News Flash

भारतातील धरणे कमी प्रदूषणकारक

भारतीय जलाशय, जलसिंचनाच्या सोयी आणि जलविद्युत निर्मिती केंद्र ही अनुमान आणि समजुतीपेक्षा कितीतरी कमी प्रदूषण आणि हरितगृह वायू निर्माण करणारी आहेत असा निष्कर्ष भारतीय वैज्ञानिकांनी

| August 6, 2013 09:26 am

भारतीय जलाशय, जलसिंचनाच्या सोयी आणि जलविद्युत निर्मिती केंद्र ही अनुमान आणि समजुतीपेक्षा कितीतरी कमी प्रदूषण आणि हरितगृह वायू निर्माण करणारी आहेत असा निष्कर्ष भारतीय वैज्ञानिकांनी काढला आहे.

    सूर्यावरून आलेली किरणं पृथ्वीवरून परावíतत होताना वातावरणातील जे वायू ती शोषून अवरक्त प्रारण  करतात त्यांना हरितगृह वायू म्हणतात. हेच आज सतत चच्रेत असलेल्या वैश्विक तापमानवाढीस कारणीभूत आहेत. बाष्प, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ओझोन हे त्यातले मुख्य वायू. जसजसं यांचं प्रमाण वाढतं तसतशी पृथ्वीवरील उष्णता वाढत जाते. नसíगक स्रोतांव्यतिरिक्त माणसाच्या कुठल्याही क्रियेतून हे वायू निर्माण होत आहेत असे म्हटले तरी चालेल. उदाहरणार्थ, कार्बन डायऑक्साईड – हा हरितगृह वायूंचा दादाच. हा जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे (कोळसा, तेलं, नसíगक वायू) अतिरिक्त प्रमाणात निर्माण होतोय तर जंगलं कमी होत असल्यामुळे वनस्पतींद्वारा त्याचं नसíगक शोषण मात्र कमी होऊन तो वातावरणात शिल्लक राहतो आहे. अगदी पक्की घरंही त्याचं उत्सर्जन करतात. याचं दुसरं भावंडं म्हणजे मिथेन. याचं उत्सर्जन कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत जरी कमी असलं तरी त्याची किरणं शोषून घेण्याची क्षमता मात्र वीस पटीनं जास्त आहे. भातशेतीची खाचरं, इतर पाणथळ जमिनी, खाणी, अगदी गायींच्या पोटातील वायूसुध्दा याची काही निर्मिती केंद्रे आहेत. तिसरा महत्त्वाचा हरितगृह वायू नायट्रस ऑक्साईड. याचं प्रमाण आणखी कमी पण त्याची किरणं शोषून घेण्याची क्षमता मात्र तीनशे पटीनं जास्त! नायलॉन, नायट्रीक आम्लाचे उत्पादन, खतांचे उत्पादन इत्यादींमुळे याची निर्मिती होते. आणखीही काही किरकोळ वायू हरितगृह वायूंत मोडतात.
