यशवंतरावांची काम करण्याची आणखी एक विशिष्ट पद्धत होती. ती म्हणजे- ते वर्षांतून एकदा सहा-सात दिवस ‘अंडरग्राऊंड’ व्हायचे. ही ‘सुट्टी’ नसे. तर दैनंदिन कामापासून दूर राहून आपण आतापर्यंत आखलेल्या धोरणांचा आणि पुढे हाती घ्यावयाच्या आगामी योजनांचा सखोल अभ्यास, त्याचे फायदे-तोटे, अडचणी लक्षात घेऊन त्यासंबंधीचा आराखडा तयार करण्यासाठी, विचारविनिमयासाठी ते ‘अंडरग्राऊंड’ व्हायचे. प्रसंगी तज्ज्ञांशी ते त्या बाबींसंदर्भात टेलिफोनवर चर्चा करायचे. म्हणूनच त्यांना आपल्या ध्येयधोरणांपासून कधी माघार घ्यावी लागली नाही. एवढेच नव्हे तर ती धोरणे यशस्वी ठरत गेली. या काळात ते नेमके कुठे आहेत हे फक्त तीन-चार व्यक्तींनाच माहीत असायचे. मात्र, बंगल्यावरचा व्यवहार त्यांच्या एखाद्या दौऱ्यागत सुरळीत सुरू राहायचा. त्यांचे निवासी खासगी साहाय्यक मुख्यमंत्र्यांच्या गाडीने ११ च्या सुमारास कार्यालयात येत आणि सायंकाळी सर्व फाइल्स गाडीतून घेऊन जात. त्यानंतर त्या फाइल्स कुठे जात आणि सकाळी कशा परत येत, हे कोणालाच कळत नसे.

यशवंतरावांच्या विचारांना आणि धोरणांना शासकीय कर्मचाऱ्यांची पूर्ण साथ लाभली होती. याला दोन कारणे होती. एक म्हणजे यातल्या ९० टक्के कर्मचाऱ्यांची (शिपायासह) नियुक्ती स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली होती. इंग्रजांची कडक शिस्त त्यांच्या अंगवळणी रुजली होती. मानेवर खडा ठेवून काम करण्याची त्यांची वृत्ती होती. कामाच्या वेळात फारसे कोणी कोणाशी बोलत नसे, किंवा कॉरिडॉरमध्येही कुणी उगाचच फिरत नसत. ‘हे काम माझे नाही’ वा ‘मी ते करणार नाही’ असे म्हणण्याची हिंमत कोणातच नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाप्रतीची निष्ठा आणि जबाबदारीची जाणीव सर्वाना होती. आजच्या पिढीला हे सर्व सत्य असूनही स्वप्नवतच वाटेल. हा काळाचा महिमा आहे!

Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १८ जागांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते

यशवंतरावांना लोकशाहीतील दुसऱ्या महत्त्वाच्या स्तंभाला सामोरे जायचे होते. आणि ती तेव्हा सर्वात अवघड गोष्ट होती. १९५७ च्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांचे पानिपत झाले होते. तर संयुक्त महाराष्ट्र समितीचे आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, ए. बी. बर्धन, आर. डी. भंडारे, दत्ताजी ताम्हाणे, दत्ता देशमुख यांच्यासारखी अनेक तगडी नेते मंडळी विधानसभेत निवडून आली होती. त्यांना तोंड देण्यात त्यामानाने यशवंतरावांची टीम काहीशी कमी पडत असे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी मनुष्यजीवनातील अनेक मर्मे सांगितली आहेत. असेच एक मर्म म्हणजे- ‘शब्दसंवाद’ माणसांना एकत्र आणतो, एकमेकांची सुखदु:खे हलकी करण्यास मदत करतो. आणि मुख्य म्हणजे एकमेकांना जोडण्यास मदत करण्याचा संस्कार मानवी मनावर घडवतो. संवादामध्ये एवढी शक्ती आहे की प्रेम, आपलेपणाची भावना, संकटांना तोंड देण्याचे धैर्य माणसात येते. यशवंतरावांच्या राजकीय, सामाजिक, सांसारिक यशोगाथेचेही हेच मर्म आहे. संवादासाठी लागणारी विचारशक्ती, वादविवादाची क्षमता किंवा पटवून देण्याची क्षमता आणि विद्वत्ता यशवंतरावांमध्ये विद्यार्थिदशेपासूनच होती. या गुणांची जोपासना त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत केली. म्हणूनच अनेक संकटांना तोंड देत ते दिल्लीच्या राजकीय जीवनात अनेक वर्षे तळपत राहिले. ते अजातशत्रू होते. अगदी हेच तत्त्व पी. व्ही. नरसिंह रावांनीही अंगीकारले होते.

