06 July 2020

News Flash

आतून मधुर मधुर व्हावे

आमच्या वाचकांनीही त्यांची ओंजळ सत्पात्री दानासाठी रिती केली.

‘सत्पात्री दान’ सदराचा हा शेवटचा लेख. वर्षभराचा आढावा घ्यायचा तर एकच म्हणता येईल की, या सदराचा उद्देश सफल झाला. वेगवेगळ्या कामांसाठी हातचं न राखता दान करणारे जसे पुण्यात्मे या समाजात भेटले तसंच त्यांची प्रेरणा घेऊन आमच्या वाचकांनीही त्यांची ओंजळ सत्पात्री दानासाठी रिती केली.. एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं समाधान आहे.

वर्षांच्या सुरुवातीला कॉलमचा ‘सत्पात्री दान’ हा विषय करायचं ठरलं, तेव्हा वाटलं की, उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू नये, असं मानणारी आपली संस्कृती, मग वर्षभर लिहिण्यासाठी २५ दानशूर आपल्याला मिळणार तरी कसे? परंतु ‘इतरांना प्रेरणा’ हा एकमेव मुद्दा कामी आला आणि द्रव्यदानाबरोबर श्रमदान, सेवादान, अन्नदान, दृष्टिदान.. अशा विविध सात्त्विक दानांनी या सदराची ओंजळ भरून गेली. वर्षभर लेख लिहिले गेले, प्रसिद्ध झाले. वाचकांचा भरभरून प्रतिसादही आला त्याचा लेखक म्हणून मला समाधान होतंच, परंतु वाचकांनीही आपापल्या परीने दानाची ओंजळ रिती केली आणि या सदराचा उद्देश सफल झाला.
या सदरातील पहिला लेख, सलग ४० वर्षे श्रमदान करून, डोंगर फोडून रस्ते बांधत गावाच्या विकासाचा मार्ग खुला करणाऱ्या नगरजवळील गुंडेगावच्या भापकर गुरुजींवरचा. त्यांची जीवनकहाणी वाचताना अनेकांची मनं हेलावली. त्यातील एक नाव म्हणजे डोंबिवलीच्या विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित. हे सद्गृहस्थ दुसऱ्याच दिवशी गाडी काढून गुंडेगावला पोहोचले आणि मग जातच राहिले. त्यांनी जणू गुरुजींना वडील म्हणून दत्तकच घेतलं. गुरुजींचं मोडकंतोडकं घर पाहून मी लेखात म्हटलं होतं..‘गावाच्या उत्कर्षांसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या या महात्म्याचं घर कधी नीट होईल? कोण करेल?’ जानेवारीत लेख प्रसिद्ध झाला आणि ऑगस्टमध्ये गुरुजींचं गुंडेगावात ५ खोल्यांचं घर झालं. गावातील दोन सहृदय माणसांनी जमीन दिली आणि पंडितसरांनी अनेक फेऱ्या घालून घर उभं केलं. गुरुजींचं हे नव प्रशस्त घर पाहायला पंडितसरांनी एकदा मलाही गुंडेगावला नेलं. तेव्हा एका सर्वसामान्य व्यक्तीची सामाजिक बांधिलकी किती उच्च कोटीची असू शकते याचं प्रत्यंतर आलं.
‘चतुरंग’च्या माध्यमातून भापकर गुरुजींची कीर्ती सर्वत्र पसरल्याने त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले, विविध वाहिन्यांवर मुलाखती घेतल्या गेल्या, परंतु कोल्हापुरातील शाहू महाराज संस्थेच्या शाळेतील मुलांनी त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने जमवलेली आणि एका भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करून दिलेली साठ हजार रुपयांची थैली त्यांना लाखमोलाची वाटते. अलीकडेच त्यांचा फोन आला होता. म्हणाले, ‘‘पद्मश्री पुरस्कारासाठी माझं नाव गेलंय. नगरमधून बरेच अर्ज आले होते, पण कलेक्टरने माझी एकटय़ाची शिफारस केलीय.’’ पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही लिवलेला कागद जोडला होता न्हवं!’’ मी म्हटलं, ‘‘गुरुजी तसंच होवो.’’
