५२ वर्षे सरकारी नोकरी.. जवळपास ४९ वर्षे नागपूरबाहेर वास्तव्य.. त्यापैकी ४५-४६ वर्षे यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, वसंतराव साठे, पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सहवासात काढलेला काळ.. या सर्वाची दिनचर्या अतिशय जवळून पाहण्याचे सुवर्णक्षण.. ही शिदोरी सोबत घेऊन १० जानेवारी २००६ ला स्थायिक होण्यासाठी मी नागपूरला परत आल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी पूर्वाश्रमीचा हा जीवनपट उलगडण्याचा  प्रयत्न करतो आहे. खरं तर माझी पत्नी स्नेहलता आणि व्यक्तिश: माझीही या कार्यकाळासंबंधी लिहावं अशी इच्छा नव्हती. पण गेली काही वर्षे मी त्यावर लिहावं, लोकांची यासंबंधातली उत्सुकता शमवावी असा अनेकांनी आग्रहच धरला. जगात देव आहे की नाही, माहीत नाही; पण निसर्गशक्ती आणि त्या अनुषंगाने ‘देव’ ही संकल्पना निश्चितच आहे, हे मी माझ्या ४९ वर्षांच्या अनुभवान्ती सांगू शकतो. संस्कारी आई-वडील, योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक, संसारात पतीधर्म पाळणारी सौजन्यशील पत्नी आणि नोकरीत आपुलकीने वागणारा बॉस लाभला की पृथ्वीतलावरही स्वर्गसुख अनुभवता येते, हे मी माझ्या स्वानुभवाने नक्कीच सांगू शकतो. असे भाग्य फार थोडय़ांना लाभते, हे खरेच! संसारात कशाची कमी भासली नाही, की दु:खाचा एखादा किरणही त्यावर पडला नाही. ‘यशवंतराव ते नरसिंह राव’ हा तब्बल ४६ वर्षांच्या कारकीर्दीचा प्रवास कसा झाला, या सर्वाची आपुलकी, जिव्हाळा व विश्वासास आपण कसे पात्र ठरलो, अशा अनेक गोष्टींचा आज मी विचार करत असतो. मनात येतं, तू होतास कोण आणि झालास काय? माझ्या मनात घोळणारा हा प्रश्न मला ओळखणाऱ्यांच्या मनातही अनेकदा आला असेल. किंबहुना, अनेकांनी धाडस करून मला तो विचारलाही. म्हणून मग वाटलं, की माझा प्रवास वाचून याचं उत्तर त्यांनाच शोधू द्यावं. सर्वसामान्यांना राजकारणात फारसा रस नसतो, परंतु मोठय़ा लोकांचं वैयक्तिक जीवन, दिनचर्या कशी असते, ते दिवसाचे २४ तास कसे व्यतीत करतात, त्यांच्या भेटीगाठी, सुरक्षा वगैरेबद्दल त्यांना उत्सुकता असते. खासकरून पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबद्दल तर अधिक कुतूहल असतं. या सदरात हे कुतूहल शमवण्याचा माझा प्रयत्न राहील. तत्पूर्वी अधिकारवाणीने हे सांगणाऱ्याची ओळख करून द्यावी म्हणून (कदाचित रटाळ वाटणारा) हा परिचय-प्रपंच! यशवंतराव चव्हाण एकदा म्हणाले होते, की आम्ही ज्यांचं साहित्य वाचतो ती व्यक्ती कशी असेल वा दिसते, हे पाहण्याचा अधिकार वाचकांना असतो.

