|| राम खांडेकर

सीमेवरील अधिकारी आणि जवानांशी चर्चा करताना यशवंतरावांना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची आणि तितकीच नुकसानकारी बाब होती- गटबाजी. संरक्षण मंत्रालयापासून ते सैनिकांपर्यंत सर्वत्र बोकाळलेली गटबाजी पाहून यशवंतराव कष्टी झाले. दुसरी गोष्ट- संरक्षण दलाच्या ब्रिटिश अमदानीत तयार झालेल्या स्वरूपात इतकी वर्षे होऊनही फारसा बदल झालेला नव्हता. लढणाऱ्या जवानांपेक्षा प्रशिक्षण नसलेल्या बाजारबुणग्यांचाच भरणा त्यांच्यात अधिक होता. या बाजारबुणग्यांना परेड करताना लेफ्ट-राइटच काय, पण डावा-उजवा पाय म्हणजे काय, हेदेखील धडपणे माहीत नव्हते. म्हणून मग इंग्रज अधिकारी परेड सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डाव्या पायाला घास (गवत) आणि उजव्या पायाला पत्ती (सागाची पाने) बांधत. मग लेफ्ट-राइटऐवजी ‘घास’-‘पत्ती’ संबोधून परेड करीत असत. त्यातल्या सुदैवाची गोष्ट एवढीच, की तिन्ही सैन्यांतील अधिकारीवर्ग इतर राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त सरस होते. तथापि, डोके चक्रावून जाईल अशी परिस्थिती खुद्द संरक्षण मंत्रालयातच असल्याचा अनुभव यशवंतरावांनी घेतला. यशवंतरावांच्या आणखी एक गोष्ट प्रकर्षांनं लक्षात आली, की संरक्षण मंत्रालयाचा कारभार हा इतर खात्यांपेक्षा फार म्हणजे फारच निराळा आहे. तो समजावून घेण्यास किती काळ लागेल याची त्यांना कल्पना नव्हती. तरीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत उत्साह आणि जागरूकता आणण्याची तसेच त्यांच्यातील गटबाजीचा समूळ नाश करण्याची नितांत आवश्यकता होती. तसं पाहिलं तर गटबाजी ही दिल्लीकरांसाठी- विशेषकरून सत्ताधीशांसाठी संजीवनीच असते. म्हणूनच ती आजवर जोपासली गेली आहे. संरक्षण मंत्रालयात परस्परविश्वास निर्माण व्हावा म्हणून, तसेच तिथल्या कर्मचाऱ्यांना नियमितपणाची सवय लागावी यासाठी यशवंतरावांनी सकाळी नऊ वाजता (चीन युद्धामुळे सरकारी कार्यालयांची वेळ एक तास वाढवली गेली होती.) संरक्षण व संरक्षण उत्पादन विभागांचे सचिव, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, वित्तीय सल्लागार यांची बैठक बोलावण्यास सुरुवात केली. यशवंतराव दिल्लीत असताना ही बैठक नित्य होत असे. या बैठकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आपले विहित कार्यक्रम रद्द करण्याची मात्र गरज नसे.

प्रत्यक्ष सचिवच नऊला येत असल्यामुळे इतर अधिकारी व कर्मचारीसुद्धा वेळेवर येऊ लागले. बैठकीला वेळेचे बंधन नव्हते. संरक्षण मंत्रालयापासून ते सीमेपर्यंत असंख्य प्रश्नांची मारुतीच्या शेपटीसारखी लांबच लांब मालिका आ वासून उभी होती. यशवंतरावांना सुरुवात कुठून करायची, हेच कळत नव्हते. यापैकी कोणतीच गोष्ट, घटना, परिस्थिती, माणसे त्यांनी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती. सह्य़ाद्रीची खरी परीक्षा इथेच होती. शून्यातून विश्व निर्माण करून दाखवण्याची किमया यशवंतरावांना साध्य करायची होती. सकाळच्या या बैठकीचा दुसरा मुख्य उद्देश असे तो- सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून संरक्षणाविषयीचे प्रश्न, अडचणी, तातडीची उपाययोजना आदी गोष्टी समजून घेऊन त्यावर योग्य तो विचारविनिमय करून त्यावर तातडीने निर्णय घेणे. थोडक्यात- लालफितीचा कारभार आणि विलंबाला शह द्यायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, की सीमेवरचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नव्हता. त्यामुळे तातडीची व दीर्घकालीन अशा दोन प्रकारच्या संरक्षण योजनांचा आराखडा तयार करायचा होता. रात्र थोडी अन् सोंगं फार होती. यशवंतरावांच्या मनाचा मोठेपणा आणखी एका गोष्टीतून दिसून आला होता. ती म्हणजे- त्यांच्या आधीचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी संरक्षण विषयाचा अभ्यास करून काही अभिमानास्पद निर्णय घेतले होते आणि त्यांची अंमलबजावणीही सुरू केली होती. यशवंतरावांनी त्यांच्या या निर्णयांना जराही धक्का लावला नाही. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अनेक गंभीर प्रश्न आ वासून पुढे उभे असतानाच यशवंतरावांचा बराच काळ लहरी अधिकारी, जवान व मंत्रालयातील कर्मचारीवर्ग यांच्यातील अविश्वास व हेवेदावे दूर करून त्यांच्यात एकोपा निर्माण करण्यात खर्च झाला होता. यशवंतरावांचे एक तत्त्व होते : वेळ लागला तरी चालेल; पण प्रत्येक गोष्टीचा पाया मजबूत झाल्यानंतरच पुढचे पाऊल उचलायचे. विचार तर उद्याचा करायचा; परंतु आजचे काम उद्यावर ढकलायचे नाही. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचा हाही एक पैलू होता.

