24 January 2019

News Flash

तेलाचे गुणधर्म

खाद्यतेल / फॅट असणारे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले तर त्यांच्या पोषण मूल्यावर परिणाम होऊ शकतो.

प्रतिनिधिक छायाचित्र

आपण काय खातोय याबद्दल सजग असणाऱ्या अनेकांचे ‘फॅट’ असणाऱ्या, म्हणजे आपल्या भाषेत तेलकट, तुपकट, तळकट अशा चमचमीत, कुरकुरीत, चविष्ट पदार्थावर चक्क फुली मारावी, यावर एकमत असते. पण एक लक्षात घ्यायला हवे की, फॅट, म्हणजे स्निग्धांशयुक्त अन्न ही शरीराची महत्त्वाची गरज आहे. आपल्या आहारातील जीवनसत्त्वे अंगी लागण्यासाठी, शरीरातील संप्रेरकांचे (हार्मोन्स) संतुलन राहण्यासाठी, प्रजनन संस्थेचे आरोग्य नीट राहण्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी.. या व अशा अनेक प्रक्रियांसाठी विशिष्ट प्रमाणात स्निग्धांशयुक्त अन्नाची गरज शरीराला नेहमी असते.

हे स्निग्धांश योग्य प्रकारे शरीराला मिळणे मात्र जरूर असते. जाहिरातीतून ज्याचे गुण गायले जातात, ते राइस ब्रान तेलातील ओरायझनॉल हृदयासाठी उपयुक्त आहे. मात्र त्याचा गुणधर्म असा की तेल जसजसे गरम व्हायला लागते तसतसा हा घटक कमी कमी होत नष्टही होऊ  शकतो. कारण ओरायझनॉल (हिट सेन्सेटिव्ह) आहे. तो  त्याचा गुणधर्मच आहे. विविध तेलांचे असे जे गुणधर्म आहेत त्यांचा लाभ मिळण्यासाठी ती कशी वापरावीत, हे समजून घ्यावे. आपण फोडणी, परतणे, तळणे यासाठी तेल वापरत असतो. कच्चे तेल वरून घेऊन ज्यात वापरतो, ते पारंपरिक पदार्थ (तेल-मसाला-भाकरी / दडपे पोहे / घट्ट पिठलं / वरून तेल घ्यायची लसूण/दाण्याची चटणी इत्यादी) आता जेवणातून सहसा आढळत नाहीत. जास्त किंमत मोजून आरोग्यदायी म्हणून जे पदार्थ खरेदी केले जातात, त्यांच्या गुणधर्माची माहिती असणे महत्त्वाचे!

स्वयंपाकघरातील सुविधांचा वापर करतानासुद्धा, अन्नाची पोषणमूल्ये टिकून राहावीत, याबद्दल सजग असणे आवश्यक आहे. खाद्यतेल / फॅट असणारे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले तर त्यांच्या पोषण मूल्यावर परिणाम होऊ शकतो. कारण किती तापमानाला, किती वेळात पदार्थ गरम झालाय, यावर त्यातील स्निग्ध घटक/ पोषण मूल्ये यांचे विघटन होऊ  शकते (डिग्रेडेशन). म्हणून तयार लाडू / शिरा-पुरी / वडे इत्यादी काही सेकंदांत गरम करायचे, की त्यासाठी दुसरी कुठली युक्ती वापरायची, याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे.

वसुंधरा देवधर vasudeo55p@gmail.com  

chaturang@expressindia.com

First Published on March 24, 2018 1:01 am

Web Title: cooking oil benefits