माझे वडील वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी कोकण सोडून अकोल्याला आणि नंतर नागपूरला येऊन पोट भरत होते. त्याकाळच्या कोकणातील दारिद्रय़ाची कल्पना आजच्या पिढीला करता येणार नाही. रात्र ते एखाद्या दुकानाच्या पायरीवर काढत. पुढे एका किराणा दुकानात त्यांना नोकरी मिळाली. आणि कालांतराने त्यांनी स्वत:चं दुकान काढलं. मग खाऊनपिऊन सुखी आणि दोन पैसे गाठीशी बाळगणाऱ्या कुटुंबात आमची गणना होऊ लागली. इंग्रजीत म्हण आहे- Some are born in silver spoon and some are in wooden ladle. माझा जन्म या दोन्ही परिस्थितींच्या मधे असलेल्या मध्यम परिस्थितीत झाला. आम्ही चार भाऊ. सहाव्या इयत्तेपर्यंत जवळपास सगळे गुण मिळवून मी नेहमीच पहिला यायचो. याचा अर्थ मी सतत अभ्यास करीत असे असा नाही. इतरांसारखाच मी होतो. ३१ मार्च १९४६ ला निकाल घेऊन घरी आलो. आनंद साजरा झाला. नातेवाईकांनी अभिनंदन आणि कौतुक केलं. उन्हाळ्याचे दिवस म्हणून रात्री बाहेर झोपलो. आणि इथंच दैवानं घात केला. सकाळी मी का उठलो नाही हे पाहण्यासाठी आई आली तर माझं अंग तापाने फणफणलेलं. चापर्यंत ताप. दोन दिवस ताप उतरला नाही तेव्हा डॉक्टरांनी निदान केलं : ‘टायफॉईड’! हल्लीच्या डेंग्यूसारखा तेव्हा टायफॉईड नवीनच होता. पेनिसिलिनशिवाय त्यावर औषध नव्हतं. तेव्हा तो एक श्रीमंती आजार मानला जाई. दोनेक महिने मी कोमात होतो. या आजारातून मी उठलो तो रांगतच. शरीरावर मांस शोधावं लागे. पार अस्थिपंजर झालो होतो. त्यातून पूर्णपणे बरा होण्यासाठी मला सहा-सात महिने लागले. माझ्या या आजाराने कुटुंबाला आर्थिक फटका आणि माझ्या बुद्धीला जबरदस्त धक्का बसला. अभ्यासात पुन्हा कसंतरी वर येण्याचा भरपूर प्रयत्न करत असतानाच दहावीत- म्हणजे आणखी तीन वर्षांनी मला पुन्हा टायफॉईड झाला. त्याने जवळपास तीन महिने घेतले. एकेकाळी ‘तू इंजिनीअर होणार की डॉक्टर?’ हा नातेवाईकांकडून विचारला जाणारा प्रश्न आता- ‘तुला नोकरी तरी मिळेल काय?’ इथवर आला. टायफॉईडने माझा सतत पिच्छा पुरवला. १९५२ साली मॅट्रिक झाल्यावर मला तिसऱ्यांदा टायफॉईड झाला. १९५९ साली चौथ्यांदा त्याला मी सामोरा गेलो. सुदैव इतकंच, की नंतरच्या आजारांत त्यावर औषधं उपलब्ध झाल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नाहीत.

gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी

या भयंकर आजारांमुळे घरच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत आपल्याला आता नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही याची मला जाणीव झाली. माफक गुणांनी मॅट्रिक पास झालो. नोकरी मिळवायची असल्याने मॅट्रिकला असतानाच मी रात्रीच्या क्लासला जाऊन इंग्रजी आणि हिंदी सरकारी टायपिंग परीक्षेत मेरिटने पास झालो. पुढे नोकरीच्या शोधात असताना मध्य प्रदेश शासनाच्या भाषा संचालनालयात १३ ऑक्टोबर १९५३ रोजी मला टायपिस्टची नोकरी मिळाली. तिथे इंग्रजी-मराठी-हिंदी टायपिस्टची गरज होती. त्याकाळी सरकारी नोकरीला (मग ती चपराशाची का असेना!) मान होता. त्यामुळे घरचे सगळे आनंदात होते. आता आमच्या आर्थिक ओढगस्तीत सुधारणा होणार होती.

भाषा विभागाचं कार्यालय तसं लहानसंच होतं. तिथे केवळ हिंदी-मराठी प्रशासनिक शब्दकोश तयार करण्याचं काम होत असल्यामुळे १५-१६ च कर्मचारी होते. काही महिन्यांतच त्यावेळचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांनी हिंदी-मराठी राजभाषा करण्याचा निर्णय घेतला आणि तो लागलीच अमलातही आणला. हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून योग्य ती पावले उचलण्यात आली. त्याची जबाबदारी भाषा विभागावर सोपवण्यात आल्यामुळे इंग्रजी टायपिस्ट/ स्टेनोग्राफर यांना हिंदी वा मराठी टायपिंग/ स्टेनोग्राफी शिकवण्यासाठी वर्ग, मॅन्युअल्स, नियमांचे हिंदी-मराठी भाषांतर करण्यासाठी दोन्ही भाषांचे अनुवादक, अधिकारी यांची नेमणूक होऊन जोमाने कामास सुरुवात झाली.

