17 November 2017

News Flash

जिज्ञासा : ओरायन तेजोमेघातील बुलेट

सध्या सूर्यास्तानंतर अंधार झाल्यावर आकाशात पूर्वेकडे बरेच वरती आपल्याला लखलखीत गुरू, त्याच्या डावीकडे थोडे

अरविंद परांजपे | Updated: January 21, 2013 10:44 AM

सध्या सूर्यास्तानंतर अंधार झाल्यावर आकाशात पूर्वेकडे बरेच वरती आपल्याला लखलखीत गुरू, त्याच्या डावीकडे थोडे वर कृत्तिका तारका पुंज दिसत आहे. उजव्या बाजूला थोडेसे खाली तांबूस चकचकीत रोहिणी दिसत आहेत. त्यांच्या बरेच खाली आणि उजव्या बाजूस आपल्याला तीन ताऱ्यांची एक रेष दिसते आणि ही रेष चार ताऱ्यांच्या चौकोनात आहे. तो मृगतारका समूह आहे. त्याला  इंग्रजीत ओरायन म्हणतात. अनेकजण या इंग्रजी नावाचा उच्चार ओरीयोन असा करतात, तो चुकीचा आहे. मृग तारका समूहातील एका रेषेतील या तीन ताऱ्यांच्या उजव्या बाजूस आपल्याला अनेक ताऱ्यांचा पट्टा दिसेल. या पट्टय़ात एक सुंदर असा तेजोमेघ आहे.
निरभ्र अंधाऱ्या रात्री नुसत्या डोळ्यांनाही पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते, तर दुर्बणितून हा फारच सुंदर दिसतो. हा तेजोमेघ आपल्यापासून सुमारे दीड हजार प्रकाश वर्ष अंतरावर आहे. शास्त्रज्ञांच्या मते सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी जी स्थिती इथे होती अगदीच तशी स्थिती इथे आहे. या भागात अनेक ताऱ्यांचा जन्म झाला आहे आणि होत आहे.  १९८३ मध्ये या तेजोमेघांच्या घेतलेल्या चित्रात या भागात बंदुकीतून सुटलेल्या गोळीचे चित्र आपण बघतो तशाच काही प्रकारच्या गोष्टी इथे दिसल्या. खगोलशास्त्रज्ञांनी यांना ओरायन बुलेट असेल नाव दिले. ही चित्र दृश्य प्रकाशाची घेतली होती. मग सुमारे नऊ वर्षांनी म्हणजे १९९२ मध्ये अधोरक्त प्रकाशाच्या चित्रात या बुलेटची चित्र अधिक स्पष्ट होत गेली.
या प्रत्येक बुलेटचा आकार प्लुटोच्या कक्षेच्या दसपट असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. प्रकाशकिरणांना सूर्यापासून प्लुटोपर्यंत जाण्यास सुमारे ५ तास लागतात. आता तुम्हाला यांच्या आकाराची थोडी कल्पना आली असेल. शिवाय यांना बुलेट म्हणण्यामागचे कारण फक्त ते बंदुकीच्या गोळीसारखे दिसतात इतकेच नव्हे तर या ध्वनीच्या वेगाहून जास्त वेगाने ओरायन तेजोमेघातून प्रवास करत आहेत.
चिलीतील जेमिनी दक्षिण वेधशाळेने नुकत्याच घेतलेल्या एका चित्रात काही आश्चर्यकारक निरीक्षणे हाती आली आहेत. चिलीतील हा भाग खगोलनिरीक्षणांच्या वेधशाळा स्थापन करण्यासाठी फार चांगली जागा आहे. हा भाग अत्यंत शुष्क आहे आणि इथे जवळ जवळ वर्षभर आकाश निरभ्र असतं. त्यामुळे तिथे ही वेधशाळा उभारण्यात आली आहे. इथे अनेक वेधशाळा आहेत आणि जेमिनी दक्षिण ही त्यातील एक मोठी वेधशाळा. वेधशाळेतील या दुर्बणिीच्या आरशाचा एकूण व्यास ८.१ मीटर आहे. अशाच प्रकारची आणखी एक दुर्बणि जेमिनी उत्तर आहे जी हवाई बेटावरच्या ‘मोना की’ या पर्वतावर आहे.
जेमिनी दक्षिण वेधशाळेच्या या दुर्बणिचा वापर करून बेनोईट निशेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच ओरायनच्या भागाची चित्रे घेतली. त्यासाठी त्यांनी एडॉप्टीव ऑप्टिक्स या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ही एक अशी प्रणाली आहे की ज्यात वातावरणातील बदलांप्रमाणे दुर्बणिीच्या काचेत बदल करता येतो आणि त्यामुळे आपल्याला निरीक्षण चांगल्या पद्धतीने घेता येते, तर अशाप्रकारे घेतलेल्या निरीक्षणातून आढळून आले आहे की, या गाठीं ॉमध्ये मोठय़ा प्रमाणात लोखंडाचे अणू आहेत. तसेच या गाठी ओरायन नेब्युलाच्या खोल गर्द भागातून बाहेर फेकल्या जात आहेत. या बुलेट तर तुम्हाला लहान दुर्बणितून दिसणार नाहीत, पण मृग तारका समूहातील या तेजोमेघाला तुम्ही नक्कीच छोटय़ा दुर्बणिीतून बघू शकाल. आणि त्या वेळी नक्कीच लक्षात ठेवा की याच भागात अनेक ताऱ्यांचा जन्म होत आहे.

