30 May 2020

News Flash

प्रतिबिंबाची प्रतिमा

आपण पहाटे डोळे उघडले, अजून अंधार आहे

|| नितीन अरुण कुलकर्णी

प्रत्यक्षाच्या प्रतिमा चित्रकार बनवतो खरा, पण ते जे ‘प्रत्यक्ष’ आहे ते तर त्याला दिसलेले दृश्य- त्याने जसे पाहिले तसेच दृश्य- मग त्याला वास्तव कसे म्हणावे? प्रतिबिंबच ना ते, चित्रकाराच्या मनातले?

आपण पहाटे डोळे उघडले, अजून अंधार आहे; या गडदपणातच आपल्याला छतावरचा पंखा फिरताना दिसतो. थोडय़ा वेळासाठी आपण तो बघतो, डोळे पुन्हा बंद करतो व झोपण्याचा प्रयत्न करतो, कूस बदलतो. काही वेळाने पुन्हा डोळे उघडले जातात. आता बाजूला लावलेला पडदा दिसायला लागतो; करडा, काळसर-जांभळा. आता आपण मोबाइलच्या घडय़ाळात बघतो आणि ताड्कन उठतो, उशीर झालाय या भावनेतून; आपल्याला थोडी चक्कर आल्यासारखे होते म्हणून थोडा वेळ तसेच बसून राहतो. दात घासताना अंधारातला तो पंखा त्याच्या नांग्यांसकट एखाद्या किडय़ासारखा परत आठवून मनात दिसतो, आपण हसतो. यानंतर इतर आन्हिकं उरकल्यावर आपला दिवस सुरू होतो, या दिवशी यानंतर आपण अव्याहतपणे पूर्ण दिवसभर अनेक वस्तू, माणसं, वेगवेगळ्या घटना बघणार असतो. हे सर्व काय असतं? दृश्यं असतात; त्यांचे व्यावहारिक अर्थ असतात; आपले स्वत:चे असे अर्थ असतात. ही दृश्यं व अर्थ यांच्या मध्ये काय असतं? तर ‘प्रतिमा’.

आपण जर चित्रकार असू तर मग आपला अशा एखाद्या प्रेरित दिवसाचा प्रवास ‘दृश्य’, ‘प्रतिमा’ व ‘अर्थ’ या त्रयींनी भारित असणार हे उघड असतं.

‘‘चित्रकाराचे मन आरशासारखे असले पाहिजे.’’      – लिओनादरे दा विंची

लिओनादरेच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या मनात आपण पाहत असलेल्या दृश्याचे आरशासारखे प्रतिबिंब उमटले पाहिजे. हे तो का बरे म्हणत असावा? कलेचे त्या काळचे यथार्थदर्शनाला केंद्रस्थानी ठेवणारे स्वरूप या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. युरोपीय प्रबोधनकाळात (‘रेनेसाँ’मध्ये) मानवाला व त्याच्या एकंदरीत अनुभवाला महत्त्व देण्याची सुरुवात झाली. हा उत्कर्षांचा काळ होता व कलेच्या प्रावीण्याकडे म्हणजे यथार्थतेकडे कल तयार झाला. माणसाचे यथार्थ चित्र रेखाटण्यासाठी शरीररचनाशास्त्राचा अभ्यास आणि परिसर व वस्तू चित्रिण्यास परस्पेक्टिव्ह या शास्त्रांचा अंतर्भाव झाला. यथार्थदर्शनात एक प्रकारे आपण वास्तवाचा चित्रपृष्ठावर आभास तयार करतो. तेव्हा हे करणे, आता वाटते तेवढे सोपे नव्हते. असे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा शोध लावला गेला. सर्वात आधी प्रबोधनकाळात (रेनेसाँमध्ये) दृश्य काचेतून एक डोळा बंद करून बघितले गेले व त्या काचेवर काढलेल्या चौकडीच्या आराखडय़ापलीकडचे दृश्य बघून त्याचे चित्र हुबेहूब काढले गेले. चित्रकारांना हे पक्के माहीत असावे की त्यांचे मन आरशासारखे कार्य करणे कठीणच आहे. त्यामुळे प्रत्यक्षाच्या दृश्यात बदल करून, त्याची प्रतिमा बनवून बघणे सुकर करून त्याचे चित्रप्रतिमेत रूपांतर करणे सुरू झाले. हे करण्यासाठी िभग, आरसे वापरून आयुधं बनवली गेली, यात कॅमेरा ऑबस्क्युरा, कॅमेरा ल्युसिडा, क्लॉड ग्लास (ब्लॅक मिरर) यांचा अंतर्भाव होतो. रेनेसाँनंतरच्या ‘बरोक’ कालखंडात व्हरमिर व व्हेलाक्वेझ या चित्रकारांनी आरसा व प्रतिमा या संकल्पनेचा पुरेपूर वापर केलेला आहे.

