आमचे एक मित्र उत्कृष्ट आणि निकृष्ट यांतील भेद सोपा करून सांगायचे. त्यांना आवडतं ते उत्कृष्ट. म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांचं प्रेयस् हेच समाजाचं श्रेयस् होतं. तर उलट माझ्या बाबतीत माझं श्रेयस् आणि प्रेयस् यांत समन्वय होता. जीवनातील व्यामिश्रता सर्व कलांत दिसली पाहिजे आणि जी पुस्तकं मी प्रसिद्ध करीन ती दीर्घकाळ प्रभावी ठरली पाहिजेत हे माझे निकष होते. पॉप्युलर प्रकाशनच्या मराठी विभागाला जे रूप प्राप्त झालं आणि आज सहा दशकांहून अधिक काळ टिकलं याचं मुख्य कारण तेव्हा आम्ही स्वीकारलेले हे निकष.

आमचे एक मित्र म्हणायचे की आपण पारतंत्र्य उपभोगलं आणि स्वातंत्र्यात मात्र खितपत पडलो आहोत. त्यातील उपहासाचा भाग सोडला तरी एका महत्त्वाच्या बाबतीत त्यात तथ्य होतं. तेव्हा आम्हा मुलांवर जे संस्कार होत होते ते फार वेगळ्या पातळीवरचे होते. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मला तेरावं र्वष चालू होतं. तरीही मी सार्वजनिक जीवनातील अनेक अनुभव घेतले होते. अिहसेचे पुजारी महात्मा गांधी आणि आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस ही दोघंही आमची दैवतं होती. ८ ऑगस्ट १९४२ ला मला मोठय़ा भावाने काँग्रेसच्या गवालिया टँक येथील अधिवेशनाला नेलं होतं आणि गांधीजींचं ‘चलेजाव’ भाषण कानावरनं गेलं होतं. त्याचप्रमाणे १९४६च्या २३ जानेवारीला सुभाषबाबूंच्या जन्मादिनानिमित्त मोर्चात भाग घेण्यापूर्वी मी बोट कापून रक्ताने तिरंगी झेंडय़ावर चरख्याच्या बाजूला ‘जयिहद’ शब्द लिहिले होते.

त्या दिवसांत आमच्या राहत्या आनंदाश्रम कॉलनीत राष्ट्र सेवा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अ‍ॅथलॅटिक लीग ही एक व्यायामशाळा यांच्या शाखा चालत होत्या. सर्व चळवळींत शारीरिक कवायत, लेझीम, लाठी यांसारखे व्यायाम आणि एकत्र खेळणं आणि सगळ्यांनी मिळून काम करणं  यांवर भर होता. आम्हा मुलांना एकत्र बागडणं आणि त्यांतून काहीतरी साधणं याचं समाधान मिळायचं. आजच्यासारखे ते चंगळवादी दिवस नव्हते. काय मिळवायचं यापेक्षा धडपडून काय साधायचं यावर आमचं लक्ष असायचं. या चळवळींसोबत ज्येष्ठांची बौद्धिकंही असायची. त्यांचा पूर्ण अर्थ तेव्हा कळत नसे.

पहिला धक्का बसला तो जानेवारी १९४८मध्ये. गांधीजी कलकत्त्याच्या, नौखालीच्या आणि बिहारच्या जातीय दंगली रोखून दिल्लीला याच कामासाठी आले होते. त्यांच्या प्रार्थना सभा होत असत. तिथं कुणीतरी बॉम्ब टाकल्याची बातमी आली. आनंदाश्रमच्या शेजारी संघपरिवारातले एक गृहस्थ राहत होते. ते बढाईच्या सुरात गांधीजींवरील हल्ला आज ना उद्या यशस्वी होणार असं सांगत फिरत. प्रत्यक्ष ३० जानेवारीला गांधीजींची हत्या झाली आणि त्यांनी पेढे वाटले. तेव्हा हिंसा-अिहसेतील फरक आणि निरनिराळ्या संस्थांचं धोरण माझ्या लक्षात येऊ लागलं.

