भाजीबाजार उपक्रमाचा उद्देश काय, तर मुलांना आपल्या आवडीची भाजी स्वत:ची स्वत: खरेदी करता यावी. म्हणजेच एक तर त्यांना स्वत:ची आवड समजावी आणि दुसरं म्हणजे मंडईतलं व्यवहारज्ञान त्यांना थोडंफार अवगत व्हावं. पैशाची देवाण-घेवाण, पैशाचं मोल आणि घेतलेल्या वस्तूंचं योग्य माप समजावं हा आमचा मुख्य हेतू या उपक्रमामुळे शक्य झाला होता.

आहार सप्ताहाची सांगता भाजीबाजाराने होते. किंबहुना आहार सप्ताहाच्या या शेवटच्या दिवसाची मुलांसह आम्ही सगळेच आतुरतेनं वाट बघत असतो. भाज्यांची ओळख झाल्यावर भाजी खरेदीसाठी मुलांना प्रत्यक्ष भाजी बाजारात नेता येईल का, या प्रश्नाचे उत्तर शोधताना ‘भाजीबाजार’ उपक्रमाची सुरुवात झाली आणि दर वर्षी शाळेत चक्क एक भाजीबाजार भरू लागला. खास मुलांसाठी!

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Shahu Maharaj celebrated Rangpanchami with ex-servicemen
माजी सैनिकांसमवेत शाहू महाराजांनी साजरी केली रंगपंचमी
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी

आमच्या शाळेतला एक पालकवर्ग हा भाजी विक्रेता आहे. प्रत्येक वर्गशिक्षिका अशा पालकांना बोलावून एका दिवसाचा भाजीबाजार शाळेत भरवण्यासाठी ते कशी मदत करू शकतील याचा अंदाज घेते. प्रत्यक्ष बाजारात जाऊनही काही भाजीविक्रेत्यांशी बोलून त्यांना आमच्या भाजीबाजारात बोलावलं जातं. या सगळ्यांच्या मदतीनं छानसा भाजीबाजार शाळेच्या शेडमध्ये सजवला जातो. साधारण डिसेंबर किंवा जानेवारीमधे भरणाऱ्या या बाजारात ताज्या पालेभाज्या, फळभाज्या घेऊन भाजीवाले, पेरूवाला, फळंवाला, कांदे-बटाटेवाला, हरभरेवाला आवडीनं येतात. मुलांसाठी यायचं म्हटल्यावर सगळे जण छान ताजी भाजी घेऊन येतात आणि आकर्षक पद्धतीनं त्याची मांडणी करतात. काही पालक व्हेजिटेबल क्राफ्टिंग करतात, वस्तू किंवा प्राणी तयार करून सजावट करतात. त्या दिवशी मुलं घरून येतानाच कापडी पिशवी आणि तीस रुपये घेऊन खरेदीसाठी तयार झालेली असतात. असा भाजी खरेदीचा जणू एक सणच साजरा होतो!

उपक्रम खरंच चांगला, पण एक प्रकारे बंदिस्त व्हायचा. खरेदीच्या दृष्टीनं सोयीचं व्हावं म्हणून आधीच भाजीवाल्यांना पाच पाच रुपयाचे भाजीचे तुकडे, पालेभाज्यांच्या जुडय़ा करून ठेवायला सांगितलेले असे. पैशांचा व्यवहार असल्यामुळे गडबड व्हायला नको म्हणून भाजीबाजारात फेरफटका मुलांचा, ताबा मात्र आम्हा शिक्षिकांचाच! मुलांना काय कळतंय, पैसे हरवले तर, अशा नाना शंकांनी शिक्षिका सावधपणे पाच पाच मुलांचा गट करून, बाहेर शेडमध्ये नेऊन बाजारहाट करवून आणत असत. मुलांचे पैसे आमच्याकडे आणि त्यांनी लायनीत येऊन हव्या असलेल्या भाजीकडे बोट दाखवायचं. मग आम्ही त्या भाजीचे पाच रुपये भाजीवाल्याला देणार. सगळा दिवस त्या भाजीबाजारात हेलपाटे. बरं, त्यादरम्यान वर्गातील इतर भूतं एकमेकांच्या मानगुटीवर बसत. त्यांना मध्येच दमदाटी करून पुढच्या गटाला घेऊन जायचं. पण ते तरी काय करणार बिचारे. परत दंगा करायला सुरुवात! या सगळ्यामुळे एका सुंदर उपक्रमाला गालबोटच लागल्यासारखं व्हायचं. प्रामाणिकपणे मला स्वत:ला मुले भाजी खरेदी करत आहेत असं वाटतच नसे. काहीतरी चुकत होतं खरं.

