News Flash

आनंदवनचे दूत

आनंदवन सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत भारतीयांपेक्षा विदेशी मंडळीच आनंदवनात जास्त संख्येने आली

मित्रमेळाव्यादरम्यान वसंतराव देशपांडे यांचे गायन, सोबत पेटीवर पु. ल. देशपांडे

आनंदवन सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा वर्षांत भारतीयांपेक्षा विदेशी मंडळीच आनंदवनात जास्त संख्येने आली. आपल्या देशातली काही मोजकीच माणसं आनंदवनात येत असत, ज्यात अण्णासाहेब सहस्रबुद्धे, प्रभाकरपंत कोरगावकर, गो. नी. दांडेकर, यदुनाथ थत्ते यांचा समावेश होता.

आनंदवनातील कुष्ठमुक्त संघर्ष करून समाजात आपलं अस्तित्व निर्माण करतील; सोबतच निर्मितीत गुंतलेले हे हात आपल्या परिश्रमांतून स्वत:च्या गतीने चालणारी एक समाधानी आणि स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणारी व्यवस्थाही निर्माण करतील, अशी बाबा आमटेंची पक्की धारणा होती. यासाठी आनंदवनातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन चैतन्यपूर्ण असणं, बाजगताशी कल्पनांची देवाणघेवाण होणं गरजेचं होतं. त्यामुळे बाहेरच्या उदासीन जगाला आनंदवनाजवळ आणण्याचा एक प्रयत्न म्हणून बाबांनी एका वार्षिक ‘मित्रमेळाव्या’चं आयोजन करण्याचा घाट घातला. ते साल होतं १९६१. पहिल्या मेळाव्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, मनोहरजी दिवाण, दादा धर्माधिकारी, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, रावसाहेब पटवर्धन, डॉ. रामचंद्र वारदेकर, अण्णासाहेब कोरगावकर, नाना वेले, कमलाताई होस्पेट, गो. नी. दांडेकर, शंकरराव देव, आचार्य भागवत, आचार्य जावडेकर अशी मोठमोठी मंडळी आली होती. सत्य आणि कल्पिताच्या मिश्रणातून आनंदवनाचं प्रत्ययकारी चित्र साकारणाऱ्या ‘आनन्दवनभुवन’ या गोनीदांनी लिहिलेल्या कादंबरीचं प्रकाशन रावसाहेब पटवर्धन यांच्या हस्ते झालं. आनंदवनात निवासासाठी पक्की बांधकामं फारशी नव्हती, म्हणून तट्टय़ाच्या मंडपांत पाहुण्यांची निवासव्यवस्था होती. पहिल्या मित्रमेळाव्याची पूर्वतयारी म्हणून इंदूने गीताबाई नेमाडे, सुशीलाबाई केळकर व कौसल्याबाई या कार्यकर्त्यां महिलांच्या मदतीने महिनाभर आधीपासून फावल्या वेळात दीड-दोन हजार लोकांना लागेल एवढं धान्य निवडणं, पाखडणं करून ठेवलं होतं.

हळूहळू हा मित्रमेळावा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक आकर्षण म्हणून नावारूपाला येऊ लागला आणि साहित्यिक, संगीतकार, गायक, वादक, कलाकार, विचारवंत, राजकीय वर्तुळातील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी आणि विद्यार्थी असे विविध क्षेत्रांतील असंख्य लोक- राज्यातूनच नव्हे, संपूर्ण भारतातून दरवर्षी या सांस्कृतिक महोत्सवासाठी आनंदवनात येऊ  लागले. केवळ जाहीर निमंत्रणावरून स्वखर्चाने, प्रवासातली दगदग आनंदाने सहन करत, कित्येक वेळा आपल्या आप्तेष्टांना बरोबर घेऊन या मित्रमेळाव्यात हजेरी लावत. मित्रमेळाव्याच्या दिवसांमध्ये आनंदवनात उत्सवाचं वातावरण असायचं. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या देशविदेशातील नव्या-जुन्या पाहुण्यांचं आदरातिथ्य बाबा-इंदू मनापासून करत. बाहेरच्या माणसांनी आनंदवनातलं काम बघावं, कुष्ठरुग्णांच्या सुखदु:खांशी समरस व्हावं ही जशी आनंदवनाची गरज होती तशी ती समाजाचीही होती. परिणामस्वरूप बाबांच्या या मात्रेने आनंदवनात मित्रमंडळींचा लोंढा येऊ  लागला. विश्राम बेडेकर, मालतीबाई बेडेकर,

पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, विंदा करंदीकर, नरहर कुरुंदकर, बा. भ. बोरकर, विष्णू चिंचाळकर, श्रीराम लागू, दादा धर्माधिकारी, चंद्रशेखर धर्माधिकारी, राम शेवाळकर अशी एकाहून एक माणसं आनंदवनाशी जोडली गेली. हीच मंडळी आनंदवनाची ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर्स’ बनली व त्यांनी समाजाला आनंदवनाकडे आणि कुष्ठरोगाकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. या मित्रमेळाव्यांनी बाबांसह सगळ्या कार्यकर्त्यांना एक भक्कम मानसिक आधार तर दिलाच, शिवाय लोकांकडून आर्थिक मदतही मिळू लागली. मित्रमेळाव्यामुळे कुष्ठरुग्णांच्या कर्तृत्वाची जाणीव समाजाला खऱ्या अर्थाने झाली. या मेळाव्यांमधून पुढे अनेक कार्यकर्तेही उभे राहिले.

वृक्षारोपण, व्याख्यानं, चर्चासत्रं असं मित्रमेळाव्याचं स्वरूप असायचं. तरी मित्रमेळाव्याचं अजून एक आगळं वैशिष्टय़ होतं : स्थापनेपासून पहिल्या दहा वर्षांत आनंदवनातल्या कुष्ठरुग्णांमध्ये आपापसांत लग्नं होत नव्हती. आपला घर-संसार असावा, सुख-दु:खं वाटण्यासाठी आपलं हक्काचं माणूस असावं ही कुष्ठरुग्णांचीही गरज होती. शिवाय ते नैसर्गिक मानवी भावनांनाही पारखे झालेले नव्हते. त्यांच्या या गरजा इंदूने ओळखल्या. कुष्ठरोग झाला म्हणून त्यांना प्रेमापासून आणि शारीरिक गरजांपासून वंचित ठेवता कामा नये, याची जाणीव बाबांनाही होती. पण तरीही कुष्ठरोग्यांनी स्वत:ला मुलं होऊ  देऊ  नयेत अशा मताचे बाबा होते. याचं कारण कुष्ठरोग संसर्गजन्य नसला तरी आनुवंशिक आहे की नाही, याबद्दल खात्रीलायक संशोधन त्या काळी झालं नव्हतं. त्यामुळे मुलं झाली तर ती निरोगी जन्माला येतीलच याबद्दल बाबा आश्वस्त नव्हते. शिवाय कुष्ठरुग्णांना इतरही अपंगत्व आलेलं असे; त्यामुळे आपल्या लहान मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हे सगळं त्यांना कसं जमणार, हे प्रश्न होतेच. पुढे ही मुलं मोठी होऊन शाळा-कॉलेजात जाऊ लागली, की ‘कुष्ठरोग्यांची मुलं’ म्हणून त्यांना समाजाकडून कशी वागणूक मिळेल, त्यांना काय काय सहन करावं लागेल, याचीही चिंता बाबांना होतीच. महारोगी सेवा समितीचं कुष्ठरोग्यांच्या विवाहासंबंधीचं हे धोरण बदलायला हवं, असं इंदूला वाटत होतं. अखेर इंदूच्या आग्रहाखातर बाबांनी, कुष्ठरुग्णांनी लग्नाआधी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करावी या अटीवर, या लग्नांना संमती दिली आणि कुष्ठरुग्णांना ‘राइट टू कम्पॅनिअनशिप’ आणि ‘राइट टू सेक्श्युअलिटी’ हे न्याय्य अधिकार मिळाले! २२ नोव्हेंबर १९६१ या दिवशी आठ कुष्ठरोगमुक्त जोडप्यांची लग्नं आनंदवनात मोठय़ा समारंभपूर्वक पार पडली. त्यातलंच एक दाम्पत्य म्हणजे आमचा शंकरभाऊ  आणि सिंधूताई सराफ (पुढे ती सर्वाची ‘सिंधूमावशी’ झाली). या आठ लग्नांच्या जोडीने भद्रावतीचे श्रीधरराव पद्मावार (आज नव्वदीचे असलेले श्रीधरराव गेली अनेक र्वष महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आहेत) यांनी वध्र्याच्या कमलताई बेलेकर यांच्याशी लग्न केलं आणि या निरोगी दाम्पत्याने कुष्ठरुग्ण व समाजातील दरी कमी करणारं एक उदाहरण घालून दिलं. या समारंभाला पाच-सहा हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. लग्नामध्ये मंगलाष्टकं म्हणायला गो. नी. दांडेकर, तुकडोजी महाराज, रावसाहेब पटवर्धन अशी मंडळी होती. हे भाग्य कुणाला लाभलं असेल! आनंदवनातील सामूहिक विवाहसोहळा हे पुढे वार्षिक मित्रमेळाव्याचं एक अविभाज्य अंगच बनून गेलं. कुष्ठरुग्णांची आपापसांत लग्नं होऊ  लागली; त्यातले बरेचसे पुनर्विवाह होते. नवऱ्यांनी सोडलेल्या बायका आणि बायकांनी सोडलेले नवरे अशीच बहुतांशी मंडळी. पुढे या लग्नसोहळ्यांमध्ये मंगलाष्टकं म्हणणाऱ्या सुहृदांमध्ये पु. ल. व सुनीताबाई देशपांडे, वसंतराव देशपांडे, बा. भ. बोरकर, कुमार गंधर्व, कलापिनी कोमकली यांची भर पडली. त्यामुळे समाजाने झिडकारलेल्या या कुष्ठपीडितांना ‘अभागी’ म्हणाल की ‘भाग्यवान’?

