नितीन अरुण कुलकर्णी nitindrak@gmail.com

अंगावर केलेले आदिम रंगकाम, वल्कलांसारखी वस्त्रे आणि ‘सभ्य कपडे’ या साऱ्यांचे हेतू निरनिराळे. झाकणे, आच्छादणे हे केवळ वस्त्रांपुरते नाही. केवळ व्यवहारापुरतेही नाही. आच्छादनाने वस्तूचे दृश्यरूप पालटते, तेव्हा कलाजाणिवाही जागृत होऊ शकतात.. 

आपण जगत असताना किती सहजतेने झाकण्याची, आच्छादनाची वा लपण्याची क्रिया करत असतो. अगदी लहान असताना चेहरा हाताने झाकून ‘बुवा कुक् ’ असे म्हणताना आपणा सगळ्यांनाच मोठय़ांसकट मजा आलेली असते; जणू काही डोळ्यांसकट चेहरा झाकताना आपण या जगापासूनच क्षणभर लपून गेलेले असतो. आंधळी-कोशिंबीर खेळताना कानाकोपऱ्यांत लपताना हाताने डोळे झाकण्याची कृती आपल्याला जगापासून लपवते. आपल्याला दुनिया दिसत नसली म्हणजे आपण तिच्यापासून लपतो असा आपला समज असतो. कुठल्या तरी आवरणाखाली, कवचाखाली व मुखवटय़ाखाली राहणे आपल्याला सोयिस्कररीत्या आवडते. स्वत:ला झाकून घेणे आणि इतरांचे अवघड वाटणारे रूप झाकण्यात आपले जगणे चालू असते. हे झाले सांकेतिक अर्थाने झाकणे. दैनंदिन घरगुती कामकाजात प्रत्यक्ष केलेले आच्छादन किती तरी वेळा दिसते. असे आच्छादन प्रामुख्याने सुरक्षिततेसाठी केलेले असते. स्वयंपाकाच्या वस्तू, फळे-भाज्या, खाण्याचे जिन्नस, नेहमी वापरात नसलेली उपयोगाची साधने (वॉटरकूलर, हीटर, इत्यादी) झाकण्यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्या, डबे व कपाटांचा वापर करतो. असे सर्व आच्छादन व्यवहार्य असते आणि यांच्या दृश्यात आपल्याला काही वेगळे, वाकडे वाटत नाही. यापुढे वर्णन केलेल्या आच्छादनांच्या दृश्यांत मात्र अशी शक्यता निर्माण होते.

घरातल्या एखाद्या सर्दी झालेल्या व्यक्तीने गरम पाण्याचा वाफारा घेण्याच्या उद्देशाने कपडय़ाने झाकलेली छबी गमतीशीर व बरोबरीनेच भयानकही दिसते. घरात पंखा साफ करताना खालील फर्निचर व त्यावरील वस्तूंवर जळमटे पडू नयेत म्हणून अंथरलेल्या चादरी त्या सर्वाचा एक आकार धारण करतात. या चादरी जर पांढऱ्या असतील तर आणखीच मजा येते.

झाकण्याचे माध्यम जर नैसर्गिक- जसे नारळाच्या झावळ्या, गवत, मोठाली पाने, बांबूच्या काडय़ा- असेल, तर यांचे आच्छादन कलात्मक भासते. गवताचे शेतातले मोठाले भारे, ढीग झाकण्यासाठी घराच्या छपरासारखे उतरते गवताचेच छप्पर बनवलेले असते. ही जणू काही गवताचीच छोटी-छोटी घरेच. खेडय़ांमध्ये मातीची लिंपलेली घरे शेणाने सारवून आच्छादली जात. अशा आच्छादनांचे मातीशी घट्ट नाते असते. जिव्हेर्नी या उत्तर फ्रान्समधील गावात गहू, बार्ली व ओट्सच्या शेतात अशा प्रकारच्या धान्यांच्या काडांचे घरांसारखे ढीग रचलेले दिसले, ते तेथेच राहायला आलेल्या ‘दृक्-प्रत्ययवाद’ (इम्प्रेशनिझम) या कलावादाचा प्रमुख चित्रकार क्लॉड मोनेला, १८९० च्या दशकात. ‘हे स्टॅक्स’ या नावाने प्रसिद्ध असलेली २५ कॅनव्हासची ही मालिका नावाजलेली आहे, ती त्याच्या एकाच विषयाची निवड व प्रकाशाच्या खेळाचे चित्रण यासाठी. संधिप्रकाशातली काही चित्रे निसर्गाच्या या गवत व धान्यरूपी प्रकाश आच्छादनाच्या जाणिवेतून एक अद्भुत धरणीचे चित्र उभे करतात. दृक्-प्रत्ययवाद वस्तूंवर पडलेला प्रकाश चितारण्यासाठी ओळखला जातो. मोनेसाठी प्रकाश म्हणजे वस्तूवरचे आच्छादन. रंगाच्या दिसेल अशा बेताने केलेले थरांचे कॅनव्हासवरचे आच्छादन (याला ‘इम्पॅस्टो’ म्हणतात) म्हणजेच त्याची चित्रे!

