नासाच्या केप्लर अंतराळ दुर्बीणीच्या मदतीने दोन नवीन बाह्य़ग्रहांचा शोध लावण्यात यश आले आहे. यातील एक ग्रह हा आपला सौरमालेतील गुरू ग्रहापेक्षा वस्तुमानाने मोठा आहे. या ग्रहांना कोओआय-२०० बी व केओआय ८८९ बी अशी नावे देण्यात आली आहेत. ते गुरूच्या आकाराचे असून त्यांचा कक्षेत फिरण्याचा काळ १० दिवसांचा आहे. त्यांच्या मातृताऱ्याभोवती हे ग्रह अतिशय जवळून फिरत आहेत. आतापर्यंत सापडलेल्या बाह्य़ग्रहांची संख्या ही ८५० आहे. हे ग्रह जेव्हा त्यांच्या मातृताऱ्यासमोरून जातात तेव्हा त्यांच्या प्रकाशमानतेत फरक पडतो. या सूक्ष्म ग्रहणांमुळे खगोलवैज्ञानिकांना ग्रहाचा व्यास मोजता येतो व तेथील वातावरणाचाही अंदाज घेता येतो. केओआय २०० बी हा ग्रह गुरूपेक्षा थोडा मोठा आहे व त्याचे वस्तुमान गुरूपेक्षा थोडे कमी आहे. त्याची घनता कमी असल्याने तो मातृताऱ्याभोवती एक आठवडय़ात प्रदक्षिणा पूर्ण करतो. केओआय ८८९ बी हा ग्रह आकाराने गुरूएवढा असून त्याचे वस्तुमान गुरूच्या दहापट अधिक आहे. तो त्याच्या मातृताऱ्याभोवती दहा दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. केप्लर अंतराळ दुर्बीण व सोफी तसेच हार्पस-एन वर्णपंक्तीमापींच मदतीने या ग्रहांचा शोध लावण्यात आला आहे. केओआय ८८९ बी हा आतापर्यंत सापडलेला सर्वात जास्त वस्तुमानाचा ग्रह आहे. तो कमी वस्तुमानाच्या ग्रहांपेक्षा वेगळ्या प्रक्रियेने बनलेला असावा.