सीमेवरील आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन देशांतर्गत संपूर्ण आधुनिक युद्धसामुग्री तयार करणे अवघड होते म्हणून त्यांनी निवडक अधिकाऱ्यांसोबत अमेरिकेला भेट दिली. परराष्ट्राला भेट देण्याची, तेथील व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची यशवंतरावांची ही पहिलीच वेळ. मात्र, हा पहिलाच अनुभव इतका कटूहोता, की त्यापासून खूणगाठ बांधून त्यांनी आयुष्यभर जपूनच पावले उचलली. चर्चेच्या ओघात त्यांच्या लक्षात आले की, अमेरिका आपल्याला नको असलेली शस्त्रे मोठय़ा औदार्याने भारताच्या पदरात टाकण्यास उत्सुक होती. गरजवंताला अक्कल नसते असे समजून अमेरिकेचे हे डावपेच चालले होते. अर्थात यशवंतरावही कूटनीतिज्ञ होते. अमेरिकेबरोबरचं भारताचे संबंध खराब होणार नाहीत अशा गोड भाषेत त्यांनी ही निष्फळ चर्चा संपवली. थोडक्यात, ही भेट पूर्णत: अपयशी ठरली होती. कोणताही देश याचकाला आपल्याला जे नको असेल किंवा आपल्याकडे जे मुबलक असेल अशाच गोष्टी देण्यासाठी उत्सुक असतो. हा धडा यशवंतराव आणि नंतर पी. व्ही.  नरसिंह राव यांना परराष्ट्रमंत्री असताना फार उपयोगी पडला होता. खरं तर हा अनुभव सर्वासाठीच मार्गदर्शक आहे. या अमेरिका भेटीनंतर स्वदेशीचा नारा देऊन यशवंतरावांनी संरक्षण उत्पादनांचा आराखडा तयार केला आणि त्यानुसार कामास सुरुवात केली. यानंतर काहीच महिन्यांनी त्यांनी रशियाला दिलेली पाच-सहा दिवसांची भेट मात्र सर्व दृष्टीने फलदायी ठरली होती. अर्थात यात नवल नव्हते, कारण रशिया हा भारताचा खराखुरा मित्र होता.

संरक्षणविषयक प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी यशवंतराव सतत प्रयत्नशील असत. त्यांना ध्यानीमनी फक्त संरक्षण मंत्रालयच दिसत होते. ते आपल्या कामांत इतके व्यग्र होते, की आतल्या काही गोष्टी त्यांना थोडय़ा उशिराच लक्षात आल्या. म्हणावी तशी आपल्या कामाला गती येत नाहीए याचे कारण तपासून पाहता त्यांच्या लक्षात आले, की संरक्षणमंत्री पदासाठी उत्सुक असलेले आणि ते न मिळाल्यामुळे दुखावलेले पटनाईक व कृष्णमाचारी आपला अधिकार मंत्रालयात गाजवीत आहेत. कृष्णमाचारी यांच्याकडे तर अर्थ व संरक्षण समन्वय खाते होते. त्यामुळे अधिकाऱ्यांची मोठी पंचाईत झाली होती. त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. नेहरूंना भेटून यशवंतरावांनी ही गोष्ट त्यांच्या नजरेस आणली, पण त्याचा फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही. पटनाईक हे नेहरूंचे आवडते. नेहरूंना आवडणाऱ्यांना सर्व गोष्टी क्षम्य असत. शिवाय नेहरू त्यांना म्हणाले होते, की मेनन यांच्यानंतर संरक्षण खाते त्यांच्याकडे आले असता संरक्षणासंबंधी अनुभव व अभ्यास असलेल्या ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांना (अर्थात पटनाईक यांना) त्यांचे मदतनीस म्हणून बोलावले होते. यावर काहीच न बोलता यशवंतराव माघारी येऊन कामाला लागले होते. पण पुढे पटनाईक यांच्या हस्तक्षेपामुळे यशवंतरावांना काम करणे अशक्य झाले. दोघेही जण जखमी वाघासारखे. संरक्षणमंत्रीपद न मिळाल्यामुळे पटनाईक दुखावले होते. जणू  यशवंतरावांना महाराष्ट्रात परत पाठवण्याचीच तयारी ते करत होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दिल्लीत अशा वृत्तीच्या राज्यकर्त्यांची व सत्तापिपासू लोकांची अनेक उदाहरणे आढळून येतात. आपण जे करतो आहोत ते देशहिताचे तर नाहीच; पण पक्षाच्याही हिताचे नाही, हे त्यांना कळत असूनदेखील केवळ सूड घेण्याचीच या लोकांची वृत्ती असते.