क्लॉड ग्लास – डार्क मिरर

आपला प्रतिमेवर विश्वास असतो. इतका की त्या प्रतिमेलाच आपण वास्तव मानतो. खरं तर चित्रकाराला जाणवलेली प्रतिमा, हे वास्तवाचं एकच रूप असतं. आता वास्तववादी चित्रकाराची अशी अडचण असते की समोर दिसणाऱ्या दृश्याच्या प्रतिकृतीतूनच (मिमेसिस = नक्कल) त्याला कलानिर्मिती करायची असते. जाणवलेल्या प्रतिमेकडे कूच करायचं तर प्रत्यक्षातलं दृश्य विभाजित करून बघता यायला हवं, त्यातले तपशील जायला हवेत. यासाठी डोळे किलकिले करून बघणं छोटी खिडकी करून बघणं अशा कृतींव्यतिरिक्त काही तरी हवं, जे प्रत्यक्षाचंच रूपांतर करून दाखवेल. क्लॉड ग्लास (हे नाव क्लॉड लोरॅन या त्याच काळातल्या चित्रकाराच्या स्वप्नवत वाटाव्या अशा शैलीमुळे दिलं गेलं.) ही बहिर्वक्र आरसा असलेली छोटी डबी यासाठीच १८ व्या शतकात वापरली जात असे. याचा वापर चित्रकारांव्यतिरिक्त दर्दी प्रवासीदेखील करत. यातून बघितलेलं दृश्य जास्त स्पष्ट व प्रत्यक्षाच्या रंग अभावाने युक्त असे. त्यामुळे प्रतिमेकडे जाणं सोपं होई. याउलट कॅमेरा ऑबस्क्युरा व कॅमेरा ल्युसिडा समोरील दृश्य चक्क तुमच्या चित्रपृष्ठावर परावíतत करतात. (हे आद्य कॅमेरेच होत.) कलाकाराला फक्त हवा तो भाग निवडून चित्रात आणायचे तेवढे उरते. व्हरमीरने याचा योग्य प्रकारे वापर केलाय. चित्रातला आरसा चित्रात गूढता तयार करतो. मुळात चित्र ही एक प्रतिमा त्यात आरशाची प्रतिमा त्यात परावíतत होणारी दुसरी प्रतिमा आणि ही आरशातली प्रतिमा जर चित्राबाहेरच्या वास्तवाची असेल तर चित्राची मिती द्विगुणित होते. तसंच काहीसं व्हेलास्वेच्या ‘लास मीनिनाज’ चित्रात केलं आहे.

दृश्यानुभव -> मनातली विशिष्ट प्रतिमा -> प्रत्यक्षाची प्रतिमा (आयुधं व तंत्रांद्वारे) -> चित्रातली बाह्य़ प्रतिमा (जी मनातल्या प्रतिमेशी दुवा प्रस्थापित करते). असे हे कल्पना व संकल्पनेचा विकास यांचे टप्पे.