गांधीजी जिवंत असतानाच आमच्या घरी भिंतीवर त्यांचा एक फोटो होता. एका अर्थी ते आमच्यावर देखरेख ठेवत होते म्हणाना! त्यांच्या विचारांतील तपशील कळत नसले तरी सर्वाविषयी बंधुभाव हे त्यांनी बिंबवलेलं महत्त्वाचं सूत्र जाणवत होतं. माझे आईवडील रोजच्या व्यवहारात बंधुभाव पाळताना मी पाहत असे. आमच्या ‘पॉप्युलर बुक डेपो’मध्ये पन्नाससाठ माणसं काम करत. ते माझ्या वडिलांचं एक मोठं कुटुंबच होतं. आई घरकामासाठी राबणाऱ्या नोकरांपासून दारावर येणाऱ्या भाजीवालीपर्यंत सर्वाची ममतेने काळजी घेत असे, त्यांचं औषधपाणीही करत असे. राष्ट्रीय पातळीवर देशाची फाळणी जरी झाली असली तरी बंधुभाव हाच देशातील आणि शेजारच्या देशातीलही लोकांच्या दृष्टीने श्रेयस्कर होता, हे आम्हा मुलांच्याही लक्षात येत होतं. या बीजातूनच पुढील आयुष्यात सर्वधर्मसमभाव, सर्वजातिसमभाव, सर्ववंशसमभाव, सर्वोदय आणि सत्याग्रह ही तत्त्वं वृक्षरूपाने सावली देऊ लागली.

त्यानंतर दोन वर्षांनी मी महाविद्यालयात जाऊ लागलो. त्यावर्षीच १९५०च्या जानेवारी महिन्यात भारताने नवीन राज्यघटना स्वीकारली. समग्रपणे तपशीलात कोणी या विस्तृत राज्यघटनेचा अभ्यास तोपर्यंत केला नसावा. महाविद्यालयात पहिल्याच वर्षी ‘इंडियन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ असा एक विषय होता. त्यात भारताच्या राज्यघटनेचा – मूलभूत कायदा म्हणून नव्हे, तर प्रशासकीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्या मागील तत्त्वं गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने स्वीकारली होती तीच तत्त्वं काँग्रेसचे तोपर्यंतचे विरोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत मार्गदर्शक म्हणून स्वीकारली होती. या राज्यघटनेविषयी आम्हाला विशेष ममत्व वाटू लागलं ते आजपर्यंत.

त्या सुमारास एका व्यावसायिक घटनेचा माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार होता. ‘पॉप्युलर बुक डेपो’ने १९४८ मध्ये गिरगावातील ‘बॉम्बे बुक डेपो’ विकत घेतला. तिथं इंग्रजीपेक्षा मराठी पुस्तकांचा प्रसार होण्याची शक्यता आहे हे हेरून माझे मेहुणे पांडुरंग कुमठा यांनी ते मराठी पुस्तकांचं माहेरघर बनवलं. मी तिथं नियमित जाऊ लागलो आणि माझ्या वयाच्या अठराव्या वर्षीच मराठी पुस्तकांच्या संपादन – प्रकाशनात गुंतू लागलो. पहिलं प्रकाशन गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह असं आधीच ठरलेलं होतं. गाडगीळांनी पुरस्कार केलेल्या नवसाहित्याच्या आधारे माझेही निकष ठरत गेले. आम्हाला आवश्यक वाटलं असतं तर तेव्हाचे प्रतिष्ठित लेखक किंवा नव्याने लोकप्रिय झालेले तात्कालिक महत्त्वाचं लेखन करणारे लेखक आम्हाला सहज मिळू शकले असते. परंतु तसं केलं असतं तर ‘पॉप्युलर’चं वेगळेपण प्रस्थापित झालं नसतं.