मग जरा थांबून शांतपणे विचार केला तेव्हा जाणवलं की या भाजीबाजार उपक्रमाचा उद्देश काय, तर मुलांना आपल्या आवडीची भाजी स्वत:ची स्वत: खरेदी करता यावी. म्हणजेच एक तर त्यांना स्वत:ची आवड समजावी आणि दुसरं म्हणजे मंडईतलं व्यवहारज्ञान त्यांना थोडेफार अवगत व्हावं. पैशाची देवाण-घेवाण, पैशाचे मोल आणि घेतलेल्या वस्तूंचं योग्य माप समजावं हा आमचा मुख्य हेतू पण इथं काळजीपोटी आम्हीच आमच्या उद्देशांना पुरेसा न्याय देऊ शकत नव्हतो. परिणामी निष्पन्न काहीच न होता केवळ भाजीबाजार मांडण्याचा नुसताच एक उपक्रम होत होता. शिवाय या सगळ्यात आमची स्वत:ची शक्तीपण खूप खर्ची होत होती.

आमच्या या आहार सप्ताह आणि भाजीबाजारातून पालकांनाही काही दिशा मिळणंही गरजेचं होतं. प्रत्येक मुलाच्या आवडीची पालेभाजी, फळभाजी, कोशिंबीर कोणती आहे व त्याने ती घेतली का, हे प्रत्येक पालकापर्यंत पोहचवता यायला हवं होतं. त्याचा फायदा निश्चितच होईल, आवडीच्या भाज्यांचा विचार करून त्यानुसार जर पालकांनी पोळी-भाजीचा डबा दिला तर निश्चितच डबा आवडीनं संपवला जाईल. पालकांनी सहभागी होऊन नुसतंच भाजीबाजार सजवणं एवढाच आमचा उद्देश नव्हता. हा सगळा प्रयोग अधिकाधिक नेमका आणि तरीही मुलं व पालकांसाठी उपयुक्त कसा होईल याचा विचार माझ्या मनात सतत सुरू होता. त्यातूनच किमान माझ्या वर्गापुरता तरी मी एक प्रयोग करण्याचं ठरवलं.

