19 March 2019

News Flash

जीवनगाणे गातच राहावे!

अनेक शास्त्रीय गायक आपला ठसा उमटवतात, तर काही जण वादक होऊन संगीताची साधना चालू ठेवतात.

संगीत क्षेत्रात उदरनिर्वाह किंवा करिअर करण्यासाठी तर अफाट संधी आहेत.

संगीत क्षेत्रात उदरनिर्वाह किंवा करिअर करण्यासाठी अफाट संधी आहेत. शास्त्रीय संगीत लहानपणापासून शिकून कठोर मेहनत करून अनेक शास्त्रीय गायक आपला ठसा उमटवतात, तर काही जण वादक होऊन संगीताची साधना चालू ठेवतात. या क्षेत्रात करिअर करा अथवा करू नका, मनाला आनंद देण्यासाठी संगीतासारखं उत्तम साधन नाही. तेव्हा लहानपणापासूनच याची रुजवात व्हायला हवी.

नमस्कार वाचक हो!

मागच्या तीनही लेखांत आपण बघितलं की संगीत आणि समुपदेशन, हातात हात घालून लहान मुलांच्या समस्यांवर कसं उपयोगी ठरतं अन् त्यांचा सर्वागीण विकास कसं घडवतं ते. उदाहरणार्थ बोबडेपणा, तोतरेपणा, एकटेपणा, चंचलपणा, अध्ययन अक्षमता, आत्ममग्नता (Autism) आणि प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा ही संगीत थेरपी या लहान मुलांना उपयोगी पडते व कधीकधी त्यांच्या भावी आयुष्यात चमत्कारही घडवू शकते. तसाच मागच्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे, सृष्टी जेव्हा आपल्याकडून एखादी गोष्ट हिरावून घेते तेव्हा अनेक गोष्टी भरभरूनसुद्धा देते! हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.

मी अंध शाळांमध्ये जाऊन गाणं शिकवते. तिकडच्या काही मुलींचा आवाज अन् गाणं उपजतच चांगलं आहे. त्या मुलींना संगीताचं विशेष प्रशिक्षण म्हणजेच गाण्यातला भाव, चढउतार, उच्चार, हरकती अन् श्वासोच्छ्वासाचं तंत्र मी शिकवते. मी जेव्हा या मुलींना गाणं शिकवायचं ठरवलं, तेव्हा माझ्यापुढे एक मोठं आव्हानच होतं.. कारण ‘स्वरमानस’मध्ये जेव्हा आम्ही मुलांना गाणं शिकवतो, तेव्हा वेगवेगळ्या गाण्यांनुरूप हावभाव (चेहऱ्यावर) करतो किंवा संगीतातल्या हरकती, चढउतार समोरच्या विद्यार्थ्यांना करून दाखवतो. म्हणजे ते गाणं जसंच्या तसं अगदी हुबेहूब ती मुलं उचलतात; पण इकडे मात्र ते शक्यच नव्हतं, कारण मी काय हावभाव करते, ते त्यांना दिसूच शकणार नव्हतं. मग मी त्यांना हे सर्व हावभाव आवाजाच्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, आनंदी आवाज, दु:खी आवाज, हलका आवाज, भक्तिपूर्ण आवाज, उत्साही आवाज इत्यादी आणि तो त्या ऐकून, समजून तसंच्या तसं अचूक गात. माझ्यापुढे तर एवढंच आव्हान होतं; पण त्यांनी तर अख्ख्या आयुष्याचंच आव्हान स्वीकारलं आहे. त्यांच्या शाळेतला त्यांचा वावर तर कमालीचा सहज असतो. त्यांचे कान तर इतके तयार असतात, की नुसत्या आवाजावरून तर सोडाच; पण फक्त एखाद्याची चाहूल किंवा चालण्याची ढब, यावरून ती व्यक्ती कोण आहे हेदेखील त्या बरोब्बर ओळखतात. गाण्यात तर त्या तासन्तास रमतात. या मुलींना जर संगीताची गोडी लहानपणापासून लावली तर त्यांना सामाजिक भान, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास नक्कीच वाढीला लागतो.