आमचे दुसरे एक मित्र उत्कृष्ट आणि निकृष्ट यांतील भेद सोपा करून सांगायचे. त्यांना आवडतं ते उत्कृष्ट. म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांचं प्रेयस् हेच समाजाचं श्रेयस् होतं. तर उलट माझ्या बाबतीत माझं श्रेयस् आणि प्रेयस् यांत समन्वय होता. जीवनातील व्यामिश्रता सर्व कलांत दिसली पाहिजे आणि जी पुस्तकं मी प्रसिद्ध करीन ती दीर्घकाळ प्रभावी ठरली पाहिजेत, हे माझे निकष होते. ‘पॉप्युलर प्रकाशन’च्या मराठी विभागाला जे रूप प्राप्त झालं आणि आज सहा दशकांहून अधिक काळ टिकलं याचं मुख्य कारण तेव्हा आम्ही स्वीकारलेले हे निकष.

सुरुवातीला माझा संबंध फक्त हस्तलिखितांचं संपादन आणि पुस्तकांची निर्मिती यांच्याशीच होता. व्यवहार पाहायला संस्थेत आणि कुटुंबात ज्येष्ठ मंडळी होती. मी पूर्ण जबाबदारी घेऊ लागलो तेव्हा एक विचित्र प्रसंग समोर आला. मार्च महिना संपत आला होता. एक शासकीय अधिकारी मला भेटायला आले. त्यांना आमच्या एका पुस्तकाच्या दोनशे प्रती त्याच दिवशी विकत घ्यायच्या होत्या. फक्त त्यावरील कमिशन बिलात न दाखवता रोख द्यायला हवं होतं. आíथक वर्षअखेर म्हणून विचार करायला वेळ नव्हता आणि तेव्हाच्या किमती लक्षात घेता प्रश्न फक्त साठ रुपयांचा होता. आमच्या अकाऊंटंटने ते साठ रुपये ताबडतोब उपलब्ध करून दिले. आम्हाला ती ऑर्डर मिळाली. पण त्या रात्री मी झोपू शकलो नाही. ‘व्यवसायात हे सारं करावंच लागतं. प्रत्येक वेळी फक्त नफ्यातोटय़ाचाच विचार व्यावसायिकाने केला पाहिजे,’ असं सांगणारे अनेक मित्र होते. पण मला मिळालेली शिकवण वेगळी होती. तेव्हापासून आमचं एक ठरलं की काही झालं तरी भ्रष्टाचारापासून दूर राहायचं. शालेय पुस्तकांच्या प्रकाशनाच्या आधारावर १९५०-६० या काळात गबर झालेले प्रकाशक आम्हाला माहीत होते. ते भ्रष्टाचाराच्या सुरस कथा चवीनं सांगत असत. क्रमिक पुस्तकं लावून घेण्यासाठी फक्त पशांची देवघेव नव्हे तर साग्रसंगीत पाटर्य़ाही दिल्या जात म्हणे. माझी संस्था आधीपासून या क्षेत्रापासून दूर होती. पुढे क्रमिक पुस्तकं शासनच प्रसिद्ध करू लागलं. तेव्हा हा प्रश्न मिटला. परंतु मोठय़ा ऑर्डरी मिळवण्यासाठी पसे चारणं हा प्रकार सर्रास चालू  होता आणि आहे. नोकरीवर ठेवण्यापूर्वी आम्ही उमेदवाराला सांगत असू की खिलवल्याशिवाय ऑर्डर मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्याकडे कामाला येऊ नका. आमच्या निर्णयामुळे या सहा दशकांत पॉप्युलर प्रकाशनाची श्रेष्ठ दर्जाची पुस्तकं वाचनालयांत पोचावीत तशी पोहोचू शकली नाहीत.

