14 December 2019

News Flash

तोची भगवंताची मूर्ती

ब रेचदा वरवरच्या गोष्टींवरून आपण एखाद्याबद्दलचं मत ठरवत असतो.

डॉ. रागिणी पारेख या डॉ. तात्याराव लहाने यांच्या शिष्या. सलग २१ वर्षे जे. जे.त काम केल्यानंतर गेली ५ वर्षे हॉस्पिटलच्या नेत्र विभागाची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. सुरुवातीच्या काळात, १९९० ला दिवसाला डोळ्यांची एकच शस्त्रक्रिया करणाऱ्या
डॉ. रागिणी यांनी नंतर दिवसाला ३०, त्यानंतर ९० आणि २००५ पासून १०० शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. आज वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांच्या नावावर ६५००० शस्त्रक्रियांचा विक्रम जमा झालाय.
बरेचदा वरवरच्या गोष्टींवरून आपण एखाद्याबद्दलचं मत ठरवत असतो. पण कधी कधी जवळ गेल्यावर उलटा अनुभव येतो. जे. जे. हॉस्पिटलमधील नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना भेटल्यावर माझं असंच झालं. संपूर्ण भारतातील नेत्रतज्ज्ञांमध्ये डोळ्यांच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात गेली ५ वर्षे सातत्याने प्रथम क्रमांकावर असणाऱ्या डॉ. रागिणी यांना भेटण्यासाठी मी २/३ महिने प्रयत्न करत होते. पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. कधी शिबिराची, कधी सेमिनारची तर कधी आत्यंतिक कामाची सबब. अखेर माझ्या चिकाटीला यश आलं. गुरुपौर्णिमेचा दिवस भेटीचा दिवस ठरला. ठिकाण जे. जे. हॉस्पिटल, भायखळा. वेळ संध्याकाळी ७. या जुलमाच्या मुलाखतीत पदरात काय पडणार. वेळ अक्कलखाती जाण्याची शक्यताच जास्त.. अशा नकारात्मक भावभावनांचं गाठोडं बरोबर घेऊन मी जे. जे.च्या आवारात प्रवेश केला.
सात वाजले, साडेसात वाजले तरी मी बाहेरच्या कॉरिडॉरमध्येच. डोळ्यांना पट्टी बांधलेला एक एक रुग्ण ५/५ मिनिटांच्या अंतराने बाहेर येताना दिसत होता. एका सेवकाबरोबर निरोप पाठवल्यावर मला आत बसवलं गेलं. तिथे समोरच एका मोठय़ा स्क्रीनवर आत सुरू असलेली शस्त्रक्रिया दाखवली जात होती. कुणीतरी सांगितलं, डॉ. लहाने डोळा बसवण्याची (दान मिळालेला) शस्त्रक्रिया करताहेत. ते विलक्षण कौशल्य धडधडत्या अंत:करणाने बघत असतानाच डॉ. रागिणी तिथे आल्या. रात्रीचे ८ वाजले होते. दिवसभरात चारशे रुग्णांची तपासणी (ओ. पी. डी.) व ६१ शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या, तरीही या डॉक्टरचा चेहरा टवटवीत दिसत होता. (नंतर मला कळलं की तेच तर त्यांचं टॉनिक होतं). डोळ्यात कमालीची स्निग्धता आणि अत्यंत नम्र देहबोली. थांबायला लागल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांनी बोलायला सुरुवात केली. थोडय़ाच वेळात डॉ. तात्याराव लहानेही ऑपरेशन संपवून या मैफिलीत सामील झाले आणि त्यानंतर पुढचा तास-सव्वा तास म्हणजे याचसाठी केला होता अट्टहास.. याची अनुभूती देणारा!
