News Flash

ऑर्थर आणि संधीनिकेतन!

ऑर्थर आणि बाबा यांच्यात अखंड पत्रव्यवहार सुरू झाला आणि नव्या प्रकल्पाची आखणी सुरू झाली.

संधीनिकेतनची वास्तू

आनंदवन हे ‘Island of Prosperity’ (समृद्धीचं बेट) बनू नये, आनंदवनातील मानव-विकासाच्या प्रारूपाचा परीघ समाजातील इतर वंचित घटकांपर्यंत विस्तारावा, हा विचार कायमच बाबा आमटेंच्या केंद्रस्थानी होता. योगायोगाने बाबांना तशी समविचारी माणसंही भेटत गेली. काऊंट ऑर्थर तार्नोवस्की हे त्यांतलेच एक.

ऑर्थर यांचा जन्म पोलंड येथे १९३० साली झाला. तार्नोवस्की घराणं पोलंड साम्राज्यातील सरदार (COUNT) घराण्यांपैकी एक. पण दुसऱ्या महायुद्धात तार्नोवस्की कुटुंबाची प्रचंड वाताहत झाली. कुटुंबीयांना तुरुंगवासही सहन करावा लागला. अखेर १९४५ साली हे कुटुंब पोलंड सोडून इंग्लंडला स्थायिक झालं. ऑर्थर यांनी लंडन येथे अर्थशास्त्राचं औपचारिक शिक्षण घेतलं. असं असलं तरी त्यांची मूळ आवड देशोदेशींच्या सफरी करणं ही होती. उत्तर आफ्रिका, मध्य-पूर्व आणि आखातातल्या अनेक देशांत त्यांनी भ्रमण केलं. पन्नाशीच्या दशकात त्यांनी भारतातील पर्यटनासाठी एक प्रवास कंपनी स्थापन केली आणि प्रवासासाठी मार्गदर्शक पुस्तकंही लिहिली. १९५८ साली ऑर्थर बाली बेटावर गेले असता त्यांना दुर्दैवाने पोलिओने ग्रासलं. त्यांनी मलेशियाच्या पेनांग येथील हॉस्पिटलमध्ये सहा महिने उपचार घेतले. अखेर सारे उपचार थकल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की, त्यांच्या कमरेखालचा भाग संपूर्णत: लुळा पडल्याने ते परत कधीच चालू शकणार नाहीत. आपलं पुढलं आयुष्य व्हीलचेअरवरच मर्यादित असणार याचा ऑर्थर यांना प्रचंड मानसिक धक्का बसला! ते इंग्लंडला परतले. मात्र, हा धक्का पचवत त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना दोन वर्ष लागली.

