News Flash

उद्योजिका घडताना..

खरंतर स्त्रिया या मुळातच उद्योजक असतात.

स्त्रिया या मुळातच उद्योजक असतात. उत्तम प्रशासक असतात. मात्र अनेकदा ते घरापुरतं मर्यादित राहतं. घराबाहेरच्या विशाल जगात त्या गुणांचं सार्थक व्हावं म्हणून उद्योजिका होण्याचं स्वप्न स्त्रियांनी प्रत्यक्षात आणायला हवं. आज अनेक जणी उद्योगाच्या क्षेत्रात पाय रोवून घट्ट उभ्या असल्या तरी अनेक जणी उंबरठय़ाशीच अडून आहेत. स्त्रीने सक्षम व्हावं, उद्योजक व्हावं यासाठी शासनही अनेक योजना राबवीत असतं. बँका कर्ज देत असतात. फक्त गरज असते ती थोडय़ा धाडसाची, आत्मविश्वासाची, उद्योगक्षेत्रातील तंत्र आणि मंत्रांची. त्यासाठीच उद्योजिका होण्यासाठी आवश्यक सर्व बारकावे, पलूंची माहिती देणारं हे सदर दर पंधरवडय़ाने.

उद्योजिका, प्रशिक्षक, समाजसेविका म्हणून परिचित असलेल्या उद्योजक समितीचे महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या नेहा खरे या यशस्वी स्त्री उद्योजिका आहेत. मिरर सलोन, मिरर अ‍ॅकेडमी, मिरर स्किन अ‍ॅण्ड हेअर केअर प्रा.लि. या संस्थांच्या, ‘मिरर समूहा’च्या त्या अध्यक्षा आहेत. उद्योजकता विकास, स्वप्न उद्योजकतेचे, उद्योजकतेचा जागर अशा अनेक कार्यशाळांच्या माध्यमातून हजारो स्त्रियांना, युवकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ‘महाराष्ट्र चेंबर’चा स्त्रिया उद्योजिका पुरस्कार,  मराठी युवा उद्योजक पुरस्कार २०१४ अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत.

एकीकडे आंतरराष्ट्रीय आघाडीवर स्त्रिया नेतृत्व करीत आहेत तर दुसरीकडे आपल्याच देशात ‘नकुशी’ म्हणूनही स्त्रियांची अवहेलना होत आहे. एका सर्वेक्षणादरम्यान असे आढळून आले की खंडाळा फलटण भागात २२२ ‘नकुशी’ आढळून आल्या आहेत. परंतु याच आपल्या अनेक मुली देशाच्या सैन्यात कार्यरत आहेत. नकुशी ते उच्चशिक्षित स्त्रिया हा प्रवास म्हणजेच स्त्री सबलीकरणाचे घोतक आहे. आपल्यामध्ये असलेली शक्तीची जाणीव शिक्षणामुळे स्त्रियांना जाणवू लागली आहे. त्याचा प्रभाव समाजात दिसून येऊ लागला आहे. आज तालुका, जिल्हा पातळीवरील स्त्रियांमध्येही परिवर्तन दिसून येत आहे,  अनेक क्षेत्रांत स्त्रिया यशस्वी होताना दिसत आहेत, अनेक क्षेत्रांत तर स्त्रियांच्या तीन ते चार पिढय़ा यशस्वी झालेल्या आहेत. त्यातलंच एक क्षेत्र उद्योगाचं.