मागच्या महिन्यातला माझा असाच एक अनुभव सांगते. मी ट्रेनने प्रवास करत होते अन् बासरीचे गोड स्वर माझ्या कानावर पडले. खूपच प्रसन्न वाटलं. एक अंध पुरुष ‘शुक्रतारा मंदवारा’ हे भावगीत वाजवत होता. त्याला लोक पैसे देत होते अन् तेही अगदी स्वेच्छेने. तो भीक अजिबात मागत नव्हता. मलासुद्धा ते दृश्य पाहून आनंद झाला आणि त्याच्याशी बोलावेसे वाटले. ‘‘तुम्ही किती सुंदर बासरी वाजवता. केव्हापासून शिकत आहात?’’ तो म्हणाला, ‘‘मी लहान असताना माझे वडील बासरी वाजवायचे अन् त्यांनीच मला ही बासरी वाजवायला शिकवली.’’ मला फार कौतुक वाटले त्याचे. विशेष शालेय शिक्षण झालेला दिसत नव्हता, त्यात दृष्टी नाही तरीही आयुष्याला कंटाळून न जाता आपल्यात जे चांगलं आहे ते ओळखून त्याचा वापर करणे व त्यातून उत्पन्न निर्माण करणे हाच जीवनाचा आव्हानात्मक मार्ग त्यानं स्वीकारला होता आणि ती बासरीच त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. म्हणजे या संगीतातून अनेक जणांचा उदरनिर्वाह तर होतोच, पण काही लोकांचं उत्तम करिअरही घडू शकतं.

अहो, माझंही अगदी तसंच झालं. मी शिकले एम.ए. (फिलॉसॉफी) व ट्रॅव्हल टुरिझम; पण करिअर वेगळेच घडले. गेली १५ वर्ष गायनाचे क्लास व आता समुपदेशनही. लहानपणापासून आईमुळे (उत्तरा केळकर) झालेले गाण्याचे संस्कार, गाण्याचं शिक्षण आणि गाणं ऐकायची प्रचंड आवड यामुळेच हे ‘स्वरमानस’च्या रूपाने शक्य झालं. असे किती तरी वादक आणि कलाकार माझ्या ओळखीचे आहेत, की जे लहान वयात प्रचंड मस्तीखोर होते; पण केवळ लहानपणापासून वाद्य अथवा गाणं शिकल्यामुळे त्यांची अतिरिक्त ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाऊन ते आज ते उत्तम वादक किंवा कलाकार म्हणून नावारूपाला आले आहेत. हो, पण याकरिता तुम्हाला गुरू मात्र चांगलाच मिळायला हवा. यात महत्त्वाचा भाग म्हणजे नातं. हो, गुरूबरोबरचं तुमचं नातं! म्हणजेच शिक्षकासोबत मुलांचं तयार स्नेह, आपुलकीचं घट्ट नातं – संगीतातून निर्माण झालेलं. त्यासाठी गुरूही ज्ञानी, गुणी आणि माणूसपण जपणारा असावा. त्याचबरोबर पालकसुद्धा आपल्या मुलांच्या बाबतीत जागरूक जरूर असावेत, पण फक्त परीक्षा, प्रमाणपत्र, चमकणे हे ध्येय ठेवण्यापेक्षा मुलं आनंदाने आणि हसतखेळत एखादी कला कशी शिकतील याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं तरच त्यांची मुलं सर्वार्थाने बहरतील.