आजच्या व्यावहारिक जीवनात संवाद नसल्यामुळे चार नातेवाईकांची तोंडे चार दिशेला आणि बोलण्यात एकवाक्यतेचा अभाव हा अनुभव आपण नित्य घेत असतो. म्हणूनच नातेवाईकांचा गोतावळा असूनही अनेकजण एकाकी जीवन जगत असतात. चार नातेवाईक तेव्हाच एकत्र येतात- जेव्हा त्यांच्या खांद्यावर पाचवा माणूस असतो. त्याच वेळी सर्वाची तोंडे एका दिशेला असतात आणि बोलण्यातही प्रथमच एकवाक्यता असते.. ‘रामनाम’! ही शोकांतिका आहे, असे नाही वाटत?

‘संवादा’चे ब्रह्मास्त्र घेऊनच यशवंतरावांनी विधानभवनात पाय ठेवला. लोकशाहीत विधानसभा, संसद यांना सर्वात जास्त महत्त्व असते. इथे तुमच्या कार्यकुशलतेची, नीतीची, विद्वत्तेची, चातुर्याची अग्निपरीक्षा असते. विधानसभेत पदार्पण करतानाच त्यांनी दोन ध्येयं मनाशी बाळगली होती. पहिले होते- पक्षशिस्त! पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे पानिपत झाल्यामुळे पक्षात अस्वस्थता व निराशा आली होती. माणसाचा स्वभाव मूलत: सत्तेकडे झुकण्याचा असल्यामुळे शिस्तीचा बडगा आवश्यक होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेत अशी कोणतीही घटना घडू द्यायची नाही, जेणेकरून विरोधी पक्ष त्याचे भांडवल करेल. विधानसभेचे सत्र सुरू असताना यशवंतरावांनी एक पथ्य पाळले होते, ते म्हणजे- विधानसभा अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत शक्यतो तेथील आपल्या कार्यालयात बसूनच ते काम करायचे आणि अधूनमधून विधानसभेत जाऊन बसायचे. तिथल्या प्रत्येक मिनिटाच्या कामकाजावर त्यांचे बारकाईने लक्ष असे. त्यामुळे मंत्र्यांवर आणि पक्षाच्या सभासदांवरही त्यांचा वचक असे. परिणामी, मंत्री हजर नाहीत किंवा सदस्यसंख्या पुरेशी नाही म्हणून सदनाचे कामकाज बंद पडले असा एकही दिवस यशवंतरावांच्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत आला नाही. त्यातही महत्त्वाची बाब ही, की विरोधी पक्षांत एकाहून एक विचारवंत, वक्तृत्वात पारंगत, अभ्यासू सदस्यांची संख्या तेव्हा भरपूर होती.