त्या मंतरलेल्या वेळात गुरू-शिष्य परंपरेतील एक आदर्श माझ्यासमोर उलगडत गेला. डॉ. रागिणी या डॉ. तात्याराव लहाने यांच्या शिष्या. सलग २१ वर्षे जे. जे.मध्ये त्यांच्यासमवेत काम करत असलेल्या. डॉ. लहाने जे.जे.चे डीन झाल्यापासून गेली ५ वर्षे या हॉस्पिटलच्या नेत्र विभागाची धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. रुग्णसेवा हाच ध्यास आणि श्वास असलेल्या आपल्या या शिष्योत्तमेचं डॉ. लहानेंनी भरभरून कौतुक केलं. म्हणाले, ‘रुग्णांविषयी हृदयात असीम सेवाभाव बाळगणारी ही जगावेगळी रागिणी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहिलं की ही खुलते; त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं की हिचे डोळे पाणवतात.’ त्यांनी असंही सांगितलं की, आज जे. जे.चा नेत्र विभाग देशात प्रथम क्रमांकावर आहे. हा दर्जा मिळवणं आणि राखणं मलाही जमलं नसतं.
या विभागाचे क्रमांक एकचे दाखले आत शिरल्या शिरल्या दिसायला लागतात. कमालीची स्वच्छता, रुग्णांच्या अंगातील स्वच्छ कपडे, त्यांच्या बिछान्यावरील पांढऱ्या शुभ्र चादरी, टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी शांतता.. एका सरकारी इस्पितळातील हे दृश्य पाहताना आपण चकित होतो. तिथल्या सेवकवर्गाशी संवाद साधला. तेव्हा कुणी म्हणालं, ‘पूर्वी इथलं जेवण तोंडात घालवत नसे पण वॉर्डमध्ये जेवण आलं की या डॉक्टर कधीही त्यातली पोळी-भाजी/ डाळ-भात खाऊन बघतात, केव्हाही रुग्णांची स्वच्छतागृहं तपासतात त्यामुळे सगळं चित्रंच बदललंय.’ कुणी म्हणालं, ‘रुग्णाचा गाऊन वा शर्ट फाटलेला वा उसवलेला दिसला तर या डॉक्टरांचा पारा एकदम चढतो. त्यांना चहा, जेवण जवळ जाऊन प्रेमानं दिलं पाहिजे ही त्यांची सक्त ताकीद.. एवढंच नव्हे तर नर्स, डॉक्टरसकट सर्वानीच रुग्णांचा उल्लेख एकेरीत न करता काका, मामा असा आदराने करावा हा त्यांनी अलिखित नियमच घालून दिलाय..’ आपल्या या डॉक्टर मॅडमचं दरारायुक्त कौतुक सांगण्यातली त्यांची अहमहमिका पाहताना प्रथम क्रमांकापाठचं मर्म उमगत जातं.
डॉ. रागिणींचं आत्तापर्यंतचं आयुष्य मुंबईतील मुलुंड या उपनगरात गेलं. वडिलांचा लहानसा व्यवसाय (आज ७७ व्या वर्षीही ते कार्यरत आहेत). आर्थिक परिस्थिती बेताची. चाळीच्या दोन खोल्यांत राहून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. एम.बी.बी.एस.पासूनच जे. जे.शी नाळ जुळली. इथूनच एम. एस., त्यानंतर लेक्चररशिप आणि आता विभागप्रमुख.
डॉ. लहाने यांनी आपल्या विद्यार्थिनीचा आणखी एक विशेष गुण सांगितला, तो म्हणजे त्यांची अफाट स्मरणशक्ती. ते म्हणाले, ‘रुग्ण दहा वर्षांनी येवो नाहीतर पंधरा. तो कुठल्या बेडवर होता इथपासून त्याचा संपूर्ण इतिहास ही धडाधडा सांगते, तेही इतक्या बारकाव्यांसह की आम्हाला कागदपत्रं (रेकॉर्ड) काढून बघायची गरजच भासत नाही.’