एप्रिलमध्ये पूर्वाचलमध्ये पर्यटनासाठी गेले असताना जुळवून आणलेली सेवाभारतीच्या सुरेंद्र ताडखेलकर यांची भेट हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग. या दुर्गम भागातील देशबांधवांसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लेखामुळे त्यांच्या कार्याला आर्थिक मदत तर मिळालीच, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या अतिपूर्वेकडील संवेदनशील प्रदेशात जाणाऱ्या स्वयंसेवकांचा ओघदेखील वाढला. काही डॉक्टरांनी त्या ठिकाणी वैद्यकीय शिबिरे घेण्याची इच्छा दर्शवली. ती सेवाही फळाला आली.
प्रसिद्धीविन्मुख अशी ही देवमाणसं शोधण्यासाठी नाना युक्त्याही योजाव्या लागल्या. ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं अशा चेन्नईस्थित पालम कल्याणसुंदरम् या संत महात्म्याची माहिती व्हॉटस्अ‍ॅपवरून समजली. त्यानंतर गुगलवरून त्यांची सर्व माहिती शोधून काढली. संपर्क नंबरही मिळाला; परंतु तामिळखेरीज एक अक्षरही ते बोलत नाहीत. मग तामिळभाषक माणूस शोधला आणि त्याच्याकडे प्रश्नांची यादी देऊन हवं ते सगळं विचारून घेतलं तेव्हा नि:शंक मनाने लिहिता आलं.
‘लोकसत्ता’वरील वाचकांच्या विश्वासाची मोहर म्हणजे पुण्यातील सिंहगडच्या पायथ्याशी वसलेल्या डोणजे गावातील ‘आपलं घरं’ आणि सातपुडय़ाच्या कुशीतील ‘जीवनशाळा’ या प्रकल्पांना मिळालेला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद. प्रत्यक्ष भेट न देताही दानशूर वाचकांनी या संस्थांची झोळी लाखो रुपयांनी भरून टाकली. गोरगरीब मुलांना एक दिवस का होईना, मौज-मस्तीचे खेळ खेळण्यासाठी एखाद्या रिसॉर्टमध्ये न्यावं, ही माझी इच्छा सुनीता देवधर बाईंनी संपूर्ण प्रायोजकत्व देऊन पूर्ण केली. पनवेलजवळील नेरे गावातील कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संचालित, अण्णासाहेब सहस्रबुद्धे आदिवासी आश्रमशाळेतील ६ वीच्या वर्गातील ५० मुलामुलींना घेऊन केलेली ठाण्यातील टिकूजीनीवाडी रिसॉर्टची पूर्ण दिवसाची सहल म्हणजे ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग.’ आपल्या गावाबाहेरचं जगही कधी न बघितलेली ही मुलं दिवसभर एका वेगळ्याच दुनियेत बागडली, नाचली, तृप्त झाली आणि निरोप घेताना आम्हाला अंतर्मुख करून गेली. म्हणाली, ‘‘पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्गाला न्या म्हणजे आज परतल्यावर आम्ही ज्या गमती सांगू त्या ऐकताना त्यांना वाईट नाही वाटायचं..’’
सातपुडा पर्वतरांगेतील ‘जीवनशाळा’मधील मुलांनीही असंच नि:शब्द केलं. धडगावमधील मुक्कामाच्या रात्री वसतिगृहातील मुलांसोबतच्या गोष्टींच्या देवघेवीत पाचवीतील रामदास नावाच्या मुलाने सांगितलेली गोष्ट अशी.. ‘पावसात तुम्ही शहरी माणसं धबधबे बघायला कुठं-कुठं जाता, पण पावसाचा जोर वाढला की आम्हाला धडकी भरते. आमची घरं डोंगराच्या आत आत.. खालून नर्मदेचं पाणी वर चढतं आणि वरून डोंगराला झरे फुटतात. घरात कधीपण पाणी शिरेल म्हणून आम्ही रात्र-रात्र जीव मुठीत धरून बसतो. दिव्यात तेलपण नसतं जाळायला. गुहेत पाणी भरलं, की रात्री वाघरंपण बाहेर पडतात. पडवीत बांधलेल्या शेळ्या-मेंढय़ांना कधी ओढून नेतील याचंही मनावर ओझं..’ त्या लहानग्याची ही जीवनकहाणी आठवली की, आजही मन हळवं होतं.