ऑर्थर यांचा मूळ पिंड प्रवाशाचा होता. त्यांच्या हालचाली चाकाच्या खुर्चीने मर्यादित झालेल्या असल्या तरी प्रवासाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. एक भन्नाट प्रवास मोहीम त्यांच्या डोक्यात आकार घेत होती. ‘रीडर्स डायजेस्ट’ या सुप्रसिद्ध मासिकात त्यांचं प्रवासविषयक लिखाण चालू असे. त्यांनी ‘रीडर्स डायजेस्ट’च्या व्यवस्थापनापुढे आपल्या प्रवास मोहिमेची कल्पना मांडली. ती कल्पना ऐकून ‘रीडर्स डायजेस्ट’चं व्यवस्थापन चक्रावून गेलं. कारण शारीरिकदृष्टय़ा अपंगांना जगभर कोणत्या सेवा पुरविल्या जातात, हे पाहण्यासाठी स्वत:चं अपंगत्व विसरून अख्खं जग गाडीने पालथं घालण्याची ऑर्थर यांची जिद्द होती! माणसं विकलांग असली तरी त्याचा अर्थ ती सक्षम नाहीत वा आयुष्याचा अर्थ शोधू शकत नाहीत असा नाही, याबद्दल ते आश्वस्त होते. त्यांना माहीत होतं, की जगभरातील अनेक अपंग व्यक्ती संधीचा अभाव असल्यामुळे भीक मागण्यासाठी बाध्य होतात, किंवा त्यांची कुटुंबंच त्यांना नाकारतात. ऑर्थर यांच्या या जिद्दीला सलाम करत ‘रीडर्स डायजेस्ट’ने ऑर्थर यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि १९६४ साली ऑर्थर व त्यांचे सहकारी जोसेलिन कॅडबरी यांनी आपल्या Austin Gipsy या वाहनाद्वारे ९४,००० मैलांच्या दोन वर्षीय Great Expedition ला सुरुवात केली. तुर्कस्थान, इराण, अफगाणिस्तान अशी मजल-दरमजल करत ही जोडगोळी भारतात दाखल झाली. या प्रवासादरम्यान ते नागपुरात आले असता ऑर्थर यांना स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिशल्य विशारद डॉ. वानकर आणि औरंगाबाद मेडिकल कॉलेजचे अस्थिशल्य विशारद डॉ. मारवा यांच्याकडून आनंदवनाविषयी माहिती मिळाली. आनंदवनातील कुष्ठरुग्णांचे कार्य म्हणजे फार तर एखादा रोगट, अंधारलेला दवाखाना असेल असं ऑर्थर यांना वाटून गेलं. मात्र, त्यांच्या पुढल्या प्रवासाचा मार्ग आनंदवनातूनच जाणारा असल्याने दूध, भाज्या वगैरे कुठे विकत मिळतील याची चौकशी करण्यासाठी ते आनंदवनात येऊन पोहोचले. त्या दिवशी पिकावर टोळधाड आली म्हणून बाबा शेताकडे गेले होते. ऑर्थर यांना मीच रिसीव्ह केलं आणि बाबांना निरोप पाठवला. ‘Welcome to Anandwan!,’ असं जोशपूर्ण स्वागत करतच बाबा आले. आल्या आल्या त्यांनी जोसेलिन यांच्याकडून ऑर्थरच्या व्हीलचेअरचा ताबा घेतला आणि ऑर्थरला म्हणाले, ‘Let me show you around.’ बाबांनी त्यांना आनंदवनातील दवाखाना, शेती, डेअरी, उद्योग, शाळा, कॉलेज अशी प्रत्येक प्रवृत्ती फिरून दाखवली. शिवाय कामात मग्न असलेले कुष्ठरुग्ण आत्मविश्वासाने बाबांच्या मदतीने ऑर्थरशी संवाद साधत होते, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. कुष्ठरुग्णांच्या वसाहतीबाबतची आपली कल्पना किती चुकीची होती असं ऑर्थर यांना वाटून गेलं. कारण कुष्ठरुग्णांनी अपार कष्ट आणि दुर्दम्य आशावादाच्या बळावर उभारलेलं स्वत:चं हक्काचं एक गाव त्यांना समोर दिसत होतं.

अचंब्यात पडलेले ऑर्थर बाबांना म्हणाले, ‘How on Earth did you achieve all this?’

बाबा उत्तरले, ‘वेल, हीच माझ्या आयुष्याची कहाणी आहे असं तू म्हणू शकतोस!’

‘बाबा, मला तीच कहाणी ऐकायची आहे.’ ऑर्थर म्हणाले, ‘मला कधी सांगाल तुम्ही?’

यावर बाबा म्हणाले, ‘आज तू मुक्काम करशील अशी मला आशा आहे.’

‘आनंदाने बाबा!’ ऑर्थर म्हणाले.

त्या रात्री बाबांनी आपल्या आजवरच्या प्रवासाविषयी ऑर्थर यांना विस्ताराने सांगितलं. तसंच त्यांच्या डोक्यातील नव्या योजनांविषयीही सांगितलं. बाबा ऑर्थरशी पहाटेपर्यंत अखंड बोलत होते! ऑर्थर यांनी अद्याप स्वत:च्या प्रोजेक्टविषयी बाबांना काहीच सांगितलं नसलं तरी आनंदवन हे प्रचंड सामर्थ्यांचं भांडार समाजातील इतर विकलांग बांधवांसाठी खुलं व्हायलाच हवं, हा विचार त्यांच्या मनात पक्का होत होता.

अखेर न राहवून ते बाबांना म्हणाले, ‘तुम्ही शारीरिकदृष्टय़ा विकलांग बांधवांसाठी काहीतरी केलंच पाहिजे.’

‘गो ऑन.’ बाबा उत्तरले, ‘मी हे का करायला हवं?’