तो दिवस गुरुपौर्णिमेचा असल्याने डॉ. रागिणींच्या हाताखाली एम. एस. करणारे तरुण डॉक्टर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मधून मधून डोकावत होते. त्यांनी एकमुखाने सांगितलं की, डॉक्टर ज्या कौशल्याने काही सेकंदात आपल्या डाव्या हाताने (डावखुऱ्या) मोतीबिंदू झालेल्या रुग्णांच्या बुबुळावरचं आवरण काढतात की, ते बघताना क्षणभर आमच्याच हृदयाचे ठोके थांबतात. यावर डॉक्टरांचं उत्तर ‘ही तर सरावाने मिळवलेली कला आहे. सुरुवातीला (१९९०) मी दिवसातून फक्त एकच ऑपरेशन करत असे. हळू हळू आत्मविश्वास वाढवत १९९८ मध्ये वाईच्या शिबिरात प्रथमच ३० शस्त्रक्रिया केल्या. नंतर कोल्हापूरला ही संख्या दुप्पट झाली. पुढे ९०/९५ पर्यंत पोहोचली. पण शंभर करायचा धीर होईना. वाटे पुढच्या रुग्णांना आपण त्याच क्षमतेने न्याय देऊ शकू का? त्यापेक्षा इथंच थांबवलेलं बरं. पण नंतर या भीतीवर मी मात केली आणि २००५ ला रत्नागिरीच्या शिबिरात प्रथमच १०० चा टप्पा गाठला. त्यानंतर हे टेन्शन निघून गेलं.’
आता डॉ. लहाने व डॉ. रागिणी शिबिरामध्ये दिवसभरात (सकाळी ११ ते रात्री ११) प्रत्येकी १२५ शस्त्रक्रिया सहज करतात. अर्थात यापाठी आजूबाजूला मदतीसाठी सज्ज असणाऱ्या सहकारी डॉक्टर, नर्स व इतर सेवकांचंही मोठं योगदान आहे, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. या टीमवर्कमुळेच आज ४८ व्या वर्षीच डॉ. रागिणींच्या नावावर ६५००० शस्त्रक्रियांचा विक्रम जमा झालाय.
जे.जे.ची नेत्रशिबिरं संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षी सप्टेंबर ते मार्च महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी-रविवारी नियमितपणे सुरू असतात. शुक्रवारी रात्री हॉस्पिटलचं काम आटपून निघायचं आणि सोमवारी सकाळी परत डय़ुटीवर हजर. रोजच्या कामात जराही व्यत्यय नाही.
शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा जो ट्रक/ गाडी पुढे पाठवली जाते त्यात सामान पॅक करून भरण्याची जबाबदारी डॉ. रागिणींनी स्वत:हून अंगावर घेतलीय. त्या म्हणाल्या, ‘‘मी चक्क जमिनीवर मांडी घालून बसते आणि एकेक वस्तू काळजीपूर्वक भरते. कारण एका मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या ५१ गोष्टींपैकी चुकून एखादी राहिली तरी हेमलकसा, मेळघाट अशा आडनिडय़ा ठिकाणी ती मिळणं महा मुश्कील. शिवाय शस्त्रक्रिया झाल्यावर फेकून द्यायच्या वस्तूंची विल्हेवाट लावणंही तितकंच महत्त्वाचं.’
ch08शिबिरांमधील असंख्य अनुभवांची पोतडी त्यांच्यापाशी आहे. त्यांनी ती उघडण्याआधीच डॉ. लहाने सांगू लागले, ‘कुठल्याही कानाकोपऱ्यात जा. तिथल्या रुग्णांची भाषा (की वेदना) रागिणीला थोडय़ाच वेळात समजायला लागते. सातपुडा पर्वतरांगांमधील मोरवी गावातील आदिवासी तर तोंडातून फक्त, पक्ष्यांसारखे आवाजच काढतात. बसतातही तसेच. त्यांनाही हिचाच विश्वास वाटतो. मोतीबिंदूने दोन्ही डोळ्यांत अंधत्व आलेली वयोवृद्ध मंडळी हिला फक्त स्पर्शाने व आवाजाने ओळखतात आणि तिचा हात घट्ट धरून ठेवतात. हीच पावती तिच्यासाठी लाखमोलाची.