विश्वातील दीर्घिकांचा सर्वात मोठा समूह खगोलवैज्ञानिकांना सापडला असून तो चार अब्ज प्रकाशवर्षे इतक्या अंतरात पसरलेला आहे.

विश्वातील दीर्घिकांचा सर्वात मोठा समूह
विश्वातील दीर्घिकांचा सर्वात मोठा समूह खगोलवैज्ञानिकांना सापडला असून तो चार अब्ज प्रकाशवर्षे इतक्या अंतरात पसरलेला आहे. या अवाढव्य आकाराच्या समूहाला ‘लार्ज क्वासार ग्रुप’ असे नाव आहे. यात क्वासार्सना महावस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या समूहाकडून ऊर्जा पुरवली जात असते. क्वासार्स हे विश्वाच्या अगोदरच्या अवस्थेतील दीर्घिकांची केंद्रके आहेत. नंतर जो कालावधी लोटला त्यात अधिक प्रकाशमानता आली व ते खूप लांब अंतरावरूनही दिसू लागले. ज्या कालावधीत हे घडून आले त्याला खगोलशास्त्रात ‘संक्षिप्त काळ’ असे म्हणतात. पण तो प्रत्यक्षात १ ते १० कोटी वर्षे इतका असतो, असे रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे. आकाशगंगा ही तिच्या शेजारच्या ‘देवयानी’ या दीर्घिकेपासून २५ लाख प्रकाशवर्षे (०.७५ मेगापार्सेक) इतकी दूर आहे. दीर्घिकांचा समूह हा २ ते ३ मेगापार्सेक इतक्या लांबीचा असू शकतो, पण लार्ज क्वासार्स ग्रुप हा २०० मेगापार्सेक इतक्या लांबीचा आहे. विश्वरचनाशास्त्रातील तत्त्व तसेच आधुनिक विश्वरचना शास्त्र यांच्या आधारे गणिती आकडेमोड केली तर खगोलवैज्ञानिकांच्या मते कुठलाही अवकाशस्थ समूह हा ३७० मेगापार्सेकपेक्षा मोठा असू शकत नाही. क्लोवेस यांनी शोधलेला लार्ज क्वासार्स ग्रुप हा ५०० मेगापार्सेक आकाराचा आहे. कारण तो बराच लांबुडका आहे. त्याची लांबी १२०० मेगापार्सेक म्हणजे ४ अब्ज प्रकाशवर्षे इतकी आहे. हे अंतर आकाशगंगा व देवयानी यांच्यातील अंतराच्या १६०० पट अधिक आहे. लार्ज क्वासार्स हा विश्वातील सर्वात मोठा समूह आहे, त्यामुळे आपले विश्वाचे आकलन बदलून जाणार आहे असे क्लोवेस यांनी सांगितले.

First Published on January 21, 2013 10:44 am

Web Title: orien bullet
टॅग Science It