गेल्या दशकात धरणं, त्याच्यातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या चादरी, धरणाच्या पाण्यावर  चालणारी विद्युत जनित्र, या सगळ्या बाबी मिथेनची निर्मिती मोठय़ा प्रमाणात (१२ कोटी मेट्रीक टन) करताहेत असं अनुमान काढलं गेलं. जलविद्युतनिर्मिती हा एक अत्यंत स्वच्छ – प्रदूषण न करणारा स्रोत समजला जायचा. या संशोधनानं त्यावर प्रश्नचिन्ह तर उभं केलंच पण भारताची परिस्थिती फार कुचंबल्यासारखी झाली. कारण वैश्विक धरणं अमेरिकेनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. शिवाय पहिल्या दोन देशात जगातील एकूण धरणांपकी ६० टक्के धरणं जरी असली तरी ती उष्णकटिबंधीय प्रदेशापासून लांब आहेत. उष्णकटिबंधीय प्रदेशातून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाचं प्रमाण इतर प्रदेशापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतं आणि त्यामुळे भारत धरणाद्वारे हरितवायूंचे उत्सर्जन करणारा साडेतीन कोटी टन मिथेनची निर्मिती करणारा देश ठरला आणि हा विषय प्रसारमाध्यमांमध्ये मोठय़ा प्रमाणात चच्रेत आला. आयपीसीसीसारख्या हवामानातील बदलाचा वेध घेणाऱ्या संस्थेनं या अनुमानाची दखल घेतली. ब्राझीलच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या अनुमानात असं म्हटलं की दरवर्षी जगातल्या सगळ्या धरणांमधून सुमारे १२ कोटी टन हरितगृह वायूचं उत्सर्जन होतंय. पकी सुमारे एक चतुर्थाश म्हणजे ३.३५ कोटी टन एकटय़ा भारतातल्या मोठय़ा धरणांमधून होतंय. या आकडेवारीची फोड अशी होती : १०.१ लाख टन धरणातल्या तळातल्या पाण्यामधून, १ कोटी ३२ लाख टन चादरीवरून धरणातलं पाणी वाहून जातं तेव्हा आणि १ कोटी ९२ लाख टन विद्युतजनित्रांमधून पाणी फिरतं तेव्हा. ही बेरीज पुढे वाढवून ४.५८ कोटी टनावर भारताच्या पारडय़ात टाकली गेली. या वाढीची मीमांसा अशी की भारतातल्या लहानमोठय़ा, सगळ्या धरणांचा एकत्रित विचार केला तर त्यांच्या तळाशी असलेल्या पाण्यातील मिथेनचं ऑक्सिडेशन होतं आणि तो वरवर येऊन जलाशयाच्या पृष्ठभागावरून वातावरणात मिसळतो म्हणून असे घडते! भारतानंतर ब्राझीलचा क्रमांक (२.१८ कोटी टन) लावला गेला . भारतातील धरणांमधून हरितवायूंचं उत्सर्जन नेमकं किती होतंय हे आकडेवारीनुसार सिध्द करणं, कमी असेल तर वरील अनुमानाचं खंडन करणं अथवा ते स्वीकारणं एवढाच एक मार्ग भारतीय वैज्ञानिकांपुढे खुला होता.
जेव्हा जलाशयात पाण्याच्या तापमानानुसार त्याला वेगवेगळ्या थरात विभागता येतं तेव्हा त्यातील सेंद्रीय पदार्थाचं विघटन होऊन प्राणवायू विरहित स्थिती निर्माण होते आणि तळातील पाण्यात मिथेनचं प्रमाण वाढतं हे खरंच आहे. पण जलाशयात मिथेनचं प्रमाण वाढणं, ऑक्सिडेशन होणं आणि तो एका ठिकाणावरून दुसरीकडे जाणं हे भोवतालच्या इतर परिस्थितीवरही अवलंबून असतं. यात सेंद्रीय पदार्थाचं प्रमाण आणि त्याचे प्रकार, त्याची विघटन होण्याची पध्दत, तापमान, पाण्याची स्थिती आणि त्यातील वनस्पती इत्यादी घटक आपली भूमिका बजावतात. पाण्यातील अनेक भौतिक प्रक्रिया, वाऱ्यामुळे