यशवंतरावांचा स्वभाव ‘दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण’ असा नव्हता, तर ‘आधी केले, मगच सांगितले’ असा होता. पक्षाचा आदेश ते स्वत: पाळत. संसदीय प्रणालीत ‘थ्री लाइन व्हिप’ला फार महत्त्व असते. विधानसभेचे वा संसदेचे काम चालू असताना चर्चेसाठी येणाऱ्या एखाद्या विषयावर जर मतदानाची शक्यता वाटली तर सत्ताधारी पक्ष आपल्या सभासदांना सभागृहात हजर राहिलेच पाहिजे असा आदेश काढतो. या आदेशातील प्रत्येक ओळ खाली अधोरेखित केलेली असते. म्हणून याला ‘थ्री लाइन व्हिप’ म्हणतात. काही कारण नसताना सभासद गैरहजर राहिला तर त्याच्यावर कारवाईसुद्धा केली जाऊ शकते. इंदिराजी पंतप्रधान असताना या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सहा केंद्रीय मंत्र्यांसह अनेकांना जाब विचारण्यात आला होता. म्हणूनच मंत्र्यांसमोर ठेवण्यात येणाऱ्या त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमपत्रिकेत याचा उल्लेख असतोच.

त्यावेळच्या विधानसभेत विरोधकांना काही वेगळाच अनुभव येत असे. सरकारच्या वतीने पुढे येणाऱ्या प्रत्येक विषयाला विरोधकांचा विरोध हा व्हावाच लागतो असा अनुभव आज आपण घेत आहोत. एकेकाळी विरोधक म्हणून सरकारच्या कुठल्याही गोष्टींना विरोध करणारी मंडळी आज सत्तेवर आल्यानंतर विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता लोकप्रतिनिधीगृहाचे कामकाज होऊ देणं किती आवश्यक व गरजेचे आहे, हे सांगत आहेत आणि पूर्वीचा सत्ताधारी पक्ष त्यांना विरोध करतो आहे. एकूणात, विरोध हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असे तर विरोधक मानत नाहीत ना, अशी शंका येते. विरोधक विरोधासाठी दक्ष असतात. त्यावेळीसुद्धा तसे ते होतेच. परंतु लोकहिताची प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी विरोधी प्रमुख नेत्यांशी चर्चा करायची, त्यांच्या सूचनांचा आदर करायचा आणि एखाद्या विषयातील वादंग निर्माण करणारी स्थळं कमी करून शक्यतो परस्परांच्या विचारानेच विधानसभेचे कामकाज चालवायचे, अशी विरोधकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याची प्रथा यशवंतरावांनी सुरू केली. परिणामी विधानसभेतील विरोधकांचा विरोध फिका पडत असे. विरोधकांची नांगी त्यांनी युक्तीने, पण आदराने मोडून काढली होती. अर्थात यशवंतरावांना याचा गर्व वाटत नसे. शर्थीने राज्य कसे चालवायचे, याचे हे नेहमीसाठीच आदर्श असे उदाहरण आहे. पण लक्षात कोण घेतो?

विधानसभेच्या कामकाजाबाबत एस. एम. जोशींनी लिहिले आहे : ‘संयुक्त महाराष्ट्र समितीचा मी सरचिटणीस असल्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणीही असला तरी ज्या- ज्या वेळी समस्या उभी राही, त्या- त्या वेळी त्या नेत्याबरोबर यशवंतरावांकडे मलाही जावे लागे. यशवंतरावांची आणि माझी सर्व बाबतीत ‘वेव्हलेंग्थ’ छान जुळली होती. याचे कारण दोघांनाही शांततेने सर्व समस्यांची उकल व्हावी असे मनापासून वाटत होते. विरोधी पक्षाच्या चांगल्या कामाचे कौतुकही यशवंतराव मनापासून करीत होते.’ एस. एम. पुढे लिहितात, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आम्ही आणि कम्युनिस्टांनी एकत्र येऊन गिरणी कामगारांची युनियन काढून एक-दोन दिवसांत एक लाख सदस्य केले. यशवंतरावांनी आमचे अभिनंदन केले. कशासाठी? काय आवश्यकता होती? आंतरिक चांगुलपणा अशा वेळी संस्कारी मनाला स्वस्थ बसू देत नाही.’

