विश्वचषकात यशस्वी होण्यासाठी संघनिवड योग्य होणे आवश्यक होते. मात्र ऑस्ट्रेलियाने चुकीच्या पद्धतीने संघनिवड केली आणि त्याचा त्यांना फटका बसला, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने व्यक्त केले. स्पर्धेदरम्यान आरोन फिंच आणि जॉन हेस्टिंग्ज यांना संघाबाहेर ठेवणे अनाकलनीय होते, अशा शब्दांत वॉर्नने आपली नाराजी व्यक्त केली.
‘ऑस्ट्रेलियाकडे गुणी खेळाडूंची मोठी फौज आहे. जिंकण्यासाठी संघ समीकरणे संतुलित होणे आवश्यक असते. ते यंदा दिसलेच नाही. यासाठी प्रशिक्षक डॅरेन लेहमन आणि निवड समिती सदस्य मार्क वॉ जबाबदार आहेत,’ असे वॉर्नने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक क्रमवारीनुसार आरोन फिंच अव्वल क्रमांकांवर असलेला खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाने फिंचला दोन सामन्यांत खेळवण्यात आले नाही आणि तिसऱ्या व चौथ्या सामन्यात संधी दिली. फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या नियमित जोडीने सलामीला यायला हवे होते. फिंचला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयामुळे संतुलन बिघडले. वॉर्नर-फिंच नियमित जोडी आहे. त्यांना एकमेकांबरोबर खेळण्याची सवय आहे. अचानक उस्मान ख्वाजाला सलामीवीराची जबाबदारी देणे योग्य नाही. वॉर्नर-फिंच जोडी प्रतिस्पध्र्याच्या मनात धडकी भरवण्यासाठी पुरेशी ठरली असती. ख्वाजाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायला हवे होते.’जोश हेझलवूडला अंतिम अकरात संधी देण्यावरही वॉर्नने टीका केली आहे. घोटीव यॉर्कर टाकण्याची हेस्टिंग्ची क्षमता उपयुक्त ठरली असती.