23 February 2019

News Flash

आहारातील ‘अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स’

आरोग्य रक्षणासाठी अ‍ॅण्टीऑक्सिडंटची गरज असते. प्राणवायू (ऑक्सिजन) हा सर्वासाठी जीवनच आहे

(संग्रहित छायाचित्र)

वसुंधरा देवधर

आरोग्य रक्षणासाठी अ‍ॅण्टीऑक्सिडंटची गरज असते. प्राणवायू (ऑक्सिजन) हा सर्वासाठी जीवनच आहे. त्याच्यामुळेच आपल्या अन्नातील स्निग्धांश, प्रथिने आणि कबरेदके यांच्याद्वारे ऊर्जा मिळू शकते. पण कधी कधी या प्राणवायूचा अणू दुधारी शस्त्र बनतो आणि आरोग्याला हानिकारक अशी ‘फ्री रॅडिकल्स’ निर्माण करतो. या फ्री रॅडिकल्सपासून पेशींच्या रक्षणाचे महत्त्वाचे काम अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स करतात. त्यामुळे आहारात त्यांचा अंतर्भाव असायला हवा.

‘सी’ आणि ‘ई’ जीवनसत्त्वयुक्त आणि बीटा-कॅरोटिन, यासारखे अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स- समृद्ध पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. कॅरोटिनॉइड्स आणि ‘ई’ जीवनसत्त्व परस्परपूरक असतात. मात्र ‘ई’ जीवनसत्त्वाचे लाभ मिळण्यासाठी आहारात पुरेसा स्निग्धांश (तेल/ साजूक तूप/ लोणी इ.) असला पाहिजे. तृणधान्ये आणि वनस्पती तेलामधून ‘ई’ जीवनसत्त्वाचा लाभ होतो.

फळे आणि भाज्यामधून ‘सी’ जीवनसत्त्व मिळते, त्यात आवळा सर्वात महत्त्वाचा. कारण त्यातील ‘सी’ जीवनसत्त्वाचे विविध प्रक्रियातही विघटन होत नसल्याने, ते शरीराला उपलब्ध होते. ब्लू बेरी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, संत्री आणि आंबे या फळांमधून अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स मिळतात. बीटा-कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते, म्हणूनच गाजराचे नाव कॅरट असावे. शरीरातील ‘अ‍ॅण्टीऑक्सिडंट विकरांना’ कार्यरत ठेवण्यासाठी सूक्ष्म प्रमाणात आवश्यक अशी मूलद्रव्ये (झिंक, सेलेनियम इ.) पालेभाज्यातून मिळतात.

विविध फळे आणि भाज्यामधील पोषक घटक शरीराला योग्यप्रकारे मिळण्यासाठी, ताजी फळे शक्यतो प्रक्रिया न करता आणि भाज्या अति मऊ न शिजवता खाणे आवश्यक आहे. कोशिंबिर महत्त्वाची ठरते, ती त्यामुळेच!

याशिवाय काही औषधी वनस्पती आणि मसाल्याचे पदार्थ यामध्ये ही अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स असतात, असे संशोधनाने स्पष्ट झाले आहे. जसे : लवंग, दालचिनी, तुळस, हळद, जिरं आणि आलं. तसेच लसूण, लाल मिरची आणि अर्थात योग्य प्रकारे केलेला चहा! देशभरात विविध प्रकारे मसाले बनतात. अगदी ताजेही केले जातात. त्यात वरीलपैकी बरेच जिन्नस असतात. हळद हा सामान्यपणे फोडणीचा अविभाज्य घटक आहे. तिचे आरोग्यरक्षक गुणधर्म नवीन संशोधनाच्या निकषावरही सिद्ध झाले आहेत.

यावरून आपल्या सहज लक्षात येईल, की आपल्या देशातील पारंपरिक भोजन संस्कृतीनुसार आहार घ्यायला हवा. त्यामुळे त्यातून आवश्यक अ‍ॅण्टीऑक्सिडंटचा लाभ होईल. जेणेकरून आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास अधिक मदत होईल. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटले जाते, ते म्हणूनच!

vasudeo55p@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on August 25, 2018 1:01 am

Web Title: dietary antioxidants for health