डॉ. रागिणींनी एका उच्चशिक्षित तरुणाची कथा सांगितली. अमेरिकेतून एम. बी. बी. एस. पदवी घेऊन परतलेल्या या मुलाचा एक डोळा कॉन्टॅक्ट लेन्सच्या वापराने जवळजवळ जाण्याच्या मार्गावर होता. शिवाय दुसऱ्यालाही अल्सरची लागण झालेली. परंतु करिअर निवडीवरून वडिलांशी तीव्र मतभेद झाल्याने उपचारालाच तयार नव्हता. अशातच एकदा या पितापुत्राने दूरदर्शनवर डॉ. लहाने व डॉ. रागिणींची मुलाखत पाहिली आणि काय वाटलं कोणास ठाऊक तो वडिलांबरोबर जे.जे.त आला. डॉ. रागिणी म्हणाल्या, आम्ही शर्थ करून त्याचा दुसरा डोळा तर पूर्णपणे वाचवलाच शिवाय अल्सरने पूर्ण ग्रासलेल्या पहिल्या डोळ्यातही ५० टक्के दृष्टी आली. वर बोनस म्हणजे या उपचारादरम्यान डॉ. रागिणींनी केलेल्या समुपदेशाने त्या बापलेकांचे संबंधही सुधारले. इतर छंद? हा प्रश्न खरं तर मी अनवधानानेच विचारला. जिथे दोन घटका निवांतपणे बसायलाही वेळ नाही तिथे असा प्रश्न विचारणं हा मूर्खपणाच होता. पण त्या म्हणाल्या, ‘वारली पेंटिंग एम्ब्रॉयडरी, मेंदी या सगळ्याची मला आवड आहे. पण सध्या एकच लक्ष्य आहे.. सरांच्या सहवासातील अनमोल क्षणांवर ‘लिव्हिंग विथ द लेजंड’ या पुस्तकाचं लेखन सुरू आहे. १९ प्रकरणं पूर्ण झालीयत. आता लौकरात लौकर हे काम हातावेगळं करायचं आहे.
मुलाखतीच्या गाडीने रूळ पकडला होता. दिलेला अध्र्या तासाचा वेळ केव्हाच उलटल्याचं भान कोणालाही नव्हतं. ही संधी साधून जिभेवर रेंगाळणारा प्रश्न मी विचारून टाकला. रुग्णसेवेला वाहून घेतल्यामुळे तुम्ही संसार मांडला नाहीत की.. यावर अगदी मनमोकळं हसत त्या म्हणाल्या, तसं नाही. खरं तर माझं प्रेम काही कारणांनी फलद्रूप नाही होऊ शकलं. त्या कठीण प्रसंगी माझ्या कुटुंबीयांनी आणि सरांनी दिलेल्या आधारामुळेच मी सावरू शकले. आता वाटतं झालं तेच बरं झालं. कारण त्यामुळे माझं खरं प्रेम मला कळलं. बोलता बोलता डॉ. रागिणींनी आपल्या बहिणीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. म्हणाल्या, तिचा मुलगा आम्ही दोघींनी मिळून वाढवला त्यामुळे माझी वात्सल्याची भूक भागली. माझ्यासाठी तेवढं पुरेसं होतं. आमचा हा लेक आज एम. एस. होऊन अमेरिकेत स्थिरावलाय.
जे. जे.मध्ये अवयवदानातून मिळणाऱ्या डोळ्यांचं प्रमाण किती? यावरचं त्यांचं उत्तर मात्र निराश करणारं. म्हणाल्या, ‘आठवडय़ात जेमतेम २ ते ३ डोळेच बसवले जातात. खरं तर ही गरज प्रचंड मोठी आहे. श्रीलंका हा आपल्या मुंबईपेक्षाही क्षेत्रफळाने व लोकसंख्येने लहान देश परंतु तोच सव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला गेली ३५/३६ वर्षे डोळे पुरवतोय. डॉ. रागिणींनी कळकळीचं आवाहन केलं की श्रीलंकेचं हे लाजिरवाणं परावलंबन संपवण्याचा निर्धार प्रत्येक भारतीयानं करायला हवा.’यावर काही बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. एव्हाना घडय़ाळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. त्यांच्या दुपारच्या जेवणाचा अजूनही पत्ता नव्हता. (हेही नेहमीचं) घरी जाण्यापूर्वीचा राउंड अजून बाकी होता. मी निरोप घेऊन जिना उतरायला सुरुवात केली. संत तुकारामांचा एक अभंग मनात नकळत जागा झाला..
ज्यासी अपंगिता नाही
त्यासी धरी जो हृदयी
दया करणे जे पुत्रासी
तेची दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती
तोची भगवंताची मूर्ती।
संपदा वागळे (संपर्क : profragini@gmail.com)
waglesampada@gmail.com

First Published on September 26, 2015 1:01 am

Web Title: story of dr ragini parekh
Just Now!
X