पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या अस्तित्वासच धोका निर्माण करू पाहणाऱ्या एखाद्या घडामोडीविषयी शास्त्रज्ञांनी कितीही इशारे दिले, तरी जागतिक स्तरावर त्यांची दखल घेतली जाऊन त्वरित उपाययोजना होणे, हे तसे दुर्मिळच असते. पण, अशी दखल घेतली जाण्याचे श्रेय ज्या थोडक्या संशोधकांच्या वाटय़ाला आले असेल, त्यातील एक होते जो फार्मन. आधुनिक काळात झालेल्या विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये, फार्मन यांनी केलेल्या संशोधनाचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल. अंटाक्र्टिक प्रदेशात ओझोनच्या थराचे प्रमाण झपाटय़ाने घटत आहे, हे त्यांनी संशोधनातून दाखवून दिले; नि त्यानंतर दोनच वर्षांत मँट्रियल जाहीरनामा (प्रोटोकॉल) जगातील बहुतांश देशांनी स्वीकारून ओझोनच्या या घटत्या प्रमाणाला कारणीभूत क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सीएफसी) या रसायनांची निर्मिती टप्प्याटप्प्याने बंद करण्याची ग्वाही दिली. फार्मन यांच्या अगोदरही यावर संशोधन झाले होते,पण फार्मन यांचा शोधनिबंध सर्वाच्या झोपा उडविणारा ठरला. जो फार्मन यांचे अलीकडेच, वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. जगाला मोठय़ा अरिष्टातून वाचविणारे संशोधन करणारे संशोधक, ही त्यांची ओळख कायम राहील, यात शंका नाही.
रेफ्रिजरेटर्सचा वापर वाढला नि शीतकरणासाठी योग्य पर्यायाचा शोधही वेगाने सुरू झाला. फ्रिजिडेअर, जनरल मोटर्स आणि डय़ू पाँ या तीन बडय़ा अमेरिकी उद्योगांनी रेफ्रिजरेशनसाठी कमी घातक वा अजिबात धोकादायक नसलेल्या पदार्थाच्या संशोधनासाठी प्रयत्न सुरू केले. या संशोधनाच्या ओघातच थॉमस मिडग्ले (ज्युनिअर) व चार्ल्स फॅडलिंन केटरिंग यांना शोध लागला तो ‘फ्रिऑन्स’ गटाच्या रसायनांचा. कर्ब, हायड्रोजन, फ्लोरिन, क्लोरिन यांनी बनलेल्या या रसायनांना ‘क्लोरोफ्लुरोकार्बन्स’ म्हणजेच संक्षेपात ‘सीएफसी’ असे म्हटले जाते. शीतकरणाच्या दृष्टीने हे वायू अतिशय योग्य आहेत, असा निष्कर्ष त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण गुणधर्मामुळे निघाला. १९३० मध्ये म्हणजे या पदार्थासाठी पेटंट मिळाल्यावर दोनच वर्षांत, त्यांचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरू झाले. ‘फ्रिऑन्स’ या नावाने हे वायू ओळखले जाऊ लागले नि त्यांचा खूप बोलबाला झाला. वायू विषारी नाही, ज्वलनशील नाही हे सिद्ध करणारी प्रात्यक्षिकेही करून दाखविण्यात आली. ‘फ्रिऑन्स’ म्हणजे केवढे मोठे वरदान असा त्यांचा गाजावाजा पुढची अनेक वर्षे होत राहिला, जवळपास चार दशके. १९७० च्या दशकात मात्र हे चित्र विरुद्ध दिशेने पालटू लागले नि ज्यांना ‘वरदान’ ठरविण्यात आले होते, तीच ‘फ्रिऑन्स’ही रसायने पृथ्वीच्या वातावरणाच्यादृष्टीने कशी अतिशय घातक आहेत, या स्वरांना बळ मिळू लागले. अर्थात, या स्वरांमागेही संशोधनाची पृष्ठभूमी होती. जो फार्मन यांनी या संशोधन-मालिकेत आपला हातभारच लावला असे नाही; तर ज्याला ‘शवपेटीवर ठोकलेला शेवटचा खिळा’ असे वर्णन करता येईल, असा जबरदस्त टोला दिला. त्याने जग खडबडून जागे झाले.
