12 November 2019

News Flash

तरुणवल्ली : समतोल साधताना…

दीपाली पदवीधर झाली आणि एका बडय़ा कॉर्पोरेट कंपनीत कामाला लागली.

काही लोक वर्चस्व गाजवणारे असतात, तर काही समजून घेणारे. त्याचा परिणाम काय होतो ते आपण आपल्या रोजच्या जगण्यात बघत असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये.

दीपाली पदवीधर झाली आणि एका बडय़ा कॉर्पोरेट कंपनीत कामाला लागली. ऑफिस- नवीन वातावरण, नवीन काम, नवीन जागा आणि नवीन माणसं या नवलाईबरोबर दीपालीला या सगळ्याची सवय होईपर्यंत धास्तीही वाटत होती. सुरुवातीला नवीन जॉब लागलेल्या 40-lp-corporateकुणालाही अशी थोडी भीती वाटणं अगदी साहजिकच आहे! पण तशी अबोल, कष्टाळू, शांत स्वभावाची दीपाली हळूहळू नवीन ऑफिसमध्ये ओळख करून घेऊ लागली. बाकीच्यांशी ओळख करून घेण्याआधी तिची तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. आधीच जरा टेन्शनमध्ये असलेल्या दीपालीच्या नशिबात टेंशन देणारा अजून एक घटक आला:- ‘एक रागीट बॉस’! खरे तर ‘बॉस’ या नावातच एक ‘आदरयुक्त भीती’ दडलेली असते, पण बरेचदा बॉसच्या ‘बॉसगिरीमुळे’ त्यातला आदर जाऊन उरते ती नुसतीच भीती!! तसंच काहीसं दीपालीचं तिच्या बॉसमुळे होऊ लागलं आणि शांत, अबोल असलेली बिचारी दीपाली भीती आणि दरारा यांच्या ओझ्याखाली येऊ लागली. अगदी पहिल्या एक-दोन दिवसांतच तिच्या ‘छोटय़ा’ चुकीवरून तिला ‘मोठा’ ओरडा मिळाला; सगळ्यांच्या समोर ही गोष्ट घडल्याने तिचा आधीच कमी असलेला आत्मविश्वास अधिकच ढासळला. पुढे याच भीतीमुळे साध्या साध्या गोष्टींतसुद्धा तिच्याकडून चुका व्हायला लागल्या. साहजिकच याचा परिणाम म्हणून तिला (शांतपणे बसवून चुका समजावून शिकवण्याऐवजी) ‘रागीट बॉसचा’ रुद्रावतार बघावा लागला! नुकताच लागलेला चांगला जॉब तिला सोडायचा नव्हता आणि बॉसबद्दल तक्रार करण्याची तिच्यात हिंमत नव्हती. अशा परिस्थितीला शरण जाऊन तिने बॉसच्या बॉसगिरीपुढे हार मानली आणि मुकाटय़ाने त्याचा ओरडा, अपमान सहन करत राहिली. हे दीपालीचं उदाहरण काही आपल्याला नवीन नाही. अशा अनेक दीपाली आणि बॉसच्या जोडय़ा आपल्याला आपल्या आजूबाजूला सतत बघायला, ऐकायला मिळत असतात आणि कधीकधी आपणसुद्धा दीपाली किंवा तिच्या बॉसच्या भूमिकेत असतो!