लग्नं झाल्यामुळे कुष्ठरुग्णांच्या निवासाची रचना बदलण्याची गरज निर्माण झाली. यासाठी बाबांनी ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’ला ‘कम्यून’ ही एक अनोखी योजना सादर केली. कम्यून म्हणजे छोटी छोटी पण स्वतंत्र घरं असलेली सामुदायिक वसाहत. सर्वानी एकत्र राहावं, एकत्र काम करावं, एकत्र खावं-प्यावं आणि त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाचं खासगीपणही जपलं जावं अशी या कम्यूनची रचना होती. एका अर्धवर्तुळाकार ब्लॉकमध्ये तीन घरं – यातल्या समोरासमोरील दोन घरांमध्ये दोन तरुण कुटुंबं राहतील, तर मधल्या खोलीत एखादं वृद्ध निराधार जोडपं अशी व्यवस्था. त्या दोन कुटुंबांचा आधार या वृद्ध जोडप्याला होईल आणि तरुण कुटुंबांनाही शेजारी कोणीतरी वडीलधारं माणूस मिळेल, असा विचार त्यामागे होता. तरुण कुटुंबांनी वृद्ध पालकांना दत्तक घ्यावं, अशी बाबांची कल्पना होती. बाबांनी ही रचना अतिशय विचारपूर्वक केलेली होती. ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’ला ही योजना खूप आवडली. त्यांनी त्वरित यासाठी चाळीस हजार रुपयांची सुरुवातीची मदत देऊ  केली आणि आनंदवनातलं पहिलं कम्यून उभं राहिलं. या कम्यूनला बाबांनी नाव दिलं -‘मुक्तीसदन.’