आधुनिक जगात मानवनिर्मित आच्छादनाचे माध्यम- जसे की टारपोलीन, प्लास्टिक किंवा कापड जरा विचित्र भासते. रस्त्यावरून चालत असताना बाजूला उभी असलेली गाडी जेव्हा आच्छादनाखाली झाकलेली असते, तेव्हा क्षणभर का होईना, अचंबा तयार करते आणि आपण त्याकडे बघत राहतो. दुचाकींवरील आरशांसकटचे आच्छादन एखाद्या विचित्र प्राण्यासारखे दिसते. मूळ वस्तूचा ढोबळ आकार प्रवाही प्रतलाच्या आच्छादनाच्या ओबडधोबडपणामुळे एक नवीन आकार धारण करतो, जो एकसंध आणि निर्मम असतो.

झाकण्यातून उघड झालेल्या व वेगळ्याच दृश्याकारात रूपांतरित होणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्याला आसपास अनुभवायला मिळतात. कधी कधी आपल्यापेक्षा विशाल गोष्टींना झाकलेले पाहणे चित्तचक्षुवेधक असू शकते. दुरुस्तीसाठी काढलेली व पूर्णपणे कापडाने झाकलेली इमारत आपण सर्वानीच पाहिलेली आहे. यात वारा शिरल्याने कापडाच्या होणाऱ्या हालचालीने या इमारतीचा आकार अक्राळविक्राळ होऊन जातो. बऱ्याचदा आपण तेथेच उभे राहून असे दृश्य बघत राहतो. असे इमारतीचे झाकणे हा झाला व्यवहार; परंतु जर कुणी असे केवळ नेत्रसुखासाठी केले तर? होय! असे करणारे एक कलाकार जोडपे आहे! क्रिस्टो व त्याची पत्नी जान क्लोड. (परंतु नेहमी क्रिस्तोचेच नाव दिलेले असते, त्याची पत्नी व्यवस्थापनाचे काम करत असे.) क्रिस्टोचे काम चालू झाले ते साध्या साध्या वस्तू- बाटल्या, कॅन्स, खुर्च्या इ.- कापडाने झाकून दोरीने बांधण्यातून. असे करण्याचा उद्देश केवळ नेत्रसुखद आनंद देणे हा होता. १९७० सालानंतर सुरू झालेले हे काम मोठमोठय़ा इमारती, नैसर्गिक प्रदेश झाकण्यातून पुढे गेले. परंतु असे धाडसी काम एकंदरीत समाजव्यवस्था व राजकारण यांच्यावर सूचक भाष्य करून जाते. कलासमीक्षक डेव्हिड बॉर्डन यांनी क्रिस्टोच्या लपेटलेल्या वस्तूंचे वर्णन ‘लपवून ठेवलेले प्रकटीकरण’ असे केले आहे. क्रिस्टो त्याच्या टीकाकारांना उत्तर देताना म्हणतो, ‘‘मी एक कलाकार असेन तर माझ्याकडे धैर्य असलेच पाहिजे. तुम्हाला याची जाणीव आहे का, की माझ्याकडे प्रत्यक्ष अस्तित्व असलेली कोणतीही कलाकृती नाही! तो-तो कलाप्रकल्प संपल्यावर त्या सर्व कलाकृती नाहीशा होतात. केवळ तयारीची रेखाचित्रे आणि कोलाज शिल्लक राहतात, जे माझ्या कामांना एक कल्पित चरित्र देतात. मला वाटते की, शाश्वत वस्तुरूप देणारे काम करण्यापेक्षा लोप पावणाऱ्या कलाकृती निर्माण करण्यास अधिक धैर्य पाहिजे.’’ आज क्रिस्टोचे हे वातावरणीय जुने काम केवळ छायाचित्रे, रेखाचित्रे व फिल्म्समधूनच पाहता येते.