पाण्यात होणारी घुसळण्याची क्रिया, या बाबीही जलाशयाच्या तळाशी असलेला मिथेनचा साठा वर येऊन वातावरणात मिसळायला तसंच जनित्राजवळ किंवा पाटावरून वाहण्याच्या वेळी वातावरणात मिसळायला कारणीभूत ठरतात. जलाशयातील मिथेनच्या उत्सर्जनास धरणाचं आयुष्यही महत्त्वाचा घटक ठरतो. अशा सगळ्या शक्यतांचा विचार करत भारतीय शास्त्रज्ञांना भारतातील धरणांचा पध्दतशीर अभ्यास करून निष्कर्ष काढणं आवश्यक वाटलं आणि गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील तुकडीनं हे आव्हान स्वीकारलं. याकरिता त्यांनी एकूण आठ धरणांचा अभ्यास करायचं ठरवलं. पश्चिम घाटावर बांधलेली, पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी सहा, तर सातवं कर्कवृत्ताच्या उत्तरेला गंगानदीच्या पाण्यानी भरणारं रिहन्द आणि हिमालयाच्या पायथ्याशी सतलज नदीवरचं भाक्रा-नांगल आठवं. ही निवड करताना ती वेगवेगळ्या हवामानातील असतील, त्यांच्या पाण्याचा स्रोत वेगवेगळा असेल, त्यांचे आयुर्मान, आकार वेगवेगळा असेल, वेगवेगळ्या अक्षांशावर ती विखुरलेली असतील याची खबरदारी घेतली गेली. यामुळे ती भारताच्याच काय पण दक्षिण आशियातील कोणत्याही धरणाचं/ जलाशयाचं सर्वसाधारणपणे प्रतिनिधित्व करतील असं पाहिलं गेलं. पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी उन्हाळ्याचा मुहूर्त निवडला कारण या दरम्यान जलाशयातील पाण्याला त्यांच्या तापमानानुसार वेगवेगळ्या थरात विभागता येतं. अर्थात ऋतुमानानुसार या पाण्यात काय फरक पडतोय हे पाहण्यासाठी यातील निवडक जलाशयांमधील नमुने हिवाळ्यातही घेतले. जलाशयाच्या वेगवेगळ्या खोलीवरच्या पाण्याचे नमुने त्यातील प्राणवायूचे, मिथेनचे, हायड्रोजन सल्फाईडचे पृथक्करण करण्यासाठी घेतले गेले. त्यात वातावरणातील घटक मिसळणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली गेली. प्राणवायूचं प्रमाण नमुने गोळा केल्याबरोबर तिथंच मोजलं तर इतर बाबींसाठी ते प्रयोगशाळेत आणले. प्रत्येक घेतलेल्या खोलीवरील तापमानाचीही नोंद घेतली. आणि या नमुन्याच्या पृथक्करणातून अनेक बाबींचा उलगडा झाला आणि खालील निष्कर्ष हाती आले.
सगळ्याच जलाशयातल्या पाण्याच्या वरच्या भागात मुबलक प्रमाणात प्राणवायू आहे. अनेक जलाशयात, भाक्रा-नांगल आणि रिहंद वगळता, खोल पाण्यात उन्हाळ्यात थोडय़ाफार प्रमाणात प्राणवायूचं प्रमाण घटलेलं दिसलं तरी तिथं मिथेन अनुमानीत प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे कारण मिथेनच्या साठवणीसाठी तेथील पाण्यात प्राणवायूचं प्रमाण सतत शून्यावर असणं आवश्यक असतं. तसंच, सगळ्याच जलाशयात पोषकद्रव्य आणि हरितद्रव्य मर्यादित प्रमाणात आहेत. भारतात शेतीसाठी मोठय़ा प्रमाणात नायट्रोजनयुक्त कृत्रिम खतं वापरली जातात आणि ही जलाशयाच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत असं अनुमान काढलं जातं. परंतु वरील नमुन्यांमधून असं दिसून आलं की एका मरकडेय जलाशयाशिवाय इतर जलाशयात नायट्रेटचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमीच आहे.