पुढे या दोघांचा हस्तक्षेप इतका वाढला, की खरे संरक्षण मंत्री कोण, असा प्रश्न उभा राहिला. स्वाभिमानी यशवंतरावांच्या सहनशक्तीबाहेर गेल्यानंतर त्यांनी नेहरूंना थोडय़ाशा कडक भाषेतच पत्र लिहून विचारणा केली की, खरे संरक्षणमंत्री कोण आहे? मग मला इथे का बोलावले? या दोघांच्या हस्तक्षेपामुळे मला काम करता येणे शक्य नाही, तरी मला मुंबईला परत जाण्याची परवानगी द्यावी. त्यांचे हे पत्र मिळताच नेहरूंनी यशवंतरावांना बोलावून घेतले. यशवंतरावांकडून सारे काही ऐकून घेतल्यानंतर त्यांना नेहरूंनी सांगितले, संरक्षणमंत्री तुम्हीच आहात. आणि पुढेही राहणार आहात. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून तर तुम्हाला मी बोलावले. तुम्ही तुमचे काम करा. मी योग्य ते करतो. आणि तुम्ही हे पत्र लिहिले हे विसरून जा. ते पत्र त्यांच्यासमोरच नेहरूंनी फाडून टाकले. त्यानंतर पटनाईक यांची ढवळाढवळ पूर्णपणे बंद झाली, तर कृष्णमाचारी यांची ३०-८- ६३ रोजी अर्थखात्यात बदली झाली.

यशवंतरावांसोबत राहण्याची संधी लाभल्यामुळे एक गोष्ट अनुभवास आली, ती म्हणजे- दिल्ली दरबारचा हा दस्तुर पचनी पडायला यशवंतरावांसारख्या सुसंस्कृत, साहित्यिक, मराठी संस्कृती जपणाऱ्या व्यक्तीला बराच काळ जावा लागला होता. दिल्लीत असेतो ते दिल्लीकरांच्या या वृत्तीत पारंगत होऊ शकले नव्हते. तशी त्यांच्याकडून अपेक्षा करणेही चुकीचेच होते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ते राज्य चालवीत होते त्याहून दिल्लीतील राजकारणाच्या शैलीत जमीन-अस्मानचे अंतर होते. यशवंतरावांना जे बाळकडू मिळाले होते त्यापेक्षा दिल्लीतील दरबारी मंडळींनी प्राशन केलेले रसायन हे सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे होते. हे रसायन प्राशनच काय, त्यास स्पर्श करण्याचे धाडसही मराठी माणसाला (काही अपवाद वगळता) करणे अवघड होते. यशवंतरावांच्या दिल्लीतील वास्तव्याचे मूल्यमापन करताना टीकाकार नेमकी हीच गोष्ट विसरले होते. त्याकाळी संरक्षण मंत्रालयात विनोदाने म्हणत असत, की ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये कॉफीची भांडी तयार होतात! कारण कृष्ण मेनन यांचे खाद्यपेय कॉफी होते. या विनोदाकडे दुर्लक्ष करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता असे आढळून आले होते, की मिग २१, सेमी अ‍ॅटोमेटिक रायफल्स, रणगाडे वगैरे युद्धसाधनांची निर्मिती जरी सुरू झाली होती, तरी योग्य त्या समन्वयाच्या अभावी त्यात फारशी प्रगती होत नव्हती. ही गोष्ट लक्षात येताच यशवंतरावांनी ही त्रुटी दूर करून उत्पादनास गती तर दिलीच; पण संशोधनासही प्राधान्य दिले. आपल्या स्वभावानुरूप यशवंतराव प्रत्येक गोष्टीचा सतत आढावा घेत असत. १९८५ मध्ये मी नरसिंह रावांसोबत भारतात तयार होणारा रणगाडा पाहण्यासाठी गेलो असता समजले की अनेक प्रयत्न, सुधारणा करूनही भारतातील भौगोलिक परिस्थितीत उपयोगी असा रणगाडा आपल्याकडे तयार होऊ शकला नव्हता.

