वानखेडे स्टेडियमबाहेरच काळा बाजार तेजीत; भाव ७०-७५ हजारांपर्यंतही जाण्याची शक्यता
अविश्वसनीय कामगिरी करत भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला. आता भारत-वेस्ट इंडिज सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमबाहेर तिकिटांचा काळा बाजार चांगलाच तेजीत सुरू आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारे मुंबईकर आसुसलेले आहेत. त्यामुळेच या महत्त्वाच्या सामन्याच्या तिकिटांची जोरदार मागणी आहे. काळ्या बाजारात एका तिकिटाचे किमान दर दहा हजार रुपये असून, हा आकडा ५० हजारांपर्यंत उंचावेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बांगलादेशसारख्या संघावर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यावर बऱ्याच जणांना भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचेल, असा विश्वास वाटत नव्हता. त्यामुळे चाहत्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यांच्या तिकिटाकडे जास्त लक्ष दिले नाही; पण ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यावर मात्र काही तासांतच वानखेडेवरील उपांत्य सामन्याची ऑनलाइन तिकिटे संपली.
‘‘काळ्या बाजारात सुनील गावस्कर स्टँडची तिकिटे सर्वात स्वस्त म्हणजे दहा हजार रुपयांना आहेत; पण ही तिकिटे स्टँडमधील खालच्या बाजूची आहेत. खालच्या बाजूला बसल्यावर सामना पाहताना जाळीचा व्यत्यय येत असतो, त्यामुळे हे तिकीट दहा हजार रुपयांना ठेवण्यात आले आहे,’’ असे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या सुलेमानने सांगितले.
सचिन तेंडुलकर स्टँडच्या तिकिटासाठी काळ्या बाजारात १२ हजार रुपये आकारले जात आहे. पश्चिमेकडे असलेल्या विजय र्मचट स्टँडमधील तिकिटांची किंमत १५ हजार रुपये आहे. यामध्ये सर्वात जास्त भाव दिव्हेचा पॅव्हेलियन आणि गरवारे पॅव्हेलियनला आहे.
‘‘मुंबईकर हे क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी काहीही करू शकतात, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तिकिटांचे दर खाली उतरणार नाहीत, उलट सामन्याच्या दिवशी हे भाव अधिक कडाडतील. सध्याच्या घडीला दिव्हेचा पॅव्हेलियनचे तिकीट २५ हजार रुपयांना विकले जात आहे, पण सामन्याच्या दिवशी या तिकिटांचा भाव किमान ३५ हजारांपर्यंत असेल. गरवारे पॅव्हेलियनचे तिकिट सध्या ३५ हजारांना विकले जात आहे, परंतु सामन्याच्या दिवशी ही तिकिटे किमान ५० हजारांपर्यंत जाऊ शकतील. सामन्याचे महत्त्व पाहता, मी हे किमान भाव आत्ताच्या घडीला सांगत आहे, पण कदाचित हे भाव ७०-७५ हजारांपर्यंतही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही,’’ असे सुलेमान म्हणाला. या सामन्याचा साक्षीदार होण्यासाठी तिकिटांना काळ्या बाजारात मोठी मागणी आहे. हा काळाबाजार वानखेडे स्टेडियमबाहेरच होत असून त्याकडे पोलिसांकडून साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळते. काळा बाजार करणारे व्यक्ती स्टेडियमबाहेर रेंगाळणाऱ्या चाहत्यांना थेट तिकिटांबद्दल विचारणा करताना दिसतात. त्यामुळे सामन्याच्या दिवशी तरी अशा अपप्रवृत्तींना आळा घातला जाणार का, हा कळीचा मुद्दा आहे.