दोन वेगळ्या मित्रांचं म्हणणं आठवतं. त्यांपकी एक तर आमच्या ज्येष्ठ लेखिका; स्वत: शिक्षणक्षेत्रात काम केलेल्या. त्यांचं म्हणणं ‘तुमचे हे नतिक नियम तुमच्यासाठी ठीक, पण त्यामुळे आमच्यासारख्या लेखकांचं नुकसान होतं, त्याचं काय? येनकेनप्रकारेण आमची पुस्तकं खपवणं हे तुमचं कर्तव्य आहे.’  दुसरा आमचा एक मित्र स्वत: व्यावसायिक. त्याने जगरहाटीनुसार बऱ्यापकी प्रगती केली होती. खरं तर आमच्या धोरणाबद्दल त्याला सूक्ष्म आदर होता. तो कृतक रागाने म्हणायचा की, ‘तुम्ही इतकी र्वष या व्यवसायात आहात. त्या मानाने किती छोटे राहिलात. कुठं हे नीतिनियम कुरवाळत बसलात? व्हा की मोठे! मला तुमच्यासारखं व्हायला आवडेल, पण परवडणार नाही.’ दुसऱ्या बाजूने ज्यांचं पुस्तक आम्ही प्रसिद्ध केलेलं नाही अशा एका लेखकाचं कौतुकाचं पत्र आलं. आम्ही नुकसान सोसूनही भ्रष्टाचारापासून दूर राहिलो हे कळल्यावर त्यांनी प्रतिकात्मक मदत म्हणून एक चेकही पाठवला.

मी सर्वाचंही ऐकून घेत असे. मला वेगळ्या प्रकारे वागणं शक्यच नव्हतं. त्यापेक्षा व्यवसाय सोडून मास्तरकी करणं मला अधिक भावलं असतं. काही वेळा देणी वेळेवर देता न आल्यामुळे ओशाळं व्हावं लागलं आणि मानहानीचे प्रसंग आले. परंतु वाडवडिलांच्या पुण्याईने आम्ही सोवळे राहूनही तग धरू शकलो.

सत्ताधारी काँग्रेस पक्ष नेहरू-इंदिरा यांच्या नेतृत्वाखाली डाव्या विचारसरणीकडे झुकणारा मानला जात असे. मी राजकारणाचा अभ्यास करू लागलो. तेव्हा लक्षात आलं की गेल्या सत्तर वर्षांत कोणताही पक्ष सत्तेत असला तरी राजकारणी, नोकरशाही आणि उद्योगपती यांची युती अभंग आहे. दिखाव्यासाठी कोणी वरचढ वाटला तरी त्यांना एकमेकांची साथ सोडून चालणार नाही. आणि साथ सांभाळायची म्हणजे सर्व प्रकारची देवाणघेवाण आलीच. प्रत्येकाने आपापलं प्रेयस् साधलं नाही तर सर्वाचा मिळून व्यावहारिक पायाच निखळून जातो आणि उलट श्रेयसाची कास धरली नाही तर जनतेसमोर मिरवता येत नाही. अशा परिस्थितीत राजकारणात जाऊन आपलं स्वत्व टिकवणारे फारच थोडे दिसू लागले. एस्.एम्.जोशी, नानासाहेब गोरे, मधू दंडवते, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते यांच्याबद्दल खूप आदर वाटायचा. तरी मी स्वत: प्रत्यक्ष राजकारणात उतरावं असं वाटेना. पक्षीय राजकारणात एक मोठी अडचण असते. पक्षश्रेष्ठींनी घेतलेले सर्वच निर्णय मान्य नसले तरी त्यांचा पाठपुरावा करावा लागतो किंवा पक्षाच्या आत जाऊन बहुसंख्य सभासदांना आपले विचार पटवण्याची ताकद कमवावी लागते. मला समाजवादी विचारसरणी पटायची, त्यांच्या नेत्यांबद्दल आदर वाटायचा. तरीही प्रजा समाजवादी पक्षाचे काही निर्णय पटत नसत. तेव्हा नाइलाजाने कोणत्याही पक्षात प्रत्यक्ष न जाता स्वत: शक्य तेवढं आणि आपल्याला झेपेल तेवढंच त्या क्षेत्रात काम करावं हाच निर्णय घ्यावा लागला.

