भारताने १९६५ च्या युद्धात पाकिस्तानवर मात केल्याच्या घटनेला नुकतीच पाच दशके पूर्ण झाली. या युद्धविजयाच्या रम्य स्मृती त्यानिमित्ताने जाग्या झाल्या. या युद्धादरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या हवाई दलांचे बरेच मोठे नुकसान झाले. त्यात मोठा वाटा कोणाचा याबद्दल बरेच वादविवाद असले, तरी भारतीय हवाई दलाची मानवी कार्यक्षमता ही उपलब्ध तांत्रिक क्षमतेपेक्षा सरसच होती, हे नि:संशय! स्वातंत्र्योत्तर काळात उभय देशांमध्ये लढले गेलेले हे पहिले र्सवकष युद्ध होते. या युद्धात पाकिस्तानच्या सॅबर या लढाऊ विमानांचे सर्वाधिक नुकसान करणारा पहिला भारतीय लढाऊ वैमानिक म्हणून आल्फ्रेड टायरोन कूक यांची ओळख आहे. हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंट असलेल्या कूक यांना त्या वेळी वीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते.
मूळचे लखनऊचे असलेल्या कूक यांचे महाविद्यालयीन शिक्षण लखनऊच्याच ऐतिहासिक अशा ला मार्टििनएर या लष्करी महाविद्यालयात झाले. तेथून त्यांना थेट हवाई दलात प्रवेश मिळाला. १९६१ ते १९६५ अशी चार वष्रे ते हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते. १९६५ च्या युद्धानंतर कूक यांनी हवाई दलातील नोकरीला राम राम ठोकत ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. १९६५ च्या युद्धाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने कूक नुकतेच मायदेशी आले होते. त्यांनी अंबाला येथील हवाई दलाच्या तळाला भेट देऊन त्यांचे वीरचक्र आपल्या स्क्वाड्रनला परत केले. ‘मी कोणतेही अचाट कृत्य केलेले नाही. मी केवळ माझे कर्तव्य बजावत होतो.. वीरचक्राचा हा जो बहुमान आहे, तोही तुमचाच’ असे नम्रपणे सांगत कूक यांनी त्यांचे वीरचक्र पदक हवाई दलातील आपल्या माजी तुकडीच्या सुपूर्द केले. यानिमित्ताने, १९६५ च्या सप्टेंबरमधील पहिल्या आठवडय़ात घडलेल्या हवाई युद्धाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. ‘पूर्व पाकिस्तानच्या (आताचे बांगलादेश) हवाई हद्दीत आम्हाला गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या वेळी आमच्या दिमतीला हॉकर हंटर ही लढाऊ विमाने होती. ७ सप्टेंबरला पश्चिम बंगालमधील खरगपूर येथील हवाई तळानजीकच्या कलाईकुंडा येथे पाकिस्तानी सॅबर जेट्सनी आमच्यावर हल्ला केला. त्यास प्रत्युत्तर देताना दोन सॅबर जेट्स पाडू शकलो, तर तिसरे जेट माघार घेऊन दिसेनासे झाले’ हा साध्या शब्दांत त्यांनी सांगितलेला पराक्रम, अधिक क्षमतेच्या जेटवर तुलनेने कमी क्षमतेच्या हंटर विमानांनी कसा विजय मिळवला याची प्रेरणा देणारा आहे. एकाच विमानाने एकाच फेरीत दोन विमानांना गारद करणे हेही विरळाच होते. याच कामगिरीबद्दल कूक यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Alfred tyrone cooke profile
First published on: 09-09-2015 at 00:01 IST