ब्रिटिश शास्त्रज्ञ असणारे जो फार्मन यांचा जन्म नॉर्विच येथे झाला. नॉर्विच स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी काही काळ एका मोठय़ा विमाननिर्मिती कंपनीत काम केले. १९५६ मध्ये एक जाहिरात त्यांच्या वाचनात आली. या जाहिरातीत अशा लोकांना निमंत्रित करण्यात आले होते, जे अंटाकर्ि्टकमध्ये संशोधन करू शकतील. दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणे, हे एक साहस आहे, ‘थ्रिल’ आहे, असा विचार करून, फार्मन यांनी अर्ज पाठविला. त्यांची निवड झाली. अनेक वर्षे दक्षिण ध्रुवाजवळच्या या बर्फाळ प्रदेशात त्यांनी संशोधन केले. त्या वेळी त्यास ‘फॉकलंड्स आयलंड्स डिपेंडंसी सव्‍‌र्हे’ असे म्हटले जाई. आता त्याचे नाव ‘ब्रिटिश अंटाकर्ि्टक सव्‍‌र्हे’ असे आहे. १९५७ मध्ये त्यांनी आपला ‘विश्वासू’ डॉबसनमीटर अंटाकर्ि्टकवरील ‘हॅले संशोधन केंद्रात’नेला नि ओझोन थराचे संशोधन त्यांनी सुरू केले. ‘फ्रिऑन्स’चे व्यावसायिक उत्पादन सुरू होऊन उणीपुरी तीस वर्षे उलटली होती. पण या जादुई रसायनाचे वलय अद्यापि कायम होते. मात्र, हे वलय कमी होऊ लागले, ते १९७० च्या दशकात नि हे वलय कमी होण्यास कारणीभूत ठरले, ते ओझोन थराचे विरळ होणे!
पॉल क्रुटझेन, मारिओ मोलिना, एफ-शेखूड रोलंड यांनी ‘फ्रिऑन्स’ चा वातावरणावर होणारा परिणाम काय, याचा शोध घ्यायचे ठरविले. मानवाला ‘फ्रिऑन्स’ घातक नसली, तरी ती जेव्हा वातावरणात पसरतात, तेव्हा ती हैदोस घालतात! पृथ्वीच्या वातावरणाचा सुमारे बावीस किलोमीटरवरचा थर म्हणजे ‘स्ट्रॅटोस्फिअर’. या स्तरावर ‘ओझोन’ चा थर असतो. तीन ऑक्सिजन अणूंनी ओझोन बनतो. पण तो अतिशय अस्थिर असतो. पण ही अस्थिरता पृथ्वीला स्थिरता देते असे म्हटले पाहिजे. सूर्याच्या अतिनील किरणांचे शोषण हा ओझोन करतो नि ही घातक किरणे पृथ्वीपर्यंत पोचू देत नाही. ओझोनची निर्मिती नि विघटन सतत चालू असते. ही प्रक्रिया सतत चालू असते, वा होती पण चित्रपटात जसे खलनायकाच्या प्रवेशाने एखादा सुखात चाललेला संसार बिघडतो, तसेच या ‘फ्रिऑन्स’ मधील क्लोरीन या खलनायकाने ओझोनच्या थराचे केले. अतिनील किरणांनी विघटन झाल्यावर ओझोनची प्रक्रिया या ‘फ्रिऑन्स’ मधील क्लोरिनशी होते नि ओझोन निर्मिती विघटन समतोल बिघडतो. ओझोनचे प्रमाण मग घटू लागते नि ओझोन थराला ‘छिद्र’ पडले की अतिनील किरण थेट पृथ्वीपर्यंत येणार. हे किरण जीवसृष्टीसाठी अतिशय घातक असतात. क्रुटझेन, मोलिना यांनी १९७० च्या दशकात आपल्या संशोधनातून हा धोक्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या या ‘सिद्धान्ता’ ला प्रमाण नव्हते. ‘नासा’ च्या उपग्रहांनादेखील ओझोनचा हा ऱ्हास टिपता न आल्याने तर या रसायनतज्ज्ञांच्या इशाऱ्याला कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. ‘दि ओझोन लेयर इझण्ट व्हॅनिशिंग आफ्टर ऑल’ असे एका नावाजलेल्या वृत्तपत्राने जाहीरही केले. मात्र त्याच सुमारास जो फार्मन असा पुरावा देण्याच्या बेतात होते, जो जगाला अस्वस्थ करून सोडणार होता.