इंदिरा गांधींच्या सुरुवातीच्या वर्षांत त्यांनी केलेला समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव यांचा पाठपुरावा आकर्षक वाटला. परंतु जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली १९७४ ची चळवळ सुरू झाली, संपूर्ण क्रांतीचं महत्त्व लक्षात येऊ लागलं आणि डोळे उघडले. आणीबाणीच्या काळात छुपेपणाने आणि जानेवारी १९७७मध्ये निवडणुकी जाहीर झाल्यावर उघडपणे आम्ही तीस-चाळीस मित्रमंडळी कामाला लागलो. जनता पक्षात न जाता त्या नेत्यांना साहाय्य करू लागलो. मुंबईच्या पक्षात पूर्वाश्रमीच्या जनसंघातील आणि समाजवादी पक्षातील कार्यकत्रे अधिक होते. त्यांच्यात समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असू. आमच्या ‘ग्रूप ७७’मधील कोणालाही काही मिळवायचं नव्हतं. फक्त जयप्रकाशजींनी लक्षात आणून दिल्याबद्दल बघ्याची भूमिका सोडून निदान जमेल तेवढं करावं ही भूमिका आम्ही घेत होतो. जयप्रकाशजींच्या ‘टूवर्डस् टोटल रिव्होल्यूशन’ या चार खंडातील ग्रंथांचं प्रकाशन करण्याची संधी आम्हाला मिळाली. माझ्या लक्षात आलं की आणीबाणीच्या एकोणीस महिन्यांबद्दल उद्याच्या इतिहासकाराला लिहायचे असेल तर संशोधनासाठी कसलेच दस्तऐवज मिळण्यासारखे नव्हतेच. आमच्यात नव्याने निर्माण झालेल्या कर्तव्य भावनेने आम्ही बरीच कागदपत्रं जमवून उपलब्ध करून दिली. जयप्रकाशजींची ‘प्रिझन डायरी’ हे त्यापकी एक महत्त्वाचं पुस्तक.

आजच्या पिढीला जयप्रकाश नारायण हे नाव फारसं माहीत नाही याचं आश्चर्य वाटतं. महात्मा गांधी यांच्या पाठोपाठ आपल्याला गरज आहे ती जयप्रकाशजींच्या विचारांची. मात्र घराणेशाहीला विरोध करण्यासाठी त्यांना हिंदुत्ववाद्यांना जवळ करावं लागलं आणि तिथून आपल्या देशाची घसरण सुरू झाली. ही घसरण थांबवायची कशी हा मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा आहे.

समाजजीवनात भेडसावणारा एक प्रश्न निरनिराळी रूपं घेऊन समोर उभा राहतो. एकाधिकारशाही आणि घराणेशाही यांना विरोध म्हणून त्या वेळी इतर सर्व पक्षांच्या कडबोळ्याला साथ द्यावीशी वाटली. आज धर्माच्या नावाने जे अत्याचार होतात त्यांचा विरोध करताना हिंसा-अिहसा यांसंबंधीचा विधिनिषेध न मानणारे, जातीयवादी आणि आíथक असमानता विकासासाठी आवश्यक मानणारे या सर्वाची मोट बांधण्याकडे कल तयार होत आहे. आणि या साऱ्यांत सामाजिक, आíथक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रांत समान संधी या संपूर्ण क्रांतीच्या संदेशाकडे दुर्लक्ष होत आहे, याची चुटपुट लागते.

सामाजिक आणि राजकीय विचारांनी अस्वस्थ व्हावं अशी परिस्थिती अनेक वर्षांपासून राहिली आहे. साधारण २०००च्या सुमारास मी ‘लोकसत्ता’ मध्ये ‘अस्वस्थ वर्तमान’ या नावाचा स्तंभ वर्षभर लिहिला. इतरही काही वर्तमानपत्रांत लेखन केलं. वयोमानानुसार आणि माझ्या वृत्तीनुसार मी काम करू शकतो हे फक्त लेखणी वापरूनच, रस्त्यावर उतरून नव्हे हे लक्षात आलं. गांधीविचार हाच आपल्याला तारू शकतो, ही श्रद्धा होती. प्रबंधासाठी मी जाणीवपूर्वक गांधी आणि त्यांचे विरोधक असा विषय घेतला. विरोधकांच्या विचारांचा शक्यतो तटस्थपणे अभ्यास करूनच मग त्यांच्या दृष्टिकोनातून गांधीविचाराकडे पाहायचं ठरवलं.