पण नेहमी हे उदाहरण ‘ऑफिसमधला बॉस आणि त्याच्या /तिच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी’ या रूपातच असेल, असं नाही, कारण ‘डॉमिनेटिंग आणि सबमिसिव्ह’ हे दोन व्यक्तिमत्त्वाचे प्रकार आहेत. ‘एक जंगल में एकही शेर होता है!’ तसंच एका नात्यात या दोन व्यक्तिमत्त्वांचा चांगला मेळ साधण्यासाठी दोघंही डॉमिनेटिंग किंवा सबमिसिव्ह असून चालत नाही. बरेचदा नात्यातील एक व्यक्ती डॉमिनेटिंग (वर्चस्व दाखवणारी) असते, तर दुसरी सबमिसिव्ह (समजून घेणारी). तर कधीकधी हे रोल (भूमिका) बदलत असतात. एका प्रसंगात डॉमिनेटिंग असलेला माणूस दुसऱ्या प्रसंगात सबमिसिव्ह होऊ शकतो. ऑफिसमध्ये कुणाला सांगून खरं नाही वाटणार, पण हा दीपालीचा ‘बॉस’ घरी बायकोसमोर मात्र लाचार नवऱ्यासारखा वागतो म्हणे! घरी बायको म्हणेल ती ‘पूर्व दिशा’ असा नियम आणि ऑफिसमध्ये मात्र हिटलरसारखा वागणारा माणूस एकच व्यक्ती आहे यावर विश्वास ठेवणं खरंच कठीण आहे. एकाच माणसाच्या इतक्या विरुद्ध दोन बाजू कशा असू शकतात हे कोडं पडणं साहजिक आहे; पण विचार केला तर उत्तर या प्रश्नातच सापडतं बरेचदा! आपला स्वभाव आणि आपलं व्यक्तिमत्त्व यांचा खूप निकट संबंध असतो. या दोन्ही गोष्टी सहसा बदलत नाहीत. एका विशिष्ट वयानंतर या गोष्टींमध्ये बदल घडून येणं फारच कठीण असतं, पण बदलत असतं ते आपलं वर्तन- जरी आपल्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्त्वाला धरून आपलं वर्तन असलं तरी परिस्थिती, काळ-वेळ, आजूबाजूची माणसं यावरसुद्धा आपलं त्या वेळचं वागणं अवलंबून असतं!! दीपालीच्या बॉसचा खरा स्वभाव फार रागीट किंवा डॉमिनेटिंग नाही; पण त्याच्या बायकोचा स्वभाव मात्र फार डॉमिनेटिंग आहे. तिला तिच्या कामात बाकी कुणी लुडबुड केलेली आवडत नाही, त्यामुळे ‘‘बॉस असशील तो ऑफिसमध्ये, घरी मात्र मीच ‘बिग बॉस’ आहे हे विसरू नको’’ असे डायलॉगसुद्धा त्याला कधीकधी ऐकावे लागतात. त्यामुळे त्याच्यासाठी आपलं म्हणणं लोकांना ऐकायला लावायचं हक्काचं ठिकाण म्हणजे त्याचं ‘ऑफिस!’ तिथे त्याच्या पोस्टमुळे तरी त्याला लोकांवर हक्क गाजवता येतो. त्यातही तो त्याच ऑफिसमध्ये ज्युनिअर होता तेव्हा त्याचा आधीचा बॉस रागीट आणि असाच फटकळ स्वभावाचा होता. त्यामुळे आधी तेव्हा दीपालीच्या बॉसला ‘सबमिसिव्ह’ राहावं लागत होतं. त्यामुळे आता तो बॉस झाल्यापासून एका प्रकारची ‘कॉम्पेन्सेशन’ स्ट्रॅटेजी त्याच्या वागण्यात दिसून येत आहे. आधीच्या बॉसची जागा घेताना त्याच्यासारखं जरा शिस्तीचं वागलो नाही तर लोक आपल्याला मिळमिळीत बॉस म्हणतील आणि आपला गरफायदा घेतील असा त्याचा समज!  आणि एवढे र्वष घरात आणि ऑफिसमध्ये ‘सबमिसिव्ह’ भूमिका घेतल्याने तो दाबून ठेवलेला राग, नाराजी या नवीन बॉसच्या भूमिकेतून, त्याच्या वागण्यातून बाहेर येत आहे. त्यातही नवीन कामाला लागलेले शिकाऊ म्हणजे बॉसगिरी करायला अजूनच वाव- त्यामुळे दीपालीला बॉसच्या अशा वागण्याला समोरं जावं लागतंय..

पण दीपालीचा स्वभाव मात्र यापेक्षा वेगळा. सगळ्याच नात्यांमध्ये तिची ‘नम्र’ भूमिका असते. घरी पालकांसमोर, कॉलेजमध्ये शिक्षकांसमोर, बाहेर मित्रमत्रिणींसमोर आणि आता तर ऑफिसमध्ये बॉससमोरसुद्धा दुसऱ्याचं ऐकून घेणारी, वर्चस्व स्वीकारणारी दीपाली ‘सबमिसिव्ह’ व्यक्तिमत्त्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. स्वत:हून निर्णय घेण्यापेक्षा समोरच्याने घेतलेला निर्णय मान्य करून त्याप्रमाणे ती वागते. काही पटलं नाही तर लगेच समोरच्याला तसं तोंडावर सांगणं तिला जमत नाही आणि कुठल्याही प्रसंगात वाद टाळणं दीपालीला चांगलं जमतं! कधीकधी अशा वागण्याचा परिणाम ‘कमी आत्मविश्वासामध्ये’ होऊ शकतो. डॉमिनेटिंग (वर्चस्व गाजवणारा) आणि सबमिसिव्ह (नम्र) यापकी दोन्ही व्यक्तिमत्त्वांमध्ये काही चूक किंवा बरोबर नाही. कुठल्याही ठिकाणी, प्रसंगात काम सुरळीत आणि व्यवस्थित होण्यासाठी अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचा समतोल असणं आवश्यक असतं. ऐकून फॉलो करणारं कुणी नसेल तर फक्त नियम आणि प्लान्स बनवण्याला काही अर्थ नाही; तसंच निर्णय घेण्याची क्षमता किंवा आत्मविश्वास नसलेल्या व्यक्ती फक्त एकत्र काम करत असतील तर त्या कामाची दिशा ठरवायला आणि सिद्धीस न्यायला फार कठीण जाईल!! त्यामुळे यापकी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आणि संपूर्ण अभाव या दोन्ही गोष्टी घातक आहेत. समतोल साधण्यामध्येच समाधान आणि यशाची गुरुकिल्ली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही! तसंच भूमिका, वेळ, प्रसंगानुरूप या दोन्ही व्यक्तिमत्त्व शैलींचा हुशारीने वापर करणं योग्य असलं तरी आपलं वर्तन दोन टोकांचं असू नये, कारण तसं वागणं आपल्यालाही कठीण जातं आणि त्यामध्ये ‘कॉम्पेन्सेशन’ स्ट्रॅटेजीचा जास्त वापर होत असेल तर असं वर्तन फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतं; याची काळजी घेणं आवश्यक आहे. अखेर कधी आपण बॉस, कधी चाकर, कधी डॉमिनेटिंग आणि कधी सबमिसिव्ह राहणं आपल्या फायद्याचं आहे हे ज्याचं त्यालाच चांगलं माहिती असतं! तराजूचं कुठलं पातं कधी जड, कधी हलकं आणि कधी दोन्ही बरोबरीची असणं आवश्यक असतं; फक्त ते आपल्याला योग्य वेळी समजणं अधिक आवश्यक आहे…
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com

First Published on May 27, 2016 1:12 am

Web Title: keeping a balance in your behavior
टॅग Behavior,Youthfull