१७ नोव्हेंबर १९६२ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते ‘मुक्तीसदना’चं औपचारिक उद्घाटन झालं. ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’चे उपमहासचिव डॉ. अर्न्‍स्ट स्नेलमन या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार होते. पण काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ  शकले नाहीत. या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना राष्ट्रसंत म्हणाले, ‘‘या रोगाबद्दलचे ज्ञान घराघरांतून पोहोचायला पाहिजे. शनीच्या पोथीची माहिती एकवेळ नसली तरी चालेल, पण आपल्यासारखाच एक माणूस टाकाऊ  का होतो; त्याची व्याधी म्हणजे त्याच्या पूर्वजन्मीचे पाप आहे, त्याच्या परंपरेचा वारसा आहे की खरूज, नायटय़ासारखा तो केवळ एक त्वचारोग आहे, याचे ज्ञान पोथीपुराणापेक्षा अधिक आवश्यक आहे.’’ महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आदरणीय रा. कृ. पाटील मुक्तीसदनबद्दल आपले विचार मांडताना म्हणाले, ‘‘मुक्तीसदन हे आमटय़ांच्या कर्तव्यतत्परतेचे नवे दालन आहे. येथे रोगमुक्त आपल्या नव्या जीवनाचे पान उघडतील. मुक्तीसदन हे उद्याच्या कृषी-औद्योगिक व्यवस्थेचे स्वरूपदर्शन.. ते भारतीय कृषीचे प्रश्न सोडवणारे भावी प्रयोगक्षेत्र ठरावे, या दृष्टीने मी या प्रयोगाकडे पाहतो.’’ समारोपीय भाषणात बाबा म्हणाले, ‘‘आनंदवनाचं हे नवं भावंड. ५० रोगमुक्तांचे संसार येथे फुलणार. त्यांच्या खुरटलेल्या जीवनाला येथे नवी पालवी फुटणार. मातीच्या ढेकळांचे छाताड फोडून त्यांनी आपले येथे नवे विश्व उभारले आहे. येथे ते सहकारी पद्धतीवर आधुनिक तंत्राने शेती करतील. गोपालन, कुक्कुटपालन करतील. निरनिराळे कारखाने चालवतील. आत्तापर्यंत आनंदवनातून आठशे लोक उपचार व धंदेशिक्षण घेऊन गेले. या दृष्टीने या नव्या प्रयोगाला ग्रामीण विद्यापीठाचे स्वरूप येऊ  पाहात आहे.’’

बाबांनी आपल्या ‘उज्ज्वल उद्यासाठी’ या पुस्तकातील ‘आसवांच्या स्फटिकात त्यांनी पाहिले इंद्रधनुष्य!’ या प्रकरणात मुक्तीसदनच्या वाटचालीविषयी लिहिलं आहे- ‘‘आनंदवनातल्या मुक्तीसदनात त्यांनी उभारलेले हे हिरवे लहरते स्वप्न पाहा. रोगमुक्तांची ही वसाहत – त्यांच्या पुनर्वसनासाठी. रोग बरा झालेला, पण समाज स्वीकारत नाही. अजूनही तो दूषित ग्रहाचा पडदा दूर झालेला नाही. यांनी मात्र उभा केला आहे – पारदर्शक स्नेहाचा पडदा! एस २२७, एस ३०८ या गव्हाच्या जातींची पहिली भरघोस लागवड चांदा जिल्ह्यत यांनी केली. जगन्नाथ, पद्मा, इ. धानाच्या जाती, लक्ष्मी कापूस, लांब पात्याचे कांदे, पाचूसारखी कोथिंबीर.. आणि ही केळीची बाग- खान्देशातून आलेल्या एका रुग्णानेच नव्याने वसवली. लहडते केळीचे लोंगर! लहान मुलांच्या गोऱ्यापान गालांसारखे भासणारे हे पेरू आणि त्या सुवर्णकांतीच्या दळदार तीन-तीन किलोच्या पपया! मेहनतीने हे पाचूचे बेट असे फुलते, फळते! अशा किती हकिगती सांगाव्यात.. या खडकाळ माळावर द्राक्षे पिकवण्याचा सफल प्रयोग त्यांनी केला. जमिनीतून पत्थर काढून त्या जागी माती ओतली. २५१ वेलींची जोपासना मोठय़ा मिनतवारीने केली. विपरीत परिस्थितीतही वर्षांकाठी पाच-पाचशे किलोंचे उत्पादन दिले. आसपासच्या ग्रामीण परिसरात येथल्या टिनकॅनने दिवस सुरू होणार, सकाळी पीठ गाळले जाणार ते येथे तयार झालेल्या चाळणीतून.. त्यांचा चहासाखरेचा, मसाल्याचा डबा येथला.. त्यांचे ताटांचे, कपबशांचे शिंकाळे येथले.. साठवणीचे डबे, कोठय़ा, पेटय़ा येथल्या.. युगानुयुगे दैन्य-दारिद्रय़ाची, लाचारीची, दूषित ग्रहांची गीते आळवत, उजाड माळरानावर एकांतात बसलेला हा – याला आता, महारोगी तरी कसे म्हणावे?’’

विकास आमटे vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2017 1:57 am

Web Title: famous indian personality visited in anandwan village
Next Stories
1 घडामोडींचे पन्नाशीचे दशक
2 अशोकवनाची स्थापना
3 आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल..
Just Now!
X