विनायक दामोदर सावरकर यांचे विचार काही बाबतींत सर्वस्वी वेगळे होते. मुसलमानांविषयी अविश्वास किंबहुना द्वेष बाळगल्याशिवाय सावरकर समजून घेता येत नाहीत हे लक्षात आलं. साध्यसाधन विचार हा तर संपूर्णपणे वेगळा होता. लोकमान्य टिळक ‘साधनानाम् अनेकता’ यावर विश्वास ठेवणारे, सावरकर ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हे आवर्जून सांगणारे, तर गांधी ‘साधनशुचिते’वर भर देणारे. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी दोघेही दलितोद्धारासाठी झटत होते. काही विद्वान त्यांच्यातील द्वंद्वावर भर देत. तर काही त्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू समजत असत. या दोन बाजू समजून घेणं सोपं नाही; पण आवश्यक आहे. हा कठीण अभ्यास चालू ठेवला आहे.

परिस्थितीविषयीची काळजी कधी संपतच नाही. तरी फार वेगळ्या क्षेत्रांचं आकर्षण मला खुणावत राहिलंच. या सांस्कृतिक आकर्षणाला प्रेयस् म्हणावं फार तर! वाङ्मयप्रेम हे तर माझ्या व्यवसायाशी बांधलेलं होतंच. त्यातून नाटकाचा शौक हा शाळाकॉलेजच्या दिवसांपासूनच. कदाचित मी रंगभूमीकडे व्यवसाय म्हणून वळण्याचाही मोह झाला असता. पण तो एक सांघिक व्यवसाय आहे, निरनिराळ्या वृत्तीच्या मंडळींबरोबर काम करणं मला जमणार नाही, असं लवकरच लक्षात आलं. ज्यांच्याशी मूलभूत मतभेद आहे त्यांच्यासोबत काम करणं मला प्रकाशनव्यवसायातही जड गेलं. त्यापेक्षा संगीतात स्वत:ला अधिक सांभाळता येईल असा अनुभव येत गेला.

आज एका चमत्कारिक परिस्थितीत मी सापडलो आहे. गांधीविचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि माझ्या मर्यादेत ते शक्यही आहे. त्याच वेळी या सर्वापासून दूर नेणारं आणि नास्तिकालाही नादब्रह्माचा आनंद देणारं संगीत मला आकर्षून घेत आहे. संगीताची आराधना करावी की

मेधा पाटकर, गणेश देवी यांच्यासारख्यांचं नेतृत्व मानून सामाजिक बांधिलकी स्वीकारावी, हा गुंता काही सुटत नाही.

समाजजीवनात भेडसावणारा एक प्रश्न निरनिराळी रूपं घेऊन समोर उभा राहतो. एकाधिकारशाही आणि घराणेशाही यांना विरोध म्हणून त्या

वेळी इतर सर्व पक्षांच्या कडबोळ्याला साथ द्यावीशी वाटली. आज धर्माच्या नावाने जे अत्याचार होतात त्यांचा विरोध करताना हिंसा-अिहसा यांसंबंधीचा विधिनिषेध न मानणारे, जातीयवादी आणि आíथक असमानता विकासासाठी आवश्यक मानणारे या सर्वाची मोट बांधण्याकडे कल तयार होत आहे. आणि या साऱ्यांत सामाजिक, आíथक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रांत समान संधी या संपूर्ण क्रांतीच्या संदेशाकडे दुर्लक्ष होत आहे, याची चुटपुट लागते.

ramdasbhatkal@gmail.com

chaturang@expressindia.com