मग त्यावर्षी आहार सप्ताह चालू झाला तेव्हा लगेचच आमच्या वर्गात एक तक्ता लागला. तक्त्याचं नाव होतं ‘भाज्या आमच्या आवडीच्या!’ तक्त्यात एकूण सहा भाग होते. मुलाचा वर्गातील नंबर, त्याचे नाव, त्याला आवडणारी पालेभाजी, फळभाजी, कोशिंबीर भाजी आणि त्याच भाज्या घेतल्या का? (अर्थात हा भाग मी माझ्या निरीक्षणानं भरणार होते.) आहार सप्ताहातील प्रत्येक दिवस हा एकेका प्रकारच्या भाजी ओळखीचा असल्याने खऱ्या भाज्या आणि चित्रातल्या भाज्या अशी आमची ओळख चालू झाली. सगळ्या भाज्या डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी चार्टभोवती बसायचं आणि प्रत्येक प्रकारातली आपली आवडती भाजी बाईंना सांगायची, असं चालू झालं. चार्टवर मुलांच्यासमोरच नोंदी व्हायला लागल्या. तीन दिवसात आमचा तक्ता छान पूर्ण झाला. रोज आल्यावर आदल्या दिवशीच्या नोंदींचं वाचन करूनच मग पुढच्या नोंदी करत होतो. रोज मुलांसमोर लेखी स्वरूपात नोंदी केल्यावर त्या भाज्यांच्या नावापुढे त्यांची चित्र काढून दुसऱ्या दिवशी मी घेऊन येत असे. कारण ज्यांना भाज्यांची नावं वाचता येत नसत ते चित्र वाचन करून आपली आवड बरोबर मांडली आहे हे ओळखू शकत होते. चौथ्या दिवशी भाजीबाजार कसा, कुठे भरणार याविषयी गप्पा झाल्या. तसेच सगळ्यांना एकदम भाजी खरेदीला जायचं आहे व त्याविषयीच्या आवश्यक सूचना दिल्या. वर्गातील तक्त्याचा फायदा असा झाला होता की भाजीबाजाराच्या दिवसापर्यंत प्रत्येक मुलाची आवडती भाजी कोणती हे मलाच समजलं होतं. आता तीच तो भाजीबाजाराच्या दिवशी घेतोय की आणखी काही वेगळे घेतोय हे बघण्यातही मजा येणार होती. यावर्षी भाजीबाजारात अजिबात हेलपाटे घालायचे नाहीत आणि वर्गातही गोंधळ नको म्हणून सगळ्यांनी एकदमच जायचं असा कार्यक्रम मी आखला होता.

‘‘इतर सगळ्या वर्गाची भाजी घेऊन झाली की शेवटच्या अध्र्या तासात मला सांगायला या.’’ असं आमच्या मावशींना सांगितलं.
‘‘तेव्हा इतर कोणताही वर्ग नको.’’ मी परत बजावलं.
‘‘बाई, आटोपणार कसं मग तुमचं?’’ मावशी म्हणाल्या.
‘‘होईल हो, काळजी करू नका’’, मी त्यांना आश्वस्त केलं. तरी मनात मात्र धाकधुक वाटत होती. भाजीवाल्यांनाही म्हटलं, ‘‘एकदम चाळीस मुलं येणार आणि त्यांची तेच भाजी घेणार,’’ तेव्हा तेही साशंक झाले. मी वर्गात आले, माझ्या मुलांना बिचाऱ्यांना कल्पनाही नव्हती की आपण सगळे एकदम जाणार आहोत, त्याला सगळे मोठे लोकं बाहेर घाबरलेले आहेत. मुलांना म्हटलं, ‘‘शेडमध्ये भाजीवाले काका-काकू, फळवाले काका बसलेले आहेत. तुम्ही मला सांगितलेल्या तुमच्या आवडीच्या छान छान भाज्या घेऊन आलेत ते. आपण सगळे एकदम बाजारात जाणार आहोत. लक्षात आहे नं? पण तिकडे गोंधळ करायचा नाही. आपले पैसे आपणच सांभाळायचे. तुम्हीच पैसे द्यायचे आणि भाजी घ्यायची. सगळे जण तय्यार का?’’

आता आपल्याला बाहेर जायला मिळणार आणि आपण आपले मुखत्यार या कल्पनेनंच त्यांच्या अंगात वीरश्री संचारली होती. ‘‘हो, हो, तय्यार!’’ वर्गात सगळ्यांचा जोरदार आवाज आला. आपापल्या पिशव्या आणि पैशाचे पाकीट घेऊन सगळे निघाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता स्वत:च्या जबाबदारीवर बाजारात जायचं आहे याची समज आल्यासारखी दिसली. मी सगळ्यात पुढे. मागे सगळा घोळका. शेडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सगळ्यांना थांबवलं आणि एकदा सगळ्या भाजीवाल्यांना म्हटलं, ‘‘मुलंच मुलांचा व्यवहार करणार आहेत. ते नक्की छान खरेदी करतील. पैशात काही गडबड झाली तर नंतर बघू.’’

