अनेक फीचर्स असणाऱ्या स्मार्ट वॉचचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध कंपन्यांची स्मार्ट वॉचेस बाजारात उपलब्ध आहेत. हे स्मार्ट वॉच तुमच्या आरोग्याची काळजीही घेत असतं. तुम्ही रोज पायी किती चाललात, किती कॅलरीज खर्च झाल्या, हृदयाचे ठोके, रक्तदाब किती आहे यांची माहिती वेळोवेळी देत असतं. मात्र, अॅपलचं स्मार्ट वॉच (Apple Smart Watch) यापेक्षा थोडं वेगळं आहे. त्यातील एका खास फीचरमुळे अनेकांचा जीव वाचल्याच्या अनेक घटना आपण आजवर ऐकल्या आहेत. नुकतीच अॅपल वॉचमुळे एका भारतीय तरुणीचा जीव वाचल्याची घटना घडली आहे.
दिल्लीस्थित धोरण संशोधक स्नेहा सिन्हा हिनं तिचा जीव वाचवल्याबद्दल ‘ॲपल वॉच ७’चे आभार मानले. डिव्हाइसवरील हार्ट रेट नोटिफिकेशन फीचरनं तिला प्रतिमिनीट २५० पेक्षा जास्त हार्ट बीट्स म्हणजेच हृदय उच्च गतीनं धडधडत असल्याचा इशारा दिला.होता. हे ‘ॲपल वॉच ७’ स्नेहाला भेटवस्तू म्हणून देण्यात आलं होतं; जे तिच्यासाठी देवदूत ठरलं आहे. तरुणी म्हणाली, “मला ॲपल वॉचनं उच्च हृदय गतीबद्दल सावध केलं नसतं आणि मला डॉक्टरांना भेटण्याचा आग्रह केला नसता, तर तरुणी वैद्यकीय मदत घेण्यासाठी सकाळपर्यंत थांबली असती, असं तिनं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा…Apple आयपॅड पुन्हा होणार स्टेटस सिम्बॉल; मोठा डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, कंपनी ‘या’ दिवशी करणार घोषणा
तर प्रसंग असा घडला की, तरुणी नेहमीच्या वेळेत घरी परत आली तेव्हा तिचे हार्ट बीट्स सामान्य वेगापेक्षा जलद होऊ लागले आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वा तपासण्यासाठी तिनं ॲपल वॉच वापरलं. वारंवार तपासून आणि ईसीजीनं उच्च हृदय गती दर्शविली असूनही तरुणी दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करीत होती. सुरुवातीला तरुणीनं हे सर्व गांभीर्यानं घेतलं नाही. जेव्हा १.५ तासापेक्षा जास्त काळ असंच सुरू राहिलं, तेव्हा ईसीजीनं ॲट्रियल फायब्रिलेशन (एएफआयबी)ची सुरुवात दर्शविली. ॲट्रियल फायब्रिलेशन हा हृदयाच्या ठोक्याशी संबंधित आजार आहे. अनेकदा जलद हृदय गती अशा रीतीनं उदभवते तेव्हा स्ट्रोक, हृदयाशी संबंधित इतर गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो.तेव्हा तरुणीनं वैद्यकीय मदत घेण्याचं ठरवलं आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तिनं मित्राला बोलावलं. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार झाले आणि डॉक्टरांनी माझ्या पालकांना कळवलं आणि अशा प्रकारे वेळीच ॲपल वॉचनं स्मार्ट वर्क केलं.
अन् टिम कूकचा आला ई-मेल
हा प्रसंग घडल्यानंतर स्नेहानं ॲपलचे सीईओ टिम कूक आणि ॲपल वॉच टीमशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. कारण- स्मार्ट वॉचचं हे फीचर विकसित केल्याबद्दल तिला मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची होती. तर पुढे घडलं असं की, तरुणीनं ही गोष्ट ॲपल टीमबरोबर शेअर करताच काही तासांतच ॲपलचे सीईओ टिम कूक यांचा ई-मेलवर मेसेज आला. त्यात असं लिहिलं होतं, “मला खूप आनंद झाला की, तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घेतली आणि तुम्हाला आवश्यक उपचार मिळाले. तुमचा हा प्रसंग आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद”, असं त्यात लिहिलं होतं. आज ॲपल वॉचनं हे पुन्हा दाखवून दिलं आहे की, तंत्रज्ञान लोकांचा जीव कसं वाचवू शकतं.