शहर फक्त ‘शहरी बाबूं’चंच असतं का? तिथं कामगारवर्गही असतो आणि या नवकामगारांना सेवा पुरवणारा फेरीवाल्यांसारखा वर्गही.. हे ‘बिनचेहऱ्याचे’ स्थलांतरित आपापला सांस्कृतिक चेहरा जपत असतातच..
स्वतचा असा वेगवेगळा तोंडवळा असला, व्यक्तिमत्व असले तरी बहुतेक शहरे बहुरंगी-बहुढंगी असतातच. कधी उघड – नजरेत भरणारी; कधी छुपी- नजरेआड वावरणारी, बहरणारी. शहर नावाच्या एका व्यवस्थेमध्ये आणि अवकाशामध्येही राहणारे अनेक समुदाय, त्यांचे सामाजिक जीवन, परस्परांशी असणारे अर्थव्यवहार, सांस्कृतिक व्यवहार, या व्यवहारांमागील राजकारण शहराला एक बहुसांस्कृतिक चेहरा बहाल करते. या बहुसांस्कृतिकतेचा परीघ कमीअधिक प्रमाणात बदलत राहतो. अशा या बहुढंगी अवकाशाला समजून घेताना कधी ‘बर्डस आय वू’ वापरावा लागतो तर कधी ‘वम्र्स आय वू’. उंचावरून उडणाऱ्या पक्षाला एखाद्या विशाल परिघातील मोठ्ठा टापू एका दृष्टिक्षेपात पाहता येतो मात्र तेथील बारीक- सारीक गोष्टी काही समजत नाहीत. जमिनीवर सरपटणाऱ्या एखाद्य किडय़ाला त्याच्या आसपासच्या परिघातील अनेक लहान—सहान गोष्टी बारकाईने टिपता येतात खऱ्या पण तो दृष्टिक्षेप फार दूरवरही पोहोचत नाही. हे मर्यादित पण सूक्ष्म आकलन म्हणजे ‘वम्र्स आय वू’. जागतिक अर्थकारण, नवउदार अर्थनीती, त्यामुळे बदलत गेलेली धोरणे, शहरांचे स्वरूप या साऱ्या परिप्रेक्ष्यामध्ये शहरांकडे ,शहरीकरणाकडे बघणे हा ‘बर्डस आय वू’ म्हणावा लागेल. पण या साऱ्यापलीकडे हे बदल प्रत्यक्ष अनुभवणारे, कधी त्याची झळ सोसणारे तर कधी त्याचे फायदे पदरात पाडून घेणारे जे ‘शहरवासीय’ आहेत त्यांच्या नजरेतून शहरांकडे पाहण्यासाठी ‘वम्र्स आय वूू’ स्वीकारावा लागेल.
शहरांत वा शहरांतून होणारे ‘स्थलांतर’ वा ‘मायग्रेशन’ ही चौकट त्याकरिता नक्की वापरता येईल. अर्थात, ‘शहरे आणि स्थलांतरित’ हा विषय ‘सिलिकॉन व्हॅली व भारतीय इंजिनीयर्स’(!) किंवा ‘मुंबई आणि परप्रांतीयांचे लोंढे’(!) याच्या फारफारच पलीकडे पोहोचतो या अत्यावश्यक डिस्क्लेमरसकट.
‘ग्लोबल नॉर्थ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या युरोप-अमेरिकेत १९६० नंतर अर्थव्यवस्थेचा गीअर बदलला. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे औद्योगिक उत्पादनाकडून सेवा क्षेत्राकडे झालेली अर्थव्यवस्थेची वाटचाल. बहुतेक साऱ्या देशांतील प्रमुख शहरे सेवा क्षेत्राकडे वळली.. फायनान्स, ट्रेड, हॉस्पिटॅलिटी, टुरिझम, मेडिकल सव्‍‌र्हिसेस, डेटा प्रोसेसिंग अशा अनेक सेवा आता शहरांमधील संघटित क्षेत्रामध्ये रोजगार उत्पन्न करू लागल्या. १९९०च्या दशकात ‘आऊटसोर्सिग’च्या रूपाने सेवा क्षेत्र आशियाई देशांमध्ये, भारतामध्येही पोहोचले. मुंबई-कोलकात्यासारख्या वर्षांनुवर्षे अर्थव्यवस्थेवर पारंपरिक वरचष्मा राखणाऱ्या शहरांची मक्तेदारी मोडून बंगलोर, पुणे, हैदराबाद ही ‘माहिती तंत्रज्ञानातील सेवा क्षेत्रावर’ चालणारी शहरे पुढे आली ती याच काळात. उद्योगनगरी मुंबई असो वा दिल्लीजवळचे गुडगाँव, ‘फायनान्स/ ट्रेड/रीअल इस्टेट’ हे शब्द शहराच्या अर्थव्यवस्थेत परवलीचे बनले. या महानगरांत ‘औद्योगिक क्षेत्र’ जाऊन ‘सेवा क्षेत्र’ आले हे खरे, पण शहरातल्या शहरातच अनेक ‘स्थलांतरे’ घडवून आणून! त्या ‘सेवा क्षेत्राला’ तोलून धरणारी अनेक समांतर सेवा क्षेत्रेही निर्माण झाली, जी असंघटित कामगारांनी निर्माण केली होती. महापालिका वा प्रशासनाच्या, ‘अधिकृत करदात्यांच्या’ जाणिवेपलीकडे ही क्षेत्रे विस्तारत राहिली, कारण शहराला त्यांची आवश्यकता होती, आजही आहे. मुंबईच्या आलिशान वांद्रे-कुर्ला संकुलात, गोरेगावच्या माइंडस्पेसमध्ये वा लोअर परळ, वरळीच्या ऑफिस डिस्ट्रिक्टमध्ये मोठय़ा प्रमाणावर नोकरदार वर्ग आहे. उत्तमोत्तम रेस्तराँ वा आऊटलेट्स तिथे असूनही अनेकांच्या खाणे-पिणे सुट्टय़ांची व्यवस्था जवळपासच्या ठेल्यांवर होते. पूर्वीच्या गिरणी कामगार कुटुंबांतील महिला वा मालवणी/चिंचोलीला वा जवळपासच्या उपनगरांत कुठे तरी राहणारे बिनचेहऱ्याचे निम्न मध्यमवर्गीय हे ठेले चालवतात. त्यांच्या कुटुंबीयांपैकी अनेक तरुण मुले-मुली इनॉर्बिट, फिनिक्स वा पॅलेडियमसारख्या मॉल्समध्ये सेल्समन-सेल्सगर्ल वा सिक्युरिटी स्टाफ वा ड्रायव्हर असतात. (दिबाकर बॅनर्जीचा ‘शांघाय’ किंवा मागच्या वर्षी आलेला कनू बहलचा ‘तितली’ सिनेमा आठवतो?) ‘संघटित’ सेवा क्षेत्राला सेवा पुरवणारा हा ‘असंघटित’ वर्ग- ज्यांत घरगुती कामे, साफसफाई करणाऱ्या महिला, रिक्षा-टॅक्सीचालक, भाजी विक्रेते, किरकोळ विक्रेते, नाका कामगार यांचाही समावेश आहेच.. त्याला सेवा कोण पुरवतं? ठेल्यावर सिगारेटी विकणे वा ऑफिसांत चहा पोहोचवणे वा सेल्समन/सेल्सगर्ल/ ड्रायव्हरच्या डय़ुटीबाहेर त्यांनाही खासगी आयुष्य असतं, स्वप्नं असतात आणि या शहराशी त्यांचंही नातं असतं. कपडेलत्ते, फॅशन, खाण्यापिण्याच्या आवडी जपण्यासाठी या वर्गालाही परवडणारे पर्याय लागतात; त्याला आवश्यक सेवा पुरवणारा आणखी एक समूह असतो: बिनचेहऱ्याचाच आणि बव्हंशी शहरी वस्त्यांच्या सांदीकपारीत कुठे तरी दडून गेलेला. वांद्रे स्कायवॉकवरून ‘बीकेसी’कडे जाताना बेहरामपाडय़ाच्या वस्तीत तिसऱ्या/चौथ्या मजल्यावरच्या अरुंद, अंधाऱ्या खोलीत मान मोडून शिवणकाम करताना जो दिसतो, खार वा ताडदेवच्या नाक्यावर सकाळी सकाळी घोळका करून उभ्या नाका कामगारांना चहा-भजी पुरवताना जो दिसतो, अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये दिवसभराच्या कामानंतर डाळभात शिजवतानाही जो दिसतो तो या वर्गातील कष्टकरी.
मुंबई वा दिल्लीपुरते बोलायचे झाले तर असे कामगार हे आपापल्या राज्यातून महानगरांमध्ये स्थलांतरित झालेले असतात आणि शहरी अवकाशात सामावून जाताना त्या अवकाशाला आकार देत राहतात. स्थलांतर करताना जिथे आपल्या भाषेचे, धर्माचे आणि गावाकडच्या लोकांचे जाळे तयार झाले आहे, तिथे येण्याकडे त्यांचा कल जास्त असतो ही एक समजूत. या समजुतीपलीकडे जाऊन ‘स्थलांतरित आणि शहरे’ या नात्याचा विचार करायचा तर त्यांचा सामाजिक अवकाश काय असतो? कामाच्या ठिकाणापलीकडे शहरात ते ‘कितपत’ वावरू शकतात किंवा शहरामध्ये आपले अस्तित्व रुजवण्यासाठी, चेहरा मिळवण्यासाठी ‘ते’ नेमकं काय करतात याचा मागोवा घ्यावा लागतो.
