मुंबई क्रिकेटचा आलेख भारतीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने उंचावत ठेवण्यात प्रतिभासंपन्न फलंदाजांच्या फळीचे योगदान आहेच, पण तितकेच वा काहीसे अधिक योगदान आहे ते अण्णा वैद्य, वसंत अमलाडी, कमल भांडारकर, रमाकांत आचरेकर अशा निष्णात प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे! या मांदियाळीतील एक लखलखता तारा म्हणजे वासुदेव तथा वासू परांजपे. नुकतेच त्यांच्या निधनानंतर प्रसृत झालेल्या बातम्यांमध्ये सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, रोहित शर्मा यांना त्यांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केले, याविषयी तपशील आहे. तरी वासू सरांची खरी महती कळून येते त्यांच्याविषयीच्या अद्भुत किश्शांमधून. ते फार कमी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. पण एके काळी आंतरराष्ट्रीय दर्जा ठासून सामावलेल्या मुंबई क्लब क्रिकेटमध्ये त्यांची हयात गेली आणि या क्रिकेटचेच बाळकडू घोटवलेले अनेक मातब्बर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या अमूल्य सल्ल्यांसाठी त्यांचे आयुष्यभरासाठी ऋणी राहिले. त्यांच्याविषयी वाचनात आलेला पहिला किस्सा सचिन तेंडुलकरविषयीचा. १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार होती आणि त्या वेळी साऱ्यांचे लक्ष होते सचिनवर. त्याच्या निवडीसाठी इराणी करंडक सामन्याची अग्निपरीक्षा पार करावी लागणार होती. सचिनवर वासू सरांचे तो शालेय क्रिकेटमध्ये चमकू लागल्यापासून लक्ष होते. अत्यंत निसर्गदत्त आक्रमक फलंदाज असे सचिनचे वर्णन ते करत. तर त्या सामन्याच्या पहिल्या डावात सचिनने ९२ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. षोडशवर्षीय सचिन त्याच्याकडून त्याही काळात असलेल्या अपेक्षांमुळे तणावग्रस्त होता. त्याच्या खेळीविषयी अभिप्राय विचारल्यावर वासू सरांनी विचारले, ‘तू कसा फलंदाज? आक्रमक की बचावात्मक?’ आक्रमक असे उत्तर आल्यावर वासू सर म्हणाले, ‘तुला रोखू शकेल असा गोलंदाज आज तरी भारतात नाही. ९२ चेंडू खेळल्यावर शतक झालेच पाहिजे’! तो सल्ला खासच फलदायी ठरला. दुसऱ्या डावात सचिनने १४५ चेंडूंत नाबाद १०३ धावा केल्या. त्याची पाकिस्तान दौऱ्यासाठी निवड झाली. सचिनच्या बाबतीत वासू सरांचा बराच काळ आक्षेप होता की, व्हिव्हियन रिचर्ड्सच्या तोडीचे आक्रमक आणि बेडर क्रिकेट तो खेळू शकतो, पण अपेक्षांमुळे त्याला मुरड घालावी लागते. तंत्रशुद्ध फलंदाजीचे अवडंबर माजवण्याची गरज नाही. तंत्र हे लवचीकच असले पाहिजे, असे ते नेहमी सांगत. याच लवचीकतेच्या सल्ल्यातून रोहित शर्माची घडण झाली. सामन्याच्या स्थितीनुरूप खेळावे हे म्हणणे जितके सोपे, तितके घोटवणे कठीण. वासू सरांचे वाक्य प्रसिद्ध आहे : तुम्ही कर्णधार असाल नि काय करायचे हे ठाऊक नसेल तर सामना तुम्ही गमावणार हे खुशाल समजावे. त्यावरून स्मरणीय असा आणखी एक किस्सा. एका सामन्यात दादर युनियनच्या ५ बाद ९२ धावा झाल्यानंतर कर्णधार वासू परांजपेंनी डाव घोषित केला. तो का? यावर त्यांचे उत्तर होते, ‘आपल्या संघात सुनील गावस्कर असूनही आपली अशी हालत झाली. प्रतिस्पर्धी संघाचीही भंबेरी उडेल. सामना जिंकायचाच आहे’! वासू सरांच्या अपेक्षेप्रमाणेच दादर युनियनने तो सामना जिंकला. खेळ आणि खेळाडूंचे इतके अचूक विश्लेषण करणारे वासू परांजपे त्यामुळेच अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक ठरले.