अमेरिकी प्रशासनातील अनेक मोक्याची पदे भारतीय वंशाच्या अमेरिकी व्यक्तींनी यापूर्वीही भूषवली, ती संख्या आता वाढते आहे. रोनाल्ड रेगन यांच्या काळात भारतीय वंशाची एक व्यक्ती त्यांच्या प्रशासनात नेमली गेली होती आज ही संख्या ३० पेक्षाही जास्त आहे. अलीकडेच ओबामा यांनी ज्या नवीन नियुक्त्या केल्या त्यात राष्ट्रीय संग्रहालय व वाचनालय सेवा मंडळाच्या सदस्यपदी डॉ. विशाखा देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. अमेरिकेतील आशिया सोसायटीच्या त्या अध्यक्ष आहेत. मुंबई विद्यापीठातून एम.ए. केल्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या. तिथे मिशिगन विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट घेतली. नंतरच्या काळात बोस्टन येथील म्युझियम ऑफ फाइन आर्ट्स या संस्थेत त्यांनी १९७७ ते १९९० असे प्रदीर्घ काळ काम केले. आग्नेय आशिया व भारतीय तसेच इस्लामी वस्तुसंग्रहांच्या सहायक क्युरेटर (अभिरक्षक) म्हणून त्यांनी १९८१ ते १९९० या काळात काम केले. त्याचवेळी शैक्षणिक कार्यक्रम प्रमुख म्हणून त्यांनी १९८१ ते १९८८ या दरम्यान  काम केले, याचा अर्थ एकाचवेळी त्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत होत्या. मॅसॅच्युसेटस विद्यापीठात १९८८-१९९० या काळात त्या सहायक प्राध्यापक होत्या. कला संग्रहालय संचालक महासंघाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मुस्लिम संस्कृतीसह आशियातील अनेक देशांच्या कला-संस्कृतीला अमेरिकेत मानाचे स्थान देण्याचे ठरवले. बहुसांस्कृतिकता ही अमेरिकेच्या हिताची आहे हे वेळीच जाणून त्यांनी डॉ. देसाई यांना अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले आहे. डॉ. देसाई यांनी २२ वर्षे आशिया सोसायटीत काम केले आहे, त्यावेळी त्यांनी या संस्थेचा भारत, दक्षिण कोरिया व इतर अनेक आशियायी देशात कार्यालये स्थापन करून विस्तार केला. हाँगकाँग व ह्य़ूस्टन येथे कला प्रदर्शनांसाठी केंद्रे सुरू केली.  समकालीन भारतीय कलेवर अधिकारवाणीने भाष्य करण्याइतका त्यांचा गाढा व्यासंग आहे. ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताचे भवितव्य’ या विषयावर त्या पुस्तक लिहित आहेत. सांस्कृतिक व धोरणात्मक बाबींची सांगड घालून आशियायी व अमेरिकी लोक यांच्यात समन्वय घडवून आणण्याची मोठी भूमिका त्यांनी पार पाडली आहे.