जो फार्मन १९६० च्या दशकापासन हे संशोधन करीत होते. अमेरिकी संशोधक जेव्हा अद्ययावत तंत्रज्ञानावर विसंबत होते, तेव्हाच फार्मन मात्र ऐंशीच्या दशकातही विसंबून होते, ते आपल्या जुनाट उपकरणांवरच- हवामान बलून्स आणि डॉबससनमीटर यावर! १९८० च्या दशकात त्यांनी प्रथम धक्कादायक निरीक्षण नोंदविले, ते म्हणजे ओझोनचे प्रमाण कमी होत आहे. फार्मन यांनी नंतर वर्णन करताना म्हटले होते, ‘जणू असा भास झाला की सारा ओझोन नष्ट होत आहे.’’ पण नासाचे उपग्रह दररोज हजारो प्रतिमा घेत असताना, त्यात जे आढळले नाही ते जुन्या पुराण्या डॉबसनमीटरवर फार्मन यांना आढळावे, हे विचित्र होते. तेव्हा फार्मन यांना प्रथम शंका आली ती आपल्या उपकरणांवर.
तेव्हा त्यांनी नवेकोरे उपकरण आणले नि त्याच्या साहाय्याने निरीक्षणे नोंदविली, नि असे दिसले की १९८४ पर्यंत तर ओझोनचे प्रमाण अधिकच घटले होते. याचे परिणाम किती गंभीर आहेत याची जाणीव असल्याने फार्मन यांनी ब्रायन गार्डिनर व जॉन शॉक्लिन यांच्यासह १९८५ च्या ‘नेचर’ च्या अंकात शोधनिबंध लिहिला. ओझोनच्या प्रमाणात ४० टक्के घट झाली असल्याचा दावा या निबंधात करण्यात आला होता. याने सर्वत्र एकच खळबळ माजली. अमेरिकी उपग्रह कोठे चुकले याचा शोध घेण्यात आला, तेव्हा असे दिसून आले की असली ‘वेडीवाकडी’ आकडेवारी खिजगणीततही न घेण्याची आज्ञा ‘सॉफ्टवेअर’ला होती. केवळ तंत्रज्ञान, उपकरणे मोठी, अद्ययावत असून चालत नाहीत. माणसाचा हस्तक्षेप लागतोच, याचाही हा धडा मानला पाहिजे. फार्मन यांच्या या निबंधाने खळबळ माजली नसती, तरच नवल. सुरुवातीस या रसायनांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगवर्तुळातून साशंकतेचे सूर निघाले. ‘सीएफसी’च्या जागी अन्य रसायनांचा वापर करणे अतिशय खर्चिक आहे, असा युक्तिवाद करण्यात येत होता. पण पुरावा खणखणीत होता नि त्वरेने काही कार्यवाही करण्यावाचून राजकीय धुरिणांसमोर पर्याय नव्हता. फार्मन यांऱ्या या स्फोटक शोधनिबंधानंतर दोन अडीच वर्षांतच मॉट्रियल करारावर अनेक राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या करून ‘सीएफसी’ चे उत्पादन व वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्याची ग्वाही दिली. आता १९७ देशांनी यास मान्यता दिली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर या स्वत: रसायनतज्ज्ञच होत्या. त्यांना फार्मन यांच्या संशोधनाने गांभीर्य पटले होते नि त्यांनी फार्मन यांना दिलेल्या पाठिंब्याचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. एका मोठय़ा संकटातून फार्मन यांनी जगाला वेळीच वाचविले इतके हे संशोधन महत्त्वाचे होते. शिवाय अमेरिकेच्या अद्ययावत तंत्रज्ञानाला भीक न घालता, ते आपल्या निरीक्षणावर व निष्कर्षांवर ठाम राहिले हे विशेष.  
अर्थात, क्रुटझेन, मोलिना आणि एक शेरवूड रॉलेड यांना, सीएफसी वरील त्यांच्या संशोधनासाठीच १९९५ चा नोबेल पुरस्कार देण्यात आला. जो फार्मन यांना अन्य अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले, मात्र, ‘नोबेल’वर मात्र त्यांचे नाव कोरले गेले नाही. आपल्या आयुष्यात साधेपणा जपणारे जो फार्मन यांच्या निधनाने, जगाला विनाशाच्या वेशीवरून परत आणणारे संशोधन करणारेच नव्हे, तर एका अर्थाने प्रवाहाच्या विरोधात जाऊन ते ठामपणे हिंमतीने मांडणारे संशोधक काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…