आज उद्योगाच्या क्षेत्रातही अनेक जणी पाय रोवून उभ्या आहेत. अनेक आव्हानं स्वीकारत, संघर्ष, अपयशाला मागे टाकत यश मिळवत आहेत. ‘डर के आगे जीत है’ हे सिद्ध करत आहेत. तरीही अनेक जणींना आजही उद्योग हा स्त्रियांसाठी नाही किंवा फक्त पापड, लोणची केलं तरी पुष्कळ अशी मानसिकता झाली आहे. मात्र स्त्री उद्योजिकांचा इतिहास पाहता त्याची पाळेमुळे खूप खोलवर गेलेली दिसतात. देशापरदेशात आपलं नाव गाजवणाऱ्या आपल्या स्त्रिया या क्षेत्रातल्या आदर्श आहेत. ‘फोर्चुन १००’ मध्येही आपल्या अनेक स्त्री उद्योजिकांची वर्णी लागलेली आहे. याचाच अर्थ थोडा आत्मविश्वास, थोडा धाडसीपणा आणि कष्टाची तयारी या गोष्टी तुमच्यातली उद्योजिका घडवू शकते.

खरंतर  स्त्रिया या मुळातच उद्योजक असतात. उत्तम प्रशासक असतात. त्यामुळे स्त्री सबलीकरण आणि आर्थिक विकास या दोन्ही गोष्टी परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. ज्या देशात स्त्रियांना सन्मान दिला जातो त्या देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या विकासाकडे बघून ठरवली जाते. त्यातलं पुढचं पाऊल म्हणजे उद्योग. जे स्त्रियांचे खुल्या दिलाने स्वागत करतो आहे. ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेची पाहिजे’ या उक्तीप्रमाणे स्त्रीने उद्योजक होण्याचा निश्चय केला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला हवे.

उद्योजकता म्हणजे काय? उद्योजक होण्यासाठी काय करायला हवे? मला यासाठी पसे कोठून मिळतील, माझे उत्पादन कोण विकत घेईल असे अनेक प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. म्हणूनच हे सदर तुमच्यातील उद्यमशीलतेला आव्हान देण्यासाठी. उद्योग सुरू करणं कदाचित सोपं असेलही पण ते टिकवणं, त्यात सातत्याने यशस्वी होणं, कायम नफ्यात राहणं हे होण्यासाठी काही नियमित प्रयत्नांची आवश्यकता आहे. काही तंत्र आणि मंत्रांची आवश्यकता असते त्याचीच माहिती अर्थात उद्योजिका होण्यासाठी आवश्यक सर्व बारकावे, पलू याबाबतची माहिती आपण या सदरातून जाणून घेणार आहोत.

उद्योगामध्ये ज्या दोन मूलभूत गरजा आहेत त्या म्हणजे मनुष्यबळ व विपणन व्यवस्था. त्याचबरोबर व्यवस्थापन हेही तितकेच महत्त्वाचे असते. याकरिता आपण व्यवसाय उद्योग सुरू करताना काय पूर्वतयारी करावी, व्यवसायाचे स्वरूप काय असावे, उद्योगाची निवड करताना कोणत्या उत्पादनाला मागणी आहे, उद्योगाची व्याप्ती कशी असावी, जागेची निवड कशी करावी, अशा अनेक बाबींवर आपण सखोलपणे या लेखमालेतून चर्चा करणार आहोत. ते जाणून घेणार आहोत. उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे मार्केटिंग. उत्पादनाची विक्री करण्यासाठी आपण यंत्रणा कशी राबविणार, यासाठी सविस्तर नियोजन करावयास हवे.

उत्पादनाची किंमत, उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य जाहिरात, स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकण्यासाठी आकर्षक पॅकिंग, स्पर्धात्मक किंमत, मालाचा दर्जा हे कसे असायला हवे या माहितीबरोबरच उद्योगासाठी आवश्यक घटक म्हणजे भांडवल. त्याची उभारणी आणि आर्थिक नियोजन याचे मार्ग याचबरोबरीने सरकारतर्फे अलीकडच्या काळात व्यवसाय मार्गदर्शन, उद्योजकता प्रशिक्षणवर्ग राबविले जातात व यामधून स्त्रियांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते, त्यांचीही माहिती या सदरातून मिळणार आहे.

