23 January 2018

News Flash

एक्स

आज धड प्रौढही नाही आणि धड तरुणही नाही

अमोल उदगीरकर | Updated: June 24, 2017 4:05 AM

आज धड प्रौढही नाही आणि धड तरुणही नाही अशा त्रिशंकू अवस्थेत लटकलेल्या पिढीचं सामाजिक माध्यमांचं आकर्षण आपल्या ‘एक्स’ला इथं पुन्हा पाहता येईल या आशेतून आलं होतं.. फेसबुकवरचा ‘पीपल यू मे नो’ हा कॉलम काही लोकांसाठी खूप क्रूर आणि काही लोकांसाठी सुखद नॉस्टॅल्जिया जागवणारा असू शकतो. तिथे काहीवेळा असा एखादा चेहरा दिसू शकतो जो तुमच्या दफन केलेल्या एकेकाळच्या त्रासदायक आठवणींना सोडय़ासारखा फसफसून वर आणतो.. हे सगळे पुरुष कधी आपल्या ‘एक्स’ नावाच्या भूतकाळातून बाहेर आलेलेच नाहीत. बायका या ‘कॉम्प्लेक्स’ असतात, असं विधान करता करता आपण त्यांच्यापेक्षा दहापट ‘कॉम्प्लेक्स’ बनत चाललो आहोत हे त्यांना कधी आकळतच नाही.

फेसबुकवर उनाडक्या करताना ‘पीपल यू मे नो’च्या कॉलमकडे त्याची नजर गेली. तिथं एक ओळखीचा फोटो झळकत होता. बायको किचनमध्ये आहे याची खात्री करून घेतली आणि त्याने प्रोफाइलवर क्लिक केलं. ‘थोडी जाड झालीये पण डोळ्यांमधली वीज तशीच आहे अजून. नवरा तर निव्वळ माकडासारखा दिसतोय. काय बघितलं असेल तिने त्याच्यात? तशी तिची आवड निवड वाईटच आहे. पण आपण पण कधी काळी हिची आवड होतोच की.’ अशा अनेक भावभावनांचा कोलाज त्याच्या मनात दाटून आला. एक मात्र नक्की असतं आजचा दिवस रोजच्यासारखा नसणार असतो. आता त्याच्या या दिवसाचे किंवा पुढच्या काही संध्याकाळच्या कातरवेळांचे मायनेच बदलून जाणार असतात.

फेसबुकवरचा ‘पीपल यू मे नो’ हा कॉलम काही लोकांसाठी खूप क्रूर आणि काही लोकांसाठी सुखद नॉस्टॅल्जिया जागवणारा असू शकतो. तिथे काहीवेळा असा एखादा चेहरा दिसू शकतो जो तुमच्या दफन केलेल्या एकेकाळच्या त्रासदायक आठवणींना सोडय़ासारखा फसफसून वर आणतो किंवा काही सुखद आठवणींना उजाळा देऊ  शकतो. अगदी दोन परस्परविरोधी शक्यता या आठवणींना जागृत करणारी किंवा अनेक असतील तर करणाऱ्या स्त्रिया (ज्यांना समदु:खी मित्रांच्या ओल्या पाटर्य़ामध्ये आम्ही अजूनही मुलीच म्हणतो) या आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचं तर आमच्या ‘एक्स’.