स्थलांतरितांची संस्कृती एका पोकळीत बहरत असते. नव्या शहरातील रोजच्या जगण्यात कामाव्यतिरिक्तच्या वेळात गाव सोडून आल्याची हुरहुर एका ‘आयडेंटिटी क्रायसिस’ला जन्म देते. गावाकडचे अन्नपदार्थ, आपली भाषा, त्यातली गाणीबजावणी, सिनेमे आणि यांचा आधार घेत एकत्र येणे हळूहळू एका नव्या सामूहिक ओळखीला जन्म देऊन जाते. उदाहरणार्थ भोजपुरी सिनेमा आणि मुंबईमधील बिहारी स्थलांतरित. मराठी अस्मितावादाच्या संकुचित ‘राज’कीय चष्म्यातून पाहिल्या गेलेल्या या विषयाला अनेक कंगोरे आहेत. शहरी स्थलांतरितांच्या विश्वावर सातत्याने काम करणाऱ्या सुरभी शर्माची ‘बिदेसिया इन बम्बई’ ही नावाजलेली फिल्म भोजपुरी ‘आयडेंटिटी मेकिंग’चा अप्रतिम वेध घेते.
गेल्या २५-३० वर्षांपासून यूपीमधील आझमगढ, जौनपूर, देवरिया वा बिहारमधील सिवन, चंपारण्य भागांतून लाखोंच्या संख्येने स्थलांतरित मुंबईत आले आहेत. टॅक्सी-रिक्षाचालक वा गवंडीकाम, सुतारकाम, रंगकाम करणारे नाका कामगार म्हणून रोजगार कमावताना त्यांनी वसई/ विरार/ नालासोपारा/ मिरा-भाईंदर/ठाणे या मुंबई महानगर प्रदेशात, मुंबईच्या परिघावर आपली वस्ती केली आहे. तरणी बायको, तान्ही मुलं यांना गावाकडे ठेवून मुंबईत एकेकटे येणारे हे स्थलांतरित भाडय़ाच्या घरांमध्ये एकत्र राहतात, स्वयंपाक करतात आणि उपजीविका चालवून घराकडे पैसेही पाठवतात. फावल्या वेळात आपल्या साजणीच्या आठवणीने झुरताना ढंगदार विरहगीते म्हणणं हा त्यांचा आवडता विरंगुळा. हळव्या गाण्यांनी सुरुवात करत हळूहळू दादा कोंडके स्टाइल ‘डब्बल मीनिंग’ गाणी सवाल-जवाबाच्या अंगाने गात देहभान विसरून नाचणं, हे त्याचं एक टोक. बरं, आवाज एखाद्याचा चांगला, कोणी ठेका छान धरणारा, तर कोणी ‘तसल्या’ सवाल-जवाबांत उस्ताद अशी मोट वळत वळत ही गाणी घोळका जमवून म्हटली जायची – कधीमधी जलसेही व्हायचे. जशी जशी भोजपुरी स्थलांतरितांची संख्या वाढत गेली, त्यांच्या ‘वस्त्या’ वाढू लागल्या तसा यात बदल होऊ लागलाय. एक तर कामाठीपुऱ्यातल्या सिंगल स्क्रीनवर किंवा छोटय़ा-मोठय़ा व्हिडीओ पार्लर्सवर लागणारे ‘भोजपुरी’ सिनेमे वाढले आहेत. सिनेमाचं मार्केट नवी गाणी नव्या रूपांत आणतंय आणि वस्त्यावस्त्यांमधून ‘जलसा ग्रुप’ उदयाला आलेत. दिवसा गवंडीकाम वा सुतारकाम करणारे रात्री ‘गायक’ बनून ‘वस्त्यांमधून’ जलसे रंगवत हिंडताना दिसताहेत. वस्त्यांमधल्या पत्र्याच्या झोपडय़ांमधून रेकॉर्डिग स्टुडिओ काढले जातात- औटघटकेचे. गाणी मोबाइलवर रेकॉर्ड होतात, सीडीही निघतात. या गाण्यांच्या निमित्ताने या अफाट शहरातले ‘बिनचेहऱ्याचे स्थलांतरित’ आपली अशी एक ओळख निर्माण करतात. (‘परप्रांतीयांच्या विरोधात’ जे आंदोलन चालवलं गेलं, त्या वेळी गाण्यांच्या या गटांनी ‘आपल्या लोकांना’ धीर देण्याचं काम कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा चोख पार पाडलं होतं.)
आज हे गट नावारूपाला येत आहेत. ‘भोजपुरी संगीत’ एक ‘कल्ट म्युझिक’ आहे याची दखल मुख्य धारेतील बॉलीवूड वा रेकॉर्डिग कंपन्या घेऊ लागल्यात. ‘एग्झॉटिक आर्ट्स’मध्ये रस घेणारे सुस्थापित या गटांना सादरीकरणासाठी बोलावू लागले आहेत.. भोजपुरी संगीताला आयडेंटिटीसोबत ‘मार्केट’ही मिळू लागलं आहे. शहराच्या परिघावर इथून तिथे फेकले जाणेही परिचितच या भोजपुरियांना; पण एक स्थलांतरित स्थलांतर करतानाही ‘घरापासून दूर’ आपले ‘विश्व’ कसे उभारतो याची ही कहाणी स्थलांतरित आणि शहराच्या सांस्कृतिक आदानप्रदानाबद्दल मार्मिक टिप्पणी करून जाते.

 

मयूरेश भडसावळे
लेखक एका नगरनियोजन अभ्यासगटात कार्यरत आहेत.
ईमेल : mayuresh.bhadsavle@gmail.com