|| डॉ. मानसी राजाध्यक्ष

हल्ली आपण सर्वच जण ‘आहारा’विषयी खूप चौकस झालो आहोत. किंवा चौकस होण्यापेक्षा आपण नेमकं काय खावं, काय खाऊ नये, घरी रोज मेन्यू ठरवताना नेमका कोणता पदार्थ करावा, कसा करावा, कसा खावा, एक न दोन शंभर प्रकारच्या शंका आपल्या मनात निर्माण झाल्या आहेत.

खरं तर, आपल्या आरोग्याचा विचार करूनच आपल्या पूर्वजांनी अन्न-परंपरा ठरवलेली आहे. तेवढी जरी आपण नेमकी समजून उमजून पाळली तरी, स्वयंपाकघरात मेन्यू ठरवताना आपला गोंधळ उडणार नाही. सणांच्या निमित्ताने योग्य ऋतुमानात, आरोग्यासाठी योग्य अशा पदार्थाची परंपरा आपण पूर्वापार जपत आहोत आणि ती तशी जपलीही पाहिजे. होळीच्या वेळेला पुरणाची पोळी आणि गणपतीच्या दिवसात ‘ऋषी’ची भाजी यामागे निश्चित असा हेतू आहे. तसंच कोणत्याही अन्नावर संस्कार केले की ते अन्न आपल्याला सहज पचतं. जर आपण अन्नावर नेमकेपणाने; निवडणं, पाखडणं, दळणं, चाळणं, भिजवणं, तव्यावर परतणं, शिजवणं, भाजणं, उकडणं, तळणं अशा अनेक संस्कारांपैकी काही संस्कार, वेगवेगळ्या पाकक्रियांच्या निमित्ताने केले तर ते अन्न ‘अमृत’तुल्य होऊन आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतं.

पण असं बघा, आपण आहार आपल्या आरोग्यासाठी घेत असलो तरी, कधी कधी त्याचा कल ‘जिभेचे चोचले’ पुरवण्याकडे होतो. जिभेवर वेगवेगळ्या चवींची जाणीव करून देणाऱ्या ‘रुचीकलिका’ असतात. या रुचीकलिकांद्वारे आपल्याला चवींची जाणीव होते. आपल्या आहारामध्ये एकूण गोड, आंबट, खारट, कडू, तुरट आणि तिखट अशा सहा चवींचा समावेश असतो. सहा चवींची जाणीव असलेल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पूर्वी आपल्या आहार पद्धतीत डावी, उजवी बाजू असलेले संपूर्ण पान वाढले जायचे. हळूहळू ती परंपरा फक्त सणावारी करण्यासाठी बाकी राहिली आणि पानामध्ये सहा चवींचा समन्वय साधला जाणारा आहार कमी व्हायला लागला. तज्ज्ञांच्या मते आहारामध्ये जेव्हा सहा चवींपैकी कोणत्याही एक किंवा दोन चवींच्या पदार्थाचं प्रमाण इतर चवींच्या पदार्थाच्या तुलनेत वाढतं तेव्हा ते अनारोग्याला आमंत्रण देतं. कोणत्याही एका प्रकारच्या चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं म्हणजेसुद्धा ‘जंक’फूड खाण्यासारखंच आहे.

तेव्हा अनेक प्रकारच्या माध्यमातून आहाराविषयक येणारे अनेक प्रकारचे बरोबर किंवा चुकीचे सल्ले ऐकून, आपण नेमका कोणता आहार खावा याविषयी चिंतेत न पडता, समप्रमाणात सहाही चवींचा समावेश, आपल्या रोजच्या आहारात आहे ना हे लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणेच रोजचा स्वयंपाकाचा मेन्यू ठरवावा, की झालं!

manasi.milind@gmail.com

chaturang@expressindia.com