‘एक्स’ हा शब्द सध्या आपल्याकडे चांगलाच रुळला आहे. सध्याची कॉलेज गोइंग पिढी हा शब्द एकदम सहजपणे वापरत असते. ज्याच्यासोबत आपण एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होतो अशी ती किंवा तो म्हणजे आपला ‘एक्स’ अशी या ढोबळमानाने व्याख्या करता येईल. पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात जन्मलेल्या मुलांसाठी या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. आम्ही ज्यांच्यावर एकतर्फी प्रेम केलं त्यांना पण दडपून ‘एक्स’च म्हणतो. त्या पिढीतल्या बहुतांश पुरुषांनी शाळेत पण प्रेम केलेलं असतंच. फक्त त्या प्रेमाला कधी शब्दच मिळालेले नसतात. त्या काळात कमी असलेलं ‘को-एड’चं प्रमाण, वयात येत असणारे मुलं आणि मुली यांनी एकमेकांशी कसं वागावं यावर असणारे प्रचंड सामाजिक र्निबध, मुलीच्या भावाच्या हातचा मार खाण्याची भीती, ती आपल्याला भावच देणार नाही, असा भयगंड अशा अनेक वैयक्तिक आणि सामाजिक कारणांमुळे अनेक प्रेमकथा गर्भावस्थेतच मारल्या जायच्या. काही हिंमतवान प्रेमवीर धाडसाने गृहपाठाची वही मागणे, वाढदिवसाला विश करणे किंवा थेट ‘लवशिप देणार का’ असा सवाल करण्याचे धारिष्टय़ करायचे. त्यांच्या प्रेमकथांचा दुर्दैवी अंत शाळेतून रस्टीकेट होणे, मुलीच्या भावाच्या हातून बेदम मारहाण होणे किंवा शहरच सोडून जावं लागणे अशा ट्रॅजेडीमध्ये व्हायचा. त्यामुळे माझ्यासारख्या नव्वदीच्या दशकात वाढलेल्या अनेकांच्या भावना या मनातच राहून गेलेल्या. नंतर अनेकांनी शिक्षणासाठी घरदारं सोडली. रोजीरोटीच्या नादात शहरं आणि गावं बदलली. अनेकांचा आर्थिक स्तर बदलला. आयुष्यातले लोक बदलले. पण हे सगळं अव्यक्त कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात दबा धरून बसलेलं होतं किंवा आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या मेल आयडीच्या पासवर्डमधून तगून होतं. ‘फेसबुक’ आणि ‘ऑर्कुट’ ही सामाजिक माध्यमंही आमच्या पिढीसाठी निव्वळ एक कोरडी माध्यम क्रांती नव्हती. आज तिशी आणि चाळिशीमध्ये असणाऱ्या आणि धड प्रौढही नाही आणि धड तरुणही नाही अशा त्रिशंकू अवस्थेत लटकलेल्या आमच्या पिढीच्या बहुतेक लोकांचं या सामाजिक माध्यमांचं आकर्षण या आपल्या ‘एक्स’ला इथं पुन्हा पाहता येईल या आशेतून आलं होतं. या पिढीच्या बहुतेक लोकांचा ऑर्कुट किंवा फेसबुकवरचा पहिला सर्च या ‘एक्स’चा होता. मुलींची आडनावं लग्नानंतर बदलणं ही प्रथा खूप अन्यायकारक आहे यावर नव्वदच्या दशकात वाढलेल्या पुरुष पिढीचं जात-धर्म-राज्यांच्या भिंती तोडून एकमत आहे. जिला प्रत्यक्षात शेवटचं बघून पण एक दशक लोटलं, ती ‘एक्स’ सोशल मीडियावर पुन्हा सापडल्यावर भावभावनांचा संमिश्र कोलाज तयार झाला. एकाच बोटीवरचे दोन प्रवासी, बोट फुटल्यावर प्रवाहामध्ये गटांगळ्या खात एकमेकांपासून दूर जातात आणि नंतर एकाच किनाऱ्यावर लागतात या थोडय़ा भाबडय़ा आणि फिल्मी प्रसंगाशीच या ‘एक्स’ भेटीची तुलना होऊ  शकते. या ‘व्हच्र्युअल’ आणि बहुतेक वेळी एकतर्फी असणाऱ्या भेटीला ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या न्यायाने पुरुषांनी वेगवेगळे भावनिक प्रतिसाद दिले. काही लोकांना आपल्या ‘एक्स’ला बघून खूप आनंद झाला. पण ते तितकंच. तो आनंद पचवून ते आयुष्याच्या घाण्यात पुन्हा शिरले. काही लोकांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याची हिंमत केली. काहींच्या रिक्वेस्ट स्वीकारल्या गेल्या, काही आभासी जगाच्या कचऱ्याच्या डब्यात गेल्या. काही फोननंबरची पण देवाणघेवाण झाली.

