्दय़ावर वेगळ्या पद्धतीनं भाष्य केलं आहे. त्याने आपल्या समाजजीवनाला रंगभूमीची उपमा दिलीय. या रंगभूमीच्या व्यासपीठावर प्रत्येक व्यक्ती एखाद्या नटासमान वावरत असते आणि आपली भूमिका पार पाडत असते. पण या व्यासपीठामागे एक ‘बॅकस्टेज’ असते, जे सर्वाना दिसूही शकत नाही आणि तिथे अगदी थोडय़ा ‘अधिकृत’ व्यक्तींनाच प्रवेश असतो. सार्वजनिक व्यासपीठावर योग्य पद्धतीने व्यक्त होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती या खासगी बॅकस्टेजचा वापर करत असते. थोडक्यात आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यात गोपनीयतेचा अधिकार अबाधित राहण्याची आत्यंतिक गरज आहे हा मुद्दा गॉफमन ठासून मांडतो.

२०व्या शतकात गोपनीयतेच्या संकल्पनेला बऱ्याच प्रमाणात समाजमान्यता आणि काही प्रमाणात राजमान्यता मिळायला सुरुवात झाली असली तरीही या संकल्पनेच्या विरोधात असणाऱ्या टीकाकारांची संख्याही कमी नव्हती. बऱ्याचदा ही टीका राजकीय किंवा व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी केली जात असल्यामुळे तिचा इथे उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. पण प्रख्यात कायदेपंडित आणि अर्थतज्ज्ञ रिचर्ड पॉसनर यांची आणि त्यांनी गोपनीयतेच्या अधिकारावर आर्थिक मुद्दय़ांवरून केलेल्या टीकेची दखल घेणं आवश्यक आहे.

कायदा आणि न्यायदान क्षेत्रातील अमेरिकेतील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून रिचर्ड पॉसनर ओळखले जातात. केवळ विधि आणि अर्थ या विषयांवरच नाही तर राजकीय, सामाजिक, पर्यावरणीय विषयांवर त्यांनी ४०हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. प्रदीर्घ काळ शिकागोच्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाचे काम केल्यानंतर आज ८२व्या वर्षीदेखील शिकागो विधि महाविद्यालयात पॉसनर प्राध्यापकाच्या भूमिकेत विद्यादान करत आहेत.

पॉसनर यांनी नेहमीच कायद्याच्या अंमलबजावणीचा आर्थिक अंगाने अभ्यास केला आहे आणि गोपनीयतेचा विचार करतानासुद्धा त्यांनी हेच तत्त्व अंगीकारलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गोपनीयतेच्या अधिकाराचा दुरुपयोग कोणतीही व्यक्ती तिच्याबद्दलची नकारात्मक, अविश्वासार्ह किंवा अगदी लांच्छनास्पद माहिती लपविण्यासाठी करू शकेल. हे एक वेळ सामाजिक जीवनात क्षम्य असेल पण कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात मात्र एका व्यक्तीने केलेल्या लपवाछपवीची समोरच्या व्यक्तीला जबर किंमत द्यावी लागू शकते.

एका उदाहरणाने वरील मुद्दा नीट समजून घेता येईल. समजा तुम्हाला तुमची जुनी गाडी विकायची आहे. चार महिन्यांपूर्वी त्या गाडीला एक मोठा अपघात झाला होता आणि त्यात तिच्या इंजिनमधल्या काही भागांचं पुष्कळ नुकसान झालं होतं. गाडी विकताना तिचा हा इतिहास गोपनीय ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा तिच्या विकल्या जाण्याच्या शक्यतेवर आणि तिला मिळू शकणाऱ्या किमतीवर नक्कीच सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होईल. गोपनीयतेच्या अधिकाराचा दुरुपयोग करून माहितीच्या पारदर्शकतेला हरताळ फासणं आर्थिकदृष्टय़ा प्रचंड नुकसानकारक ठरू शकतं आणि त्यामुळेच खासगी माहितीच्या गोपनीयतेचा अमर्यादित स्वरूपात अधिकार कोणत्याही व्यक्तीकडे असणं घातक ठरेल असं आग्रही प्रतिपादन पॉसनर करतात.