सामान्य अवलोकनात आपण दृश्यालाच सत्य मानलेलं असतं. तो अर्थ आपल्याला एवढा खरा वाटत असतो की प्रतिमेचं अस्तित्व आपल्याला सहजासहजी मान्य नसतं. रेने माग्रिट या अतिवास्तववादी चित्रकाराचं एक काम आहे. या चित्रात धूम्रपान करण्याचा एक पाइप दाखवला आहे व या पाइपखाली फ्रेंच भाषेत लिहिलं आहे- ‘‘धिस इज नॉट अ पाइप.’’ इथं दर्शक बुचकळ्यात पडला आहे व स्वत:शी झगडत आहे – ‘‘हा पाइपच तर आहे’’.. उत्तराचा पाठपुरावा केला तर लक्षात येतं- कलाकाराला एवढंच म्हणायचंय की, ‘हा खराखुरा पाइप नसून, पाइप या वस्तूचं हे एक प्रातिनिधिक रूपांकन आहे’. ‘जस्ट अ‍ॅन ‘इमेज’’! केवळ ‘प्रतिमा’. आणि बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येतं की, ही एक प्रतिमेतली प्रतिमा आहे. पाइपच्या प्रतिमेतली ज्ञानाची प्रतिमा.

‘‘आरशातल्या प्रतिमेला आपण प्रतिमा मानायला तयार नसतो, तसेच मनातल्या प्रतिमेलादेखील प्रतिमा मानायला तयार नसतो.’’

ज्या क्षणी आपण दृश्याला प्रतिमा म्हणालो त्या क्षणी आपण त्या दृश्याला वास्तवापासून थोडे दूर नेले. शक्यतेचा दाट पुरावा म्हणजे वास्तव होय. एकंदरीतच आरसा व प्रतिमा यांचं नातं गूढ आहे. याचमुळे की काय, गूढ व परीकथांमध्ये आरशाचा वापर भय व संदिग्धता तयार करण्यासाठी केला जातो. आरसा जणू काही पूर्ण जगातले ‘आत्मे’ गिळंकृत करत असतो आणि पाहिजे तेव्हा नवीन वास्तव तयार करत असतो. इथं खऱ्या अर्थी आरसा व मन यांत एक प्रकारचं साधर्म्य दिसतं.

अमेरिकन छायाचित्रकार डुएन मायकल्स याने १९७६ मध्ये ‘वास्तवाला छायाचित्रांकित करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न’ हा निबंध लिहिला. त्यात तो म्हणतो :

‘‘वास्तवाला छायाचित्रांत पकडणे सोपे आहे; यावर विश्वास ठेवणे किती मूर्खपणाचे आहे! मी झाडे, वाहने आणि माणसे यांच्या दृश्यांनाच ‘वास्तव’ समजण्याचा गोंधळ करत होतो; इतके दिवस मला असेच वाटत होते की, या सगळ्या दृश्यांची छायाचित्रेच त्या वस्तूंची छायाचित्रे आहेत.

‘‘परंतु हे एक विदारक सत्य आहे की, मी कधीही वास्तवाचे छायाचित्र काढू शकणार नाही. प्रयत्न

केलाच तर केवळ अपयश हाती येणार.

‘‘मी स्वत:च एक प्रतिबिंब असून, प्रतिबिंबातच दुसऱ्या प्रतिबिंबाचे छायाचित्र काढत आहे; वास्तवाचे छायाचित्र काढणे म्हणजे नसलेपणालाच छायाचित्रित करणे होय.’’

लेखक दृश्य कला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात.

nitindrak@gmail.com

(( अमेरिकन छायाचित्रकार डुएन मायकल्स याने काढलेले रेने माग्रिट यांचे छायाचित्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2019 12:06 am

Web Title: what is reflection
Next Stories
1 स्वप्रतिमेचा अनुभव
2 अनुभवाचे शरीरशास्त्र
3 संकल्पन हीच एक कला..
Just Now!
X