दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, ज्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या किंमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे खर्चाचे गणित सांभाळत महिन्याचं बजेट ठरवण्यात खरी कसरत असते. त्यात काही गोष्टी या जीवनावश्यक गोष्टींप्रमाणे महत्वाच्या असतात. रिचार्ज प्लॅन हा देखील त्याचाच एक भाग. पण इतर गोष्टींप्रमाणे रिचार्ज प्लॅनच्या किंमती देखील वाढल्या आहेत. अशात कॉलिंग आणि डेटासाठी कोणता रिचार्ज प्लॅन स्वस्त आहे, याचा शोध प्रत्येकजण घेत असतो.

रिचार्ज प्लॅनच्या रोज वाढत्या किंमतींमध्ये कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक आकर्षक प्लॅन्सच्या ऑफर जाहीर केल्या आहेत. जिओ आणि एअरटेल यामध्ये आघाडीवर असल्याचे म्हणता येईल. पण आता जिओ आणि एअरटेल वगळता आणखी एका कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ही चर्चा आहे बीएसएनएलच्या नव्या रिचार्ज प्लॅनची. यामध्ये केवळ ३२१ रुपयांमध्ये संपुर्ण वर्षासाठी कॉलिंग आणि डेटा उपलब्ध होणार आहे.

आणखी वाचा – फेसबूक आणि इन्स्टाग्राम वापरा तुमच्या आवडत्या भाषेत; या स्टेप्स वापरून लगेच करा बदल

बीएसएनएलचा हा नवा रिचार्ज प्लॅन केवळ पोलीस अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. सध्या कंपनीने हा प्लॅन तमिळनाडूमधील पोलीस अधिकाऱ्यांसाठी लाँच केला आहे. या ३२१ रुपयांच्या प्लॅनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग सेवा उपलब्ध आहे. परंतु पोलीस अधिकाऱ्यांना केवळ इतर पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतानाच यां अनलिमिटेड कॉलिंग सेवेचा लाभ घेता येईल. म्हणजेच हा प्लॅन फक्त पोलीस अधिकाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे.

आणखी वाचा – मोबाईलमधला इंटरनेट डेटा लगेच संपतोय? ‘या’ ट्रिक्स वापरा नक्की होईल बचत

या रिचार्ज प्लॅनमध्ये एसएमएस सेवा देखील उपलब्ध आहे. प्रत्येक महिन्याला २५० एसएमएस करता येतात. कोणत्या दुसऱ्या नंबरवर जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी एखादा दुसरा रिचार्ज प्लॅन विकत घ्यावा लागेल. यात इनकमिंग कॉल वर्षभरासाठी सुरू असेल. फक्त ३२१ रुपयांचा हा प्लॅन सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक आहे. पण हा प्लॅन सध्या केवळ तमिळनाडूमधील पोलीस अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.