पॉसनरच्या वरील मुद्दय़ांना प्रभावीपणे खोडून काढण्याचं काम जॉर्जटाऊन विश्वविद्यालयात कायदासंबंधातील विषयांची प्राध्यापक असलेल्या जुली कोहेननं केलंय. बौद्धिक संपदा, विदासुरक्षा आणि गोपनीयता या विषयांमधल्या २१व्या शतकातील प्रमुख विचारवंतांपैकी एक म्हणून कोहेन ओळखल्या जातात. या विषयासंदर्भात अस्तित्वात असलेल्या कायद्यांचं डिजिटल युगातील आव्हानांच्या अनुषंगाने अद्ययावतीकरण करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे. कोहेनच्या मते पॉसनर साहेबांचा गोपनीयतेकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा एककल्ली आहे. केवळ अर्थशास्त्राच्या अंगाने विश्लेषण केल्यामुळे गोपनीयतेसंदर्भातल्या सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील अशा इतर पैलूंकडे साफ दुर्लक्ष होतं. कोहेननी गोपनीयतेच्या दोन पावलं पुढे जाऊन स्वायत्तता (ऑटोनॉमी) जपण्याची संकल्पना मांडली आहे, ज्यामुळे व्यक्तीला स्वत:चे निर्णय कोणत्याही प्रकारच्या सक्तीशिवाय घेता येतील.

गोपनीयतेच्या विषयावर कदाचित आजवरचा सर्वात जास्त सर्वसमावेशक अभ्यास अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात संशोधन व अध्यापन करणाऱ्या हेलन निसनबॉमनी केला आहे. त्यांनी लिहिलेल्या आणि २००९ साली प्रकाशित झालेल्या ‘प्रायव्हसी इन कॉन्टेक्स्ट’ या अत्यंत वाचनीय पुस्तकात गोपनीयतेची संकल्पना विस्तृतपणे विशद केली आहे. निसनबॉमच्या म्हणण्यानुसार गोपनीयतेची सर्व बाबतीत लागू पडेल अशी एकच एक व्याख्या करणं योग्य नाही. गोपनीयतेचे निकष हे काळानुसार, त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार, तसेच सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांनुसार बदलत असतात; ज्याच्यासाठी त्यांनी ‘कॉन्टेक्स्टच्युअल इंटिग्रिटी’ असा शब्दप्रयोग केला आहे.

उदाहरणार्थ, भिन्न समाजात खासगी माहितीच्या गोपनीयतेचे निकष वेगवेगळे असू शकतात. जसं अमेरिकेत नोकरीसाठी आलेल्या उमेदवाराला त्याच्या धर्माबद्दलची माहिती विचारणं निषिद्ध मानलं जातं तर त्याउलट भारतात धर्म तसंच जातीबद्दलची माहिती सर्वच ठिकाणी (शाळा- कॉलेज प्रवेश, सरकारी वा खासगी नोकरी इत्यादी) विचारली जाते. एखादी गोष्ट एका विशिष्ट कालखंडात गोपनीय मानली गेली असेल तर कालांतराने त्यात बदल होऊ शकतो. १९व्या तसेच २०व्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिका किंवा युरोपात एखाद्या व्यक्तीने आपल्या समलिंगी जाणिवा जाहीर करणं अयोग्य समजलं जाई कारण समाज त्याकडे हेटाळणीयुक्त नजरेने बघत असे. २१व्या शतकात मात्र या गोष्टीला सामाजिक तसंच कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे वरील निकषात पूर्णपणे बदल झाला आहे. थोडक्यात गोपनीयतेचा विचार करताना सामाजिक, सांस्कृतिक तसेच त्या वेळच्या परिस्थितीचा संदर्भ तपासून घ्यावा लागेल असं निसनबॉम सांगतात, ज्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे.

असो, गोपनीयतेसंदर्भात जगभरातील विद्वानांनी केलेलं विचारमंथन जाणून घेतल्यानंतर गोपनीयतेची नेमकी व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न आपण पुढील लेखात करू.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. amrutaunshu@gmail.com