या संगीत क्षेत्रात उदरनिर्वाह किंवा करिअर करण्यासाठी तर अफाट संधी आहेत. शास्त्रीय संगीत लहानपणापासून शिकून, कठोर मेहनत करून अनेक शास्त्रीय गायक आपला ठसा उमटवतात. तसंच शास्त्रीय संगीताचं शिक्षण न घेतासुद्धा त्यात रुची असेल तर काही लोक तानपुरा वादक म्हणूनही नोकरी मिळवतात किंवा कार्यक्रमात साथीला बसतात, तर सुगम संगीतात आपल्या असाधारण आवाजावर मेहनत घेऊन पाश्र्वगायकही बनता येते. बऱ्यापैकी आवाज असलेल्या पण विशेष संगीत न शिकलेल्या, चित्रपटातल्या गाण्यांसाठी कोरस गाऊनसुद्धा बऱ्यापैकी पैसे कमावतात. कित्येक वादक सिन्थेसायझर, पेटी, तबला, ढोलक-ढोलकी, सतार, बासरी, ऑक्टोपॅड अशा विविध प्रकारच्या वाद्यांचे पद्धतशीर शिक्षण घेऊन रेकॉर्डिग्समध्ये व्यस्त होतात आणि नावारूपाला येतात. कित्येक वेळा टेक्निकल गोष्टींची आवड आणि त्याचबरोबर संगीताचा कान असलेल्या व्यक्ती साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणूनदेखील पुढे येतात.

अगदी पट्टीच्या गायक-वादकांबरोबरच, त्यामानाने सामान्य गायक वादकांनासुद्धा या संगीत क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. सूर-तालाची जाण असेल, पण उत्तम आवाज नसेल-असेल तरीही संगीत विशारद होऊन खूप जण संगीत शिक्षक म्हणून महानगरपालिकेच्या किंवा इतर खासगी शाळांमध्ये नोकरी मिळवू शकतात. आजकाल खूप मोठय़ा म्हणजे भव्य गाण्यांच्या कार्यक्रमांपासून ते अगदी छोटय़ाछोटय़ा कार्यक्रमांपर्यंत असे अनेक कार्यक्रम शहरात, गावात, खेडय़ात व गल्लोगल्लीत होत असतात. वर्षभर सणांची रेलचेल तर असतेच. त्यात राष्ट्रीय सण, विविध जयंती आणि पुण्यतिथी असे अनेक प्रसंग असतातच. त्याकरिता अनेक वादकांची जरूर असते. तेव्हा उपजतच कला असल्यामुळे म्हणा किंवा अगदी थोडं शिक्षण घेऊनसुद्धा अनेक कलाकार या कार्यक्रमात बऱ्यापैकी व्यस्त असतात व चांगले पैसेही कमावतात. तसाच संगीताचा कान व रुची असणाऱ्याला चाली आपोआप स्फुरतात ते उत्तम संगीतकारही बनू शकतात. याशिवाय काही जण नोटेशनचे ज्ञान व इतर वाद्यांची माहिती घेऊन संगीत संयोजकही होऊ  शकतात. बरेच जण गाण्याची अथवा वाद्यांची शिबिरे चालवू शकतात किंवा कॉलेजमध्ये संगीताचे प्राध्यापक होऊ  शकतात; पण ही आपली कला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शिक्षण, सातत्य, चिकाटी अन् त्या जोडीला चांगल्या स्वभावाचीही गरज असते.

थोडक्यात काय, तुमच्या घरातला एखादं मूल वाटय़ा, चमचे घेऊन वाजवत असेल किंवा एखादा चिमुरडा डब्यावर ताल धरत असेल तर वैतागून जाऊन त्याला बिलकूल रोखू नका. काय सांगावे, यापैकीच एखाद्या लहानग्यात उद्याचा एक चांगला साइड ऱ्हिदमिस्ट किंवा तबलजीही दडला असेल. (समाप्त)

मानसी केळकर-तांबे swarmaanas@gmail.com

 

First Published on August 26, 2017 2:53 am

Web Title: unlimited opportunities for career in the field of music