यातही माझ्या एका मित्राचा किस्सा थोडा अस्वस्थ करून जाणारा आहे. त्याचं शाळेत असताना एका मुलीवर प्रेम होतं. राजकीय पक्षांचे समर्थक आणि प्रेमवीर यांच्यात एक साम्य असतं. ते अगोदर बाण मारून नंतर त्याभोवती वर्तुळ काढत बसतात. थोडक्यात आपल्याला सोयीस्कर अर्थ काढतात. या माझ्या मित्राने पण असंच एक सोयीस्कर वर्तुळ काढलं होतं. ती मुलगी पण आपल्यावर प्रेम करते असा समज त्याने करून घेतला होता. अर्थातच छोटय़ा शहरांच्या बंदिस्त आणि कोंदट वातावरणात त्याला पण आपल्या भावना कधीच व्यक्त करता आल्या नाहीत. काही वर्षांनी फेसबुकवर त्याला त्याची ‘एक्स’ भेटली. त्याची हुरहुर वाढली. फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पाठवण्याचे सोपस्कार पार पाडल्यावर त्याने ‘ओळखलंस का मला?’ अशा अर्थाचा मेसेज केला. तिचं एकाक्षरी थंड उत्तर आलं, ‘नाही’. आणि हा माझा मित्र कोसळलाच. अज्ञातात तो सुखी होता. आज ते अज्ञानाचं छप्परच उडून गेलं होतं. हा किस्सा ऐकून मला ‘सदमा’चा अजरामर शेवट आठवला.

माझा एक गावाकडचा मित्र वर्षांतले काही दिवस अस्वस्थ असतो. त्याच्या समोरच राहणारी त्याची ‘एक्स’ वर्षांतले काही दिवस माहेरी येते तेव्हा तो कावराबावरा होतो आणि कॉर्नरवरच्या पानटपरीवर स्वस्त सिगरेटी फुंकत जास्तीत जास्त वेळ काढतो. तिच्या मुलाला चोरून लांबून न्याहाळतो. आणखी एक ऑफिसमधला सहकारी आठवतो. त्याने आपल्या मुलीचं नाव आपल्या ‘एक्स’वरून ठेवलं होतं. आपल्या ‘एक्स’ला जळवण्यासाठी सोशल मीडियावर आपल्या ‘आनंदी’ आयुष्याचे प्रदर्शन मांडून बसलेला आणखी एक मित्र आठवतो. हे सगळे पुरुष कधी आपल्या ‘एक्स’ नावाच्या भूतकाळातून बाहेर आलेलेच नाहीत. बायका या ‘कॉम्प्लेक्स’ असतात असं विधान करता करता आपण त्यांच्यापेक्षा दहापट ‘कॉम्प्लेक्स’ बनत चाललो आहोत हे त्यांना कधी आकळतच नाही. समोरच्या बाईला गृहीत धरून आणि तिला खलनायक बनवण्याचा प्रयत्न करता करता आपण हास्यास्पद बनत जातो, हे एक तर त्याला कळत नसावं किंवा कळवून घेण्याची त्याची इच्छा नसावी. भारतीय पुरुष हा ‘देवदास सिंड्रोम’ मनापासून एन्जॉय करणारा. दारू  पीत किंवा सिगरेट ओढत ‘एक्स’च्या नावाचे कढ काढायला त्याला मनापासून आवडतं. जोपर्यंत ही त्याची गरज राहील तोपर्यंत हा ‘एक्स’ नावाचा कल्ट वाढतच राहील हे नक्की.

मी एक सर्जनशील म्हणवून घेणारा माणूस म्हणून या ‘एक्स’च्या काचेच्या बुटात पाय घालून विचार करण्याचा प्रयत्न करतो. त्या पण कधी ‘त्याला’ सोशल मीडियावर सर्च करण्याचा प्रयत्न करत असतील का? ‘त्याला’ जळवण्यासाठी आपल्या संसारातल्या ढीगभर सुखाचं प्रदर्शन करत असतील का? एखादीच्या पासवर्डमध्ये त्याचं नाव लपलेलं असेल का? एखाद्या पावसाळी संध्याकाळी नवऱ्यासोबत गरम गरम कांदा भजी खाताना त्यांना त्याची आठवण येत असेल काय? किशोर कदमच्या ‘बघ माझी आठवण येते का’चं एखादं फीमेल व्हर्जन असेल का? पण मग जाणवतं की या प्रश्नांची उत्तरं शोधणं निर्थक आहे. दगडावर पाणी ओतत राहण्याइतकंच निर्थक. हा ज्याचा त्याचा आपापला समुद्र आहे. आपला आपल्याच पोहून जावा लागतो. उगी उत्तरांचा डेटा जमवून त्याचं विश्लेषण करत बसण्यात काहीच स्वारस्य नाही. इथून आलेल्या उत्तरातून काही नियम तयार झाले तर त्या नियमांचा व्यत्यास पण तितकाच खरा असेल.

अमोल उदगीरकर

amoludgirkar@gmail.com 

First Published on June 24, 2017 4:05 am

Web Title: article by amol udgirkar
  1. No Comments.