सदराची मुदत संपल्यामुळे ज्यांच्यावर लिहायचं राहून गेलं अशी हुरहुर लावणारी काही नावं म्हणजे..अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण-करियर-आयुष्य घडावं म्हणून स्वत:च्या करियरवर पाणी सोडून १०वी-१२वी या महत्त्वाच्या टप्प्यासाठी मार्गदर्शक अशी ‘भारूकाका.कॉम’ ही संपूर्ण मराठी भाषेतील वेबसाइट चालवणारे महेंद्र वैसाणे, वेगवेगळ्या क्षेत्रांतील सामाजिक संस्थांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘देणे समाजाचे’ नावाचा उपक्रम गेली १० वर्षे चालवणाऱ्या पुण्याच्या वीणा गोखले, स्वत: चाळीत राहून आपल्या गावच्या (देवरूख) वाचनालयासाठी १६ लाखांची देणगी देणारे रमेश साने.. असे अनेक. आता तर असं वाटतंय की, ‘सत्पात्री दान भाग-२’ लिहिलं तरी ही गंगोत्री आटणार नाही.
वाचकांना प्रेरणा मिळावी हा आमचा उद्देश मात्र बऱ्याच अंशी सफल झाला. साद घातली तिथे प्रतिसाद तर मिळालाच, शिवाय आम्हाला अमुक-अमुक निमित्ताने तमुक-तमुक द्यायचं आहे, कुठं देऊ, असं विचारणारे अनेक दूरध्वनी वर्षभर येत राहिले. राकेश दवे या तरुणाने सदरापासून स्फूर्ती घेऊन ‘फेसबुक’वर आवाहन करून एक ग्रुप बनवला आणि या गटाने अडीच लाख रुपये गोळा करून शहापूरमधील एका शाळेला बसण्याचे बाक आणण्यासाठी दिले. दोन दानशूरांनी तर वृद्धाश्रम/गोशाळा यांना जमीन दान देण्यासाठी योग्य संस्थांची विचारणा केली. त्यांना त्या त्या शहरातील नि:स्पृह व्यक्तींची गाठ घालून दिली.
मनाच्या चांदण्यात आयुष्यभर भिजावे असे काही अनमोल क्षण या सदराने मला दिले. जसं सातपुडा पर्वतातील मणिनेली या गावामधील ‘जीवनशाळा’त १५ ऑगस्टला नर्मदेच्या साक्षीने माझ्या हस्ते झालेलं ध्वजवंदन.. जे. जे.चे डीन डॉ. तात्याराव लहाने आणि हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या ‘इंडिको रेमडीज’ कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे या मान्यवरांसोबत रंगलेल्या गप्पा.. औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटलची मंतरलेली भेट.. अशा स्वप्नांच्याही पलीकडल्या अनुभवांसाठी मी या सदराची कायम ऋ णी राहीन.
दुसऱ्याच्या हाताला मेंदी लावताना ज्याप्रमाणे स्वत:ची बोटंही रंगून जातात त्याप्रमाणे या थोर व्यक्तींच्या सहवासातून मलाही वेगळी दृष्टी मिळाली. गरजू व्यक्ती आणि संस्थांना दानशूरांशी जोडणाऱ्या ‘सेवासहयोग’च्या संजय हेगड यांचा आदर्श समोर ठेवला आणि शक्य होईल तिथे ही दोन टोकं जोडणाऱ्या प्रयत्न केला. वनमित्र सुरेशकुमार व जयशंकर यांचं जीवन जाणून घेतल्यापासून किचनच्या खिडकीत धान्याचा वाडगा व पाणी ठेवल्याखेरीज नाश्ता केला नाही. ज्या ज्या ठिकाणी अन्नदान, सेवादान सुरू होतं तिथं तिथं स्वत:चा खारीचा वाटा ठेवत गेले. या सदरातून शेवटी दत्ता हलसगीकर म्हणतात तसंच तर साधायचं होतं..
मन थोडे ओले करून
आतून हिरवे हिरवे व्हावे
मन थोडे रसाळ करून
आतून मधुर मधुर व्हावे
waglesampada@gmail.com
(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 1:21 am

Web Title: inspirational stories from loksatta chaturang
टॅग Chaturang,Human Life
Next Stories
1 तृप्तीची तीर्थोदके..
2 कीर्तिरूपी उरावे..
3 सत्पात्री दान : दानाचा अखंड यज्ञ
Just Now!
X