स्त्रिया सक्षमीकरणाच्या घोषणा आपण सतत ऐकत असतो. स्त्रियांनी सक्षम व्हायचे म्हणजे काय करायचे. स्त्रियांनी आपले परंपरागत मार्ग बदलले पाहिजे, केवळ घरकामात अडकून न पडता समाजातील बदलत्या प्रवाहात झोकून घेतले पाहिजे. प्रवाहानुसार आपलेही मार्ग निवडले पाहिजे. हे करीत असताना अनेक विरोधांना आपल्याला सामोरे जावे लागेल. प्रथमत: कुटुंबातील विरोध, समाजात होणारा विरोध मोडून काढला पाहिजे व नवीन संधी शोधून नवीन मार्ग पादाक्रांत केले पाहिजेत. आपल्या देशात, राज्यात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या त्यांचा आदर्श आपणाला ठेवता येईल, परंतु प्रत्येकीचा मार्ग वेगळा आहे, आपण कोणत्या मार्गावरून जायचे याचा विचार आपणच करावयास हवा. प्रत्येक स्त्रीला वैचारिक स्वातंत्र्य हवे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे, आर्थिक स्वातंत्र्य हवे तरच स्त्री सबला होऊ शकेल. स्वयंसिद्धा होऊ शकेल.

शासन वर्षोनुवर्षे स्त्रियांना उद्योगासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. अनेक प्रकारचे अनुदान व सवलती त्यांना दिल्या जात आहेत. बँका या स्त्रिया उद्योजिकांना कर्ज देण्यास पुढे येत आहेत. आर्थिक दुर्बल घटक व बचत गटांना साहाय्य करण्यासाठी शासनाच्या सक्षम यंत्रणा कार्यरत आहेत. मध्यम आणि लघू उद्योजकांसाठी सरकारी योजना खूप आहेत, या योजनांचा लाभ स्त्रियांनी घेतला पाहिजे. पंतप्रधान उद्योग विकास योजना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जातात, स्टार्ट अप इंडिया यासारख्या योजना सध्याचे सरकार उद्योगाच्या विकासासाठी राबवीत आहेत. या योजनांची माहिती घेतली पाहिजे त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.

उद्योग सुरू करताना आपण जो उद्योग सुरू करणार आहात त्याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे, त्यासाठी लागणारे प्रशिक्षण घेतले पाहिजे, व्यावसायिक शिक्षण घेतले पाहिजे. स्किल डेव्हलमेंटसारख्या योजनांचा लाभ घेऊन व्यावसायिक प्रशिक्षण आत्मसात केले पाहिजे. त्याचबरोबर व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करून उद्योजकतेचे गुण आत्मसात केले पाहिजेत.

उद्योग सुरू केला म्हणजे लगेचच आपणास यश मिळेल असे नाही, यश म्हणजे जादूची कांडी नाही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. धोका पत्करला पाहिजे, होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे. यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. एखाद्या वेळेस आलेल्या अपयशाने खचून न जाता अपयशाची कारणे शोधून, त्यावर उपाय करून यश संपादन केले पाहिजे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात, परंतु आजचा मंत्रच वेगळा आहे. कुटुंबातील एक स्त्री उद्योजिका झाली तर संपूर्ण कुटुंब उद्यमशील होते. उद्योजकतेचे संस्कार स्त्रिया अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात. मग काय, उद्योजिका व्हायचंय ना? विचार करू नका, उद्योगाच्या दुनियेमध्ये आत्मविश्वासाने पाऊल टाका, आणि स्वयंविकासाबरोबरच राज्याच्या व देशाच्या विकासात सहभागी व्हा! आम्ही तुमच्या सोबत असणार आहोतच. विचारा आम्हाला तुमच्या मनातले प्रश्न म्हणजे आपला हा प्रवास सोबतीचा होईल.

नेहा खरे

neha18.mirror@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 12:56 am

Web Title: article on women entrepreneurs
Next Stories
1 खाद्यग्रंथांतील संस्कृती
2 चाकोरीपलीकडे
3 अक्षरानुभव!
Just Now!
X