यावर ऑर्थर म्हणाले, ‘तुम्ही इथे जे कार्य उभारलं ते अद्भुत आहे. तुम्ही जे कुष्ठरुग्णांसाठी केलं आहे ते तुम्ही इतर अपंगांसाठीही करू शकता याची मला खात्री आहे. बाबा, अपंगांचं गावपातळीवर सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी जगात आजवर कुणी एक साधा प्रायोगिक प्रकल्पही राबवलेला नाही.’

बाबा म्हणाले, ‘तुझं म्हणणं बव्हंशी योग्यच आहे. हे काम करण्याची खूप गरज आहे. पण दिवसाला चोवीस तासच असतात ऑर्थर. मला अनेक प्रकल्प राबवायचे आहेत. मग तूच सांग, मी हे कसं करू?’

पण ऑर्थरचा निग्रह पक्का होता. त्यांनी आपल्या प्रवासादरम्यान अपंगांच्या समस्यांबाबतीत आलेल्या विदारक अनुभवांबद्दल बाबांना सांगितलं. अपंगांना सन्मानाने जगता यावं यासाठी शाश्वत प्रारूप उभं करू शकणारी व्यक्ती बाबांशिवाय दुसरी कुणी असूच शकत नाही यावर ते ठाम होते. जणू ते हजारो-लाखो अपंग बांधवांचे प्रतिनिधी आहेत या उत्कटतेने ते बाबांशी बोलत होते. ऑर्थर एवढे हट्टाला पेटले की त्यांचा आवाज टिपेला पोहोचला! अखेर बाबा खळखळून हसू लागले तसं ऑर्थर यांच्या ध्यानी आलं की आपण चक्क ओरडतो आहोत.

बाबा हसत हसतच ऑर्थरना म्हणाले, ‘You know, I can never resist the enthusiasm of others and I don’t expect others to resist my enthusiasm either!’

जरासं वरमून ऑर्थर बाबांना म्हणाले, ‘So will you do something?’आणि बाबांनी ‘हो’ म्हणावं अशी त्यांनी मनापासून प्रार्थना केली.

बाबा उत्तरले, ‘Arthur, I will try.’

एव्हाना उजाडलं होतं. नाश्ता करता करता पुढले दोन तास, ‘I will try’ म्हणणारे बाबा आणि ऑर्थर यांच्यात भावी प्रकल्पाच्या ढोबळ आराखडय़ाविषयी सविस्तर चर्चाही झाली. ऑर्थरची निघण्याची वेळ झाली तशी बाबा त्यांना म्हणाले, ‘Something will come out of this, Arthur. We will work together one day.’ याबद्दल ऑर्थर यांनी लिहून ठेवलं आहे, ‘As I waved farewell, I felt in my heart that at least the foundation of the project has been laid, even if the walls were not yet scheduled!’

इंग्लंडला परतल्यानंतर ऑर्थर आणि बाबा यांच्यात अखंड पत्रव्यवहार सुरू झाला आणि नव्या प्रकल्पाची आखणी सुरू झाली. पुढे १९६७ साली भटकंतीदरम्यान आलेल्या अनुभवांचा समूळ गोषवारा घेणारं ‘The Unbeaten Track’ हे ऑर्थर यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकाचे हक्क ‘रीडर्स डायजेस्ट’ने ऑर्थर यांच्याकडून १,५०,००० रुपयांना खरेदी केले. ऑर्थर यांनी ही दीड लक्ष रुपयांची संपूर्ण रक्कम महारोगी सेवा समितीच्या स्वाधीन केली आणि आनंदवनात अपंगांसाठी निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ रचली गेली. केंद्राचं नाव ठरलं- संधीनिकेतन (House of Opportunities). १९७० साली संधीनिकेतनची वास्तू उभी राहिली. आनंदवनातले सर्व उद्योग संधीनिकेतनशी जोडले गेले आणि ग्रामीण भागातल्या अपंगांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळण्याची सोय निर्माण झाली.

संधीनिकेतनच्या प्रवासाविषयी मी नंतर विस्ताराने लिहीनच. पण त्याआधी आपण पुढल्या काही लेखांमध्ये साठीच्या दशकात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आणि नव्याने सुरू झालेल्या उपक्रमांचा आढावा घेऊयात..

विकास  आमटे vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2017 2:18 am

Web Title: baba amte count arthur tarnowski and sandhiniketan
Next Stories
1 आनंद निकेतन महाविद्यालय
2 आनंदवनचे दूत
3 घडामोडींचे पन्नाशीचे दशक
Just Now!
X