प्रशासक असावा तर तो रविशंकर शुक्ला यांच्यासारखा असं मला नेहमी वाटतं. एकदा टाकलेलं पाऊल त्यांनी कधी मागे घेतलं नाही. प्रत्येक काम चोखपणे होत होतं. मी मात्र बेचैन होतो. कारण ‘टायपिस्ट’ या पदाला शून्य किंमत असते याची जाणीव झाली होती. त्याचं दिवसभराचं काम बिनडोकपणाचं असतं हे कळून चुकलं होतं. टायफॉईडने मेंदू मंद झाला असला तरी बुद्धी तल्लखच होती. भरपूर पगार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वावरता येईल आणि त्यांच्याकडून काही शिकता येईल यादृष्टीने त्यावेळी एक पर्याय समोर दिसत होता, तो म्हणजे हिंदी स्टेनोग्राफर होण्याचा! त्याला मागणीही होती. ऑफिस सुटल्यावर रात्रीचा हिंदी स्टेनोग्राफीचा शिकवणी वर्ग लावला आणि दोन-तीन प्रयत्नांनंतर सरकारी परीक्षा पास झालो. परमेश्वर देतो तेव्हा ‘छप्पर फाडके’ देतो तसं काहीसं माझ्या बाबतीत घडलं. तिथेच हिंदी स्टेनोग्राफरची एक जागा रिकामी झाली आणि त्या जागेवर माझी नियुक्ती झाली. ८६ रुपये असलेला पगार एकदम १४० रुपये झाला. डिक्टेशननिमित्त संचालकांशी वारंवार संबंध येऊ लागला. आणखी एक मोठा फायदा झाला, तो असा : साहित्यिक वा साहित्याशी मुख्यमंत्र्यांचा किती संबंध होता याची मला कल्पना नाही; परंतु हिंदी-मराठी साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी हिंदी साहित्य संमेलन आणि विदर्भ साहित्य संघ यांना नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठी जागा तर  दिलीच; शिवाय इमारतीसाठी अनुदानही दिलं. मुख्यमंत्र्यांचं साहित्यप्रेम एवढय़ावरच थांबलं नाही, तर साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी उत्कृष्ट साहित्यनिर्मितीकरता हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत एकेकलाख रुपयांचं पारितोषिकही देण्याचं त्यांनी ठरवलं. त्याकाळी ही रक्कम खूप मोठी होती. पारितोषिक देताना कुणावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी मध्य प्रदेश शासन साहित्य परिषदेची स्थापना केली. या साहित्य परिषदेचे मुख्यमंत्री अध्यक्ष, तर शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण सचिव, भाषा संचालनालयातील एक अधिकारी, तसंच हिंदी-मराठी भाषेतील प्रत्येकी तीन विद्वान साहित्यिकांचाही समावेश केला गेला. मला आठवतं, भाऊसाहेब माडखोलकर, डॉ. पेंडसे यांचा त्यात समावेश होता. दोन महिन्यांतून एकदा या परिषदेची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होत असे. भाषा संचालनालयाचे अधिकारी परिषदेचे सचिव असल्यामुळे त्याचे काम आमच्या कार्यालयातूनच चाले. बैठकीचे कामकाज, पत्रव्यवहार तसंच परिषदेच्या कामासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी मला नेमण्यात आलं. अर्थात, हे अतिरिक्त काम असल्यामुळे त्यासाठी मला २० रुपये दरमहा मानधन मिळत असे. पैशाचा मला मोह नव्हता. आनंद होता तो या बैठकीनिमित्त परिषदेच्या विद्वान सदस्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ओळख, बोलणे होई आणि त्यातून काही शिकायला मिळे, याचा. परिषदेतर्फे दरवर्षी हिंदी-मराठी दोन भाषणमालिकाही आयोजित करण्यात येत. त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर होती. मार्च १९५३ ते नोव्हेंबर १९५६ या इथल्या नोकरीच्या काळात अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या; ज्या मला पुढे खूप उपयोगी पडल्या. एक प्रकारे माझ्या प्रगतीची ती पायाभरणी होती.

राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com