 हरितद्रव्य आणि नायट्रेट – दोन्ही मर्यादित असल्यामुळे मिथेनच्या निर्मितीस लगाम बसला आहे. ब्राझिलच्या जलाशयातील मिथेनच्या (सुमारे ८०० मायक्रोमोल) तुलनेत भारतातील कमी आयुर्मानाच्या जलाशयांतील (तिळारी १५६.३), साळवली (१२५.४) आणि मरकडेय (५५.४)) अधिकतम मिथेनचं प्रमाण किरकोळच म्हणायला हवं. फार तर असं म्हणता येईल की भारतातल्या कमी आयुर्मानाच्या जलाशयांत मिथेनचं अधिक प्रमाण आहे आणि जसंजसं हे आयुर्मान वाढत जातं तसंतसं मिथेनचा साठा कमी होत जातो. शिवाय तो त्या ठिकाणी विविध कारणांमुळे जमा होणाऱ्या सेंद्रीय पदार्थावरही अवलंबून असतो. भारतातील कमी आयुर्मानाच्या जलाशयातील मिथेनच्या प्रमाणाची तुलना आफ्रिकेतील जास्त आयुर्मानाच्या जलाशयांशी होऊ शकते आणि यामुळे भारतीय वैज्ञानिकांना असं वाटतं की भारतातल्या जलाशयांत मिथेनची निर्मिती आणि साठवण ही अनुमान आणि समजुतीपेक्षा कमीच असायला हवी. आपल्या वैज्ञानिकांना असंही दिसून आलं की भारतातल्या जलाशयात पावसाळा आणि हिवाळ्यादरम्यान सगळ्याच उंचीवर असलेल्या पाण्याचं घुसळण आणि ताज्या पाण्याच्या आगमनामुळे तळाशी असलेल्या पाण्यात प्राणवायूचं पुनर्भरण होतं आणि ही परिस्थिती मिथेनची निर्मिती आणि साठवणीस खीळ घालते. या दरम्यान तेथील सूक्ष्मजीवी, प्राणवायूच्या उपस्थितीत, उन्हाळ्यात थोड्याफार प्रमाणात निर्माण झालेल्या मिथेनचे कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर करतात आणि म्हणून जलाशयाच्या वरच्या पाण्यात घुसळणीच्यावेळीही (ही क्रिया पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा जोरात वारे वाहतात तेव्हा, वादळी हवेदरम्यान, सपाटून पाऊस पडतो तेव्हा होण्याची शक्यता असते) मिथेनचं स्थलांतर किरकोळ प्रमाणातच होतं.
याशिवाय सर्वसाधारणपणे विद्युतनिर्मिती आणि जलसिंचनासाठी जिथून पाणी घेतलं जातं त्याच्या कितीतरी खाली मिथेनची साठवण आपल्या धरणात होत आहे असं आढळून आलं. यामुळे जलाशयांतून सोडलेल्या पाण्यात प्राणवायूचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे या ठिकाणाहूनही मिथेनचं उत्सर्जन नगण्य होतंय हे लक्षात आलं. या अभ्यासाअंती भारतीय जलाशय, जलसिंचनाच्या सोयी आणि जलविद्युत निर्मिती केंद्र ही अनुमान आणि समजुतीपेक्षा कितीतरी कमी प्रदूषण आणि हरितगृह वायू निर्माण करणारी आहेत असा निष्कर्ष भारतीय वैज्ञानिकांनी काढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले मुद्दे मांडायचे तर त्याला सखोल अभ्यासाचं पाठबळ असावं लागतं. त्याकरिता आवश्यक तेवढी माहिती गोळा करावी लागते. आणि हे पध्दतशीरपणं करायचं असेल तर वैज्ञानिकांना पुरेसा वेळ द्यावा लागतो. याअभावी प्रसारमाध्यमावरील चर्चा पोकळ ठरतात. आपल्या वैज्ञानिकांनी हे करून दाखवलं याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. अर्थात वैश्विक तापमान वाढतेय हेही तितकंच सत्य आहे. ही वाढ नियंत्रित करण्यात आपणही आपल्या गरजा मर्यादित करून खारीचा वाटा उचलू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 9:26 am

Web Title: indian dams are less poultice
Next Stories
1 पृथ्वीच्या अंतरंगाचे संशोधन
2 ‘यूमी बेबी बॉटल्’
3 फिनिक्स लँडर
Just Now!
X