आच्छादनाचा नित्याचा आपला शारीरिक व तेवढाच मानसिक असणारा अनुभव म्हणजे अंगावर परिधान करण्याच्या वस्त्रांचा. रेचल केम्पर ही पोशाखाच्या इतिहासाची अभ्यासक. तिच्या म्हणण्यानुसार, ‘आदिमानवाने शरीराचे गुह्यभाग कुतूहलापोटी झाकले. आकर्षण जागृत करणे हे शरीर झाकण्याचे पहिले काम होते’- हे ऐकून धक्का बसतो. शरीराचा वातावरणापासून बचाव करण्याचा व्यावहारिक भाग त्यानंतरचा, जेव्हा प्राण्यांची चामडी काढता येऊ लागून वस्त्र म्हणून वापरणे चालू झाले, तेव्हाचा. नग्नतेशी असलेला असभ्यतेचा अर्थ त्या काळासाठी गैरलागू ठरतो, ‘सभ्यतेसाठी वस्त्रे’ ही समाज प्रगत झाल्यानंतरची संकल्पना ठरते. शरीर रंगवून आच्छादण्याची प्रथादेखील आदिमच होती. शरीर सुशोभित करणे याआधीचे प्रयोजन मानसिक स्वरूपाचे आहे. हा माणूस भीतीने ग्रासलेला होता. नैसर्गिक आपत्ती व हिंस्र पशूंशी कराव्या लागणाऱ्या सामन्याशी त्याचे नाते होते. पूर्ण शरीर नैसर्गिक रंग, रेषा व आकारांनी भरले जाई. माणसाला एखाद्या श्वापदाप्रमाणे रूप प्राप्त होई. या प्रकारची रंगरंगोटी करून नाच केला जाई, अशी कृती सामूहिक आन्हिके व तंत्राचा भाग असे. माणसाच्या पामराप्रमाणे असलेल्या आपल्या स्थितीतून बाहेर येणे असे या लेपन-आच्छादनाचे प्रयोजन मानले जाते. गोंदण (टॅटू) शरीराच्या विरूपीकरणातले सौंदर्य व पुढे बनलेली वस्त्र-सभ्यता, या साऱ्याचा एक हेतू झाकण्यातून व आच्छादनातून नवीन रूप दाखवणे व या रूपाचा जीवनात अंतर्भाव करणे हाही आहे.

मोकळ्या वस्त्राचा वापर (ड्रेपरी) शरीराचा काही भाग झाकून तयार केलेली शिल्पे ग्रीक व नंतर रोमन काळात आढळतात. वस्त्राच्या घडय़ांच्या रेषा दैवी जाणीव (ग्रीक शिल्पांत) व नंतर लालित्य (रोमन शिल्पांत) निर्माण करतात. शिल्पांमध्ये अशा प्रकारच्या रेषा व त्यांच्या उठावातून छायाभेद निर्माण करून परिणाम साधणे यासाठी भारतीय गांधार शैली प्रसिद्ध आहे. बुद्धाच्या शरीरावर आच्छादलेले तलम वस्त्र व्यवहारी उपयोगापेक्षा त्यातून दर्शवलेल्या आध्यात्मिक भावासाठी प्रसिद्ध आहे.

‘फॅशन’चे २०व्या शतकात अस्तित्वात आलेले जीवनातले मुख्य प्रयोजन, समाजात स्वत:ची ओळख तयार करणे हे होते. समाजाच्या रूढी व परंपरांमधून तयार झालेल्या माणसाच्या अस्तित्वाला जेव्हा तडा जातो तेव्हा फॅशन पुढे सरसावते व म्हणते, ‘‘मी तुला नवीन ओळख बहाल करते; तू फक्त ऐहिकतेचा, शारीरिकतेचा स्वीकार कर.. यातूनच तुला मानसिक समाधान मिळणार आहे’’!!

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.