सर्व कसे सुरळीत चालू होते आणि एक दिवस अचानक दुपारनंतर काँग्रेस पक्षात धावपळ सुरू झाली. कारण होते- विधानसभेत विदर्भाचे नेते ब्रजलाल बियाणी यांनी पक्षसंघटनेचा आदेश झुगारून सरकारच्या धोरणाविरुद्ध भाषण केले. एक कर्तृत्ववान मंत्री म्हणून विदर्भात त्यांना प्रतिष्ठा होती, पण द्विभाषिक राज्यात त्यांना मंत्रीपद देण्यात आले नव्हते. ब्रजलाल बियाणी यांची विचारसरणी महाराष्ट्राच्या विकासात अडथळा निर्माण करणारी होती, म्हणून त्यांचा समावेश यशवंतरावांनी विचारपूर्वक केला नव्हता. यशवंतराव लिहितात : ‘मला ही घटना आवडणे शक्य नव्हते. मी थोडासा बेचैन झालो. पाच-दहा मिनिटे शांतपणे विचार करून काही आराखडा तयार केला. ताबडतोब बंगल्यावर जाऊन विदर्भातील मंत्र्यांना व पक्षाध्यक्षांना तातडीने बोलावून घेतले. ब्रजलाल बियाणींच्या विधानसभेतील वर्तणुकीबद्दल नीट विचार करून याबाबत काय करायचे, याबद्दल मत देण्यास सुचवले. जर आपणा सर्वाचा त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय असेल तर तो आजच नाही, तर आत्ताच घ्यायला पाहिजे. माझे बोलणे ऐकून त्यांचे आश्चर्यचकित झालेले चेहरे पाहून मी त्यांना सांगितले की, घाईचे कारण उद्याच्या अंकात पहिल्या पानावर विधानसभेतील घटनेचा वृत्तान्त मोठय़ा अक्षरांत येईल. बियाणींच्या भाषणाचा वृत्तान्त वाचून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटेल की पक्षाने त्यांच्यावर काहीच शिस्तभंगाची कारवाई केली नाही. काहींना तर स्फुरणच चढेल. ही भावना त्यांच्या मनांना स्पर्श करण्यापूर्वीच निर्णय घेणे गरजेचे आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो. उद्याच्या वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर शीर्षक हवे- ‘ब्रजलाल बियाणींची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी’! हे लक्षात आल्यावर नीट विचार करून सर्वानुमते त्यांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला गेला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रवाल्यांनी यालाच प्राधान्य देऊन पहिल्या पानावर बातमी छापली होती. नंतर माझ्या लक्षात आले, की दिसायला लहान वाटणारी ही घटना विचारपूर्वक केली होती तरी लहान नव्हती. कारण बियाणी यांचे पंडित नेहरूंशी घनिष्ठ संबंध होते. म्हणूनच बियाणींनी धमकीसुद्धा दिली, ‘यह कल का बच्चा मुझे काँग्रेस से निकालता है क्या? मैं भी देख लूंगा.’ मी दिल्लीला जाऊन पंडितजींना सर्व घटना सविस्तर सांगणार तोच पंडितजी म्हणाले, ‘जो मैं नहीं कर सका था वह तुमने करके दिखाया. अच्छा हुआ.’’

यशवंतरावांच्या मनात सदैव एक खंत होती, ती म्हणजे आपण जे करतो आहे त्याचा जनता मनापासून आनंद लुटू शकत नाही. कारण तहानेने व्याकूळ झालेल्याला पंचपक्वानांचे जेवण देण्यासारखेच हे आहे. म्हणून यशवंतराव मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीनेही ‘यशवंत नीती’नुसार काम करीत होते. आणि याची जाण विरोधी पक्षांनासुद्धा होती.

 –  राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com