घडय़ाळात बरोबर दुपारचे अडीच वाजले होते. तीन वाजता मधली सुट्टी होती. म्हणजे अर्धा तास आमच्याकडे होता. मी मुलांपुढून बाजूला झाले आणि ती बाजारात आली. मी आणि आमच्या मावशी त्यांच्या मधून फिरत होतो आणि फक्त अगदीच कोणाला काही मदत लागली, पाकीट उघडायला वगैरे, तर करत होतो. सुरुवातीला भाजीवाले पण गोंधळले पण नंतर मात्र मुलांनी इतका छान व्यवहार केला की ते चकितच झाले. कुठेही काही मस्ती नाही. पैशांची पाडापाडी नाही. प्रत्येक जण व्यवस्थित भाजी खरेदी करू शकत होता. मात्र आपल्या आवडीचीच भाजी घेतील हा माझा अंदाज साफ चुकीचा ठरला. कुणी आपल्या बाबांच्या आवडीची भाजी घेतली तर कुणी आजीच्या आवडीची. मला वाटायचं की लहान मुलांना मेथी किंवा पालकाचे पराठेच पालेभाजीत आवडतात पण शेपू लहान मुलांमध्ये एवढा प्रसिद्ध आहे हा साक्षात्कारच मला या भाजीबाजाराने झाला. अर्धा तास म्हणजे भरपूर वेळ मिळाला आमच्या बाजारहाटीला! मनासारखी भाजी खरेदी करून आम्ही सगळे परतीच्या प्रवासाला निघालो. तीस रुपयांत सगळ्यांकडे भरपूर काय काय दिसत होते. एक गाजर, एक टोमॅटो, एखादा चिकू. असं थोडंथोडं पण विविध गोष्टी दिसत होत्या. तीस रुपयांत आईला काहीतरी भाजी मिळावी या विचारानं मुलांच्या आईसाठी भाजी खरेदी करून देणाऱ्या आमच्या विचारांना मुलांनी पार हद्दपार केलं होतं आणि आपापल्या मनाप्रमाणे खरेदी केलेलं एकुलतं एक गाजर, टोमॅटो, चिकू मुलं तिथल्या तिथे फस्त करत होती. वर्गात येईपर्यंत अध्र्याजणांच्या भाजीच्या पिशव्या रिकाम्या दिसत होत्या. कोशिंबिरीच्या भाज्या, मटार, काही फळभाज्याही खाल्लेल्या होत्या. पालेभाज्या तेवढय़ा शिल्लक होत्या.

भाजी बाजाराच्या दिवशी शाळा सुटली की पालकांनाही उत्सुकता असते मुलांनी काय खरेदी केलं असेल हे बघण्याची. शाळेतल्या बाकीच्या वर्गातल्या मुलांच्या पिशव्या भरलेल्या दिसत होत्या. आमच्या वर्गातील आयांनी आपापल्या मुलांच्या पिशव्या बघायला सुरुवात केली, पण आमची भाजी केव्हाच पोटात जाऊन बसली होती. त्यामुळे मुलांचं पोट भरलेलं होतं व रिकामी पिशवी आईकडे बघत होती.
अती काळजीपोटी आपण उगीच मुलांना बांधून ठेवतो. जरा विश्वास टाकला तर ती चांगली सक्षम असतात. गरज असते ती आपणच थोडं बदलण्याची. मुलं आईबरोबर उडय़ा मारत गेली. मी माझ्या रिकाम्या वर्गात परतले. माझा भाजीबाजार आज एकदम यशस्वी झाल्याचं समाधान मला वाटत होतं.

– रती भोसेकर
ratibhosekar@ymail.com