संरक्षण मंत्रालयालाच नव्हे, तर पंतप्रधानांपासून संसदेपर्यंत सर्वानाच भारतावर चाल करून येण्यामागचा चीनचा मुख्य हेतू काय होता, त्याला कुणाची चिथावणी होती, यातून त्याला काय मिळवायचे होते/ काय मिळाले होते, या प्रश्नांची पटणारी उत्तरे प्रचंड काथ्याकुट करूनही कधीच सापडली नाहीत. तशात आश्चर्यचकित करणाऱ्या एका गोष्टीने तर या कोडय़ात आणखीनच भर टाकली. या युद्धात आपला पूर्णपणे पाडाव होण्याची खात्री झाल्याने भारतीय सैन्य घाईघाईत माघारी फिरले होते. (खरं तर त्यांनी पळ काढला होता.) त्यावेळी  हेलिकॉप्टरसहित अनेक शस्त्रे रणभूमीवर, कॅम्पवर मागे सोडून ते माघारी परतले होते. त्यांत बरीच रशियन शस्त्रास्त्रे होती. चिनी सैन्याने ती सर्व नीट तपासून त्यातील काही स्वच्छ करून ती तशीच टाकून तेही माघारी परतले होते. त्यांनी असे का केले असावे, ही गोष्ट विचारशक्तीच्या पल्याडची होती.

यशवंतराव लकीरचे फकीर नव्हते. आधुनिक युद्धसामुग्री आणि प्रत्यक्ष युद्धाची माहिती नसेल तर तो संरक्षणमंत्री कसला? म्हणून त्यांनी युद्धाशी संबंधित अनेक पुस्तके मिळेल तिथून गोळा करायला सुरुवात केली. यशवंतरावांना जणू संरक्षण खात्याने झपाटलेल्यासारखे झाले होते. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी त्यांना संरक्षण मंत्रालयाशी संबंधित कामच दिसे. रात्री बारा- साडेबाराला सरकारी फायली संपल्या की ते संरक्षण सामुग्री तसेच युद्धासंबंधीची दोन-तीन पुस्तके घेऊन दिवाणखान्यात येऊन बसत. एका पुस्तकातील काही पानांचे वाचन झाले की ते त्यावर मनन करीत. नंतर दुसरे, तिसरे पुस्तक.. वाचनात ते इतके मग्न होत, की कधी कधी मध्यरात्रही उलटून जात असे. आपल्या या वाचनात व्यत्यय आणलेला त्यांना आवडत नसे. त्यामुळे ते उशिरा झोपत. परंतु म्हणून दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या कार्यक्रमांवर काहीही परिणाम होत नसे. विद्यार्थीदशेत अभ्यास करताना रात्री झोप येऊ नये म्हणून बरेचजण चहा पितात. दिवसभरच्या सततच्या कामामुळे रात्री फार वेळ जागरण करणे अवघड जात असे. त्यातून मग यशवंतराव चहाऐवजी सिगारेट ओढू लागले. त्यांचे हे व्यसन पुढे घातक ठरण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढू लागली. याचे कारण ते ‘चेन स्मोकर’ झाले होते. चिंतन-मनन करताना आपल्या बोटांत सिगारेट आहे याचेसुद्धा भान त्यांना राहत नसे. त्यापायी त्यांची मधली बोटे जळली होती. जळती सिगारेट गालिच्यावर पडू नये म्हणून ते जागे असेपर्यंत एक चपराशी थोडय़ा अंतरावर बसून असे. परंतु त्यांना ‘सिगारेट सोडा’ असे सांगण्याची हिंमत कोणात नव्हती. जवळपास नऊ-दहा महिने वाचनाचा हा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर मात्र त्यांची सिगारेट बंद करण्यासाठी अनेक उपाय सुरू झाले. ‘पाकीट संपले.. नवीन आणायला गेला आहे’ वगैरे सबबी सांगून त्यांना बऱ्याचदा सिगारेट दिली जात नसे. अशा वेळी यशवंतरावांचा रागीट, चिडलेला चेहरा भयप्रद असे. त्यांचा असा चेहरा कधी कोणी पाहिला नव्हता.. पुढेही कधी दिसला नाही. शेवटी या प्रयत्नांना यश आले. त्यानंतर मात्र यशवंतरावांना कधीही कोणतेही व्यसन स्पर्श करू शकले नाही.

यशवंतरावांचे अंतरंग अधिक उलगडून पाहायचे तर त्यांच्या व्यावहारिक, सांसारिक जीवनातही डोकावून पाहावे लागेल. त्याकरता त्यांच्या निवासस्थानी जाऊ या.

ram.k.khandekar@gmail.com