गेल्या अंकात रशियामध्ये पडलेल्या उल्का पाषाणाच्या (मीटिऑराइट) संदर्भात Asteroid Terrestrial-Impact Last Alert System (किंवा ATLAS) या प्रकल्पाचा मी उल्लेख केला होता. यात आठ छोटय़ा आकाराच्या दुर्बणि असतील. ज्या आपल्याला पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाची पूर्वसूचना देऊ शकतील. हा प्रकल्प हवाई बेटावर साकारण्यात येत आहे. तसेच मी हादेखील उल्लेख केला होता, की अशा धोकादायक लघुग्रहांची दिशा बदलण्याचे तंत्र विकसित करण्याची गरज आहे.
आता असे तंत्र विकसित करायचे म्हणजे आपल्याजवळ असलेल्या माहितीच्याच आधारे ते तयार करावे लागेल. पण खुद्द त्याचे परीक्षण करून ते सफलच होईल याची खात्री देणे अवघड आहे. कारण आपल्या माहितीत जर काही कमतरता राहिली असेल तर ते आपल्याला कदाचित आधीच कळू शकणार नाही. याच संदर्भात गेली दोन वर्षे युरोपियन स्पेस एजन्सी (इसा) एक प्रकल्प रावबत आहे.  या प्रकल्पाचे नाव आहे ‘अ‍ॅस्टेरॉइड इम्पॅक्ट अँड डिफ्लेक्शन असेसमेंट सिस्टिम मिशन’. एखाद्या लघुग्रहावर अंतराळयानाची धडक घडवून आणायची आणि त्याच्या परिणामाचा अभ्यासासाठी  ही मोहीम आहे. ‘इसा’चे शास्त्रज्ञ या मोहिमेसाठी आणखी सहयोगी संस्थांच्या शोधात होते. गेल्या महिन्यात रशियात पडलेल्या उल्का पाषाणामुळे परत एकदा अनेकजण खडबडून जागे झाले आणि इसाबरोबर काम करण्यास अमेरिकेतील ‘नासा’ही संस्था पुढे आली.
या मोहिमेसाठी डायडीमॉस नावाच्या लघुग्रहाची निवड करण्यात आली आहे. डायडीमॉस हा जुळा लघुग्रह आहे. म्हणजेच दोन लघुग्रह एकमेकाभोवती फिरत सूर्याची परिक्रमा करत आहेत. यातील लहान दगडाचा आकार सुमारे १५० मीटर आहे. म्हणजे साधारण आपल्या क्रिकेटच्या मदानाच्या इतका आहे. मोठा दगड सुमारे ८०० मीटर व्यासाचा आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे, पण त्यापासून पृथ्वीला कुठलाच धोका नाही.
अंतराळयानाची लघुग्रहाशी ही धडक आजपासून १० वर्षांनी म्हणजे सुमारे २०२२ साली घडवून आणली आहे आणि त्या वेळी हा लघुग्रह आपल्यापासून सुमारे १ कोटी ५ लाख किलोमीटर दूर असेल. ज्या वेळी ही टक्कर होईल तेव्हा हे दोन्ही लघुग्रह ताशी सुमारे २२५०० कि.मी. या वेगाने प्रवास करीत असतील.
या टकरीत जी ऊर्जानिर्मिती होईल तिची तुलना पृथ्वीभोवतीच्या अंतराळात स्पेस जंकच्या (अंतराळ कचऱ्याच्या) एखाद्या कृत्रिम उपग्रहाशी होणाऱ्या धडकेशी करता येईल. स्पेस जंक म्हणजे अंतराळ मोहीम सुरू झाल्यापासून पृथ्वीभोवती परिक्रमा करणारा कचरा. हा कचरा म्हणजे आता काम न करणारे कृत्रिम उपग्रह, रॉकेट पाठवताना रॉकेटचे निकामी किंवा टाकून दिलेले तुकडे आणि स्पेस वॉक करणाऱ्या अंतराळवीरांच्या हातून सुटलेली उपकरणे आहेत. यातील एक अत्यंत महागडा कचरा म्हणजे एक हॉशेलबाल्ड कॅमेरा जो बरेच वर्षांपूर्वी एका अंतराळवीराच्या हातून सुटला होता. असे म्हणतात, की हा कॅमेरा अजून ही पृथ्वीची परिक्रमा करत आहे. पण तो नेमका कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही.
जगात अशा काही संस्था आहेत, की ज्या या अंतराळातील कचऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत, पण लहानसहान कचऱ्याची मात्र नोंद होत नाही. इसा आणि नासाच्या या मोहिमेतून एखाद्या अंतराळयानावर असा कचरा आदळला तर काय परिणाम होईल याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. पण अर्थात या मोहिमेचा मुख्य उद्देश लघुग्रहाशी टक्कर घडवून आणून त्या टक्करीचा अभ्यास पृथ्वीच्या सुरक्षतेसाठी कसा करता येईल हा आहे. यात दोन अंतराळयाने डायडीमॉस या लघुग्रहाच्या दिशेने पाठवण्यात येतील. यातील एक यान डायडीमॉसच्या लहान दगडाला धडक मारेल. तेव्हा त्याचा वेग दर सेकंदाला सुमारे ६.२५ कि.मी. इतका असेल. या यानाचे वजन सुमारे ३०० किलो असेल. या टकरीतून या लघुग्रहाची दिशा पृथ्वीला वाचवण्यासाठी कशी बदलता येईल हा नाही. त्यासाठी मोठी मोहीम हाती घ्यावी लागेल. या मोहिमेतून डायडीमॉसच्या लहान दगडाला धडक मारल्यावर त्यांच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेत किती बदल होतो याचा अभ्यास यात केला जाणार आहे. तर या टकरीचे निरीक्षण एका दुसऱ्या यानातून केले येईल. शास्त्रज्ञांचा अभ्यास असे सांगतो, की या टकरीत या अवकाशीय पाषाणाच्या दिशेत जो बदल होईल तो बदल, त्याचे निरीक्षण पृथ्वीवरून घेता येण्याइतका असेल. त्यामुळे पृथ्वीवरील काही दुर्बणिीही या लघुग्रहाच्या टकरीचे चित्रण करत असतील.
या सर्व निरीक्षणातून आणि त्यांच्या अभ्यासाचे फलित जर एखादा असा उल्का पाषाण पृथ्वीच्या दिशेने येत असेल तर त्याची पृथ्वीशी होणारी टक्कर वाचवण्यासाठी पुरी असेल का, तर कदाचित नाही. असाच एक प्रयत्न २००५ मध्ये हाती घेण्यात आला होता. ‘डीप इम्पॅक्ट’ नावाच्या अंतराळयानाने ९ पी टेंपल या धूमकेतूला धडक दिली होती आणि आणि त्यात अपेक्षेपेक्षा वेगळे परिणाम दिसले होते. ही सध्याची मोहीम एक सुरुवात आहे आणि कालांतराने अशी परिस्थिती नक्कीच तयार होईल की अशा धोक्यापासून पृथ्वीचे संरक्षण होऊ शकेल.
विज्ञान पानासाठी लेख पाठवण्याचा पत्ता- निवासी संपादक, लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस प्लॉट नं. १२०५/२/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर पुणे-४ अथवा  rajendra.yeolekar@expressindia.com