15 January 2021

News Flash

हिवाळ्यातील आजार

श्वसनमार्गाला आणि फुफ्फुसाला सूज येते आणि आजार निर्माण होतात.

सुरेखाची आई घाई घाईत माझ्या हॉस्पिटलमध्ये सुरेखाला घेऊन आली. सुरेखा ही १७ वर्षांची कॉलेजकन्यका! हिला नेहमीच सर्दी आणि खोकला होतो! आणि तिची आई त्याचा दोष सुरेखाच्या प्रतिकारशक्तीला देते. खरं तर सुरेखाला अलर्जिक सर्दी आहे. पण या वेळेला सुरेखाला सर्दीबरोबर दमही लागत होता आणि तिला अस्थमाचा त्रास होत होता. ताबडतोब नेब्युलायझरने औषध दिल्यावर तिचा दम कमी झाला. तिच्या आईच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. सुरेखाला नेहमी फक्त सर्दी होते, मग आज हा दम कोठून आला? त्यांचे समाधान करेपर्यंत वयोवृद्ध पाटील काकांना त्यांचा मुलगा घेऊन आला की ते व्यवस्थित खात नाहीत, थोडा दम आणि बारीक तापही येतो आहे. त्यांना तपासल्यावर लक्षात आले की त्यांना डाव्या फुफ्फुसामध्ये न्युमोनिया झाला आहे. एक्सरे काढल्यावर त्यात डाव्या बाजूला मोठा न्युमोनिया दिसून आला. तो पाहून पाटीलकाका आणि मुलगा बुचकळ्यात पडले. हा एवढा मोठा न्युमोनिया झाला कधी आणि केव्हा? यांना तर फक्त सर्दी आणि थोडा खोकला होता .

सुरेखा आणि पाटीलकाका अचानक आजारी पडले कारण कधी नव्हे तो मुंबई आणि महाराष्ट्रातला उकाडा पळाला आहे आणि गुलाबी थंडी अवतीर्ण झाली आहे. ती येताना काही आजारांना पण घेऊन आली आहे. हे थंड हवामान आणि तापमानातील अचानक होणारे बदल यामुळे अलर्जिक सर्दी असणाऱ्या सुरेखाला अस्थमाचा त्रास झाला आणि पाटीलकाकांना सर्दीबरोबर जंतुसंसर्ग होऊन त्याचा प्रसार त्यांच्या फुफ्फुसात होऊन न्युमोनिया झाला.

हिवाळ्यात दिवसाचे आणि खास करून रात्रीचे तापमान कमी होते. यामुळे हवेमधील सर्व प्रदुषण हवेच्या खालच्या थरात येते यामध्ये मानवी आरोग्याला घातक विविध वायू आणि सूक्ष्म कण असतात. हीच हवा आपण श्वसनासाठी वापरतो. त्यामुळे श्वसनमार्गाला आणि फुफ्फुसाला सूज येते आणि आजार निर्माण होतात.

सर्दी आणि खोकला : कमी तापमान आणि हवेमधील प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाचा दाह होतो. यामुळे नाकातून पाणी, शिंका आणि खोकला सुरू होतो. घसा दुखतो, प्रसंगी तापही येतो. श्वसनमार्गाचे विषाणूदेखील याला कारणीभूत असतात.

ब्रॉन्कायटिस : हवेतील धुलीकण, वाहनातील उत्सर्जित वायू आणि इतर रसायने ही श्वसनमार्गात गेल्यामुळे श्वसननलिकांना दाह होऊन त्या आकुंचन पावतात आणि त्यामध्ये अधिक प्रमाणात कफ निर्माण होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो. यामध्ये विषाणू अथवा इतर जंतूसंसर्ग झाल्यास हिरवा-पिवळा कफ येऊन ताप येण्यास सुरुवात होते. तीव्र स्वरूपात ब्रॉन्कायटिस झाल्यास रुग्ण अत्यवस्थ होऊन त्याच्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव निर्माण होतो. अशा रुग्णास तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, विविध प्रकारच्या धुराच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना ब्रॉन्कायटिस फार चटकन होतो.

अस्थमा : हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषण हे अस्थमाचा आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी घातक ठरते. नियमितपणे औषधाची गरज असणाऱ्या आणि कधीतरी औषधांची गरज लागणाऱ्या स्थिर रुग्णांनाही त्रास होऊ लागतो. त्यांच्या श्वासनलिका आकुंचन पावतात आणि कफाचे प्रमाण वाढते. यामध्ये जंतुसंसर्ग झाला तर दमाचे प्रमाण वाढून रुग्णालयात तातडीने दाखल होण्याची गरज पडते

न्युमोनिया : हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाची प्रतिकार शक्ती कमी होऊन जंतुसंसर्ग झपाटय़ाने होण्यास मदत होते. फुफ्फुसांना सूज येवून त्या भागामध्ये कफ जमा होतो. स्पंज सारखा नरम असणारा फुफ्फुसाचा बाधित हिस्सा घट्ट बनतो आणि तो श्वसनक्रियेत भाग घेऊ शकत नाही. रुग्णाला खोकला, ताप येऊ लागतो. फुफ्फुसाचा बराच भाग बाधित झाला असेल तर श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो आणि रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होते. रुग्णांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते.

याशिवाय थंड हवा आणि हवेच्या खालच्या थरामध्ये स्थिर झालेले प्रदूषण यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, गुदमरल्यासारखे वाटणे, नाक व घसा जळजळणे, शिंका येणे, खोकला, घसा खवखवणे या गोष्टी सर्वाना त्रस्त करतात. त्वचा कोरडी पडून कंड आणि पुरळही येते.

हे आजार संपूर्णपणे टाळणे अशक्य आहे. परंतु काही खबरदारी घेऊन ते काही प्रमाणात टाळू शकतो अथवा त्यांची तीव्रता कमी करू शकतो. यासाठी गर्दीची ठिकाणे टाळावीत.  खोकताना अथवा शिंकताना नाका तोंडावर रुमाल किंवा कपडा धरावा. यामुळे आसपासच्या व्यक्तींना होणारा संसर्ग काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

  • रस्त्यावरील सिग्नल व चौक, तसेच वाहतूक कोंडी अशा ठिकाणी कमीत कमी वेळ थांबावे. थांबणे आवश्यक असले तर तोंडावर आणि नाकावर रुमाल किंवा मास्क लावावा.
  • सर्दी, खोकला यासाठी सर्व जण प्रथम घरगुती उपाय करून पाहातात. त्याने गुण आला नाहीतर डॉक्टरकडे जातात. अनेकदा त्यामुळे महत्त्वाचा वेळ वाया जातो,घरगुती उपायांनी गुण येण्यासाठी फार वेळ वाट पाहू नये, लवकर आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • शीतपेये, आईस्क्रीम आदी थंड पदार्थाचे सेवन टाळावे.
  • सर्दी आणि खोकला यांसोबत जोरात ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • वयोवृद्ध व्यक्ती, गर्भवती स्त्रिया तसेच लिवर, किडनी यांचे कायमस्वरूपी आजार असणाऱ्यांनी हे आजार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. थंडीमध्ये होणाऱ्या फ्लूपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी त्याची लस घेणे आवश्यक आहे,
  • अशी ही हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडी त्रासदायकदेखील ठरते. परंतु योग्य काळजी घेतल्यास या थंडीची मजा लुटणेदेखील सहज शक्य आहे!
    डॉ. पराग देशपांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 1:11 am

Web Title: winter diseases
Next Stories
1 फॅमिली डॉक्टर
Just Now!
X